‘स्त्री म्हणजे काय आहे?’ या प्रश्नाचे एका शब्दात उत्तर देता येईल. स्त्री म्हणजे एक ‘अजूबा’ आश्चर्य आहे. परमेश्वराची अजोड निर्मिती आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय या निसर्गाच्या परिचक्रातील पहिली महत्त्वाची गोष्ट. उत्पत्ती – म्हणजे एखादी गोष्ट निर्माण होणे. स्थिती – म्हणजे पृथ्वीवरील एखाद्या गोष्टीचे अस्तित्व आणि तिसरी स्थिती – लय म्हणजे एखादी गोष्ट संपून जाणे, विलय पावणे, मृत्यू. सर्व सृष्टी या परिचक्राला बांधलेली आहे. परंतु यातील – निर्मिती, उत्पत्तीची ताकद महत्त्वाची आहे. या मर्थ्यातूनच जग निर्माण झाले आहे. ते निर्माण होण्यासाठी स्त्री बीज आणि पुरुष बीज दोन्हीची आवश्यकता आहे. दोन्ही सारखेच महत्त्वाचे आहे. परंतु प्रत्यक्ष निर्मितीची ताकद, सामर्थ्य आणि क्षमता निसर्गाने स्त्रीत्वाला म्हणजे मादीला दिली आहे. निसर्गातील निर्मितीच्या आणि संगोपनाच्या दैवी शक्तीचा साक्षात्कार माणसाला प्रथम स्त्रीमध्येच झाला होता. स्त्रीच – आदिमाता होती. लक्ष्मी, सरस्वती, शारदा, काली, चंडिका आणि प्रसंगी महिषासुर मर्दिनी ही सर्व स्त्री सामर्थ्याचीच वेगवेगळी प्रतीकात्मक रूपे आहेत.
अपत्याला जन्म देणे, स्तनपानाने त्याचे पोषण करणे, त्याला वाढवणे, स्वतंत्रपणे स्वतःचे जीवन जगण्यास समर्थ करणे, हे सर्व माता म्हणून स्त्री काटेकोरपणे करतेच. परंतु केवळ जननक्षमता म्हणजे स्त्री नव्हे. स्त्रीच्या सामर्थ्यामधील ही निसर्गदत्त एक बाजू आहे. परंतु त्याबरोबर स्त्रीला प्रेमळ मन, माया, स्नेह जिव्हाळ्याने भरलेले अंतःकरण दिले आहे. बारीक, दिली सूक्ष्म नजर आहे. संत तुकारामांनी स्त्रीचे व बालकाचे वर्णन केले आहे. ‘घार हिंडते आकाशी, चित्त तिचे माता पिल्लापाशी। गुंतली कामासी चित्त तिचे बाळापाशी।।’ एवढेच नव्हे तर आईची माया ‘उणे लिंपणारी’ असते. जे मूल अशक्त असेल, ज्याला जास्त गरज असेल त्याच्याकडे आईचे जास्त लक्ष असते. प्राण्यांमध्ये सुद्धा कमकुवत पिल्लांची आई जास्त काळजी घेते. हा स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा असला तरी स्त्री एवढीच नाही. बुद्धिमत्ता, सतत कार्यमग्र राहण्याची वृत्ती, क्षमता, कल्पनाशक्ती, प्रतिभा, सौंदर्यदृष्टी, प्रयोगशीलता… सारे काही स्त्रीमध्ये आहे. सुग्रणपणा आणि घराचा साक्षेप स्त्रीचा स्थायी भाव आहे. म्हणूनच घराचे ‘घरपण’ स्त्रीवर अवलंबून असते.
मानवी संस्कृतीतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृषी – शेती. या शेतीचा शोध स्त्रीने लावला. आपल्या झोपडी भोवतालची जमीन हातातल्या ‘खननयष्टी’ (Digging Stick) ने जमीन नांगरून स्त्रीने शेती सुरू केली. भाजीपाला, फळझाडे लावू लागली. भात पाखडून तांदुळ करणे, डाळी करणे, दळणे या गोष्टींबरोबर मातीची भांडी करणे, टोपल्या, रोवळ्या करणे, वस्त्र विणणे. या सर्व गोष्टी स्त्रीने आपल्या प्रज्ञेतून, प्रयोगशीलतेतून घडवल्या, विकसित केल्या. एकमेकांना धरून राहणे, परस्परात प्रेम, स्नेह वाढवून नाते निर्माण करणे हा तर स्त्रीचा स्वभावच होता. याबरोबर कमालीचा कणखरपणा, चिवटपणा, निसर्गाने स्त्री पिंडात पेरला नाही, तर दाबून बसवला आहे. हीच स्त्रीची आत्मशक्ती आहे. या आत्मशक्तीच्या जोरावरच स्त्री जीवनातल्या सर्व आघाड्या, स्थित्यंतरांना सामोरी जाते. विचार केला की समजेल. एका घरात स्त्री जन्म घेते. मातापित्यांच्या प्रेम, मायेत मोठी होते. विवाह करून दुसऱ्या घरात जाते. म्हणजे जणू ‘जन्मभूमीतून’ कर्मभूमीत’ जाते. मनात माहेरची ओढ असली तरी सासरच्या जीवनात एकरूप होते. स्त्रीचे केवळ नाव बदलत नाही, तर तिच्या जगण्याचा संदर्भ बदलतो. दिशा बदलते. स्त्री आत्मशक्तीच्या जोरावरच नवीन जीवन, घर, नाती आपलीशी करते. जीवनाच्या जगण्याच्या, अस्तित्वाच्या बदलत्या आयामाला स्त्री सकारात्मकतेने सामोरी जाते. अंतःकरणात तेवत असणारी आत्मशक्ती, कणखरपणाच स्त्रीला जीवनात प्रेरणा देत असतो. प्रतिकूल परिस्थितीत, संकट प्रसंगी हीच स्त्रीची आत्मशक्ती, कणखरपणा नागाने फणा काढावा तसा अधिक विकसित व जागरुक होतो. म्हणूनच साने गुरुजींनी ‘श्यामची आई’ पुस्तक लिहिले. ‘मदर इंडिया’ चित्रपट निघाला. यातूनच सारे व्यक्त होते.
या आत्मशक्तीच्या स्थायीभावाबरोबर जिद्द, चिवटपणा, मनाने एखादी गोष्ट करायची ठरवली की ती करणे, ही तर स्त्रीच्या मनाची धारणा आहे. त्या जोडीला बुद्धिमत्ता, प्रतिमा, सौंदर्यदृष्टी आहेच. सांस्कृतिक परिवर्तनाच्या स्थित्यंतराच्या, पुरुषप्रधान संस्कृतीच्या दीर्घकाळात स्त्री व स्त्रीच्या क्षमता दडपल्या गेल्या होत्या. अनेक रूढी, संकेतांनी स्त्रीच्या विकासाचा मार्ग खुंटला होता. किंबहुना आपल्या नैसर्गिक क्षमतांची जाणीव स्त्री स्वतःच जणू विसरली होती.
परंतु गेल्या दोन शतकातील घडणाऱ्या घटनांतून, सामाजिक, सांस्कृतिक स्थित्यंतरातून वातावरण बदलत आहे. स्वतःच्या विकासाची संधी स्त्रियांना मिळत गेली. एक एक दार उघडत गेले. कस्तुरी मृगाला त्याच्या जवळच्या कस्तुरीची, ओळख नसते. तशीच काहीशी स्थिती स्त्रीची होती. पण एक महत्त्वाचा फरक होता. स्त्री अज्ञानी होती. शिकलेली नव्हती. पण अजाण, अडाणी नव्हती. स्वक्षमतांची तिची तिलाच ओळख नव्हती. पण त्या सर्व क्षमता तिच्या व्यक्तिमत्त्वात सुप्तावस्थेत होत्या. योग्य अवसर, संधी मिळाल्यावर स्त्रीच्या क्षमता फुलल्या, विकसित झाल्या. स्त्रीला आत्मभान आले. स्त्रीची आत्मशक्ती जागृत झाली, स्वक्षमतांची जाणीव झाली, तसा स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाचा पट नव्याने उलगत गेला. स्त्रीच्या कर्तृत्वाचे क्षेत्र साकार होऊ लागले. स्त्रिया संघटित होत आपल्या हक्क व अधिकारांसाठी लढायला सिद्ध झाल्या. पाश्चात्य देशात स्त्रियांनी मतदानाच्या अधिकारासाठी उभे केलेले ‘सफ्रेजेट आंदोलन’ स्त्रियांच्या संघभावनेचे, लढाऊवृत्तीचे व चिवटपणाचे प्रतीक आहे. स्त्रियांना समान प्राथमिक शिक्षण मिळावे म्हणून पुण्यात शंभर वर्षांपूर्वी स्त्रियांनी रमाबाई रानडे आणि जानाका शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठा मोर्चा काढला होता. एकोणिसाव्या शतकातील अमेरिकेच्या ‘क्रिमियन वॉर च्या (Crimean war) वेळेला जखमी सैनिकांची सेवा, सुश्रुषा करण्यासाठी फ्लोरेन्स नायटिंगेल आत्मप्रेरणेने स्त्रियांचे पथक घेऊन युद्धभूमीवर गेल्या. त्यातूनच स्त्रियांसाठी सेवाभावी परिचारिकेचा (नर्सिंग) पेशा खुला झाला. शास्त्रज्ञ मादाम मेरी क्यूरी यांनी
रेडियमचा शोध लावून दोन वेळा नोबेल पारितोषिक मिळविण्याचा विक्रम केला. भारतीय स्वातंत्र्याच्या महात्मा गांधींच्या आंदोलनात आवाहनाला प्रतिसाद देत अनेक स्त्रिया स्वातंत्र्याच्या आंदोलनात आत्मप्रेरणेने सहभागी झाल्या. स्त्रियांनी तुरुंगवास सहन केला. पुण्यात पहिली ‘प्रभात फेरी’ स्त्रियांनी काढली होती.
साहित्य, संगीत, नृत्य, नाट्य, चित्रपट ही कलाक्षेत्रे, खेळ क्रीडा, शिक्षण, राजकारण, समाजसेवा, प्रशासकीय क्षेत्र सर्वत्र स्त्रियांनी आज स्वकर्तृत्वाची, स्त्रीच्या क्षमतेची मुद्रा उमटवली आहे. आपल्याच व्यक्तिमत्त्वातल्या कस्तुरीची (अनुभूती) क्षमतेची, प्रज्ञेची स्त्रियांना जशी ओळख पटत गेली, तसा नदीच्या प्रवाहाचा ओघ विस्तृत व्हावा तसा स्त्रीच्या कर्तृत्वाचा प्रवाह व्यापक, विस्तृत झाला. स्त्रियांनी व्यक्तिगत कार्य केले, तसे संघभावनेने एकत्र येऊन स्त्रियांसाठी कार्य उभे केले. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीला पंडिता रमाबाई यांनी स्त्रियांसाठी ‘शारदा सदन’ सुरू केले. स्त्रियांना स्वावलंबी बनविण्यासाठी रमाबाई रानडे यांनी १९०९ मध्ये ‘पुणे सेवा सदन’ संस्था सुरू केली. स्त्रियांना नियमित काम देणारी ‘लिज्जत पापड’सारखी संस्था आज ‘वटवृक्ष’ बनली आहे. चित्रपट संगीताच्या क्षेत्रात लता मंगेशकर, आशा भोसले यांनी अढळपदच प्राप्त केले. चाकोरी बाहेरच्या क्षेत्रात सुद्धा स्त्रियांनी कर्तृत्व साकार केले. कॉश्च्युम डिझायनिंग क्षेत्रात अथैय्या भानू यांनी दीर्घकाळ कार्य केले. ‘गांधी’ चित्रपटासाठी ऑस्करचा सन्मान त्यांना प्राप्त झाला. स्वतःच्या वैधव्याचे दुःख विसरून कमलाबाई होपेस्पेट यांनी स्त्रियांना परिचारिकेचे शिक्षण देणारी ‘मातृसेवा संघ’ संस्था स्थापन केली. तर स्वतः चे निराधारपण बाजूला ठेवून संस्था सिंधूताई सपकाळ अनेक अनाथांच्या माता बनल्या. ‘सन्मती बाल निकेतन’ सारख्य सिंधूताईंनी उभ्या केल्या. गिर्यारोहण क्षेत्रात ‘एव्हरेस्ट शिखर’ जिंकून बचेंद्री पालने विक्रम केला, तर कल्पना चावला अवकाश संशोधक झाली. आज वनाधिकारी म्हणून अनेक स्त्रिया कार्य करीत आहेत.
खेळ, क्रीडा क्षेत्र तर स्त्रिया गाजवत आहेतच, परंतु आज लष्करी, सैनिकी सेवेतही भारतीय स्त्रिया दाखल झाल्या आहेत. ‘बॉर्डर सिक्युरिटी फोर्स’मध्येही स्त्रियांची नेमणूक होते. या वर्षीच्या २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात स्त्रियांची तुकडी तर होतीच, पण एका पुरुषांच्या तुकडीचे नेतृत्व स्त्री करीत होती. स्त्रियांच्या काही तुकड्या, गट मोटारसायकलवर कसरती करीत होत्या. निवेदकाने सांगितले म्हणून त्या स्त्रिया आहेत याची ओळख पटली. नाही तर लांबून येणारी मोटारसायकलिंगची रांग, कसरती करणाऱ्या स्त्रिया, त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून (देहबोली) स्त्रिया आहेत, असे वाटतही नव्हते. ते दृश्य बघताना खरंच ऊर भरून आला. अभिमान वाटला. स्त्रीला आपल्या व्यक्तिमत्त्वातील ‘कस्तुरी’चा शोध लागला आहे. याविषयी मनोमन प्रत्यय आला.
स्त्रीने आत्मविकास करताना आपले स्त्री म्हणून भावविश्व, स्त्रीत्व प्रेमळ स्वभाव सोडावा, विसरावा असा अर्थ नाही. असे होणार नाही. याचे भानही स्त्रीला काळानेच दिले आहे, असे म्हणता येते. म्हणूनच ‘स्त्री म्हणजे काय? ‘ तर निसर्ग निर्मितीचा ‘एक अजूबा’ असेच म्हणावेसे वाटते.
– डॉ. स्वाती कर्वे
व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी – महिला विशेषांकातून साभार
Leave a Reply