मनुष्याला आपल्या आयुष्यात प्रत्येकक्षणी सतत काहीतरी हवे असते. आणि या हव्यासापोटी तो आपले सामाजिक कर्तव्य विसरत चालला आहे. शिक्षण, व्यवसाय, नोकरी करत असताना सामाजिक बांधीलकीचे भान ठेवणे गरजेचे आहे, आणि काही व्यक्ती ठेवतातही. त्यापैकीच खामगावचे एक कलाशिक्षक संजय गुरव. प्राणीमात्रांची सेवा करून इतरांनाही प्रेरणादायी ठरणारा छंद त्यांनी जोपासला आहे.
आजच्या ग्लोबलायझेशनच्या युगात बहुतांश पालक आपल्या मुलांना घर, शाळा, शिकवणी वर्ग, संगणक, टीव्ही आणि मोबाइल या व्यतिरिक्त इतरत्र डोकावूनसुद्धा पाहू देत नाहीत. जग जवळ आले असले तरी विद्यार्थ्यांना आजूबाजूला आढळणारे प्राणी, पक्षी कोणते? याची माहिती नसते. पूर्वी ‘चिव ये, दाणा खा, पाणी पी अन् भुर्र्र उडून जा’, असे लहानपणी मुले खेळत होती. बालगोपाल चिमण्यांच्या चिवचिव आवाजाचा, भुर्र्र उडण्याचा मनसोक्त आनंद घेत असत. परंतु, आज हा प्रकार अनुभवाला मिळत नाही. तीन वर्षांपूर्वी खामगाव येथील र्शी अ. खि. नॅशनल हायस्कूलमधील कलाशिक्षक संजय माधव गुरव, त्यांची दोन मुले, पत्नी व मित्र विजय खंडागळे यांनी एक प्रयोग करून बघितला. सुरुवातीला अंगणात वृक्षलागवड केली. त्यामुळे विविध पक्षी येऊ लागले. सोबतच खार, मुंगूस, सरडे, हिरवा सरडा, चिमणी, बुलबुल, सूर्यपक्षी, मैना, साळुंकी, चष्मेवाला, शिंपी, पिंगळा, होला, दयाळ, राखी वरवट्या, काळी मैना, ब्राrाणी मैना यांची ओळख छोट्या मुलांना व मित्रांना करून देण्याचा छंद त्यांना जडला. नंतर या पक्ष्यांसाठी अंगणात 22 बाय 33 फूट लांबीचे चार पाणवठे तयार केले. पाणवठय़ाच्या वरच्या बाजूला 12 फूट उंचीवर एक लाकडी घरटे तयार करून लावले. त्या ठिकाणी नियमित अन्न टाकणे सुरू ठेवले. दोन महिन्यांनंतरच त्या घरट्यात ब्राrाणी मैनेने दोन पिलांना जन्म दिला, हे त्यांचा मुलगा संदेशने आनंदाने नाचून सांगितले. हा आनंद पैसे देऊनही विकत मिळत नाही, असे वाटल्याने त्यांनी घरट्यांची संख्या वाढवली. मातीच्या मडक्यांची घरटी तयार केली, परंतु पक्षी येईनात. म्हणून सहा महिन्यांनी मडक्याच्या तोंडावर चिमणीच्या आकाराचे छिद्र पाडले व त्यावर खरड्याचे आवरण लावले. आणि अवघ्या अध्र्या तासातच दोन्ही मडक्यांमध्ये चिमण्यांची ये-जा सुरू झाली. आजपर्यंत या घरट्यात मैना व चिमण्यांनी दहा-बारा वेळा आपल्या पिलांना जन्म दिला. हा अनुभव खरंच आजच्या धकाधकीच्या जीवनात लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्वांना सुखदायक ठरणारा आहे.
Leave a Reply