पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाच देशांचा यशस्वी दौरा भारताची आर्थिक, संरक्षण चौकट मजबुत करण्यासाठी उपयुक्त….
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ५-१० जुनच्या पाच देशांच्या दौर्यामागे मुख्य उद्देश होता तो अणू पुरवठादार गटामध्ये (न्युक्लिअर सब्स्क्रायबर्स ग्रुप किंवा एनएसजी) भारताला प्रवेश मिळवून देण्यासाठी त्यातील सदस्य देशांचा पाठिंबा मिळविण्याचा. पाचपैकी तीन देश एनएसजीचे सदस्य आहेत.मोदी यांनी अफगाणिस्तान, कतार,स्वित्झर्लंड,अमेरिका,मेक्सिको या 5 देशांना भेटी दिल्या आहेत.
अफगाणिस्तानात विकासकार्याद्वारे भारताचा ठसा
अफगाणिभूमीत नरेंद्र मोदीनी, भारताने बांधून दिलेल्या भव्य धरणाचे उद्घाटन केले .इराण मधिल चाबाहार बंदर भारताने विकसित केले व त्याचा व्यापारी वापर सुरू केला की, त्या आखाती मार्गावर भारताचीही करडी नजर असणार आहे. भारतासाठी अफगाणिस्तान व पुढे उझबेगीस्तान-कझागस्तान रशियामार्गे युरोपात पोहोचण्याचा मार्ग सुकर होणार आहे. इराणच्या सीमेपर्यंत अफगाणिस्तानचा महामार्ग भारताने आधीच बांधून काढला आहे.तोही महामार्ग पाकच्या बलुचिस्तान सीमेला समांतर जाणारा आहे. थोडक्यात, भारताला हे बंदर व्यापाराइतकेच लष्करी रणनीतीमध्येही उपयुक्त ठरणार आहे. मात्र, चीनसाठी ग्वादार बंदर तितके उपयुक्त असले, तरी सुरक्षित नाही. कारण त्याचा मार्ग बंडखोर तालिबानी, बलुची प्रदेशातून जातो.
पाकिस्तानचा प्रभाव अफगाणिस्तानच्या पश्तून समाजापर्यंत मर्यादित आहे.हिंदुकुश पर्वतरांगेच्या उत्तर भागात ताजीक, उझबेग, हजारा आदी इतर गैर-पश्तून समाज पाकिस्तानचा आणि तालिबानचा विरोध करतात. सलमा धरण आणि विद्युत प्रकल्प, झरांज-देलाराम महामार्ग आणि शेजारच्या इराणमध्ये चाबहार बंदराचा विकास आदी विकासकार्याद्वारे भारताने या देशांत स्वतःचा ठसा उमटविला आहे. याद्वारे भारताला अफगाणिस्तानच्या बिन-पश्तून भागात प्रभाव वाढवण्याच्या प्रयत्नात यश मिळत आहे; तसेच पाकिस्तान एकाकी पडत आहे.
कतार भेट -गुंतवणुकीच्या संधींचा फायदा उठवा
कतार या इंधनसमृद्ध देशाच्या आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मोदी यांनी कतारच्या प्रमुख उद्योगपतींबरोबर एक तास चर्चा केली. या वेळी त्यांनी भारतात व्यवसायवृद्धीसाठी आपल्या सरकारद्वारा गेल्या दोन वर्षांत राबविण्यात आलेल्या धोरणांची माहिती दिली.अनुकूल धोरणांवर भर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कतारच्या कंपन्यांना प्रामुख्याने पायाभूत सुविधा क्षेत्रातील उपलब्ध व्यवसायाच्या संधींचा फायदा उठविण्याचे आमंत्रण दिले. या कंपन्यांनी नमूद केलेले अडथळे दूर करण्याचे आश्वासनही मोदी यांनी दिले.
पंतप्रधानांनी प्रामुख्याने रेल्वे, संरक्षण, उत्पादन तसेच अन्न प्रक्रिया यांसारख्या क्षेत्रांचा उल्लेख केला. त्याचबरोबर त्यांनी पर्यटन क्षेत्रातील उपलब्ध मोठ्या संधींचाही उल्लेख केला. मोदींनी सांगितले, की आमचे सरकार नियम आणखी सहजसोपे करण्यासाठी काम करत राहील, ज्यामुळे भारतात व्यापार करणे अधिक सोपे जाईल. कतारच्या कंपन्यांना गुंतवणुकीचे निमंत्रण देताना ते म्हणाले, की भारत संधींची भूमी आहे आणि तुम्ही याचा फायदा उठविला पाहिजे. भारत आणि कतारचे संबंध अतिशय जवळचे आहेत आणि भौगोलिकदृष्ट्याही दोन्ही देश एकमेकांच्या जवळ आहेत.
भारताचे 80 कोटी युवक आमची मोठी ताकद आहे.कतारचे उद्योगपती पायाभूत सुविधांसह रेल्वे, कृषी आणि सौरऊर्जेच्या क्षेत्रात गुंतवणूक करू शकतात. मोदी यांनी दोन्ही देशांमधील व्यापाराला चालना देण्यातील कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद थानी यांच्या भूमिकेची स्तुती केली. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार 2014-15मध्ये 15.67 अब्ज डॉलर होते. यामध्ये भारताची निर्यात सुमारे एक अब्ज डॉलर होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतारचे आमीर शेख तमिम बिन हमाद अल थानी यांच्यादरम्यान झालेल्या चर्चेनंतर भारत आणि कतार यांच्यात राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधीसह सात करारांवर सह्या झाल्या. यामध्ये आरोग्य, सहकार्य, पर्यटन, कौशल्य विकास, सीमा शुल्कात परस्पर सहकार्य, तसेच युवक आणि क्रीडा यांचा समावेश आहे.
भारताला NSG मध्ये स्वित्झर्लंडचा पाठिंबा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ०६ जुनला स्वित्झर्लंडचे अध्यक्ष युहान स्नायडर अमन यांची भेट घेतली. स्वित्झर्लंडने 48 देशांच्या न्युक्लियर सप्लायर ग्रुप (NSG) मध्ये भारताच्या मेंबरशिपसाठी समर्थन दिले आहे.करचुकवेगिरी आणि भ्रष्टाचार या दोन्ही क्षेत्रातही भारताला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन स्वित्झर्लंडने दिले आहे.
करचुकवेगिरीसाठी भारतीयांकडून स्वीस बॅंकेत ठेवण्यात येणाऱ्या काळ्या पैशांवरही यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली.भारताला स्विस बँकांमध्ये इंडियन अकाउंट होल्डर्सची माहिती मिळु शकते. त्याचबरोबर व्यापार, गुंतवणूक या क्षेत्रातही दोन्ही देशांनी परस्परांना सहकार्य करण्याचे निश्चित केले. त्याआधी मोदी यांनी येथे भारतीय वैज्ञानिक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अफगाणिस्तान आणि कतरनंतर रविवारी ते रात्री येथे पोहोचले होते.
मोदी म्हणाले- भारत आणि स्वित्झर्लंडमध्ये अशीच समान सहकार्याची भावना असावी जशी, मार्टिना हिंगीस, सानिया मिर्झा आणि लिअँडर पेसमध्ये आहे. या टेनिस खेळाडुंमध्ये आहे.या मुळे त्यांनी जागतिक पातळीवर अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. आम्हाला वाटते की, स्वित्झर्लंडच्या अधिकाधिक लोकांनी भारताला भेट दिली पाहिजे. त्यासाठी आम्ही ई-टूरिस्ट व्हिजा ओपन केला आहे. स्विस कंपनीनी भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आमच्यासोबत भागिदारी करायला हवी.
भारत-अमेरिका मैत्रीच्या अध्यायाचे नवे पर्व सुरू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील संसदेला संबोधित करताना लोकशाहीवर नितांत श्रद्धा असणार्या वॉल्ट व्हिटमन या अमेरिकन कवीच्या कवितेच्या ओळी उद्धृत केल्या. त्या औचित्यपूर्ण, बोलक्या म्हणाव्या लागतील. अमेरिका- भारत संबंध ज्या उंचीवर आहे, त्याचे ते प्रतीकात्मक रूप आहे. ‘द ऑर्केस्ट्रा हॅव सफिशिअंटली ट्युंड देअर इन्स्ट्रुमेंटस्, द बॅटन हॅज गिव्हन द सिग्नल’ (वाद्यवृंदातील सारी वाद्ये पुरेशा प्रमाणात सुरात लावून सज्ज झाली आहेत. ती सुरू करण्याची खूणही केली गेलेली आहे.) या ओळीत मोदी यांनी ‘देअर इज अ न्यू सिम्फनी इन प्ले’ या स्वत:च्या ओळीची भर टाकून या संबंधांचे अनोखे महत्त्व अधोरेखित केले. यातूनच उभय देशांच्या मैत्रीच्या अध्यायाचे नवे पर्व सुरू होत आहे.
आक्रमक चीनला अटकाव करण्यासाठी अमेरिकेची मैत्री जरुरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अफगाणिस्तान, कतार, स्वित्झर्लंड, अमेरिका आणि मेक्सिको या पाच देशांचा दौरा हा परराष्ट्र धोरणाचा बारकाईने विचार करून अत्यंत सुनियोजित पद्धतीने आखला गेला होता. गेली दोन वर्षे अत्यंत व्यवहार्य पद्धतीने परराष्ट्र धोरणाची रणनीती मोदी यांनी ठरविली आहे. बलाढ्य,युध्दखोर,आक्रमक चीनला अटकाव करण्यासाठी ही मैत्री जरुरी आहे. पाकिस्तानबरोबरची मैत्री दृढ करून तसेच नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका आदी शेजारी देशांमध्ये हितसंबंधाची गुंतवणूक करून चीन भारताला कोंडीत पकडत आहे. भारताबरोबरचा सीमा प्रश्नही त्यांनी अद्याप सोडलेला नाही.अनेक प्रकारे आपल्याला चीन त्रास देत असतो. म्हणुन अमेरिकेची मैत्री लाभदायक आहे.
मोदी यांनी यावेळी अमेरिकेन संसदेत प्रभावी भाषण करून दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकला सूचक इशारा देण्याचे काम केलेच; पण भारताचे सामर्थ्यही निदर्शनास आणून दिले. त्यांनी आपल्या ओघवत्या वक्तृत्वाच्या, चतुरस्र आणि प्रगल्भ नेतृत्वाच्या आधारे मोठे यश संपादन केले आहे. भारत-अमेरिका यांच्यातील आण्विक कराराला पुढे नेण्यात आलेल्या यशाचा यामधे प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. आण्विक क्षेत्रातील एकाकीपण दूर करण्याच्या प्रयत्नाला बरेच मोठे बळ यामुळे मिळाले. क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण करारात (एम.टी.सी.आर.) सहभागी असलेल्या देशांच्या समूहात आपल्याला स्थान मिळणे, अतिशय महत्वाचे आहे.
विकासासाठी अणुऊर्जा ,आधुनिक तंत्रज्ञान जरुरी
विकासाची आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि ‘ग्लोबल वॉर्मिंग’विरुद्ध लढा देण्यासाठी आपल्याला अणुऊर्जा आणि त्याविषयीचे आधुनिक तंत्रज्ञान हवे आहेच. म्हणूनच आण्विक पुरवठादार देशांच्या समूहात (एन.एस.जी.) आपल्याला प्रवेश हवा आहे. अणुतंत्रज्ञान विकण्याचा व हस्तांतरित करण्याचा अधिकार फक्त या समूहातील 48 देशांना आहे. अण्वस्त्र चाचणीबंदी करार किंवा अण्वस्त्र प्रसारबंदी करार याचे आपण सदस्य नाही. शिवाय, इथे सर्व निर्णय सर्वांच्या सहमतीने घेतले जातात. चीनचा भारताच्या ‘एन.एस.जी.’ सदस्यत्वाला विरोध आहे. अणुऊर्जेचा मुक्त व्यापार करता यावा व अन्य देशांना आपण विकसित केलेले तंत्रज्ञान पुरवता यावे, यासाठी या समूहाचे सदस्यत्व मिळणे आवश्यक आहे.
तसे झाल्यास आपल्या देशातील थोरियम आधारित अणू इंधनाचे विकसित केले गेलेले तंत्रज्ञान अन्य देशांना पुरवू शकू आणि आपणास आवश्यक असलेला युरेनियमचा पुरवठा अन्य देशांकडून विनासायास होऊ शकेल; पॅरिसमधील हवामान बदलाच्या विषयावर जो करार झाला, त्याबाबतही उभय देशांतील मतभेदाचे मुद्दे बरेच कमी झाल्याचे या भेटीत दिसले. कार्बन फूटप्रिंट कमी करण्याच्या दृष्टीने ओबामा यांनी कराराला खूपच महत्त्व दिले आहे. भारत वर्षअखेरपर्यंत तो मान्य करेल.
भारतात सहा अणुभट्ट्या उभारणीसाठी पूर्वतयारीचे काम सुरू करण्याचा निर्णय उभय देशांत आण्विक करार होऊनही यासंबंधीचा व्यापार पुढे सरकत नव्हता. मोदी यांनी आता परिस्थिती अनुकूल करून घेण्यात यश मिळविले आहे. विम्याच्या प्रीमियमची जबाबदारी सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांवर देऊन त्यांनी आण्विक दायित्व कायद्यातील अडचणीवर तोडगा काढला आहे. त्यामुळेच वेस्टिंगहाऊस या अमेरिकन फर्मने सहा अणुभट्ट्या आंध्र प्रदेशात उभारण्याच्या निर्णयावर या भेटीत शिक्कामोर्तब झाले.
लष्करी सहकार्य आर्थिक गुंतवणूक महत्वाची
अमेरिकेबरोबर लष्करी सहकार्य हा महत्त्वाचा आहे.आपल्याला अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, तंत्रज्ञान हवे आहे. तरच आपण प्रादेशिक धोक्यांना जास्त सक्षमपणे तोंड देऊ शकु. आपली युध्द सज्जता, मिलिट्री इन्फ्रास्ट्रक्चर कालबाह्य आहे.त्याच्या आधुनिकीकरणाची गरज आहे. या भेटीत त्याही आघाडीवर बरीच प्रगती झाली आहे. संरक्षणविषयक परस्पर सहकार्य, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि संरक्षण सामग्रीची सहनिर्मिती त्यामुळे शक्य होणार आहे.
उच्च तंत्रज्ञानावर आधारित सहकार्याच्या असंख्य शक्यता आहेत. अंतराळ विज्ञानापासून अर्टिफिशिअल इंटेलिजन्सपर्यंत व मॅरिटाईम क्षेत्र, मायक्रोबॉयोलॉजीपर्यंतची अनेक क्षेत्रे आपल्याला खुली आहेत.
अमेरिकन उद्योगाची भारतातील गुंतवणूकही या भेटीमुळे वाढली आहे. सप्टेंबर 2014 पासून आतापर्यंत 28 अब्ज डॉलर्सची भारतात गुंतवणूक करण्यात आली होती. अजून 45 अब्ज डॉलर्स गुंतवणूक अपेक्षित आहे, असे यूएस इंडिया बिझनेस कौन्सिलतर्फे सांगण्यात आले. अॅमेझॉन भारतात आणखी 3 अब्ज अमेरिकन डॉलर्स गुंतवणूक करणार असल्याची घोषणाही यावेळी झाली. यावरून परकीय गुंतवणूकदारांचा भारताविषयी विश्वास वाढत असल्याचे चित्र दिसते. दोन्ही देशांतील व्यापारही वाढत आहे. 1990 मध्ये 5.6 अब्ज डॉलर्स, 2013 मध्ये 120 अब्ज डॉलर्सपर्यंत तर 2030 पर्यंत तो 1 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत जाऊ शकतो.
मोदी यांच्या 45 मिनिटांच्या भाषणात ६९ वेळा मिळालेल्या टाळ्या आणि १० वेळा मिळालेली मानवंदना तसेच पुढील तीन वर्षांसाठी मिळालेले ४५०० कोटी डॉलरच्या गुंतवणुकीचे आश्वासन ही मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याची उपलभ्दी आहे. मेरिकन-भारत संबंधाची घडी नीट बसवून, त्याला नवे परिणाम देण्याचा हा प्रयत्न देशाला आणखी बळ देणारा आहे. मोदी यांच्या करिष्म्याने भारताची प्रतिमा व स्थान आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावले आहे व भारत आणि अमेरिकेतील भविष्यकाळातील प्रभावी वाटचालीचे द्योतक आहे.
एनएसजी’साठी भारतला मेक्सिकोचाही पाठिंबा
भारत आणि मेक्सिको यांच्यात विविध क्षेत्रांतील सहकार्याबाबतचे करारमदार झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष एनरिक पेना निटो यांनी पंतप्रधान मोदी यांना डीनरसाठी ‘क्विण्टोनील’ या रेस्टॉरंटमध्ये नेले. त्यावेळी निटो यांनी स्वत: गाडी चालवून मोदी यांचे सारथ्य केले. राष्ट्राध्यक्ष निटो हे मोदींसाठी गाडी चालवतानाचे आणि रेस्टॉरंटमध्ये गप्पा मारतानाचे दोघांचे फोटो ट्विटरवर झळकले. – ऊर्जा, ऑटोमोटिव्ह, फार्मा कृषी, संशोधन, जैविक, तंत्रज्ञान, कचरा, व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, सौरऊर्जा प्रकल्पांत भारत आणि मेक्सिको एकमेकांची मदत घेणार आहेत.
एनएसजी’मधील भारतच्या सदस्यत्वाच्या दाव्याला पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी मेक्सिकोचे आभार मानले आहेत. भारतला मेक्सिकोसोबत असलेले संबंध आणखी दृढ करायचे आहेत असे त्यांनी नमूद केले. तर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष निटो यांनी खास ट्विट करून भारतच्या पंतप्रधानांचे स्वागत केले. त्यांच्या या दौर्यामुळे मेक्सिको हा देश तब्बल ३० वर्षांनंतर भारतच्या अजेंड्यावर आला आहे.
भारत आणि मॅक्सिको यांच्यातील संबंध केवळ विक्रेता आणि खरेदीदार एवढ्यापुरतेच मर्यादित राहणार नाहीत तर ही भेट अधिक सुफळ संपूर्ण ठरेल, असा मला विश्वास आहे असे राष्ट्राध्यक्ष निटो यांनी नमुद केले.
मोदी डॉक्ट्रीनचा प्रभाव
अमेरिकेशी संबंध वृद्धिंगत करण्याच्या पंतप्रधान मोदींनी चालविलेल्या प्रयत्नांना, तसेच त्यांच्या भारत-अमेरिका संबंधांच्या विचारसरणीला अमेरिकेने ‘मोदी सिद्धांत’ (मोदी डॉक्ट्रीन) असे नाव दिले आहे. त्यांनी अमेरिकेन संसदेच्या संयुक्त बैठकीसमोर केलेल्या भाषणाचे कौतुकयुक्त पडसाद अद्याप अमेरिकेत उमटत असून हा प्रसंग ऐतिहासिक असल्याचे वर्णन केले जात आहे.
भारताजवळ जगाला देण्यासारखे काय आहे आणि जगाकडून भारताच्या प्रगतीसाठी काय घ्यायचे आहे, याची स्पष्टता मोदी यांच्या परराष्ट्र धोरणात सतत दिसून येते. एनएसजीच्या सदस्यत्वाच्या विषयात चीनला एकाकी पाडण्यात भारत यशस्वी झाला आहे. दहशतवादाच्या बाबतीत पाकिस्तानचे काळे रूप जगासमोर आणण्यात आणि जगाने त्याला कृतिरूप विरोध केला पाहिजे इतपत त्याचे स्वरूप जगाला पटवून देण्यात मोदी यांनी जे यश मिळविले आहे ते लक्षणीय आहे. या पाच देशांच्या दौर्यात नरेंद्र मोदी यांनी आपल्या अभ्यासाने, अस्सल भारतीय विचारांच्या प्रकाशात मांडलेल्या विचाराने, सहज संवेदनशील व्यवहाराने, प्रभावी वक्तृत्वाने या पाची देशांना जिंकले आहे.
परदेशी दौर्यांमध्ये देशाची प्रतिमा निर्माण करणं हा विषय महत्त्वाचा असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या प्रत्येक दौर्यामध्ये दहशतवादाला आश्रय देणार्या पाकिस्तानला लक्ष्य करताना दिसतात. मोदींच्या सध्याच्या विदेश दौर्यातून एनएसजीच्या प्रवेशाची निश्चिती झाली आहे असे जरी म्हणता येत नसले तरी भारताचा मार्ग सुकर मात्र नक्कीच झाला आहे.
परदेशी दौर्यांद्वारे मोदी भारताची आर्थिक आणि संरक्षणविषयक चौकट मजबूत करताना दिसत आहेत. प्रत्येक देशाला भेट देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतातील अर्थव्यवस्था केंद्रस्थानी ठेवून मुद्दे मांडताना दिसतात. त्यांचा प्रत्येक परदेश दौरा भारताच्या विकासाच्या संदर्भात पुढचं पाऊल टाकताना दिसतो.
— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि.)
Leave a Reply