यशवंत आणि चंदू ह्यांच्यासमोर एक चाळीशीचा तरूण बसला होता.
कपड्यांवरून तो परदेशांतून आला असावा, असे वाटत होते.
यशवंतांची त्याने रितसर फोनवर वेळ घेतली होती आणि तो आला होता.
एवढ्या उमद्या सुस्थितींतील तरूणाची समस्या काय असावी, ह्याचा यशवंत अंदाज घेत होते.
अशोक मनोहर हें नांव त्यांनी अलिकडेच पेपरमध्ये वाचलं होतं.
तो म्हणाला, “मी आपल्याला माझे नांव फोनवर सांगितलेच आहे.
मीच तो “अमर अशोक मनोहर”.
मनोहर हे आमचं आडनांव.
मी तुमच्याशी अशोक मनोहर ह्यांच्यासंबंधी बोलायला आलो आहे. कदाचित्..”
यशवंत त्याला थांबवत म्हणाले, “मध्यंतरी दादर काळाचौकी भागांत एका वृध्दाने आत्महत्या केल्याचे वृत्त होते.
मला वाटते त्यांचे नांव…”
अमरने त्यांचे वाक्य पूर्ण करत म्हटले, “त्यांचे नांव अशोक मनोहर होते पण त्यांनी आत्महत्या केली हे वृत्त खोटे आहे.
ते एकटे इथे रहात, हें खरं आहे पण त्यांचे सर्वांशी चांगले संबंध होते.
त्यांना आजार होते, ते औषधं घेत होते, हे खरं आहे परंतु ते आजाराला कंटाळून आत्महत्येला प्रवृत्त होणारे नव्हते.
दोनच दिवस आधी त्यांनी माझ्याशी युएसएला येण्याबद्दल गोष्टी केल्या होत्या.
मी त्यांना माझ्याकडेच घेऊन जाणार होतो.
ही आत्महत्या आहे, हे माझ्या मनाला पटतच नाही.
धुरंधर साहेब कांही करा पण यातले सत्य शोधा.”
हे ऐकतांना अशोक मनोहरांबद्दलची पेपरांतली छोटी बातमी यशवंतांच्या डोळ्यासमोर येत होती.
सात आठ दिवसांपूर्वी ही बातमी पेपरांत आली होती.
‘अशोक मनोहर’ नांवाच्या वृध्दाने काळाचौकी येथील एका रिडेव्हलप झालेल्या एका तीस मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील त्यांच्या फ्लॅटमध्ये विषप्राशन करून जीव दिला होता.
त्यांच्या बेडवरच ते झोपले होते व तिथेच मृत झाले होते.
विषाची बाटली जवळच पडली होती आणि पोस्ट मॅार्टेमच्या अहवालात अत्यल्प प्रमाणात विष पोटांत सापडल्याचे म्हटले होते.
आजार व एकटेपणा ह्यामुळे ही आत्महत्या त्यांनी केली असावी, असे पोलिसांनी म्हटले होते.
घरी कामाला येणाऱ्या स्वैंपाक्याची आणि भांडी घासायला येणाऱ्या मुलीची जबानी घेण्यांत आली होती.
त्यांत संशयास्पद कांही नव्हतं.
दोघेही आपल्या नेहमीच्या वेळी येऊन काम करून गेले होते.
स्वैंपाकी दोनदा येत असे.
त्यांना मालक नेहमीसारखेच वाटले होते.
त्या वृत्तात मुलाचा उल्लेखही नव्हता.
त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचे हाल, त्यांना घरी कुणी न विचारणे, परदेशी गेलेली कृतघ्न मुलं अंत्यविधीलाही येत नाहीत, वगैरे वर नेहमीच येणारे लेख पुन्हां प्रसिध्द करण्यांत आले होते तर कांहीची नवी भर पडली होती.
सर्वांची माहिती ऐकीव होती किंवा पोलिसांनी दिलेली होती.
खरी सहानुभूती कुणालाच नव्हती.
पोलिसांनी आत्महत्या असे जाहिर करून आपले काम कमी केले होते.
यशवंताना हे सर्व आठवत होते.
अमर मनोहर म्हणाला, “धुरंधर साहेब, पहिली गोष्ट म्हणजे बाबांनी आत्महत्या करत आहे, अशी चिठ्ठी लिहून ठेवलेली नाही.
त्यांच्या स्वभावानुसार त्यांनी ती लिहायला हवी होती.
दुसरी गोष्ट मागे एकदा स्वेच्छामरणाचा हक्क एका वयोमर्यादेनंतर असावा, ह्यासाठी एका ज्येष्ठ गृहस्थाने कोर्टात दाद मागितली होती.
हे आपल्याला माहित असेलच.
त्यावेळी बाबांनी मला एक मेल पाठवला होता.
त्याची प्रत माझ्याकडे आहे.
त्यांत त्यांनी स्वेच्छामरणाचा हक्क म्हणजे परमेश्वरी कारभारात ढवळाढवळ होईल, असे म्हटले होते.
जीवन आणि मरण जसे नशीबी असते, तसे माणसाने पत्करले पाहिजे, असे त्यांचे ठाम मत होते.
तेव्हां ते आत्महत्येचा विचारही करणे अशक्य होते.”
चंदूने विचारले, “जर कुणी त्यांना मारले असेल तर कुणी आणि कां ?
तुमचा संशय कुणावर आहे.”
अमर थोडा विचार करत म्हणाला, “माझी बहिण शमिका आणि तिचा पती जयदेव नगरकर मुंबईतच रहातात.
बाबांनी त्या दोघांशी अनेक वर्षांपूर्वीच संबंध तोडले होते.
बहिणीने त्यांच्या मर्जीविरूध्द त्याच्याशी विवाह केला होता.
नंतरही तो व्यसन आणि कर्ज ह्यांत गुरफटलेलाच असतो.
बहिण नोकरी करून कसाबसा संसार चालवते.
ती दोघं बाबांकडे कधीच येत नसत व इथल्या शेजाऱ्यांनाही त्यांची माहिती नव्हती.
मी त्याच्यावर संशय घेतोय असं नाही पण जयदेव बेजबाबदार आहे, हे तर नक्कीच.”
यशवंतानी विचारले, “बाबांच्या आर्थिक व्यवहाराची कांही माहिती देऊ शकाल कां ?”
अमर म्हणाला, “बाबांची आर्थिक स्थिती संपन्न होती.
ते एकेकाळी त्यांच्या वाहन विक्री व्यवसायांतील पहिल्या दोन कंपन्यात होते.
त्यांची शो रूम आणि गॅरेज प्रसिध्द होतं.
कारसाठी, टू व्हीलरसाठी नंबर लावण्याचा जमाना होता.
लायसेन्स फार कमी लोकांकडे होतं.
त्या वेळी केलेल्या भरपूर कमाईमुळे त्यांनी खूप सेव्हिंग केले होते व शेअरमार्केटमध्ये खूप पैसा गुंतवला होता.
त्यांच्या सुदैवाने त्यांतही त्यांची भरभराट झाली होती.
वयाच्या पासष्टीनंतर त्यांनी प्रकृतीमुळे व्यवसाय विकला होता.
त्यांना मधुमेह झाला होता.
त्यांनी अनेकांना मोठ्या रक्कमा कोणत्याही कागदपत्राशिवाय कर्जाऊ दिलेल्या होत्या.
कधी कोणी परतही करत पण बुडवणारेच जास्त.
बाबांना त्याची बिलकुल खंत नव्हती.”
यशवंत म्हणाले, “अमर, तू दिलेली माहिती आम्हाला सत्याचा शोध घ्यायला पुरेशी आहे.
आम्ही आजच त्या फ्लॅटला भेट देऊ इच्छितो.
आतांच आलो तर चालेल काय ?”
अमर म्हणाला, “फ्लॅट पोलिसांनी बंद ठेवला आहे.
त्यांच्या परवानगीनेच आपल्याला जाता येईल.
मी माझ्या सासरी रहात आहे.”
यशवंत म्हणाले, “आपण पोलिसांची परवानगी घेऊन जावूया तिथे.”
यशवंतानी संबंधित पोलिसांशी संपर्क साधला.
काळाचौकी पोलिस स्टेशनचे इन्सपेक्टर चांदेकर यशवंताना ओळखत होते.
ते म्हणाले, “चावी तर तुम्हाला देतो पण तुम्ही ह्या प्रकरणात कसे आलांत ?”
यशवंतानी त्यांना अमरबद्दल सांगितले.
चांदेकर म्हणाले, “धुरंधर साहेब, आम्हालाही ही आत्महत्या आहे की खून ह्याबद्दल संशय आहे व आम्हीही तपास करत आहोत.
जर खून झाला असला तर खुनी बेसावध रहावा म्हणून आम्ही आत्महत्या असेच जाहिर केले आहे परंतु आमची चौकशी चालू आहे.
आम्ही तिथे एक पोलिस ठेवलेला आहे.
त्याच्याकडे चावी आहे.
आपण केव्हां येताय ?
मी स्वत: तिथे येतो. मला अमरचेही स्टेटमेंट लिहून घ्यावं लागेल.”
यशवंतानी शमिका आणि जयदेव ह्यांची अधिक माहिती काढायला चंदूला सांगितले.
अमर, यशवंत आणि इन्सपेक्टर चांदेकर एका तासांनंतर त्या फ्लॅटमध्ये होते.
इन्सपेक्टर चांदेकर ह्यांनी स्वैंपाकी आणि कामवाली बाई ह्यांनाही बोलावलं होतं !
स्वैंपाकी मनीष उत्तरेकडला होता.
अशोकना ताजा स्वयंपाक हवा असे म्हणून तो दोनदा येत असे.
तर कामवाली एकदाच येई.
तो म्हणाला, “साहब उस दिन कुछ उलझनमे दिखते थे.
लेकीन मुझे उनके पसंदका खाना करनेको कहा.
उन्हे मीठा खाना मना था पर मीठा देनेको मजबूर कर रहे थे.”
कामवाली बाई म्हणाली, “सायेब नेहमीसारखेच होते.
माझ्या मुलाची, नवऱ्याची रोज चौकशी करतात.
त्या दिवशी पण केली.”
यशवंतनी दोघांनाही विचारले, “त्या दिवशी किंवा त्या आधी तुम्ही असतांना त्यांना भेटायला कुणी आलं होतं ?”
मनीषने नाही म्हटलं पण बाई म्हणाली, “एक साहेब आले होते.
व्यापारी वाटत होते.
पैसे, कर्ज ह्याबद्दल कांही बोलणं चाललं होतं.”
फ्लॅटच्या रचनेत दिवाणखाना व किचन ह्यामधे भिंत होती.
मधल्या भिंतीला मोठी खिडकी होती.
जेवण तिथून आणणे शक्य होई.
खोल्या दिवाणखान्याच्या डाव्या बाजूला होत्या मध्ये मोकळा रस्ता होता.
किचनमध्ये काम करणारा बाहेर काय चाललंय ते सहज पाहू शकत होता.
तिथलं बोलणंही ऐकू येण्याची शक्यता होती, ह्याची नोंद यशवंतांनी घेतली.
भेट संपवताना यशवंतानी मनीषच्या गांवाची व तिथल्या त्याच्या परिस्थितीची माहिती काढायला इन्सपेक्टर चांदेकरना विनंती केली.
चंदूने अमरच्या मेहुण्याची बरीच माहिती काढली.
तो पूर्ण व्यसनाच्या आहारी गेला होता आणि त्याची नोकरीही गेली होती.
त्याला कोणी उधारीवरही कांही द्यायला तयार नव्हतं.
अर्थात् तो शमिकाकडून अपेक्षा ठेवायचा.
त्यामुळे त्यांची आपापसात खूप भांडणं होत.
त्याने खटपटीने कॅनडात एक नोकरी मिळवली होती व कॅनॅडीयन व्हिसासाठी तो एम्बॅसीच्या मुंबई ॲाफीसमध्ये गेला होता.
ज्या दिवशी अशोक मनोहर ह्यांनी आत्महत्या केली त्याच दिवशी जयदेव एम्बॅसीत गेला होता.
शमिका कॅनडाला त्याच्याबरोबर जायला मुळीच तयार नव्हती.
त्यावरून त्यांचं मोठं भांडण झालं होतं आणि शेवटी शमिकाने घटस्फोट घ्यायचे ठरवले होते.
सध्या दोघं एकत्र रहात नव्हते.
जयदेवला कॅनडात जाण्यासाठी आवश्यक रक्कमही कुठेच मिळत नव्हती.
शमिकाने पैसे द्यायला नकार दिला होता.
सासरा मदत करणे शक्य नव्हते.
कोंडीत सांपडलेला जयदेव शमिकाने दहा लाख रूपये दिल्यास तिला घटस्फोट द्यायला तयार होता.
यशवंतांनी अशोक मनोहर यांच्या सोसायटीचे सिक्युरीटीकडले रजिस्टर पाहिले होते.
त्यांतील नोंदीप्रमाणे अशोक मनोहर यांच्याकडे फक्त दोन व्यक्ती त्यांच्या मृत्यूपूर्वीच्या पंधरा दिवसांत येऊन गेल्या होत्या.
त्यापैकी एक होती शमिका तर दुसरे नांव एका सिनेनिर्मात्याचे होते.
शमिका वडिलांना घटस्फोट घेणार असल्याचे सांगायला व कदाचित वडिलांकडून दहा लाख घेऊन नवऱ्याकडून घटस्फोट मिळविण्याच्या उद्देशाने तिथे आली असावी.
ही माहिती अशोक मनोहरांच्या पासबुकांतील माहितीशी जुळत होती.
ती येऊन गेल्यावर त्यांनी बॅंकेतून दहा लाख रोख रक्कम काढली होती.
ह्याच माहितीची त्यांनी सोसायटीच्या सीसीटीव्हीवर पाहून खात्री केली होती.
शमिका चिंताग्रस्त चेहऱ्याने आलेली दिसली होती.
सिनेनिर्माता कोणत्या कारणासाठी येऊन गेला त्याची माहिती काढणे आवश्यक होते.
चित्रपटसृष्टीत यशवंताना ओळखणारे बरेच जण होते.
एकाने त्यांना सिने निर्मात्याचा नंबर दिला.
फोनवर कांहीही बोलायला त्याने नकार दिला पण भेटायचे कबूल केले.
यशवंत त्याला जाऊन भेटले.
तो म्हणाला, “मी तुम्हाला जे सांगतोय, तें मी इतर कुणालाही सांगणार नाही व मला विचारले तर मी अमान्य करीन.
अशोकचा खून झाला असा संशय आहे म्हणताय म्हणून मी फक्त तुम्हाला ही माहिती देत आहे.
अशोक मनोहर ‘जिंदा दिल’ माणूस होता.
माझ्याकडून कसलाही कागद न घेता त्याने मला वीस लाख रुपये कांही वर्षांपूर्वी दिले होते.
मी मागच्या आठवड्यांत त्याला वीस लाख परत केले.
व्याज घेणं त्याला मान्य नव्हतं.
ती सगळी रोख रक्कम होती.
पांचशेची चाळीस बंडले एका पिवळ्या थैलीत घालून मी त्यांना नेऊन दिली होती. मला आशा आहे की ते पैसे सुरक्षित आहेत.
मी तरी तो जाण्याआधी त्याच्या ऋणांतून मुक्त झालो.”
यशवंतानी सोसायटीचा सीसीटीव्हीचे रेकॅार्डींग पहातांना ती पिवळी पिशवी पाहून तिची नोंद घेतली होती.
जातांना त्यांच्या हातात ती पिशवी नव्हती.
पण ज्या दिवशी अशोक मनोहर मरण पावले त्याच दिवशी रात्री परत जातांना मनीष कांहीतरी छातीशी धरून नेत होता व त्याचा रंग पिवळाच असावा, असं पुसटसे दृश्य सीसीटीव्हीत होतं.
इन्सपेक्टर चांदेकरना यशवंतांच्या सूचनेनुसार मनीषच्या घराची झडती घेतली आणि त्यांत ती पिवळी पिशवी मिळाली.
निर्मात्याचे वीस आणि मुलीला द्यायला आणलेले दहा असे तीस लाख रूपये घरांत असल्याचे पाहून मनीषची बुध्दी फिरली असावी.
इन्सपेक्टरनी काढलेल्या माहितीप्रमाणे त्याने गांवाला दुमजली बंगला विकत घ्यायचा करार केला होता.
एम्बॅसीत गेलेला जयदेव सासऱ्याच्या घराकडे फिरकला नव्हता.
मनीषला अटक करण्याएवढा पुरावा होता.
इन्सपेक्टर चांदेकरनी ताब्यांत घेतलेला मनीष धडाधड बोलू लागला.
माफी मागू लागला.
घरांत एवढे पैसे होते पण आजारी अशोकनी प्रतिकार केलाच असता.
दोन दिवस त्याने अशोक मनोहरना गोड न लागणारे पण साखर वाढवतील असे पदार्थ खायला घालून त्यांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण प्रचंड वाढेल व त्यांना असाच मृत्यू येईल यासाठी प्रयत्न केले पण त्यांना कांही झाले नाही मग शेवटच्या दिवशी त्याने चक्क जेवणांत गांवाहून आणलेले विष घातले.
जेवण होताच ते झोपले, ते कायमचेच.
मनीषने त्यांनी कपाटांत ठेवलेली पिवळी पिशवी उचलली आणि ती छातीशी धरून तो बाहेर पडला.
थोड्या दिवसांनी मुंबईतून कायम गांवी जायचा बेत त्याने आंखला होता.
पण प्रत्येक गुन्हेगार चुका करतोच.
अमरने यशवंतावर विश्वास टाकून वडिलांच्या नावावर जडलेला आत्महत्येचा कलंक मिटवला.
त्यांच्या सल्ल्यानुसार फ्लॅट शमिकाला दिला आणि तिला जयदेवपासून घटस्फोटही मिळवून दिला.
यशवंत म्हणाले, “अमर, परदेशी जाणारी मुलं स्वार्थी, कृतघ्न आणि बेजबाबदार असतात, ह्या गैरसमजाला तू छान उत्तर दिलेस.”
– अरविंद खानोलकर
Leave a Reply