१९४४ सालातील गोष्ट आहे. एका बावीस वर्षांच्या तरुणानं ‘महारथी कर्ण’ या हिंदी चित्रपटात नारदाची छोटी भूमिका केली. तीन दिवसांत त्याचे जेवढे सीन होते, त्याचं शुटींग पूर्ण झालं. त्या चित्रपटाच्या निर्माता-दिग्दर्शकानं त्याला आॅफिसमध्ये बोलावून घेतलं व त्याच्या हातावर नारदाच्या भूमिकेचं मानधन म्हणून पाच हजार रुपये ठेवले. त्या मुलाची आयुष्यातील ती पहिली कमाई होती. त्याच्यासोबत त्याचे वडिलही होते. त्याने लागलीच वडिलांकडे जाऊन त्यांना ती रक्कम दाखवली. वडील त्याच चित्रपटात महारथी कर्णाची भूमिका करीत होते. त्यांनी मुलांच्या हातून ते पैसे आपल्याकडे घेतले व त्या निर्मात्याकडे गेले. त्या निर्मात्याला त्यांनी विनंती केली की, ‘माझ्या मुलाच्या हातात, आपण एवढी रक्कम दिल्यामुळे तो बिघडेल. तेव्हा कृपाकरुन ती रक्कम, आपण परत घ्या.’ निर्माते त्या मुलाच्या वडिलांना म्हणाले, ‘एकदा दिलेले मानधन मी परत घेत नसतो. ते पैसे इथे टेबलवर ठेवा. मी त्याला ते परत देईन.’
ते ‘महारथी कर्ण’ या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक होते, चित्रतपस्वी भालजी पेंढारकर! तो नारदाची भूमिका करणारा मुलगा होता, राज कपूर व त्या चित्रपटात ‘महारथी कर्ण’ची भूमिका करणारे कलाकार होते, पृथ्वीराज कपूर!
त्या चित्रपटाचे शुटींग संपल्यानंतर, दोघेही पितापुत्र मुंबईला गेले. राजकपूरने त्या पाच हजारांच्या रकमेत अजून दोन हजारांची भर घालून चेंबूर येथे मोठी जमीन खरेदी केली. त्या माळरानावर त्याने ‘आरके स्टुडिओ’ उभा केला..
याच आरके स्टुडिओमध्ये, राज कपूरने पुढे अनेक चित्रपटांची निर्मिती केली. या स्टुडिओने त्याला यश, कीर्ति, प्रसिद्धी, संपत्ती सर्व काही दिलं. इथेच त्याने ‘जागते रहो’ चित्रपटाची निर्मिती केली, त्यावेळी शुटींगसाठी बांधलेली उंच भिंत त्याने शेवटपर्यंत तशीच ठेवलेली होती. याच आरके स्टुडिओमध्ये दरवर्षी अनेक मान्यवर कलाकारांसोबत होळीचा सोहळा रंगत असे.
राज कपूरने स्वतःसाठी हा स्टुडिओ वापरलाच, शिवाय इतर निर्मात्यांना तो भाड्याने वापरायला दिला. त्यामुळे इथे अनेक अजरामर चित्रपटांची निर्मिती झाली..
जेव्हा कधी भालजी पेंढारकर मुंबईत येत असत, तेव्हा आरके स्टुडिओमध्ये भगवा झेंडा उभारला जात असे. ती भालजींना कृतज्ञेपोटी दिलेली मानवंदना असे. भालजींना स्वतः पृथ्वीराज कपूर, पायावर डोकं टेकवून नमस्कार करीत असत.. त्यांचच अनुकरण राज कपूरही नम्रतेने करीत असे.
१९७२ साली पृथ्वीराज कपूर गेले. १९८८ साली राज कपूर गेले.१९९४ साली भालजी पेंढारकर गेले. राज कपूर गेल्यानंतर आरके स्टुडिओ त्यांच्या मुलांनी कसाबसा काही वर्षे चालविला. काही वर्षांनंतर स्टुडिओला आग लागली व मोठं नुकसान झालं..
आरके स्टुडिओ शेवटची घटका मोजत होता.. शेवटच्या काळात त्याचा खर्चही निघण्याएवढं उत्पन्न होत नव्हतं.. शेवटी राज कपूरच्या सर्व मुलांनी एकत्र येऊन दोन वर्षांपूर्वी तो विकण्याचा निर्णय घेतला… व्यवहार झाला व आरके स्टुडिओ जमीनदोस्त केला गेला…
आज या आरके स्टुडिओशी जोडलेल्या अनेक व्यक्ती या जगातून निघून गेलेल्या आहेत… आता राहिल्यात फक्त आठवणी…
चित्रपटाच्या या शंभर वर्षांच्या इतिहासातील, छोट्या भूमिकेला पाच हजार रुपये देणारे, दिलदार निर्माते पुन्हा होणार नाहीत..
आपल्या मुलाच्या हातात एवढी मोठी रक्कम आल्यावर तो बिघडेल, अशी काळजी करणारा पृथ्वीराज कपूरसारखा वडिलही पुन्हा होणार नाही…
त्या पाच हजारांत भर घालून आरके स्टुडिओचं स्वप्न साकार करणारा राज कपूरही पुन्हा होणार नाही..
या मायानगरीत सत्तर वर्षे उभं राहून शेकडो निर्मात्यांची स्वप्नं प्रत्यक्षात आणून त्यांना व्यावसायिक यश मिळवून देणाऱ्या, आरके स्टुडिओचं आता नामोनिशाणही राहिलेलं नाहीये….
ही हृद्य आठवण मला सांगितली सुबोध गुरूजी, या ज्येष्ठ कला दिग्दर्शकाने.. ज्यांनी हिंदी व मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ पाहिलेला आहे, त्यांच्याकडून मला तो ऐकायला आवडतो.. त्यातल्या काही निवडक आठवणी मी अशाच प्रकारे लिहित राहीन….
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२२-८-२१.
Leave a Reply