१. तृणानि नोन्मूलयति प्रभञ्जनो मृदूनि नीचैः प्रणतानि सर्वतः |
समुच्छ्रितानेव तरून्स बाधते महान्महत्स्वेव करोति विक्रमम् ||
अर्थ: सोसाट्याचा वारा सर्व बाजूनी वाकलेल्या मउ (लेच्यापेच्या) गवताला उपटत नाही, तर तो उंच वाढलेल्या झाडांना पाडतो. थोर माणसे थोरांशीच स्पर्धा (शौर्य) दाखवतात.
२. परैः प्रोक्ता गुणा यस्य निर्गुणोऽपि गुणी भवेत्
इन्द्रोऽपि लघुतां याति स्वयं प्रख्यापितैर्गुणैः ||
अर्थ: दुसऱ्यांनी ज्याचे गुण गाईले असतील तो जरी गुणी नसला तरी गुणी [मानला] जाईल. पण स्वतःच्या तोंडाने स्वतःच गुणवर्णन केलं तर इंद्राला सुद्धा कमीपणा येतो.
३. सर्वस्य हि परीक्ष्यन्ते स्वभावा नेतरे गुणाः |
अतीत्य हि गुणान्सर्वान्स्वभावो मूर्ध्नि वर्तते ||
अर्थ : कुणाच्याही स्वभावाची आधी पारख करावी, इतर गुणांची नव्हे. (त्या गुणांना नंतरच महत्व द्यावं) कारण सर्व गुणांना मागे टाकून स्वभाव हा उचल खातो.
४. ये च मूढतमाः लोकाः ये च बुद्धेः परं गताः।
ते एव सुखमेधन्ते मध्यमः क्लिश्यते जनः।।
अर्थ: सर्वात जास्त मूर्ख आणि सर्वात जास्त बुद्धीमान लोकच सुखसमृद्धीत असतात, मध्यम लोकांना क्लेश होतात. मूर्खांना काहीच कळत नसल्यामुळे ते गोड अज्ञानाच्या सुखात राहतात आणि बुद्धीमान लोक सुखाचा मार्ग बरोबर शोधून काढतात. मध्यम लोकांना हे दोन्ही जमत नाही. त्यामुळे त्रास होतो.
५. अज्ञेभ्यो ग्रन्थिनः श्रेष्ठाः ग्रन्थिभ्यो धारिणो वराः ।
धारिभ्यो ज्ञानिनः श्रेष्ठाः ज्ञानिभ्यो व्यवसायिनः॥
पाठभेद: धारिभ्यो कर्मिणो श्रेया: कर्मिषु अपि उपकारिणः ॥
अर्थ: निरक्षर माणसापेक्षा साक्षर बरा असतो, वाचलेले लक्षात ठेवणारा साक्षरांमध्ये चांगला असतो, ते समजणारा ज्ञानी माणूस त्याच्यापेक्षा चांगला असतो आणी त्या ज्ञानाचा उपयोग करून कर्म करणारा त्याहून श्रेष्ठ असतो,
पाठभेद: परोपकार करणारा माणूस कर्म करणाऱ्या माणसापेक्षाही सर्वश्रेष्ठ असतो.
६. तीर्थे तीर्थे निर्मलं ब्रह्मवृन्दः
वृन्दे वृन्दे तत्त्वचिन्तानुवादः।
वादे वादे जायते तत्वबोधः
बोधे बोधे भासते चन्द्रचूडः।।
अर्थ: तीर्थातीर्थांमध्ये (अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये) ब्रह्मवृंद रहातात, या विद्वान लोकांमध्ये (धर्मशास्त्रावर) चर्चा (वाद) होत असते, त्यांना या चर्चांमधून तत्वाचा बोध होत असतो आणि तो बोध झाल्यानंतर परमेश्वराचा भास होतो. (तो असल्याची अनुभूति होते). असा एक परमेश्वराला भेटण्याचा राजमार्ग या श्लोकामध्ये दाखवला आहे. आज अशा प्रकारची तीर्थक्षेत्रे आणि तिथे रहाणारे विद्वान, त्यांच्यातल्या चर्चा यातले काय शिल्लक आहे? आणि परमेश्वराची आस तरी किती लोकांना वाटते?
७. पिण्डे मतिर्भिन्ना कुण्डे कुण्डे नवं पयः।
जातौ जातौ नवा चारा नवा वाणी मुखे मुखे॥
अर्थ: व्यक्ति तितक्या प्रकृति (स्वभाव) असतात.
प्रत्येक ठिकाणी नवा चारा असतो.
प्रत्येक जागी नवी भाषा असते
प्रत्येक मनुष्याचें मत स्वतंत्र असतें
जो तो आपल्या बुद्धीप्रमाणें विचार करतो.
८. न गोप्रदानं न महीप्रदानं
न चान्नदानं हि तथा प्रधानम्।
यथा वदन्तीह महाप्रदानं
सर्वप्रदानेष्वभयप्रदानम्।।
-पंचतंत्र
पाठभेद: यथा वदन्तीह बुधाः प्रदानं
अर्थ: सर्व प्रकारच्या दानांमध्ये अभयदान जितके महत्वाचे आहे तितके गायीचे दान नाही, जमीनीचे (मही) दान नाही आणि अन्नदानही नाही असे शहाणे लोक म्हणतात. घाबरलेल्या माणसाच्या मनातली भीती काढणे हे त्याला काहीही देण्यापेक्षा जास्त महत्वाचे असते.
९. बन्धनानि खलु सन्ति
बहूनि प्रेमरज्जुदृढ़बन्धनमन्यत्।
दारुभेदनिपुणोSपि षंडध्रि
र्निष्क्रियो भवति पङ्कजकोशे ।।
अर्थ: अनेक प्रकारचे बंध असतात, पण प्रेमाचा मजबूत बंध वेगळाच असतो. लाकडालासुद्धा भोक पाडण्यात प्रवीण असलेला भुंगा कमळाच्या पाकळ्यांत अडकला तर मात्र काही करू शकत नाही.
१०. अर्धं भार्या मनुष्यस्य, भार्या श्रेष्ठतमः सखा ।
भार्या मूलं त्रिवर्गस्य, भार्या मूलं तरिष्यतः॥
अर्थ: पत्नी ही पुरुषाची अर्धांगिनी असते, ती त्याची सर्वात श्रेष्ठ मैत्रिण असते, त्याच्या त्रिवर्गाचा (धर्म, अर्थ, काम) आधार असते तसेच तिच्या आधारानेच तो भवसागर तरून जातो. ….. पत्नीचे जीवनातले स्थान किती महत्वाचे असते हे या श्लोकात सांगितले आहे.
११. प्रियप्राया वृत्तिर्विनयमधुरो वाचि नियमः
प्रकृत्या कल्याणी मतिरनवगीतः परिचयः।
पुरो वा पश्चाद्वा तदिदमविपर्यासितरसं
रहस्यं साधूनामनुपधि विशुद्धं विजयते ॥
अर्थ: शुद्ध (खरा) प्रेमळ स्वभाव, विनयशील वागणूक आणि गोड वाचा यांचा आग्रह, इतरांचे भले करण्याची चांगली बुद्धी, निष्कलंक ओळख, मागे किंवा पुढे (आत किंवा बाहेर) न बदलता समानच असणाऱ्या आवडीनिवडी (रस) हे गुण म्हणजेच सज्जन लोकांच्या विजयाचे रहस्य आहे.
१२. रे रे घरट्ट मा रोदीहि! कं कं न भ्रामयन्त्यमूः |
कटाक्षवीक्षणादेव कराकृष्टस्य का कथा ||
अर्थ: अरे जात्या; (घरघर असा आवाज करून) रडू नकोस बाबा! या (स्त्रिया) कोणाला (गरा गरा) फिरायला (भाग पाडत) नाहीत बरे? अरे (एका) नजरफेकीनेच (त्या पळायला भाग पाडतात;) तुला तर हातानी खेचत असल्यावर गरगर फिरायला लागेल यात काय विशेष? (त्याच दुःख करू नकोस.)
१३. रोगशोकपरीतापबन्धनव्यसनानि च |
आत्मापराधवृक्षाणां फलान्येतानि देहिनाम् ||
अर्थ: माणसानी स्वतः केलेल्या अपराध (चूक; गुन्हा) रूपी वृक्षाची, आजार; शोक; दुःखं; जखडलं जाणं आणि संकटे येणं ही फळे आहेत.
१४. पूर्णे तटाके तृषितः सदैव भूतेपि गेहे क्षुधितः स मूढः ।
कल्पद्रुमे सत्यपि वै दरिद्रः गुर्वादियोगेऽपि हि यः प्रमादी ॥
अर्थ: सद्गुरु ची भेट होऊन सुद्धा जो चुका करतो तो (शिष्य) तळेपूर्ण भरलेले असूनही कायम तहानलेला असतो, स्वतःचे घर असूनही भुकेजलेला व कल्पवृक्ष मालकीचा असूनही गरीबच असतो.
१५. विषस्य विषयाणां हि दृश्यते महदन्तरम् |
उपभुक्तं विषं हन्ति विषयाः स्मरणादपि ||
अर्थ: विषय (हा विषाप्रमाणे असतात असं लोकांना वाटत पण खरं तर) आणि विष आणी विषय यात फार फरक आहे. विष खाल्लं तर ते खाणाऱ्याला मारून टाकते पण विषय मनात नुसते घोळवून (दुष्परिणाम होतो आणि) मरण ओढवते. (म्हणजे विषापेक्षा विषय वाईट की नाही?)
१६. कामधेनुसमा विद्या सदैव फलदायिनी।
प्रवासे मातृवत्तस्मात् विद्या गुप्तधनं स्मृतम्।।
अर्थ: कामधेनुप्रमाणेच (किंवा कल्पवृक्षाप्रमाणे) विद्यासुद्धा फळ देणारी असते. प्रवासामध्ये ती आईप्रमाणे आपले रक्षण करते. म्हणूनच तिला गुप्त धन असेही म्हणतात. (मातृदिना निमित्त)
१७. नमन्ति फलिनो वृक्षाः नमन्ति गुणिनो जनाः।
शुष्ककाष्टश्च मूर्खाश्च न नमन्ति कदाचन।।
अर्थ: फळांनी लगडलेला वृक्ष (त्याच्या फांद्या) खाली झुकतो. गुणवान लोक नम्रतेने वागतात, कोरडे लाकूड आणि मूर्ख लोक मात्र कधीच वाकत नाहीत.
विद्या विनयेन शोभते असेही एक सुवचन आहे.
फळांनी लगडलेल्या वृक्षांचे (त्याच्या फांद्यांचे) लवणे याच उदाहरणावर आणखी एक सुभाषित आहे. राजा भर्तृहरीच्या नीतीशतकामधील या सुभाषिताचा पंतकवि वामन पंडितांनी मराठीत श्लोकामध्ये सुरेख अनुवाद केला आहे. ते दोन्ही खाली दिले आहेत.
भर्तृहरीचा श्लोक
१८. भवन्ति नम्रास्तरवः फलागमैर्नवाम्बुभिर्दूरविलम्बिनो घनाः ॥
अनुद्धताः सत्पुरुषाः समृद्धिभिः स्वभाव एवैष परोपकारिणाम् ॥
भवन्ति नम्राः तरवः फलागमैः नव अम्बुभिः दूरविलम्बिनो घनाः।
अनुद्धताः सत्पुरुषाः समृद्धिभिः स्वभाव एषा एव परोपकारिणाम्।
अर्थ: ज्याप्रमाणे फळे लागल्यामुळे झाडे लवतात, पाण्याने भरल्यामुळे काळे ढग खाली येतात त्याचप्रमाणे समृद्धी आल्यानंतरसुद्धा चांगले लोक उद्धट न होता नम्र राहतात कारण परोपकार हा त्यांचा स्वभाव असतो.
वामन पंडितांचे रूपांतर
वृक्ष फार लवती फलभारे
लोंबती जलद देउनि नीरें ॥
थोर गर्व न धरी वैभवाचा
हा स्वभाव उपकार
१९. मूर्खाः यत्र न पूज्यंते धान्यं यत्र सुसंचितम्।पत्यो कलहो नास्ति तत्र श्रीः स्वयमागता।।
अर्थ: जिथे मूर्खांची पूजा केली जात नाही, जिथे धान्य चांगल्या प्रकारे साठवून ठेवले जाते, नवराबायकोंमध्ये भांडणे नसतात अशा जागी लक्ष्मी स्वतः येते.
एकमेकांशी भांडणतंटा न करता आपण एकजुटीने रहावे, सगळीकडे शांति राहू दे. असा साधारण अर्थ आहे असे समजून हा शांतिपाठ आपण असंख्य वेळा म्हंटला असेल, पण त्यामधील शब्दांचा नेमका अर्थ काय आहे? हे एका गुरूने त्याच्या शिष्याला उद्देशून म्हंटले आहे.
२०. ॐ सह नाववतु सहनौ भुनक्तु।
सह वीर्यं करवावहै।
तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः।।
अर्थ: (परमेश्वर) आपणा दोघांचे एकत्र रक्षण करो, आपण दोघे एकत्र भोजन करू (आमचे पोषण होऊ दे), एकत्र पराक्रम करू (सर्व शक्तीनिशी काम करू), आपले शिक्षण प्रकाशमान होऊ दे (आपल्याला ज्ञानाचे तेज प्राप्त होऊ दे), एकमेकांचा कधीही द्वेष करणार नाही. आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक शांति प्रस्थापित होऊ दे. (मनात,जगात आणि दैवी शक्तींमध्ये).
२१. अगुणस्य हतं रूपं दुःशीलस्य हतं कुलम्।
असिद्धस्य हता विद्या अभोगेन हतं धनम्।।
अर्थ: अंगात चांगले गुण नसले तर रूपाला काही अर्थ नसतो, माणसाचे शील शुद्ध नसले तर त्याच्या कुळाला बट्टा लागतो, शिकलेल्या विद्येचा उपयोग केला नाही तर ती कांही कामाची नाही आणि संपत्तीचा उपभोग घेतला नाही तर ती तशीच वाया जाते. थोडक्यात सांगायचे तर आपल्याकडे जे कांही असेल त्याचा चांगल्या कामासाठी उपयोग करता आला पाहिजे.
२२. विद्यार्थी सेवकः पान्थः क्षुधार्तो भयकातरः।
भाण्डारी प्रतिहारी च सप्तसुप्तान् प्रबोधयेत्।। (चाणक्य नीति शास्त्र)
अर्थ: (एरवी झोपलेल्या माणसाला उठवू नये, ते पाप आहे, पण) विद्यार्थी, नोकर, प्रवासी, भुकेलेला, घाबरलेला, स्वयंपाकी आणि राखणदार या सात झोपलेल्यांना (आवश्यक असेल तर)
झॊपेतून उठवायला हरकत नाही,
२३. लोभश्चेदगुणेन किं पिशुनता यद्यस्ति किं पातकैः,
सत्यं चेत्तपसा च किं शुचिमनो यद्यस्ति तीर्थेन किम्।
सौजन्यं यदि किं गुणैः सुमहिमा यद्यस्ति किं मण्डनैः,
सद्विद्या यदि किं धनैरपयशो यद्यस्ति किं मृत्युना।।
अर्थ: लोभ असतांना दुसरे दुर्गुण कशाला? कपटापुढे आणखी कुठल्या पापांचे काय? प्रामाणिकपणा असला तर तपाची काय गरज आहे? मन शुद्ध असेल तर तीर्थयात्रा कशाला? सौजन्य असेल तर आणखी कुठले गुण हवेत? मन मोठे असेल तर दिखाव्याची काय गरज आहे? चांगली विद्या असतांना दुसरी संपत्ती कशाला? अखेर अपयशापुढे मृत्यूचे एवढे काय?
कोणकोणत्या चांगल्या किंवा वाईट गोष्टींचे महत्व सगळ्यात जास्त असते किंवा असायला हवे हे चाणक्याने या श्लोकात सांगितले आहे. यात सांगितलेले विचार आजही तसेच मानले जातात.
२४. लोभमूलानि पापानि संकटानि तथैव च।
लोभात्प्रवर्तते वैरं अतिलोभात्विनश्यति ।
अर्थ: लोभ हे पाप, वैर आणि संकटांचे मूळ आहे, लोभामुळे वैर निर्माण होते आणि अतिलोभामुळे नाश होतो.
२५. रत्नैः महार्हैः तुतुषुर्न देवाः न भेजिरे भीमविषेण भीतिम्।
अमृतं विना न प्रययुर्विरामम् न निश्चितार्थात्विरमन्ति धीराः।।
अर्थ: समुद्रमंथन करतांना मिळालेल्या रत्नांनी देव संतुष्ट झाले नाहीत किंवा जालिम विषाच्या भीतीलाही ते बळी पडले नाहीत. अमृत मिळेपर्यंत ते स्वस्थ बसले नाहीत. धीरोदात्त पुरुष ठरवलेले लक्ष्य गाठल्याशिवाय विश्रांति घेत नाहीत.
डॉ. दिलीप कुलकर्णी
मोबा: ९८८१२०४९४
१६.०५.२०२३
As usual beautifully explained. जात्या वरील श्लोक छान आहे. धन्यवाद…