नवीन लेखन...

पेढांब्यात सामुहिक शेतीचा यशस्वी प्रयोग !

|| हरि ॐ ||

शेतीच्या कामांसाठी वेळेवर मजूर उपलब्ध होत नाहीत. जमिनीच्या लहान तुकड्यामुळे शेती फायदेशीर ठरत नाही. अशा परिस्थितीला यशस्वीपणे तोंड देत चिपळूण तालुक्यात पेढांबे गावातील तरूण शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन सामुहिक शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला..!

पेढांबे गावात शेतीशाळेतील मार्गदर्शन आणि कृषिभूषण रणजित खानविलकर यांच्या प्रयत्नामुळे २५ तरुण शेतकरी एकत्र आले. दिपक शिंदे या प्रयोगशील शेतकऱ्याच्या नेतृत्वाखाली त्यांनी अशी जमीन फुलविण्याचे निश्चित केले. भौगोलिक स्थिती आणि शेतीकामातील मर्यादांवर मात करण्यासाठी सामुहिक शेतीची संकल्पना सर्वांनी स्वीकारली.

सर्वांनी मिळून २००६ मध्ये ‘श्री सत्यनारायण केळी प्रकल्प’ हाती घेतला. ५० एकर क्षेत्रात हा प्रकल्प राबविण्याचा निश्चय करण्यात आला. त्यापैकी ३० एकर या शेतकऱ्यांच्या मालकिची तर २० एकर मुंबईला राहणाऱ्या नातेवाईकांकडून भाडेपट्टयावर घेतलेली होती. ही सर्व जमीन पडीक स्वरूपाची होती. प्रारंभी शेतीच्या यशाविषयी अनेक शंका व्यक्त करण्यात आल्या. मात्र कृषितंत्राचे अभ्यासक असलेल्या खानविलकर यांनी नव्या तंत्रज्ञानाच्या वापरानेच फायदेशीर शेती करता येते हे शेतकऱ्यांना पटवून सांगितले. गटशेतीचे महत्त्व पटल्यावर शेतकरी या प्रकल्पात सहभागी होण्यास तयार झाले. वैयक्तिक जमीन आणि शेतीची कामे, खर्च आदी सामुहिक पद्धतीने करून लाभ वाटप त्याच प्रमाणात करण्याचे निश्चित करण्यात आले. शेतकऱ्यांच्या या प्रयोगशीलतेला प्रोत्साहन देत बँक ऑफ महाराष्ट्रने आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले. कृषि विभागाने तांत्रिक मार्गदर्शनाबरोबरच राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि शासनाच्या इतर योजनांमधून आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले.

गावातील शेतकऱ्यांनी स्वयंस्फुर्तीने केळीचे पीक घेण्याचा निर्णय घेतल्यावर योग्य वाण निवडण्यासाठी कृषि विभागाने मार्गदर्शन केले. गावात भात आणि नागलीचेच खरीप हंगामात उत्पादन पारंपरिक पद्धतीने घेतले जात असल्याने हा प्रयोग तसा गावकऱ्यांसाठी नवा होता. केळीचे जी-९ प्रकारचे टिश्यु कल्चर वापरण्यात येऊन निश्चयाने शेतीकडे लक्ष देण्यास या शेतकऱ्यांनी सुरुवात केली. कृषि सहायक अशोक शेंडगे यांनी शेतकऱ्यांना नियमितपणे मार्गदर्शन केले.

वशिष्टी नदीवरून उदक सिंचन पद्धतीने शेतीसाठी पाणी आणण्यात आले. शेतात ठिबक सिंचन यंत्रणा कृषि विभागाच्या सहकार्याने कार्यान्वित करण्यात आली. कृषि विभागाने भूमी परीक्षण तसेच एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन व किड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना सहकार्य केले. दर आठवड्याला भरणाऱ्या शेतीशाळेत कृषि सहाय्यकामार्फत शेतीपद्धतीविषयी सातत्याने मार्गदर्शन केले जात होते.

एकूण १.०८ कोटीच्या प्रकल्पासाठी बँकेने ६६.५० लक्ष कर्ज उपलब्ध करून दिले. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत ६.२० लक्ष तर ठिबक सिंचनासाठी ५ लक्ष अनुदान देण्यात आले. शेतातच गांडूळ खताचे युनिट सुरू करण्यात आले. उत्पादनाला सुरुवात झाल्यावर शास्त्रीय पद्धतीने विक्रीचे व्यवस्थापन करण्यावर भर देण्यात आला. त्यासाठी बाजारपेठेचे सर्वेक्षण करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यात विकली जाणारी ९० टक्के केळी बाहेरील जिल्ह्यातून येत असल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले. त्या आधारावर स्थानिक स्तरावर स्वत: शेतकऱ्यांनीच केळी विक्रीचा निर्णय घेतला.

एकूण ३००० मे.टन केळीचे उत्पादन झाले. ५००० रुपये प्रती मे.टन प्रमाणे ३३ महिन्यात १.५ कोटीचे उत्पन्न या प्रकल्पापासून मिळाले. त्यात ४०.२ लक्ष निव्वळ लाभ आहे. बँकेचे ६६.५ लक्ष आणि २४ लक्ष व्याज याच कालावधीत फेडण्यात आले. या समुहातील काही शेतकऱ्यांनी २०१० पासून आणखी २० एकर क्षेत्रावर सामुहिक पद्धतीने शेती सुरू केली असून त्या जमिनीवर अननस, आले, हळदीचे पीक घेण्यात आले आहे. अर्ध्या एकरावर प्रायोगिक तत्त्वावर बटाट्याची लागवड करण्यात आली आहे. वरकस जमिनीवरील हा प्रयोग यशस्वी ठरल्यास कोकणातील शेतकऱ्यांना उत्पन्नाचा नवा मार्ग मिळेल, असे दिपक शिंदे सांगतात.

‘कॉर्पोरेट फार्मिंग’ची कल्पना अस्तित्वात आणून सामुहिक शेतीला कायदेशीर आधार देण्याचा प्रयत्न असल्याचे श्री. खानविलकर सांगतात. सामुहिक शेतीचा हा प्रयोग शेजारील खेड, दापोली आणि गुहागर तालुक्यातही केला जात आहे. भौगालिक परिस्थितीवर सामुहिक शक्तीच्या बळावर उपाय शोधीत पेढांबे गावातील शेतकऱ्यांनी साकारलेला शेतीतील हा अभिनव प्रयोग महाराष्ट्रातील सर्व शेतकरीवर्गासाठी मार्गदर्शक ठरेल.
<जगदीश पटवर्धन

— जगदीश पटवर्धन

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

1 Comment on पेढांब्यात सामुहिक शेतीचा यशस्वी प्रयोग !

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..