श्री. भि. वेलणकर यांच्या चित्रकाव्यातील विलोमकाव्य या पोटप्रकारातला हा श्लोक आहे. पहिली ओळ वाचल्यानंतर शेवटच्या अक्षरा पासून उलट वाचत आले तरी त्याला सुंदर अर्थ असतो अशा काव्याला विलोम काव्य म्हणतात.
१. विकृतिं नैव गच्छन्ति सङ्गदोषेण साधवः |
आवेष्टितं महासर्पैश्चन्दनं न विषायते ||
अर्थ : सज्जन माणसे [वाईट लोकांच्या] संगतीने बिघडत नाहीत. चंदनाच्या वृक्षाला मोठमोठया सापांनी वेढले तरी तो विषारी बनत नाही.
२. अगाधजलसञ्चारी गर्वं नायाति रोहितः |
अङ्गुष्ठोदकमात्रेण शफरी फर्फरायते ||
अर्थ : रोहित हा [एक मोठा मासा] खूप खोल पाण्यात विहार करून सुद्धा गर्व करीत नाही. पण शफरी मात्र टीचभर पाण्यात असली तरी (गर्वाने) फुगते.
३. सहस्त्र विष मात्रेण गर्वे न जायते वासुकी |
विष बिंदू मात्रेण ऊर्ध्वं वहती कंटकः ||
अर्थ: वासुकी सर्पा कडे सहस्त्र मात्रा असलेले विष असते पण त्याला त्याचा कधीही गर्व नसतो, पण एका बिंदुएवढे विष असूनसुद्धा गर्वाने (शेपटी वर करून) वृश्चिक ते मिरवत असतो. जे ज्ञानी असतात ते कधीही गर्व करत नाहीत पण जे अर्धवट ज्ञानी असतात ते आपल्या ज्ञानाचा टेम्भा मिरवतात.
४. आयुषः क्षण एकोऽपि सर्वरत्नैर्न लभ्यते |
नीयते स वृथा येन प्रमादः सुमाहनहो ||
अर्थ : सर्व रत्ने (सर्वात महाग वस्तू दिली तरीहि आयुष्याचा एक क्षण सुद्धा (वाया घालवलेला परत) मिळत नाही. म्हणून वेळ वाया घालवणे ही घोडचूक आहे.
५. कौर्मं संकोचमास्थाय प्रहारानपि मर्षयेत् |
प्राप्ते काले च मतिमानुत्तिष्ठेत् कृष्णसर्पवत् ||
अर्थ : (कठीण प्रसंगात) कासवाप्रमाणे पाठीचे कातडे घट्ट करून दणके सुद्धा खावे. पण योग्य वेळ येताच सापाप्रमाणे फणा काढावा. कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे रक्षण करता येणे हे सर्वात मोठे कर्तव्य आहे.
६. इक्षोरग्रात्क्रमशः पर्वणि पर्वणि यथारसविशेषः |
तद्वत्सज्जनमैत्री विपरीतानां च विपरीता ||
अर्थ : उसाच्या टोकाच्या कांडापासून जसजसे पुढे जावं तसा तो अधिकाधिक (मधुर) रसाचा लागतो. त्याप्रमाणे सज्जनाशी मैत्री केली असता अधिकाधिक मधुर बनतं जाते आणि उलट लोकांची (दुष्टांची अधिकाधिक) त्रासदायक बनत जाते.
७. सौवर्णानि सरोजानि निर्मातुं सन्ति शिल्पिनः |
तत्र सौरभनिर्माणे चतुरश्चतुराननः ||
अर्थ : (चांगले) सोनार सोन्याची कमळे बनवू शकतात. पण त्यात सुगंध मात्र फक्त चतुर असा ब्रह्मदेवच निर्माण करू शकतो. निसर्गा इतकी उत्तम आणि परिपूर्ण रचना मानव करू शकत नाही.
८. अहो दुर्जनसंसर्गान्मानहानिः पदे पदे |
पावको लोहासङ्गेन मुद्गरैरभिहन्यते ||
अर्थ : दुष्ट माणसाच्या सहवासाने पावलोपावली अपमान होतो. (लोखंड गरम करतात तेंव्हा) पावकाला (पवित्र अशा अग्नीला सुद्धा) लोखंडाच्या सहवासामुळे मोगरीचे (घण) तडाखे खावे लागतात.
९. उद्यमस्साहसं धैर्य बुद्धि: शक्तिः पराक्रमः ।
षडेते यत्र वर्तन्ते तत्र देवः सहायकृत् ॥
अर्थ : कामसुपणा , धाडस ,धीरता , हुशारी , ताकद आणि हे सहा गुण (ज्याच्याजवळ असतील त्याला) देव सुद्धा मदत करतो.
१०.साहित्यसंगीतकलाविहीनः साक्षात्पशुः पुच्छविषाणहीनः |
तृणं न खादन्नपि जीवमानस्तद्भागधेयं परमं पशूनाम् ||
अर्थ : ज्याला साहित्य, गाणं किंवा एखादी कला येत नाही, तो माणूस म्हणजे शेपूट आणि शिंग नसलेला पशूच होय. तो गवत न खाता जगतो हे पशूंच मोठंच भाग्य आहे. (म्हणूनच माणसाने एखादी तरी कला शिकणे गरजेचे आहे.)
११. यौवनं धनसम्पत्तिः प्रभुत्वमविवेकिता |
एकैकमप्यनर्थाय किमु यत्र चतुष्टयम् ||
अर्थ : तारुण्य, श्रीमंती, सत्ता आणि अविचार यापैकी एकटी गोष्ट सुद्धा अनर्थ करण्यास पुरेशी आहे तर जेथे चारही असतील तेथे अनर्थ घडेल हे काय सांगावयास पाहिजे का?
१२. किं वाससा तत्र विचारणीयाः वसः प्रधानं खलु योग्यतायाम्॥
पीतांबरम वीक्ष्य दधौ स्वकन्यां चर्माम्बरं वीक्ष्य विंषं समुद्रः॥
अर्थ : कपड्यांवर काय अवलंबून असते? तर बरंच काही असते. पीतांबर नेसलेल्या विष्णूला समुद्राने आपली मुलगी दिली आणि चामडं गुंडाळणा-या शंकराला विष दिले.
१३. भोजनान्ते च किं पेयं जयन्तः कस्य वै सुतः ।
कथं विष्णुपदं प्रोक्तं तक्रं शक्रस्य दुर्लभम् ॥
अर्थ : जेवण झाल्यावर कोणते पेय प्यावे (ताक)? जयन्त हा कोणाचा मुलगा आहे (इन्द्राचा)? विष्णुपद मिळण्यास कसे आहे (अतिशय अवघड)? ताक इन्द्राला (मिळण्यास) अतिशय अवघड.टीप :- समस्या प्रकारचा हा श्लोक आहे राजदरबारामध्ये कवींना चवथा चरण देऊन श्लोक रचणे अशी एक प्रकारे परीक्षा होती. ताक इन्द्राला (मिळण्यास) अतिशय अवघड (तक्रम शक्रस्य दुर्लभं) हे वाक्य अर्थपूर्ण करण्यासाठी पहिले तीन योग्य असे चरण कवीने रचले आहेत.
१४. करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तम् |
वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि ||
अर्थ : हस्त कमलाने चरणकमल मुखकमलामध्ये घालणाऱ्या, वडाच्या पर्णावर शयन करणाऱ्या, छोट्याशा भगवान श्रीकृष्णाचे मी मनापासून स्मरण / मनामध्ये स्मरण करतो/ते.
१५. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।
उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥
अर्थ: (आम्ही सर्वत्र ज्याचा) गंध (दरवळत असतो अशा, तब्येत) सुदृढ करणार्या तीन नेत्र असलेल्या भगवान शंकरासाठी यज्ञ करतो. (त्याची भक्ती करतो.) त्यांनी उंबराच्या फळा प्रमाणे आम्हाला मृत्यू पासून सोडवावे मोक्षा पासून नको. ऋषी ना अपमृत्यु असेल तर त्यापासून सुटका हवी आहे. उंबराच फळाला देठाचा काही भाग रहात नाही. आणि अगदी सहज ते गळत, तसे
घडावे.
१६. कमले कमला शेते । हर: शेते हिमालये ।
हरि: शेते समुद्रे च । मन्ये मत्कुणशन्कया ॥
अर्थ : लक्ष्मी कमळामध्ये झोपते. शंकर हिमालयामध्ये झोपतो. विष्णू समुद्रामध्ये झोपतो. (बहुतेक ढेकणांच्या भीतीने… 🙂
१७. सर्वस्य हि परीक्ष्यन्ते स्वभावा नेतरे गुणाः |
अतीत्य हि गुणान्सर्वान्स्वभावो मूर्ध्नि वर्तते ||
अर्थ : कुणाच्याही स्वभावाची आधी पारख करावी, इतर गुणांची नव्हे. (त्या गुणांना नंतरच महत्व द्यावं) कारण सर्व गुणांना मागे टाकून स्वभाव हा उचल खातो.
१८. वरमेको गुणी पुत्रो नच मूर्खशतान्यपि |
एकश्चंद्रस्तमो हन्ति, नच तारागणोपि च ||
अर्थ : शंभर मूर्ख मुले असण्यापेक्षा एकच गुणी मुलगा असणे चांगले. रात्री अनेक तारका आकाशात असल्या तरी, अंधार दूर करायला एकटा चंद्र पुरेसा असतो.
१९. जानामि नागेंद्र तव प्रभावो,
कण्ठे स्थितो गर्जसि शंकरस्य |
स्थानं प्रधानं न बलं प्रधानं
स्थाने स्थितो कापुरुषोपि शूरः ||
अर्थ: हे नागराजा, तुझा मोठेपणा काय ते मला माहीत आहे, शंकराच्या गळ्यात राहून भय दाखवतोस; बळ नव्हे तर स्थान हेच महत्वाचे; अशा ठिकाणी राहून एकादा दुबळाही शूर भासतो.
२०. राज्ञि धर्मिणि धर्मिष्ठाः पापे पापाः समे समाः |
लोकास्तमनुवर्तन्ते यथा राजा तथा प्रजा ||
अर्थ : राजा (प्रशासक) जर धार्मिक असेल तर प्रजा धार्मिक होते. तो दुराचारी असेल तर जनता दुराचारी होते. जर तो (सर्वाशी) सारखा वागत असेल तर ती पण तशीच वागते. माणसे नेहमी राजा प्रमाणेच वागतात.
२१. बुभुक्षितैर्व्याकरणं न भुज्यते पिपासितैः काव्यरसो न पीयते |
न च्छन्दसा केनचिदुद्ध्रृतं कुलं हिरण्यमेवार्जय निष्फला गुणाः ||
अर्थ : भूकेलेल्यांची भूक व्याकरण खाऊन भागत नाही. तहानलेले काव्य परीक्षण पिऊ शकत नाहीत. वेदांच्या (ज्ञानाने) कोणी घरात बरकत आणू शकत नाही. त्यामुळे धन मिळवावेत, गुण वाया जातात.
२२. लुब्धानां याचकः शत्रुश्चोराणां चन्द्रमा रिपुः |
जारस्त्रीणां पतिः शत्रुर्मूखाणां बोधको रिपुः ||
अर्थ : (काहीतरी) मागणारा हा हावरटांचा शत्रु असतो. चन्द्र हा चोरांचा शत्रु आहे. वाईट चालीच्या स्त्रियांचा पति हा शत्रु असतो आणि (चांगले) शिकवणारा हा मूर्खांना शत्रु वाटतो.
२३. पुराणमित्येव न साधु सर्वं न चापि नवमित्यवद्यम् |
सन्तः परीक्ष्यान्यतरद्भजन्ते मूढः परप्रत्ययनेयबुद्धिः ||
अर्थ : सर्वच जुन्या गोष्टी चांगल्या नसतात किंवा नवीन आहे म्हणून वाईट पण नसतात. सज्जन लोक विचारपूर्वक त्यापैकी जे चांगलं असेल त्याची निवड करतात. मूर्ख मात्र दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे (चांगलं वाईट) ठरवतात.
२४. स्वभावं न जहात्येव साधुरापद्गतोऽपि सन् |
कर्पूरः पावकस्पृष्टः सौरभं लभतेतराम् ||
अर्थ : संकट कोसळलं म्हणून सज्जन स्वतःचा [सुस्वभाव] कधीहि सोडत नाही. कापाराला अग्नीचा स्पर्श झाला (जळून नाहीसा होण्याची वेळ आली तर उलट) तरी तो अधिकच सुगंधित होतो.
२५. नरत्वं दुर्लभं लोके विद्या तत्र सुदुर्लभा।
शीलं च दुर्लभं तत्र विनयस्तत्र सुदुर्लभः॥
अर्थ : मनुष्याचा जन्म मिळणे कठीण असते. त्यातही शिक्षण मिळण अजून अवघड असत त्यातही चारित्र्य संपादन करणं अधिक कठीण आणि एवढ (असूनही) नम्रपणा (असणारा) फारच विरळा.
– डॉ. दिलीप कुलकर्णी
संस्कृत समजणारे हल्ली अभावानेच सापडतील. परंतु आपली प्रगल्भ संस्कृतीचे जतन डॉ.कुलकर्णी ह्यांच्या संस्कृत मधील सुभाषितांचे मराठी रुपांतर केलेल्या, हा लेख वाचून समजलं. धन्यवाद!!!