नवीन लेखन...

सुभाषित रत्नांनी – भाग ३

सुभाषित रत्नांनी भाग – ३

१. वनानि दहतो वह्ने: सखा भवति मारुत:।
   स एव दीपनाशाय कृशे कस्यास्ति सौह्र्दम ॥
अर्थ – जंगलामध्ये वणवा लागला असताना वारा अग्नीला मदत करतो. मात्र तोच वारा दिव्याची ज्योत (दुर्बल अग्नी) विझवतो. दुर्बलाला कोण मित्र असतो?? (कोणीही नसतो)

२. कस्तुरि जायते कस्मात्‌ को हन्ति करिणां शतम्।
   भीरु: करोति किं युध्दे मृगात सिंह: पलायते॥
अर्थ- कस्तुरी कोणापासून मिळते? शंभर हत्तींची हत्या कोण करतो? भित्रा मनुष्य युध्दामध्ये काय करतो? हरणापासून सिंह पळतो.
स्पष्टीकरण – शेवटचे चरण थोडेसे संभ्रमात टाकणारे आहे. “सिंह हरणापासून पळतो”. यात पहिल्या ३ चरणांमध्ये प्रश्न विचारले आहेत आणि चौथ्या चरणात त्याची उत्तरे आहेत.
कस्तुरी कोणापासून मिळते? – हरणापासून
शंभर हत्तींची हत्या कोण करतो? – सिंह
भित्रा मनुष्य युध्दामध्ये काय करतो? – पळतो

३. हंस श्वेतः बकः श्वेतः को भेदो बकहंसयोः।
   नीरक्षीरविवेकेतु हंसो हंसो बको बकः ॥
अर्थ – हंस पांढरा, बगळा पण पांढरा. हंस आणि बगळ्यात फरक काय? दूधातुन पाणी वेगळे करण्याच्या परीक्षेत मात्र हंस तो हंस आणि बगळा तो बगळा. (अशी एक समजुत आहे की हंस, दूध आणि पाण्याच्या मिश्रणातुन पाणी वेगळे करुन फक्त दूध पितो).

४. काकः कृष्णः पिकः कृष्णः को भेदो पिककाकयो:|
   वसन्तसमये प्राप्ते काकः काकः पिकः पिकः||
अर्थ- कावळा ही काळा असतो व कोकिळा ही काळी असते. मग दोघांच्यात फरक तो काय? पण ज्या वेळी वसंत ऋतू येतो त्यावेळी कावळा काव काव (असा कर्कश्श आवाज) करतो पण कोकिळा कुहू कुहू असा गोड नाद करते.

५. घृष्टं घृष्टं पुनरपि पुनश्चन्दनं चारूगन्धं
   छिन्नं छिन्नं पुनरपि पुन: स्वादु चैवेक्षुकाण्डम्
   दग्धं दग्धं पुनरपि पुन: काञ्चनं कान्तवर्णं|
   प्राणान्तेऽपि प्रकृतिविकृतिर्जायते नोत्तमानाम् ||
अर्थ – कितिही उगाळावे, चंदन सुगंधीच; कितिही तुकडे करा ऊस गोडच;
कितीही तापवा, सुवर्णाची चकाकी तशीच; तशाप्रकारे प्राणावर बेतले, तरी उत्तमांची गती (गुण) बिघडत नाहीत.

६. घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्यात् रासभरोहणम्।
    येन केन प्रकारेण प्रसिद्धपुरुषो भवेत॥
अर्थ – मडके फोडावे, कपडे फाडावेत (किंवा) गाढवावर बसावे (पण) या ना त्याप्रकारे माणसाने प्रसिद्ध व्हावे.

७. उत्साहसम्पन्नमदीर्घसूत्रं क्रियाविधिज्ञं व्यसनेष्वसक्तम् |
    शूरं कृतज्ञं दृढसौहृदं च लक्ष्मीः स्वयं याति निवासहेतोः ||
अर्थ – अतिशय उत्साही असणाऱ्या; चेंगटपणा न करणाऱ्या; नियम कृती यांची माहिती असणाऱ्या; व्यसन नसणाऱ्या; शूर; कृतज्ञ; मैत्री सांभाळणाऱ्या अशा (माणसाकडे) लक्ष्मी (संपत्ती) स्वतः (कायम) राहण्यासाठी येते.

८. आकर्ण्याम्रस्तुतिं जलमभूत्तन्नारिकेलान्तरं प्रायः कण्टकितं तथैव पनसं जातं द्विधोर्वारुकम् |
   आस्तेऽधोमुखमेव कादलमलं द्राक्षाफलं क्षुद्रतां श्यामत्वं बत जाम्बवं गतमहो मात्सर्यदोषादिह ||
अर्थ – (फळांचा राजा असणाऱ्या आंब्याची स्तुती ऐकून) नारळाच्या पोटात /मनात (पाणी) पाणी झालं. फणसाच्या अंगावर काटा उभा राहिला. उंबराचे फळ तर फुटलंच. केळ्यांनी पण मान खालीच घातली. द्राक्ष काळपट तर पडलीच आणि लहान झाली, जांभूळ (हेव्याने) जांभळे पडले (हे सगळं मत्सरानी बरं!)

९. आयातो भवतः पितेति मातुर्निशम्योदितं धूलीधूसरितो विहाय शिशुभिः क्रीडारसान्प्रस्तुतान् |
   दूरात्स्मेरमुखः प्रसार्य ललितं बाहुद्वयं बालको नाधन्यस्य पुरः समेति परया प्रीत्या रटन्घर्घरम् ||
अर्थ – “तुझे बाबा आले रे” असं आईनी म्हटलेलं ऐकल्यावर; चालू असलेली मित्रांबरोबरची भरपूर गम्मत टाकून हसत हसत सुंदर हात पसरून घशातून आनंदाचे उद्गार काढत धुळीने माखलेलं आपलं मूल आनंदाने ज्याच्या समोर येते; असा (पिता) खरोखर धन्य होय.

१०. चन्दनं शीतलं लोके चन्दनादपि चन्द्रमाः |
    चन्द्रचन्दनयोर्मध्ये शीतला साधुसंगतिः ||
अर्थ- या जगात चंदन हे शीतल असत. चंदनापेक्षाही चन्द्र अधिक शीतल असतो. (पण) सज्जनांचा सहवास हा चन्द्र आणि चंदन यांच्या पेक्षाहि अधिक शीतल असतो.
११. करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तम् |
    वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि ||
अर्थ – हस्त कमलाने (आपले) चरणकमल मुखकमलामध्ये घालणाऱ्या, वडाच्या पर्णावर शयन करणाऱ्या, छोट्याशा भगवान श्रीकृष्णाचे मी मनापासून स्मरण / मनामध्ये स्मरण करतो/ते.

१२. क्षमा शत्रौ च मित्रे च यतीनामेव भूषणम्|
     शाम्येत्प्रत्यपकारेण नोपकारेण दुर्जन: ||
अर्थ – मित्र आणि शत्रूंना सुद्धा क्षमा करणे ही गोष्ट यति (संन्यास घेतलेल्यांनाच) कौतुकास्पद आहे. (गृहस्थाला ते योग्य नव्हे कारण) दुष्ट मनुष्य हा त्याला (त्याच्या दुष्कृत्यांचे) वाईट परिणाम भोगल्यामुळेच वठणीवर येईल त्याच्यावर उपकार केल्यामुळे नव्हे.

१३. हंसो विभाति नलिनीदलपुञ्जमध्ये सिंहो विभाति गिरिगव्हरकन्दरासु |
    जात्यो विभाति तुरगो रणयुद्धमध्ये विद्वान्विभाति पुरुषेषु विचक्षणेषु ||
अर्थ – कमळांच्या ताटव्या मधे हंस शोभून दिसतो; पर्वतावरील कडेकपारीत सिंह शोभून दिसतो; जातिवंत घोडा युद्धभूमीवर शोभून दिसतो; (गोष्टींप्रमाणेच) विद्वान पण्डित हा ज्ञानी लोकांमध्ये शोभून दिसतो.

१४. भार्यावियोगः स्वजनापवादो ऋणस्य शेषं कृपणस्य सेवा |
     दारिद्र्यकाले प्रियदर्शनं च विनाग्निना पञ्च दहन्ति कायम् ||
अर्थ – पत्नीचा वियोग; आपल्याच (जवळच्यानी) दोष देणं; कर्ज फेडायचं असणं; कंजूष माणसाची सेवा (नोकरी]) करायला लागणं आणि आवडत्या लोकाना (अगदी) गरिबी आली असताना भेटायला येणं, या पाच गोष्टी आग नसून सुद्धा होरपळवतात.

१५. ध्यानशस्त्रं बकानां च वेश्यानां मोहशस्त्रकम् |
     साधुत्वशस्त्रं मैन्दानां परप्राणार्थहारकम् ||
अर्थ – बगळ्यांच ध्यान करण्याचे (सोंग हेच) शस्त्र; वेश्यांचे भुरळ पाडणं हे हत्यार आणि ठगांचे शहाजोगपणाचे ढोंग ही हत्यारे दुसऱ्यांचे प्राण आणि द्रव्य लुबाडत असतात.

१६. इन्दुं निन्दति तस्करो गृहपतिं जारो सुशीलं खलः साध्वीमप्यसती कुलीनमकुलो      जह्याज्जरन्तं  युवा |
विद्यावन्तमनक्षरो धनपतिं नीचश्च रूपोज्वलं वैरूप्येण हतः प्रबुद्धमबुधो कृष्टं निकृष्टो जनः ||
अर्थ – चोर चंद्राला नाव ठेवतो; जार (प्रेयसीच्या) नवऱ्याची निंदा करतो; दुष्ट सज्जनांना नाव ठेवतो; कुलटा गरत्या स्त्रीची निंदा करते; हलक्या कुळातला, घरंदाज माणसाला सोडून जातो; तरुण म्हाताऱ्यांची सांगत सोडतो; अडाणी सुशिक्षिता जवळ रहात नाही; गरीब श्रीमंताजवळ टिकत नाही; कुरूप व्यक्ती देखण्याची निंदा करते; मंद माणूस हुशार व्यक्तीची निंदा करतो (तात्पर्य]) गुणांनी निकृष्ट आपल्यापेक्षा गुणी माणसाचा मत्सर करतो.

१७. इक्षोरग्रात्क्रमश: पर्वणि पर्वणि यथा रसविशेष: |
     तद्वत्सज्जनमैत्री विपरीतानां तु विपरीता ||
अर्थ – उसाच्या वरच्या टोकापासून जसं जसं पुढचं पेर अधिकाधिक (मधुर) रसाळ असं असत त्याचप्रमाणे सज्जनांशी केलेली मैत्री (अधिकाधिक मधुर बनत जाते) आणि दुर्जनाशी केलेली मैत्रीचे मात्र उलटं असतं.

१८. आसिन्धुसिन्धुपर्यन्ता यस्य भारतभूमिका |
     पितृभूः पुण्यभूश्चैव स वै हिन्दुरिति स्मृतः ||
     (स्वातंत्र्यवीर सावरकर)
अर्थ – हिंदुधर्म हे कोणत्याही एका विशिष्ट धर्माचे वा पंथाचे विशेष किंवा अन्य नाव नसून ज्या अनेक धर्मांची आणि पंथांची सिंधू नदी पासून तर समुद्रापर्यंत ज्यांची ही पितृभूमी आणि पुण्य भूमि आहे, त्या साऱ्यांना समाविष्ट करणाऱ्या धर्मसंघाचे हिंदूधर्म हे सामुदायिक अधिष्ठान आहे. (त्यामुळे कुठल्याही धर्मातील जो माणूस या भूमीचा आदर करतो तो हिंदू होय.)

१९. आयुषः क्षण एकोऽपि सर्वरत्नैर्न लभ्यते |
     नीयते स वृथा येन प्रमादः सुमहानहो ||
अर्थ – जीवनातला एखादा क्षण सुद्धा (कितीही किंमत दिली) अगदी सगळी रत्ने दिली, तरीही (परत) मिळत नाही. हे विद्वान हो, जर वेळ वाया घालवला तर तो अतिशय मोठा गुन्हा आहे.

२०. मालाकमण्डलू अधः करपद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगुले डमरूत्रिशूले |
     यस्य स्त उर्ध्वकरयोः शुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तम् ||

अर्थ – खालच्या दोन करकमलात जपमाळ आणि कमंडलू आहे; मधल्या करद्वयात डमरू आणि त्रिशूल आहे आणि वरच्या दोन हातात कल्याणकारक शंख आणि चक्र आहे, अश्या सहा करे असलेल्या भगवान दत्तात्रेयाला मी नमस्कार करतो.

२१. छिद्रं मर्म च वीर्यं च विजानाति निजो रिपुः |
     दहत्यन्तर्गतश्चैव शुष्कवृक्षमिवानल: ||
अर्थ – आपल्या (अगदी ओळखीचा) जवळचा मनुष्य (जेव्हा) शत्रु बनलेला असेल, तेंव्हा आपला पराक्रम तसच मर्मस्थान आणि वैगुण्य (कमतरता) त्याला पूर्णपणे माहित असते. अग्नी ज्या वठलेल्या झाडात असतो ते झाड जोऱ्याच्या वाऱ्या मुळे क्षणात जळते, त्याप्रमाणे तो आपला नाश करतो.

२२. एकं विषरसो हन्ति शस्त्रेणैकश्च हन्यते।
     सराष्ट्रं सप्रजं हन्ति राजानं मन्त्रविप्लवः ||
अर्थ – विष (पाजल्यावर) एकालाच मारता येत. शस्त्रांनी एखादाच (मेला तर) मरतो (हत्या होते). पण गुप्त खलबताच्या वादळाने सगळ्या प्रजेसकट आणि राजासकट सर्व राष्ट्र नाश पावते.

२३. गृह्णन्तुसर्वे यदि वा यथेष्टं नास्ति क्षति: क्वापि कवीश्वराणाम् |
     रत्नेषु लुप्तेषु बहुष्वमर्त्यैरद्यापि रत्नाकर एव सिन्धुः ||
अर्थ – जर आवडत असेल तर (आपली वाङ्गमय रत्न) सगळे जण हवी तेवढी घेवोत; श्रेष्ठ कवींना (त्याची काहीच चिन्ता नसते), त्यात त्यांच काही नुकसान होत नाही. देवांनी (समुद्रमंथनाच्या वेळी खूप रत्ने पळवली) तरी अजूनही सागर हा (रत्नाकर) – रत्नांचा खजिना आहेच. (प्रतिभावान कवींचे अप्रतिम साहित्य वाचून रसिकांनी मनसोक्त आनंद लुटला तरी त्या कलाकृतींच सौंदर्य कधीच कमी होत नाही हे या वाङ्गमय संपत्तीचे वैशिष्ठ्य आहे.)

२४. वृक्षान्छित्वा पशून्हत्वा कृत्वा रुधिरकर्दमम् |
     यद्येवं गम्यते स्वर्गं नरकं केन गम्यते ||
अर्थ – झाड तोडून; प्राण्यांना मारून; रक्ताचा चिखल करून (या नरकात पडण्यासारख्या सद्गुणांमुळे {?}) जर स्वर्गात जाता येत असेल तर नरकात कोण जातो?

२५. फणिनो बहवः सन्ति भेकभक्षणतत्पराः|
     एक एव हि शेषोऽयं धरणीधारणक्षमः ||
अर्थ – बेडूक खात राहणारे खूप सर्प असतातच. (सर्व ठिकाणी सामान्य ताकद असणारे लोक खूप असतात.) पण पृथ्वी तोलून धरण्याची क्षमता असणारा शेषनाग एकटाच.

या प्रत्येक लेख मालेत सर्व लोकांना समजतील असे पंचवीस सोपे व शक्यतो प्रसिद्ध संस्कृत श्लोक देण्याचा प्रयत्न करतो आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की संस्कृत श्लोक क्लिष्ट नसतात, अर्थ समजण्यास सोपे असतात. ही लेख माला सर्व सामान्य वाचकांच्या करता आहे हे लक्षात/ध्यानात घेतले आहे.
येथे कोठल्याही मालेत संदर्भ देत नाही. कारण संस्कृत सुभाषिते यावर असंख्य लेख, पुस्तके आहेत. त्या सर्वांचा उल्लेख करणे शक्य होणार नाही.

डॉ. दिलीप कुलकर्णी
मोबा. ९८८१२०४९०४
०१/०२/२०२३

 

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 81 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

4 Comments on सुभाषित रत्नांनी – भाग ३

  1. आपली संस्कृती पहा व आपले पूर्वजाने अनेक शतकांन पूर्वी लिहिले हे शुभाशिते आजही काळाला धरुनच आहेत.डॉ.कुलकर्णी ह्यानें परिश्रमाने लिहलेला लेख वाचनीय आहे.

  2. नवीन नवीन श्लोक आणि त्यांची माहिती होत आहे. छान उपक्रम आहे. धन्यवाद..

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..