नवीन लेखन...

सुभाषित रत्नांनी – भाग ८

१. गते शोको न कर्तव्यो भविष्यं नैव चिन्तयेत्।
वर्तमानेन कालेन वर्तयन्ति विचक्षणा:॥
अर्थ: गेलेल्या (काळा बद्दल) शोक करू नये. भविष्याचीही काळजी करू नये.
बुद्धिमान लोक वर्तमान काळाप्रमाणे वागतात/ वर्तमान काळात जगतात.

२. न कश्चिदपि जानाति कि कस्य श्वो भविष्यति।
अतः श्वो करणीयानि कुर्यादद्यैव बुद्धिमान्॥
अर्थ: उद्या काय होणार ते कोणालाही माहित नाही.
म्हणून बुद्धिवान माणसाने उद्याचे काम आजच करतात.

३. प्रथमे नार्जिता विद्या द्वितीये नार्जितं धनम्।
तृतीये नार्जितं पुण्यं चतुर्थे किं करिष्यसि?॥
अर्थ: जीवनाच्या पहिल्या भागात विद्या, दुसऱ्या भागात धन,
तिसऱ्या भागात पुण्य मिळवलं नाही तर चौथ्या भागात काय करशील?
जीवनाच्या पहिल्या तीन पर्वात (बालपण, तरुणपण, प्रौढपण) तू कांहीच केले नाहीस तर म्हातारपणी काय करशील?

४. श्रमक्लमपिपासोष्णशीतादीनां सहिष्णुता।
आरोग्यं चापि परमं व्यायामादुपजायते ॥
अर्थ: श्रम, थकवा, तहान, उष्णता, थंडी इत्यादि सहन करण्याची शक्ती
आणि उत्तम आरोग्य सुद्धा व्यायामातून (व्यायाम केल्याने) उत्पन्न होते (प्राप्त होते).

५. मित्रेण कलहं कृत्वा न कदापि सुखी जनः।
इति ज्ञात्वा प्रयासेन तदेव परिवर्जयेत् ॥
अर्थ: आपल्या मित्राबरोबर भांडण करून (कोणी) व्यक्ती कधीही सुखी राहू शकत नाही.हे जाणून, प्रयत्नपूर्वक ते (भांडण) टाळावे.
मित्रांचे महत्व वर्णन केली आहे.

६. लोभात् क्रोधः प्रभवति लोभात् कामः प्रजायते।
लोभात् मोहः च नाशः च लोभः पापस्य कारणम् ॥
अर्थ: लोभातून क्रोध उत्पन्न होतो; लोभातून वासना उत्पन्न होते;
लोभातूनच होतो मोह आणि नाश. लोभामुळेच मनुष्य पाप करतो.
षड्रिपू पैकी लोभ हा किती वाईट असतो याचे वर्णन केले आहे.

७. देहे पातिनि का रक्षा यशो रक्ष्यमपातवत् |
नरः पतितकायोऽपि यशःकायेन जीवति ||
अर्थ: (केव्हातरी निश्चितपणे मृत्युमुखी) पडणाऱ्या शरीराच्या रक्षणाबद्दल अतिचिंता कशाला करायची? कीर्तिला जराही धक्का लागणार नाही याची मात्र काळजी घ्यावी. (कारण) मरून गेल्यावरसुद्धा मनुष्य कीर्तिरूपी शरीराने जिवंत राहतो.

८. कृपाद एकम वटच्छाया तथा मृद निर्मितं गृहं।
शीतकाले भवे उष्णम उष्णकाले तू शीतलं ।।
अर्थ: वटवृक्षाच्या छायेचे वर्णन केले आहे. वटवृक्षाची व माती निर्मित घर यांची छाया हिवाळ्यात उष्ण व उन्हाळ्यात थंड असते.
नुकतीच वटपौर्णिमा होऊन गेली आहे, त्या निमित्ताने.

९. अपूर्वः कोपि कोशोयं विद्यते तव भारति।
व्ययतो वृद्धिमायाति क्षयमायाति संचयात् ।।
अर्थ: हे देवी शारदे, तुझा विद्यांचा खजिना अपूर्व आहे, खर्च करण्याने त्यात भर पडते आणि साठवून ठेवण्याने त्यात घट होते. आपल्याकडे असलेली विद्या इतरांना देत असतांना ती अधिक पक्की होते आणि कुणालाही न देता आपल्याजवळच राखून ठेवली तर ती विस्मरणात जाऊ शकते.

१०. नास्ति कामसमो व्याधि: नास्ति मोहसमं दुखम्।
नास्ति क्रोधसमो वह्नि: नास्ति ज्ञानसमं सुखम्॥
अर्थ: मनुष्य जीवनात कामा सारखा दुसरा रोग नाही, दुसरे रोग बरे होतील परंतु कामना वाढतच जाते. मोहा सारखे कोणतेही दुःख नाही कारण संसारातील साऱ्या दुःखाचा उगम मोहच आहे. क्रोधासारखी दुसरी आग नाही जी आपल्या बरोबर जगालाही जाळते आणि फक्त वैर आणि वैरी निर्माण करते. पण ज्ञाना सारखे दुसरे सुख नाही ज्याच्यापासून मनुष्याला परम शांती, सन्मान, सुख, संपत्ती, आणी परमागती व सर्व कांही प्राप्त होते.

११. सर्वार्थसंभवो देहो जनित: पोषितो यत:।
न तयोर्याति निर्वेशं पित्रोर्मत्र्य: शतायुषा॥
अर्थ: (मनुष्यास) शंभर वर्षाचे जरी आयुष्य प्राप्त झाले तरी आईवडिलांच्या ऋणातून त्यास मुक्त होता येत नाही. खरे म्हणजे ज्यांनी जे शरीर, धर्म,,अर्थ, काम, मोक्ष प्राप्तीचे प्रमुख साधन आहे, त्या शरीराचे पालन पोषण ज्यांच्याकडून झाले आहे त्यांच्या ऋणातून मुक्त होणे कठीणच काय पण असंभव आहे.
हा एक फारच प्रसिद्ध श्लोक आहे.

१२. वैद्यराज नमस्तुभ्यं यमराजसहोदर ।
यमस्तु हरति प्राणान् वैद्यो प्राणान् धनानि च ॥.
अर्थ: हे वैद्यराज तुम्ही यमाचे भाऊ आहात, मी तुम्हाला प्रणाम करतो. यम तर फक्त प्राण घेऊन जातो पण वैद्य प्राण आणि धन पण घेऊन जातो.
सद्धयाच्या परिस्थितीत हा श्लोक फार चपखल बसतो. दवाखान्यांची एवढी मोठी बिले भरून पण रुग्ण दगावतो व कुटुम्बियांचे धन व रुग्णाचे प्राण दोन्ही जातात.

१३. कामधेनुसमा विद्या सदैव फलदायिनी।
प्रवासे मातृवत्तस्मात् विद्या गुप्तधनं स्मृतम्।।
अर्थ: कामधेनुप्रमाणेच (किंवा कल्पवृक्षाप्रमाणे) विद्यासुद्धा फळ देणारी असते. प्रवासामध्ये ती आईप्रमाणे आपले रक्षण करते. म्हणूनच तिला गुप्त धन असेही म्हणतात.

१४. अष्टादशपुराणानां सारं व्यासेन कीर्तितम्।
परोपकार: पुण्याय पापाय परपीडनम्॥
पाठभेदः
अष्टादशपुराणेषु व्यासस्य वचनद्वयम्।
परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम्।
अर्थ: व्यासमहर्षींनी अठरा पुराणांचे सार (दोन वाक्यात) असे सांगितले आहे. “परोपकार (दुसऱ्यावर उपकार करणे) म्हणजे पुण्य आणि परपीडा (दुसऱ्यांना त्रास देणे) म्हणजेच पाप”
“पुण्यपर उपकार पाप हे परपीडा (भीमसेन जोशींनी म्हटलेला अभंग)”

१५. धनानि भूमौ पशवश्च गोष्ठे
भार्या गृहद्वारि जनः श्मशाने।
देहश्चितायां परलोकमार्गे
कर्मोनुगो गच्छति जीव एकः ॥
अर्थ: धन, द्रव्य भूमीवर, पशु गोठ्यात, पत्नी घरात, नातलग स्मशानात, आणि शरीर चितेवर राहते. केवळ तुम्ही केलेले कर्मच परलोकाच्या मार्गावर तुमच्या बरोबर येते.

१६. अनन्तशास्त्रं बहुलाश्च विद्या
अल्पं च कालो बहुविघ्नता च।
आसारभूतं तदुपासनीयं
हंसो यथा क्षीरमिवाम्बुमध्यात्॥
अर्थ: शास्त्रे खूप आहेत, विद्या सुद्धा अनेक आहेत, परंतु मनुष्याचे जीवन फार छोटे (लहान) आहे. त्याच्यात सुद्धा विघ्ने खूप आहेत. म्हणून हंस जसा मिळालेल्या पाण्यातून दूध वेगळे करून पितो व पाणी सोडून देतो तसे महत्वाच्या विद्या ग्रहण करून बाकी सोडून दिल्या पाहिजेत.

१७. श्रिय: प्रसूते विपदः रुणद्धि,
यशांसि दुग्धे मलिनं प्रमादि ।
संस्कार सौधेन परं पुनीते,
शुद्धा हि बुद्धिः किलकामधेनुः॥
अर्थ: पवित्र आणि शुद्ध बुद्धी कामधेनु सारखी आहे. धनधान्य निर्माण करते, (बुद्धीमुळे) संकटापासून वाचवते; यश आणि किर्ती रुपी दुधाने मलिनता धुऊन टाकते व जवळ सान्निध्यात आलेल्या लोकांना आपल्या पवित्र संस्कारानी पुनीत करते.

१८. अनित्यानि शरीराणि विभवो नैव शाश्वतः ।
नित्यं संनिहितो मृत्युः कर्तव्यो धर्मसङ्ग्रहः ॥
अर्थ: मनुष्याचे शरीर हे नश्वर आहे.धन आणि द्रव्य हे नेहमीच चंचल असते व शाश्वत नाही. मृत्यू तर आपल्या नेहमीच जवळ असतो म्हणून आपण आपले कर्तव्य व पुण्य कर्म करत राहावे.

१९. ॐ सह नाववतु सहनौ भुनक्तु।
सह वीर्यं करवावहै।
तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥
अर्थ: परमेश्वर आपणा दोघांचे एकत्र रक्षण करो, आपण दोघे एकत्र भोजन करू,
आमचे पोषण होऊ दे, एकत्र पराक्रम करू, सर्व शक्तीनिशी काम करु, आपले शिक्षण प्रकाशमान होऊ दे, आपल्याला ज्ञानाचे तेज प्राप्त होऊ दे, एकमेकांचा कधीही द्वेष करणार नाही. आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक शांति प्रस्थापित होऊ दे. (मनात, जगात आणि दैवी शक्तींमध्ये).
एकमेकांशी भांडणतंटा न करता आपण एकजुटीने रहावे, सगळीकडे शांति राहू दे.
असा साधारण अर्थ आहे असे समजून हा शांतिपाठ आपण असंख्य वेळा म्हंटला असेल, पण त्यामधील शब्दांचा नेमका अर्थ काय आहे? हे एका गुरूने त्याच्या शिष्याला उद्देशून म्हंटले आहे.


भर्तृहरि नीती शतकातिल पाच श्लोक खाली अर्थासह देत आहे.

२०. लभेत सिकतासु तैलमपि यत्नतः पीडयन्
पिबेच्च मृगतृष्मिकासु सलिलं पिपासार्दितः।
कदाचिदपि पर्यटन् शशविषाणमासादयेत्
न तु प्रतिनिविष्टमूर्खजनचित्तमाराधयेत् ॥
अर्थ: अथक प्रयत्न करून वाळूपासून तेल पण काढता येईल, तसेच मृगजळापासून पाणीही मिळवता येईल, कदाचित शिंग असलेला ससा ही आपल्याला दिसू शकतो पण हठवादी, मूर्ख हट्टी दुराग्रही, पूर्वग्रही माणसाला खऱ्या गोष्टीचा बोघ करून देणे असंभव आहे.

२१. रूपयौवनसंपन्ना विशालकुलसंभवाः।
विद्याहीना न शोभन्ते निर्गन्धाः किंशुका इव।।
अर्थ: रूप, तारुण्य, सौन्दर्य यौवन यांची प्राप्ती तसेच नामांकित कुटुंबात, परिवारात कुळात जन्म होऊनही अडाणी विद्याविहीन असेल तर ती व्यक्ती शोभून दिसत नाही. जसे की पळसाच्या वृक्षाला (किंशुक) आकर्षक रंगाची फुले असतात पण गंध, रस हीन असल्याने शोभून दिसत नाहीत व त्यांचा उपयोग हि होत नाही.

२२. शशिना च निशा निशया च शशी शशिना निशया च विभाति नभः।
पयसा कमलं कमलेन पयः पयसा कमलेन विभाति सरः॥
अर्थ: चंद्राने निशेला (रात्रीला) शोभा येते. रात्री चंद्र उठून दिसतो. रात्र व चंद्राच्या चांदण्यामुळे आकाशाला शोभा येते पाण्याने कमळाला शोभा येते. कमळामुळे पाण्याला शोभा येते व कमल आणि पाणी यामुळे सरोवराला शोभा येते

२३. न सा सभा यत्र न सन्ति वृद्धाः
वृद्धा न ते ये न वदन्ति धर्मम्।
धर्मो न वै यत्र च नास्ति सत्यं,
सत्यं न तद् यच्छलनानुविद्धम्॥
अर्थ: ज्या सभेमद्धे वृद्ध, जाणते सज्जन, सतूशील, ज्ञानी, बुद्धिमान अनुभवी लोक उपस्थित नाहीत ती सभा नव्हे; उपस्थित असलेले जे सत्य जे, ते सत्य, धर्म, कर्तव्य जबाबदारी याबद्दल बोलत नाहीत ते वृद्ध जाणते नव्हेत; ज्यात सत्याचा अंश नाही तो धर्मच नाही; व जे दुष्ट, स्वार्थ, कपट वृत्तीने वेधले गेलेले आहेत ते पूर्ण सत्यही नाही

२४. व्यालं बालमृणालतन्तुभिरसौ रोद्धुं समुज्जृम्भते
छेत्तुं वज्रमणीञ्छिरीषकुसुमप्रान्तेन सन्नह्यते ।
माधुर्यं मधुबिन्दुना रचयितुं क्षाराम्बुधेरीहते
नेतुं वाञ्छति यः खलान्पथि सतां सूक्तैः सुधास्यन्दिभिः ॥
अर्थ: आपल्या विद्वत्तेच्या गोड गोष्टींनी दुष्ट लोकांना सन्मार्गावर आणण्याचा प्रयास करणे म्हणजे एका मनात हत्तीला कमळाच्या फुलांच्या पाकळ्यांनी कह्यात आणणे किंवा एखाद्या हिऱ्यास शिरीष झाडाच्या फुलांनी कापणे किंवा एका थेंबाने समुद्राचे खरे पाणी गोड केल्या सारखे आहे. थोडक्यात मूर्ख माणसाला शहाणे बनवणे असंभव आहे.

डॉ. दिलीप कुलकर्णी
०८. ०६. २०२३

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 78 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

3 Comments on सुभाषित रत्नांनी – भाग ८

  1. जीवनाचा आनंद घ्यायचा असेल, व सुखाने आयुष्य जगायचे असेल तर लेखकाने सांगितले आहे त्या प्रमाणे प्रत्येकाने ने लागलं पाहिजे.

  2. सर्व सुभाषिते फार उद्बोधक आहेत व त्यांचे भाषांतर देखील उत्तम प्रकारे केलेले आहे त्याबद्दल डॉक्टर दिलीप कुलकर्णी यांना मनःपूर्वक धन्यवाद ???

    • You translated the meaning of slokas in marathi. It is really
      Useful for all of us. Great efforts ?????

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..