या भागाची सुरवात आपण पहेलिका (कोडे) असणाऱ्या श्लोकांनी करू या
१. नान्न फलं वा खादामि न पिबामि जलं किंचित
चलामि दिवसे रात्रौ, समय बोध्यामि च
अर्थ: अन्न खात नाही, फळे ही खात नाही पाणी ही पित नाही परंतु दिवस रात्र चालतो व आपल्याला वेळ सांगतो.
उत्तर- घड्याळ
२. मेघश्यामोऽस्मि नो कृष्णो, महाकायो न पर्वतः ।
बलिष्ठोऽस्मि न भीमोऽस्मि, कोऽस्म्यहं नासिकाकरः ।।
अर्थ: कृष्ण नाही पण मी काळा आहे, पर्वतासारखा मोठा आहे पण पर्वत नाही, भीम नाही पण मी बलवान आहे, माझे कान व नाक लांब आहेत, मी कोण आहे हे शहाणे लोकच ओळखू शकतील.
उत्तर- हत्ती
३. वृक्षाग्रवासी न च पक्षिराजस्त्रिनेत्रधारी न च शूलपाणिः |
त्वग्वस्त्रधारी न च सिद्धयोगी जलं च बिभ्रन्न घटो न मेघः ||
अर्थ : झाडाच्या शेंड्यावर राहतो पण पक्षिश्रेष्ठ नाही. तीन डोळे आहेत पण शंकर नाही. वल्कले परिधान केली आहेत पण तापसी नाही. पाणी बाळगतो पण घडा किंवा ढग नाही. असा कोण ते ओळखा?
उत्तर: नारळ
४. न तस्यादिः न तस्यान्तः मध्ये यः तस्य तिष्ठति।
तवाप्यस्ति ममाप्यस्ति यदि जानासि तद्वद।।
अर्थ : ज्या शब्दाच्या सुरवातीला न कार आहे, आणि शेवटी सुद्धा न कार आहे व मद्धे य कार आहे, व ते सर्वांच्याकडे आहे. ओळखा पाहू मी कोण?
उत्तर- डोळे (नयन)
५. वृक्षाग्रवासी न च पक्षिराजः
तृणं च शय्या न च राजयोगी।
सुवर्णकायो न च हेमधातुः
पुंसश्च नाम्ना न च राजपुत्रः।।
अर्थ: हा एक असा राजा आहे जो झाडावर राहतो पण पक्षी नाही, गवतावर राहतो पण योगीराज साधू नाही, शरीर सोनेरी आहे पण सोने नाही, पुल्लिंगी आहे पण राजकुमार नाही, असा कोण?
उत्तर-आंबा
६. नष्टं द्रव्यं लभ्यते कष्टसाध्यम् , नष्टा विद्या लभ्यतेऽभ्यासयुक्ता |
नष्टारोग्यं सूपचारैः सुसाध्यम् नष्टा वेला या गता सा गतैव ||
अर्थ : (खूप) कष्ट करून गेलेली संपत्ति मिळवता येते. (विसरल्यामुळे) गेलेली विद्या अभ्यास करून (पुन्हा) मिळवता येते. तब्बेत खराब झाली तर चांगले उपचार करून ति सुधारता येते. पण वेळ (वाया) घालवला तर तो गेला तो गेलाच. (वेळ वाया घालवण टाळावं)
वेळेचे महत्व अधोरेखित केले आहे.
७. यत्र विद्ववज्जनो नास्ति श्लाघ्यस्तत्राल्पधीरपि |
निरस्तपादपे देशे एरण्डोऽपि द्रुमायते ||
अर्थ : ज्या ठिकाणी विद्वान लोक नाहीत त्याठिकाणी कमी बुद्धी असणारा माणूस देखील स्तुतीला पात्र ठरतो. जसे (मोठे) वृक्ष नसलेल्या प्रदेशात एरंडसुद्धा वृक्ष म्हणून मिरवतो.
८. यथा खनन् खनित्रेण नरो वार्यधिगच्छति |
तथा गुरुगतां विद्यां शुश्रूषुरधिगच्छति ||
अर्थ : ज्याप्रमाणे कुदळीने (सतत) खणत राहणाऱ्या मनुष्याला (विहिरीचे) पाणी मिळते, त्याप्रमाणे गुरूंची (निष्ठेने) सेवा करणाऱ्या (व त्यांच्याकडून विद्या मिळवू इच्छिणाऱ्या) विद्यार्थ्याला गुरुकडे असलेली विद्या मिळते.
९. सर्वस्य हि परीक्ष्यन्ते स्वभावा नेतरे गुणाः |
अतीत्य हि गुणान्सर्वान्स्वभावो मूर्ध्नि वर्तते ||
अर्थ : कुणाच्याही स्वभावाची आधी पारख करावी, इतर गुणांची नव्हे. (त्या गुणांना नंतरच महत्व द्यावं) कारण सर्व गुणांना मागे टाकून स्वभाव हा उचल खातो
१०. उद्योगिनं पुरुषसिंहमुपैति लक्ष्मीर्दैवं प्रधानमिति कापुरुषा वदन्ति |
दैवं विहाय कुरु पौरुषमात्मशक्त्या यत्ने कृते यदि न सिध्यति कॉऽत्र दोषः ||
अर्थ: सिंहाप्रमाणे असणाऱ्या कामसू माणसाकडे लक्ष्मी (आपणहून) येते. मात्र घाबरट लोक नशीब महत्वाचे आहे असे म्हणतात. नशिबाचा विचार न करता स्वतःच्या सामर्थ्याने प्रयत्न कर आणि प्रयत्न करूनही जर (ध्येय) गाठता आलं नाही तर त्यात (तुझा) काय दोष आहे?
११. कौर्मं संकोचमास्थाय प्रहारानपि मर्षयेत् |
प्राप्ते काले च मतिमानुत्तिष्ठेत् कृष्णसर्पवत् ||
अर्थ : (कठीण प्रसंगात) कासवाप्रमाणे पाठीचे कातडे घट्ट करून दणके सुद्धा खावे. पण योग्य वेळ येताच सापाप्रमाणे फणा काढावा.
स्व संरक्षण महत्वाचे आहे. योग्य संधीची वाट पाहावी.
१२. उदीरितोऽर्थः पशुनापि गृह्यते हयाश्च नागाश्च वहन्ति चोदिताः |
अनुक्तमप्यूहति पण्डितो जनः परेङ्गितज्ञानफला हि बुद्धयः ||
अर्थ : (बुद्धिहीन) पशुसुद्धा सांगितल्यावर (मालकाच्या मनातील गोष्ट) समजतात. चाबूक मारल्यावर घोडे, हत्ती सुद्धा ओझे वाहून नेतात. पण विद्वान लोक सांगितल्याशिवाय (दुसऱ्याच्या मनातील गोष्ट) ओळखतात. (कुशाग्र) बुद्धीला दुसऱ्याच्या मनातील गोष्ट ओळखण्याची कला असते.
१३. तृणानि नोन्मूलयति प्रभञ्जनो मृदूनि नीचैः प्रणतानि सर्वतः |
समुच्छ्रितानेव तरून्स बाधते महान्महत्स्वेव करोति विक्रमम् ||
अर्थ : सोसाट्याचा वारा सर्व बाजूनी वाकलेल्या मउ (लेच्यापेच्या) गवताला उपटत नाही, तर तो उंच वाढलेल्या झाडांना पाडतो. थोर माणसे थोरांशीच स्पर्धा (शौर्य) दाखवतात.
१४. परैः प्रोक्ता गुणा यस्य निर्गुणोऽपि गुणी भवेत् |
इन्द्रोऽपि लघुतां याति स्वयं प्रख्यापितैर्गुणैः ||
अर्थ : दुसऱ्यांनी ज्याचे गुण गाईले असतील तो जरी गुणी नसला तरी गुणी (मानला) जाईल. पण स्वतःच्या तोंडाने स्वतःच गुणवर्णन केलं तर इंद्राला सुद्धा कमीपणा येतो. स्वतःची स्तुती स्वतः करू नये.
१५. यौवनं धनसम्पत्तिः प्रभुत्वमविवेकिता |
एकैकमप्यनर्थाय किमु यत्र चतुष्टयम् ||
अर्थ : तारुण्य, श्रीमंती, सत्ता आणि अविचार यापैकी एकटी गोष्ट सुद्धा अनर्थ करण्यास पुरेशी आहे तर जेथे चारही असतील तेथे अनर्थ घडेल हे काय सांगावयास पाहिजे का ?
१६. नरत्वं दुर्लभं लोके विद्या तत्र सुदुर्लभा।
शीलं च दुर्लभं तत्र विनयस्तत्र सुदुर्लभः॥
अर्थ : मनुष्याचा जन्म मिळणे कठीण असते. त्यातही शिक्षण मिळण अजून अवघड असत त्यातही चारित्र्य संपादन करणं अधिक कठीण आणि एवढ (असूनही) नम्रपणा (असणारा) फारच विरळा .
१७. सन्तप्तायसि संस्थितस्य पयसो नामापि न ज्ञायते
मुक्ताकारतया तदेव नलिनीपत्रस्थितं राजते ।
स्वात्यां सागरशुक्तिमध्यपतितं सन्मौक्तिकं जायते
प्रायेणोत्तममध्यमाधमदशा संसर्गतो जायते ॥
अर्थ : तापलेल्या लोखंडावर पडलेल्या पाण्याचा मागमूस सुद्धा राहात नाही. (पण) तेच पाणि जर कमळाच्या पानावर असले तर मोत्याच्या आकाराचे [सुंदर ] दिसते. तेच (पाणि) स्वाती नक्षत्राच्या पावसात समुद्रात दोन शिंपल्या मध्ये पोचले तर त्याचं सुंदर मोती तयार होतो. सामान्यतः उत्कृष्ट , मध्यम आणि हीन अशा अवस्था सहवासामुळे लाभत असतात.
हा श्लोक राजा भतृहरीच्या नीतिशतकातला आहे.
१८. हीयते हि मतिस्तात हीनैः सह समागमात् |
समैश्च समतामेति विशिष्टैश्च विशिष्टताम् ||
अर्थ : बाळा, हलक्या (किंवा कमी बुद्धी असलेल्याच्या) सहवासाने बुद्धीचा क्षय होतो. बरोबरीच्या (आपल्या सारख्याच लोकांच्या) सहवासाने तेवढीच राहते आणि (खूप) विशेष लोकांच्या सहवासाने अधिक चांगली बनते.
विद्वान लोकांचा सहवास कायम फायदेशीर असतो.
१९. शूराश्च कृतविद्याश्च रणे सीदन्ति मत्सुताः || कुन्ती महाभारत
अर्थ : मुलगा नशीबवान असावा शूर किंवा विद्वान् असण्याची (जरूर) नाही (कारण) शूर आणि ज्ञानी
(असूनही) माझे पुत्र युद्धात कुजून जात आहेत.
२०. सामैव हि प्रयोक्तव्यमादौ कार्यं विजानता |
सामसिद्धानि कार्याणि विक्रियां यान्ति न क्वचित् ||
अर्थ : काम (चांगले कसे करावे हे) जाणणाऱ्याने पहिल्यांदा गोड बोलून समजावून सांगावे. अशाप्रकारे
सामाचा उपयोग करून पूर्ण केलेली कामे कधीही बिघडत नाहीत.
२१. नौमीड्य तेऽभ्रवपुषे तडिदम्बराय गुञ्जावतंसपरिपिच्छलसन्मुखाय |
वन्यस्रजे कवलवेत्रविषाणवेणुलक्ष्मश्रिये मृदुपदे पशुपाङ्गजाय || भागवत
अर्थ : हे परमेश्वरा, घनश्यामा, ज्याचे मस्तक गुंजानी सुशोभित केले आहे. अशा, वस्त्रे तेजस्वी असणाऱ्या, स्निग्ध आणि सुंदर मुख असणाऱ्या, वनमाला धारण करणाऱ्या, बासरी, शिंग, वेत एका हाती घास यामुळे सुंदर दिसणाऱ्या, कोमल चरण असणाऱ्या गोपराजाच्या मुलाला (श्रीकृष्णाला, देवा तुला) मी वन्दन करतो.
२२. त्वयि मेऽनन्यविषया मतिर्मधुतेऽसकृत् |
रतिमुद्वहताद्धा गङ्गेवोघमुदन्वति || कुन्ती भागवत १ स्कंध ८ अध्याय
अर्थ : हे मधू राक्षसाचा वध करणाऱ्या श्रीकृष्णा, गंगेचा प्रवाह ज्याप्रमाणे (न थांबता, सतत) समुद्राकडे झेप घेतो त्याप्रमाणे तुझ्याविषयी माझ्या मनात एकान्तिक (दुसरा कुठलाही विचार न येता फक्त तुझेच चिंतन एवढा एकच) विचार येवो
२३. गुणेष्वनादरं भ्रातः पूर्णश्रीरपि मा कृथाः |
सम्पूर्णोऽपि घटः कूपे गुणच्छेदात्पतत्यधः ||
अर्थ : हे बन्धो, अतिशय श्रीमंत असलास तरी गुणांचे (संवर्धन करण्यात) दुर्लक्ष करू नकोस. घडा (विहिरीतून काढताना पाण्याने) पूर्ण भरला असला तरी गुण (गुण किंवा पोहोऱ्याचा दोर) तुटल्यास खाली कोसळतो.
२४. कोलाहले काककुलस्य जाते विराजते कोकीलकूजितं किम् |
परस्परं संवदतां खलानां मौनं विधेयं सततं सुधीभिः ||
अर्थ : कावळ्यांच्या घरट्यात काव काव चालू असताना, कोकीळपक्षाचे कुहू कुहू गायन शोभून दिसते काय? (ते लोपून जाते तसंच) दुष्ट लोक परस्परांशी बोलत असताना विचारी माणसाने गप्प बसावे. (त्यांचा फक्त अपमान होईल)
२५. पठतो नास्ति मूर्खत्वं जपतो नास्ति पातकम् |
मौनिनः कलहो नास्ति न भयं चास्ति जाग्रतः ||
अर्थ : शिकत राहणाराला मूर्खपणाचा धोका नसतो. जप करणाराला पाप लागण्याचा धोका नसतो. मौन बाळगणाऱ्याला भांडणाची भीती नसते. दक्ष राहणाऱ्याला कसलीच भीती नसते.
२६. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे |
तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः || भागवत मङगल १ . १
अर्थ : विश्वाची उत्पत्ति, स्थिति, प्रलय वगैरेना कारणीभूत असणाऱ्या, सत्, चित् आणि आनंद हेच स्वरूप असणाऱ्या, भगवान श्रीकृष्णाची आम्ही अध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक तापनिवारणासाठी स्तुती करतो.
२७. विद्या शस्त्रस्य शास्त्रस्य द्वे विद्ये प्रतिपत्तये |
आद्या हास्याय वृद्धत्वे द्वितीयाऽद्रियते सदा ||
अर्थ : शस्त्रविद्या आणि शास्त्रविद्या (ज्ञान) दोन्ही विद्या कीर्ति मिळवून देणाऱ्या आहेत (परंतु) पहिली म्हातारपणी हास्यास्पद ठरते तर दुसरीचे नेहमी कौतुक होते.
ही लेखमाला इथेच संपूर्ण करू या . ह्या लेखमालेत संस्कृत सुभाषितांचे मराठी भाषान्तर केले आहे. शक्यतो कळण्यास सोपी सुभाषिते निवडायचा प्रयत्न केला आहे. सगळेच श्लोक सगळ्या लोकांना माहित असतील किंवा सर्वच श्लोक प्रसिद्ध असतील असे नाही. परंतु सामान्य लोकांना सोप्या भाषेत सांगावयाचा प्रयत्न केला आहे. ह्या लेखमाला सुरु असताना वाचकांचा प्रतिसाद फारच चांगला होता. आवर्जून वाचकांनी तसे कळवले त्या बद्धल त्यांचे आभार मानतो.
ही लेखमाला लिहिताना माझेही बरेच वाचन होऊन माझाही ज्ञानात भर पडली व विस्मृतीत गेलेले श्लोक परत वाचतांना एक प्रकारचा हरवलेला ठेवा गवसल्याचा आनंद मिळाला.
।।ओम शुभम भवतु।।
— डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
डॉ.कुलकर्णी ह्यांचा ह्या विषयावर चा शेवटचा लेख अतिशय सुंदर रित्या न उलगडला आहे. सध्या भागवत सप्ताह चालू आहे, तर हा लेख वाचून त्याची (सप्ताह ची) आठवण झाली.
सुभाषितांची ही शेवटची माला देखील खूप छान आहे.सर्व सुभाषितांचे मराठीत सोप्या भाषेत अर्थ सांगितल्यामुळे समजण्यास अतिशय सोपे आहे.लेखक डॉक्टर दिलीप केशव कुलकर्णी यांना मनपूर्वक धन्यवाद ?
छान लेखमाला..
आवडली…
आमच्या पण ज्ञानात भर पडली.
धन्यवाद…