या भागाची सुरवात आपण शंकराचार्य यांच्या प्रसिद्ध श्लोकाने करणार आहोत.
अन्नपूर्णा, अन्नपूर्णेश्वरी, अन्नदा किंवा अन्नपूर्णा ही पार्वतीचे रूपे आहेत आणि अन्न आणि पोषणाची हिंदू देवी म्हणून ओळखली जाते. हिंदू धर्मात पूजा आणि अन्न अर्पण यांची खूप प्रशंसा केली जाते, आणि म्हणूनच, अन्नपूर्णा देवी लोकप्रिय देवता म्हणून ओळखली जाते. ती देवी पार्वती, शिवाची पत्नी चे रूप आहे आणि अन्नदा मंगलमध्ये तिचे स्तवन केले जाते.
१. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राण वल्लभे ।
ज्ञान वैराग्य सिद्धयर्थं भिक्षा देहीं च पार्वती ।।
माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वर: ।
बांधवा: शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम ।।
अर्थ: ह्या श्लोकात पार्वती देवीच्या अन्नपूर्णा स्वरूपाची माहिती सांगितली आहे. अन्नपूर्णा देवी ही शंकराची शक्ती व पत्नी पण आहे. ती संपूर्ण आहे. अनादि काला पासून अन्नपूर्णामाता मनुष्याला अन्नाचे वरदान देत आहे आणि अनंतापर्यंत अन्नाचा प्रसाद देत राहील. आपणही अन्नपूर्णा देवीची आपल्या ज्ञान व वैराग्य या मार्गाने सिद्धी प्राप्त करून घेण्यासाठी आवश्यक अन्न रुपी प्रसादाची याचना करू या.
२. सत्यस्य वचनं श्रेय: सत्यादपि हितं वदेत् ।
यद्भूतहितमत्यन्तमेतत्सत्यं मतं मम ||
अर्थ : खरं बोलण हे चांगलं असतं. सत्यापेक्षा सुद्धा जे हितकारक असेल ते बोलावे. ज्यामुळे प्राणीमात्रांचे अतिशय कल्याण होईल तेच सत्य होय असे मला वाटते.
३. नरत्वं दुर्लभं लोके विद्या तत्र सुदुर्लभा।
शीलं च दुर्लभं तत्र विनयस्तत्र सुदुर्लभः॥
अर्थ: मनुष्याचा जन्म मिळणे कठीण असते. त्यातही शिक्षण मिळणे अजून अवघड असते त्यातही चारित्र्य संपादन करणं अधिक कठीण आणि एवढे (असूनही ) नम्रपणा (असणारा ) फारच विरळा .
४. ईर्षुर्धृणी नसन्तुष्टः क्रोधनो नित्यशङ्कितः ।
परभाग्योपजीवी च षडेते नित्यदुःखिताः ॥
अर्थ: (सतत दुसऱ्याशी ) स्पर्धा (तुलना) करणारा, (फार) सहानुभूति बाळगणारा,. असमाधानी, सतत भिणारा (किंवा शंका काढणारा) दुसऱ्याच्या आश्रयाने राहणारा असे सहा जण नेहेमी) दुःखी असतात.
विदुर नीति : संस्कृत मधे शंक धातूचा अर्थ भिणे असा आहे.
५. वस्त्रदानफलं राज्यं पादुकाभ्यां च वाहनम् ।
ताम्बूलाद्भोगमाप्नोति अन्नदानात्फलत्रयम् ॥
अर्थ: वस्त्र दान केल्याने राज्य (मिळते ) पादुका (चपला) दिल्याने वाहन (मिळेल) विडा दिल्याने विषय प्राप्त होतात अन्नदान केल्याने तिन्ही गोष्टी मिळतात.
अन्नदान किती श्रेष्ठ आहे हे वर्णन केले आहे.
६. बुभुक्षितैर्व्याकरणं न भुज्यते पिपासितैः काव्यरसो न पीयते |
न च्छन्दसा केनचिदुद्ध्रृतं कुलं हिरण्यमेवार्जय निष्फला गुणाः ||
अर्थ: भूकेलेल्यांची भूक व्याकरण खाऊन भागत नाही. तहानलेले काव्य परीक्षण पिऊ शकत नाहीत. वेदांच्या (ज्ञानाने) कोणी घरात बरकत आणू शकत नाही. त्यामुळे धन मिळवावे, गुण वाया जातात.
७. सौवर्णानि सरोजानि निर्मातुं सन्ति शिल्पिनः |
तत्र सौरभनिर्माणे चतुरश्चतुराननः ||
अर्थ: (चांगले) सोनार सोन्याची कमळे बनवू शकतात. पण त्यात सुगंध मात्र फक्त चतुर असा ब्रह्मदेवच निर्माण करू शकतो. (निसर्गा इतकी उत्तम आणि परिपूर्ण रचना मानव करू शकत नाही)
८. अर्थेन भेषजं लभ्यमारोग्यं न कदाचन |
अर्थेन ग्रन्थसंभारः ज्ञानं लभ्यं प्रयत्नतः ||
अर्थ: पैसे (देऊन) औषध मिळते, पण आरोग्य कधीही पैसे देऊन मिळत नाही. पैशांनी पुस्तकांची चळत (विकत) मिळते, पण ज्ञान (त्यामुळे ज्ञान मिळत नाही ते ) कष्टाने मिळवावे लागते.
९. मनसेह मनोज्ञाय धारासंसरणे रभः|
भरणे रससंराधा यज्ञा नो महसे नमः ||
अर्थ: इथे (ह्या जगात ) मनाने त्या सुंदर तेजाला नमस्कार असो. आम्ही उच्च ध्येयाकडे जोमाने जात आहोत आणि त्यासाठी केलेले यज्ञ म्हणजे रसपूर्ण मेजवानीच.
श्री . भि . वेलणकर यांच्या चित्रकाव्यातील विलोमकाव्य या पोटप्रकारातला हा श्लोक आहे . पहिली ओळ वाचल्यानंतर शेवटच्या अक्षरा पासून उलट वाचत आले तरी त्याला सुंदर अर्थ असतो अशा काव्याला विलोम काव्य म्हणतात.
१०. श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् |
अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ||
इति पुंसार्पिता विष्णौ भक्तिश्चेन्नवलक्षणा |
क्रियते भगवत्यद्धा तन्मन्येऽधीतमुत्तमम् ||
भागवत सातवा स्कंध पाचवा अध्याय
अर्थ: प्रल्हाद हिरण्यकश्यपुला सांगतो विष्णूची भक्ति – श्रवण (त्याच्या कथा ऐकणे) नामसंकीर्तन, मनात स्मरण करणे, पाय चेपणे, पूजा करणे, नमस्कार करणे, दास्य भक्ति (हनुमानाप्रमाणे), सख्य भक्ति (अर्जुनाप्रमाणे) आणि आत्मनिवेदन (स्वतः देव आपलं ऐकतो आहे अशा प्रकारे त्याला सर्व सांगणे) – अशी नवविधा भक्ति केली तर ते उत्तम शिक्षण होय.
११. क्षणशः कणशश्चैव विद्यां अर्थं च साधयेत्।
क्षणे नष्टे कुतो विद्या कणे नष्टे कुतो धनम्॥
अर्थ: क्षणा क्षणाचा उपयोग जीवनात शिकण्यासाठी करा. लहान लहान शिक्के(पैसे) वाचवता येथील तेव्हढे वाचवा. क्षणा चा नाश करून विद्याप्राप्ती होत नाही व पैसे (शिक्के) नष्ट करून धनप्राप्ती होऊ शकत नाही.
१२. कः कालः कानि मित्राणि को देशः कौ व्ययागमौ ।
कश्चाहं का च मे शक्तिरिति चिन्त्यं मुहुर्मुहुः ।।
अर्थ: (कुठलेही मोठे काम हातात घेतांना) काळ, वेळ, मित्र, जागा, उत्पन्न, खर्च, आपले स्थान, शक्ती वगैरेंचा पुन्हा पुन्हा विचार करावा. अविचार करू नये.
१३. अपूर्वः कोपि कोशोयं विद्यते तव भारति।
व्ययतो वृद्धिमायाति क्षयमायाति संचयात् ।।
अर्थ: हे देवी शारदे, तुझा (विद्यांचा) खजिना अपूर्व आहे, खर्च करण्याने त्यात भर पडते आणि साठवून ठेवण्याने त्यात घट होते. आपल्याकडे असलेली विद्या इतरांना देत असतांना ती अधिक पक्की होते आणि कुणालाही न देता आपल्याजवळच राखून ठेवली तर ती विस्मरणात जाऊ शकते.
१४. दीपो नाशयते ध्वान्तं, धनारोग्ये प्रयच्छति |
कल्याणाय भवति एव , दीपज्योतिर् नमोस्तु ते ||
अर्थ: दिवा अंधाराचा नाश करतो, धन व आरोग्य देतो आणि कल्याण करतो. हे दीपा , तुला माझा नमस्कार असो.
याशिवाय आपण नेहमी ही प्रार्थना म्हणतोच,
शुभंकरोति कल्याणम् आरोग्यम् धनसंपदा शत्रुबुद्धीविनाशाय दीपज्योती नमोस्तु ते ।
हे दिव्या, सर्व शुभ आणि कल्याणकारक असे घडावे, मला आरोग्य आणि समृद्धी मिळावी आणि माझ्या मनातली वैरभावना नाहीशी व्हावी यासाठी मी तुला नमस्कार करतो.
१५. इन्द्रियाणि च संयम्य बकवत्पण्डितो नरः।
देशकालबलं ज्ञात्वा सर्वकार्याणि साधयेत् ।।
अर्थ: बगळ्याप्रमाणे आपल्या इंद्रियांवर संयम ठेवून आणि देश, वेळ व बळ समजून घेऊन आपली सर्व कामे
(कर्तव्ये ) साध्य करावीत.
१६. सुश्रान्तोपि वहेद्भारं शीतोष्णं न च पश्यति।
संन्तुष्टश्चरते नित्यं त्रीणि शिक्षेच्च गर्दभात्।।
अर्थ: गाढव दमलेला असला तरीसुद्धा (विश्रांति न घेता) भार वाहून नेणे, थंड किंवा ऊष्ण याची पर्वा न करणे (समभाव) आणि नेहमी संतुष्ट असणे हे तीन गुण गाढवाकडून शिकण्यासारखे आहेत.
हे पण एक प्रसिद्ध सुभाषित आहे.
१७. मर्कटस्य सुरापानं मध्ये वृश्चिक दम्शनम् ।
तन्मध्ये भूतसञ्चारो यद्वा तद्वा भविष्यति ॥
अर्थ: एखाद्या माकडाला जर प्रथम दारू पाजली व त्यांत त्याला आणखी विंचू चावला व नंतर त्यास भूतबाधा झाली तर तो केवढा प्रचंड धिंगाणा घालेल त्याचे वर्णनहि करतां येणार नाही. एखाद्या कुचेष्टेखोर अथवा खोड्याळ मनुष्याला जर अनुकूल संधि मिळाली तर त्याच्या माकडचेष्टांना किती ऊत येईल?
१८. क्षते प्रहारा निपतंत्यभीक्ष्णं धनक्षये दीप्यति जाठराग्निः ।
आपत्सु वैराणि समुल्लसंति छिद्रेष्वनर्था बहुलीभवंति ॥
-पञ्चतंत्र
अर्थ: लहानशा जखमेला पुन्हा पुन्हा धक्का लागून ती चिघळते, पैसे नसतांना जोरातच भूक लागते, संकट आले तर वैरी आनंदाने जल्लोश करतात, तेंव्हा लहानशा छिद्रापासून खूप अनर्थ होत असतात. लहानसहान त्रासाकडेही दुर्लक्ष करणे घातक ठरू शकते.
१९. दृष्ट्वा यतिर्यतिं सद्यो वैद्यो वैद्यं नटं नटः।
याचको याचकं दृष्ट्वा श्वानवद् गुर्गुरायते।।
पाठभेद: पंडितो पंडितं दृष्ट्वा श्वानवद् गुर्गुरायते
अर्थ: एक संन्यासी दुसऱ्या संन्यास्याला, एक वैद्य दुसऱ्या वैद्याला, एक नट दुसऱ्या नटाला आणि एक भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याला पाहून कुत्र्यासारखे गुरगुरायला लागतो.
२०. न द्विषन्ति न याचन्ते परनिन्दां न कुर्वते।
अनाहूता न चायान्ति तेनाश्मानोऽपि देवताः॥
अर्थ: दगड कुणाचा द्वेष करत नाहीत, ते कुणाकडे भीक मागत नाहीत, कुणाची निंदा करत नाहीत, कुणाकडे न बोलावता अचानक जात नाहीत (त्यांच्यात माणसांचे हे दुर्गुण नसतात) यामुळे तेसुद्धा देव असतात.
२१. लोके नास्ति नृपोsत्र दर्परहितो विद्वान्न निर्मत्सरः
शैलो नास्ति च हिंस्रजन्तुरहितः काव्यं न दोषोज्झितम्।
वाणिज्यं न च वञ्चनाविरहितं वृत्तिर्न निष्कण्टका
निर्दोषं नहि वस्तु किञ्चन ततो मोहं त्यजेत्सर्वथा ॥
अर्थ: या जगात निगर्वी असा राजा नसतो, मत्सर न करणारा विद्वान नसतो, हिंस्र श्वापदे नसलेला पर्वत नसतो, दोषापासून मुक्त काव्य नसते, फसवणुकीशिवाय धंदा नसतो, निष्कंटक व्यवसाय असत नाही. कुठलीही वस्तू पूर्णपणे निर्दोष असत नाही. म्हणून माणसाने तिचा (पूर्णत्वाचा) मोह (खोटी आशा) सोडून द्यावा.
२२. सत्यं माता पिता ज्ञानं धर्मो भ्राता दया सखा।
शान्ति: पत्नी क्षमा पुत्र: षडेते मम बान्धवा:॥
पाठभेद- सखा- स्वसा
अर्थ: सत्य हीच माझी आई, ज्ञान हे वडील, धर्म हा भाऊ, दया हा मित्र किंवा बहीण, शांति ही पत्नी आणि क्षमा हा मुलगा असे माझे सहा आप्त आहेत.
२३. गीतं कोकिल तावकं रसविदः शृण्वन्ति कर्णामृतं
नो किञ्चिद्वितरन्ति ते तरुदलैरेव स्वयं जीवसि।
कर्णायुर्हरमुद्गिरन्ति विरुतं काकास्तु तेभ्यो बलिं
प्राज्ञा एव हरन्ति हन्त धिगिदं वक्रं विधिक्रीडितम् ॥
सुभाषितकौस्तुभ ५३
अर्थ: अरे कोकिळा, रसिक लोक त्यांच्या कानांना अमृतासारखे वाटणारे तुझे गोड गायन ऐकतात, पण ते तुला काहीही देत नाहीत, तू तर झाडांची पाने खाऊन जगतोस. हा कावळा कर्कश आवाज करून कान किटवतो, तरी विद्वान लोकसुद्धा त्यांला पिंड खाऊ घालतात. दैवाच्या या खेळाचा धिःकार असो.
२४. अत्यद्भुतानामनभिज्ञगोष्ठ्यामस्ति प्रशस्तिर्न कवीन्द्र- वाचाम्।
मण्डूकसंघे मधुरापि सा किं मयूरगीतिर्बहुमानमेति ॥
सुभाषितकौस्तुभ ६
अर्थ: अज्ञानी लोकांच्या सभेत अद्भुत अशा कविराजाच्या काव्यवाचनाची प्रशस्ति होत नाही. बेडकांच्या कळपात मोराच्या गायनाला कुठला मान मिळणार आहे? गाढवाला गुळाची चंव काय?
२५. किं खलु रत्नैरेतैः किं पुनरभ्रायितेन वपुषा ते।
सलिलमपि यन्न तावकमर्णव वदनं प्रयाति तृषितानाम् ॥
भामिनीविलास
अर्थ: अरे सागरा, तुझे पाणी तहानलेल्यांच्या तोंडात जात नसेल (तुझे पाणी ते पिऊ शकत नसतील) तर तुझ्या आकाशासारख्या सुंदर वस्त्राचे आणि तुझ्यात दडलेल्या रत्नांचे खरेच काय करायचे? (त्यांचे काय महत्व किंवा उपयोग आहे?)
डॉ. दिलीप कुलकर्णी
डॉ.कुलकर्णी, ह्यांचा लेख आधीच्या भागात आलेल्या लेखां प्रमाणेच अर्थपूर्ण आणि वाचनिय आहेत. कौतुकाची गोष्ट म्हणजे हल्ली असे लिखाण अभावानेच वाचायला मिळते म्हणून कौतुक. वाचुन समाधान झाले. धन्यवाद!
खुपच छान डी के साहेब, सर्व वाचून झाल्यावर माझ्या तर ज्ञानात खुपच भर पडली. धन्यवाद !!!
Apratim ahe
Khup chan ,
१६ वा आणि २० वा श्लोक विशेष आवडला.
धन्यवाद…