ए आई, माझा चेहरा बघ ना किती खराब झालाय !”
“अगं किती सुटलीयेस तु डिलीव्हरी नंतर ?’
‘अगं, काय सांगू आजकाल नं माझे गुडघे खूप दुखतात !”
” आजकाल माझे केस खूपच गळताहेत कॅल्शियम कमी
झालय बहुतेक. ”
या आणि अशाच कितीतरी वाक्यांनी लोकलमधील डबे भरून गेलेले आपण रोजच बघतो. आणि मग त्यावर घरगुती उपाय नवीन बाजारात आलेली उत्पादने काही जाहिरातीचे अनुभव, किंवा मग एखाद्या वैद्याच्या औषधामुळे आलेला गुण असा चर्चेचा फड रंगतो.
मैत्रिणींनो आज आपण खूप शिकलो. सुसंस्कृत झालो, बऱ्यापैकी कमावतोही, मुलांना पण चांगले शिक्षण देतो, आपल्या घरासाठी तर आपण काय काय करत असतो, पण हे सगळे करताना स्वत:कडे किती लक्ष देतो? कधीतरी अचानक थकवा जाणवायला लागला म्हणून कुणीतरी डॉक्टरकडे गेलेच तर रक्त तपासल्यावर कळले तिचे हिमोग्लोबीन खूपच कमी आहे म्हणून रक्त म्हणजे आपल्या शरीरातील जीवन शक्ती, तीच कमी झाली तर? असे म्हणतात की, भरतातील ७० टक्के स्त्रियांमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण सरासरीपेक्षा खूपच कमी असते. हे झाले एक उदाहरण पण इतरही असे अनेक आजार किंवा लक्षणे आहेत ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो व मग काही दिवसांनी त्याचे रूपांतर एखाद्या मोठ्या विकारामध्ये होते.
ज्या घरातील स्त्री शिकली ते घर शिकले या उक्तीप्रमाणेच ज्या घरातील स्त्री आरोग्यवती त्या घरात आरोग्य नांदते आणि आरोग्य असेल तर मन प्रसन्न राहते आणि मन प्रसन्न असेल तर काम करण्याला उत्साह येतो आणि आई उत्साही तर घर हसरे, हो ना ! म्हटलेलेच आहे “आरोग्यं धन संपदा”.
पण मग हे आरोग्य जपायचे म्हणजे काय करायचे?
त्याविषयी अनेक टिप्स आपल्याला वारंवार पेपर, मासिक, टी.व्ही., मोबाईल इ. माध्यमातून मिळत असतात. त्या कितपत फॉलो करायच्या त्या सगळ्यांची मला गरज आहे का? माझ्यामध्ये काय कमी आहे?
वेगवेगळ्या ऋतुनुसार वातावरणात बदल होत असतात त्याचा परिणाम शरीरावरही होतो त्याच्याशी कसे जुळवून घ्यावयाचे? अनेक प्रश्न या प्रश्नांची उत्तरेच आपण शोधून काढू या. त्याकरिता मला स्त्री शरीर समजून घ्यावे लागेल.
त्याची रचना पुरूष शरीरापेक्षा वेगळी आहे हे मला माहीत आहे पण त्याची काळजी कशी घ्यायची हे बघायचे आहे. जे माझे वेगळेपण आहे ते मला जपायला हवे नाही का?
परमेश्वराने स्त्री शरीराकडे नवनिर्मितीचा अमृतकुंभ दिलाय. त्याची जोपासना करून आरोग्याचे दान पुढच्या पिढीकडे देण्याचे कार्य स्त्रीला करायचे आहे. स्त्रीचे आरोग्य उत्तम असेल ती सुदृढ असेल तरच तिच्या गर्भाचे पोषण ती उत्तमरित्या करू शकेल व तिची पुढची पिढी सशक्त होईल.
त्याकरिता तिला ती मुलगी अवस्थेत असल्यापासूनच जपणे आवश्यक आहे. स्त्रिया पैसे साठवू शकतात. बचत करू शकतात ही गोष्ट लक्षात घेऊन जसे बचतगट स्थापन झाले त्याच पद्धतीने स्त्री आरोग्य गट स्थापन व्हायला हवेत. आपण एकमेकींच्या दागिन्यांची, साड्यांची, सौंदर्याची जशी प्रशंसा करतो तशीच एखादीच्या आरोग्याचीही प्रशंसा करायला सुरुवात करू या. म्हणजे आपोआपच आरोग्याकडे लक्ष द्यायला लागतील सगळ्या जणी आपल्या आणि मैत्रिणींच्याही.
मोबाईलची बॅटरी डाऊन झाली की तो चार्ज करावा लागतो त्याशिवाय आपण इतरांच्या संपर्कात राहू शकत नाही तसेच परमेश्वराने चार्ज करून पाठविलेली शरीराची बॅटरी डाऊन झाली की ती रिचार्ज करावी लागते. योगासने, प्राणायाम आणि काही रसायनांनी अन्यथा आपण आरोग्याच्या वेगवेगळ्या संस्था, त्रिदोष, सप्त धातू, मेंदू, इतकेच काय आपले मन इ. ॲप्स बिघडतात कधी कधी आऊटडेटेड होतात आणि मग आपला शरीररूपी मोबाईल वरून छान दिसत असला तरी तो वारंवार बिघडतो.
नमनाला घडाभर तेल म्हणतात तसे झाले. पण खरोखरच आज स्त्रीला स्वतत:ला आरोग्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज निर्माण झालीय. म्हणून हा खटाटोप.
तर मग आपल्याच हृदयावर हात ठेवून शपथ घेऊया “मी माझ्या व्यस्त आणि धावपळीच्या जगण्यातून थोडा वेळ काढून त्याचा उपयोग माझ्या आरोग्याच्या संरक्षणासाठी करेन. माझ्या आरोग्याची बॅटरी नेहमी चार्ज राहील याची खबरदारी घेईन.”
आणि शेवटी दासबोध वचन..
“जे जे आपणाशी ठावे, ते ते इतरांस सांगावे शहाणे करून सोडावे सकळ जनां’ ,
वैद्य सौ. वर्षा जोशी
आयुर्वेदाचार्य, डोंबिवली
Leave a Reply