नवीन लेखन...

सुधींद्र कुलकर्णींना अनावृत्त पत्र

सप्रेम नमस्कार,
आजच्या दैनिक सकाळ मध्ये इस्राएलचे दोन चेहरे हा श्री. सुधींद्र कुलकर्णी यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे.
मला तो लेख पटला नाही, रुचला नाही,म्हणून एक अनावृत्त पत्र दै सकाळ कडे व प्रत श्री कुलकर्णी यांना पाठवली आहे.

तेच अनावृत्त पत्र खालील प्रमाणे….

अनावृत्त पत्र

प्रती
श्री.सुधींद्र कुलकर्णी
माननीय महोदय,

आज दै. सकाळच्या सप्तरंग पुरवणीत आपला लेख “इस्राईल चे दोन चेहरे” वाचला. सदर लेख तुम्ही वस्तुनिष्ठ राहून न लिहिता, स्वतःची मते घुसडत, इस्राईल व पॅलेस्टाईन वादात ज्यांचा काडीमात्र संबंध नाही अशा हिंदू लोकांना व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना, तुम्हाला हवे त्याप्रमाणे गुंतवण्याचा प्रयत्न केला आहे, जो निंदनीय आहे, म्हणूनच तुमचा सदर लेख दुर्लक्ष करण्यायोग्य आहे. तथापी हा लेख दै सकाळ मध्ये प्रसिद्ध झाला असून दै सकाळचा वाचकवर्ग हा बुद्धिजीवी व विचारवंत आहे, त्यांचे मत कलुषित होऊ नये यासाठी हा पत्रप्रपंच !

एकेकाळी तुमच्यावर मार्क्सवादाचा प्रचंड प्रभाव होता, तो अचानक संपला आणि मार्क्सवादाची भारतातच काय पण जगात कुठेही गरज नाही हा दृष्टांत तुम्हाला झाला. त्यानंतर आपण मा. श्री. लालकृष्ण अडवानी यांच्या माध्यमातून भाजपमध्ये आलात आणि पंतप्रधान मा.श्री. अटलजी यांच्यासाठी भाषणे लिहू लागलात. २००४ मधील शायनिंग इंडिया या कॅम्पेन मध्ये तुमचा वाटा होता, पण भाजपच्या पराभवानंतर तुम्ही भाजप सोडला. त्यानंतर मा.श्री.गडकरी भाजप अध्यक्ष होताच, तुम्ही त्यांच्या सानिध्यात आलात आणि त्यांचे सल्लागार हि झालात. २०१४ मध्ये मा. श्री. मोदीजी पंतप्रधान होताना आपण पुनः भाजप सोडला. नंतर तुम्ही, भारताचे पंतप्रधान होण्यासाठी श्री.राहुल गांधी योग्य आहेत असं जाहीर मत प्रदर्शित करून त्यांचं वर्णन The Leader with Good Heart असे केलेत. तुम्ही आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी दोघाबद्दलचा २०१५ मध्ये मुंबईत घडलेला किस्सा सर्वश्रुत आहे.  हे सगळे लिहिण्याचे कारण, तुमच्या मनस्थितीत, विचारात आणि आचारात किती वेगाने आणि सोईने स्थित्यंतरे होतात हे तुमच्या व वाचकांच्या ध्यानात आणून देणे, इतकाच मर्यादित आहे. तुमच्या या प्रवासामुळे, पूर्वग्रहदूषित मनाने मी तुमचा लेख वाचलेला नाही किंवा त्यावर मत प्रदर्शनही पूर्वग्रहदूषित विचाराने करत नाही.

आता मी पॅरेग्राफप्रमाणे तुमच्या लेखातील मुद्द्याकडे वळतो.

पॅरा १ :१५ मे १९४८ ला ब्रिटिशकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इस्राएल या छोट्या देशाने सर्व क्षेत्रात केलेली प्रगती हि सगळ्या जगाला चकित करणारी आणि विकसनशील देशांना प्रेरणादायी आहे. यालाच जर तूम्ही इस्राईल चा एक चेहरा म्हणत असाल तर, खरेच हा इस्राईलचा एकमेव चेहरा आहे.
या सर्व यशासाठी इस्राईल जगभरात कौतुकास पात्र ठरला आहे याला तुमची हरकत नाही, पण पुढील वाक्यात “अनेक हिंदूकडून,विशेषतः संघपरिवाराकडून इस्राईल चे गोडवे गायले जाण्यामागं” तुम्हाला वेगळी कारण दिसतात. जर सगळे जग इस्राईल चे कौतुक करते तर मग हिंदू आणि रा.स्व.संघ हे जगाचे घटक नाहीत का? पॅलेस्टाईन मुसलमानावर दडपशाही इस्राएलचे सरकार करते असे तुम्ही म्हणता, या पॅलेस्टाईन मध्ये फक्त मुस्लिमच रहातात का ?खरेतर तिथे मुस्लिमानंतर दुसऱ्या क्रमांकावर ज्यू लोकसंख्या आहे. तुम्ही लेखात उल्लेख केल्याप्रमाणे इस्राएल बिनदिक्कत पणे,निष्ठुर व निर्दयीपणे दडपशाही करत असेल तर इस्रायली ज्यू ना त्याचा त्रास होणार नाही का ? आणि खुद्द इस्राईल मध्ये २०% ,मुस्लिम रहातात.
महत्वाचा मुद्दा, इस्राएल व पॅलेस्टाईन हा प्रश्न जागतिक राजकारणाचा आहे. पॅलेस्टाईन ने स्वतःला स्वतंत्र राष्ट्र घोषित केले १९८८ मध्ये. पण अजूनही अमेरिका, इंग्लंड, फ्रांस, जर्मनी अशा ४५ देशांनी (UN) त्याला मान्यता दिलेली नाही. मग तुम्ही या राजकीय प्रकरणात “अनेक हिंदू व रा.स्व.संघ” यांना का गोवत आहात? एक राजकीय विश्लेषक म्हणून तुमची मते वस्तुस्थिती व परिस्थितीशी प्रामाणिक नकोत का? यात तुम्ही स्वतःची वैयक्तीक मते का आणता ? संघ व हिंदुत्वाबद्दल कुपमंडूक वृत्ती का दाखवता ?

आपले पंतप्रधान व इस्राईल चे पंतप्रधान यांच्यात मैत्री झाली तर काय चुकीचे आहे ? आंतरराष्ट्रीय मैत्रीचा फायदा कधी व कसा होतो हे करोना काळात तरी सर्वांनी अनुभवले आहेच.त्याही पलीकडे अशा मैत्रीचे पडसाद दीर्घकालीन असतात हे तुम्हाला दुसऱ्या कुणी सांगायची गरज आहे?

सोशल मीडियावर फक्त हिंदू व रा.स्व.संघ धार्जिणे नसतात तर इतर अनेक लोक हि असतात. तुम्ही त्यांचे वर्गीकरण कोणत्या आधारे केले? सोशल मीडियाचा वापर ‘टूलकीट’ या लेबलखाली कोण व कसा करते हे आता सगळ्या जगाला कळले आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध, इस्राएल सारखे कडक व कठोर धोरण ठेवावे हे आज प्रत्येक भारतीयांचे मत आहे. किंबहुना सरकारने या मताला दुजोरा देत पाकिस्तान मध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करून हे दाखवून ही दिले आहे. सोशल मीडियावरील मेसेजेस जे तुमच्यामते हिंदूंचे आहेत आणि त्याचा आशय तुम्ही तुम्हाला योग्य वाटेल असा मांडला आहे. मुळात सोशल मीडियावर खाते उघडण्यासाठी कोणत्याही वैध ओळखपत्राची गरज नसल्याने अनेक फेक अकौंट उघडले जातात.ट्विटर वर तर एखाद्याचे खरे अकाउंट शोधणे हि कसरत असते. असो.

सर्व भारतीयांची (यात हिंदू, मुस्लिम, शीख,ख्रिस्ती सर्वांचा समावेश आहे) इच्छा अशीच आहे की, इस्राईल ज्याप्रमाणे प्रचंड बळ व अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून शत्रूला नामोहरम करतो, त्याचप्रमाणे भारताने घुसखोर पाकिस्तान व चीनला नामोहरम करून धडा शिकवावा. यांत मुस्लिमाना धडा शिकवायचा मुद्दा तुम्ही कुठून आणलात ?

आज भारतातील सुमारे १३९ कोटी नागरिक (यात सर्व धर्म आले) गुण्यागोविंदाने रहात आहेत.त्यात फुट पाडण्याचा प्रयत्न स्वतःला विचारवंत म्हणवणारे कांही स्वार्थी राजकारणी करत आहेत.त्या पंक्तीत बसायचा इतका अनावर मोह का होतोय तुम्हाला ?

इस्राईल ने गाझा पट्टीवर हल्ले केले, ते हमास ने केलेल्या हल्ल्याच्या उत्तरादाखल होते. २००७ पासून गाझा पट्टीवर हमास या दहशतवादी संघटनेचे राज्य आहे. इस्राईल ने हल्ले करण्यापूर्वी तेथील नागरिकांना तेथील इमारती मोकळ्या करण्यास सांगितले होते. त्यानंतर इस्राईल ने हल्ले केले. अल जजीराची इमारत जमीनदोस्त करण्यापूर्वी एक तासाची वेळ दिली होती आणि त्यानंतर आत एकही माणूस नाही, हे अल जजीराच्या प्रतिनिधीला विचारून, खात्री झाल्यानंतर ती इमारत भुईसपाट केली. या प्रतिहल्ल्याच समर्थन करणाऱ्यांची भूमिका दुर्दैवी व अस्वीकारार्ह आहे असे तुम्ही म्हणता, मग हमास ने केलेले हल्ले, पॅलेस्टाईन संघटनांचे अतिरेकी हल्ले, त्यांत जीव गमावलेले निष्पाप नागरिक याबद्दल का लिहीत नाही ?

पॅलेस्टाईनमध्ये PLO, PFLP, PFLP-CG, DFLP, Abu Nidal, PIJ,Hamas या दहशतवादी व अतिरेकी संघटना हिंसक प्रकारे कार्यरत असताना,नियमीत इस्राएल वर छुपे हल्ले करत असताना काय करायचे, स्वतःच्या संरक्षणार्थ हा निर्णय घेण्याचा हक्क इस्राएल चा नाही का ?
पुढील पॅरामध्ये इस्राईल ची निर्मिती बेकायदेशीर आहे असे तुम्ही लिहलंय. मग इस्राईल ला जगातील इतर देशांनी मान्यता कशी व का दिली ? भारताने का दिली ?तेंव्हा भारतात काँग्रेसचे राज्य होते. ब्रिटन कडून त्यांनी स्वातंत्र्य मिळवले. जसे आपण त्यांच्या आधी कांही महिने मिळवले होते. आपल्याकडे कांही नेत्यांच्या मागणी प्रमाणे मुस्लिम बहुल्य प्रदेश पाकिस्तान झाला, त्यांनी स्वतःला मुस्लिम राष्ट्र घोषित केले.तिथल्या हिंदूंना हाकलले. बेघर केले.काश्मीरचा प्रदेश बळकावला.पाकिस्तान व POK मधून हिंदूंना, आणि नंतर काश्मिरी पंडितांना घरातून राज्यातून हकलण्यात आलं, तेंव्हा आपले केंद्र सरकार मूग गिळून गप्प बसले.

इंदिराजी पंतप्रधान असताना, भारत -पाक युद्धात आपण जिंकलेला भु भाग पाकिस्तानला परत केला.आपल्या शालोम (शांतता व सौहार्द)धोरणामुळे पाकिस्तानने आपल्या देशाला नेभळट गृहीत धरले आणि कुरापती काढू लागला.

आपला कित्ता न गिरवता इस्राएल ने युद्धात जिंकलेली जमीन परत केली नाही.आणि अतिरेकी दहशतवादी संघटनांवर त्याद्वारे अंकुश ठेवला आहे. इस्राईल ने प्रत्येक  अतिरेकी हल्ल्याला सर्जिकल स्ट्राईक्स ने सडेतोड उत्तर दिले आहे. इस्राएल आणि आखाती देशांचा हा अंतर्गत प्रश्न आहे. आणखी कांही वर्षांनी कदाचित इस्राएलचा निर्णय योग्य होता की नाही हे सिद्ध होईल.पण म्हणून इस्राएलला दोषी ठरवण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होत नाही. आपल्या देशाने दहशतवादी, अतिरेकी हल्ले भोगले आहेत, त्याची झळ सोसली आहे, म्हणूनच आपल्याला इस्राएल ची मानसिकता समजायला हवी. त्यांचा अभिमान वाटायला हवा. आपण इस्राएल कडून, अतिरेकी कसे ठेचायचे हे शिकले पाहिजे. आपण इस्राईलशी मैत्री अजून बळकट करून अतिरेकी, दहशतवादी वृत्तीचा खात्मा करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत.

हमास कडून इस्राईल वर सातत्याने दहशतवादी हल्ले केले जातात, हे या लेखातील तुमचे वाक्य आहे. पुढे तुम्ही लिहिता की पॅलेस्टिनी व अरब लोकांचा मृत्यू झाला त्या तुलनेत फारच कमी ज्यू लोकांना प्राण गमवावे लागले.इस्राईल कडे खडं सैन्य आहे,अणवस्त्रे आहेत, अमेरिकेचा पाठिंबा आहे.
हमास ने 3000 हुन अधिक रॉकेट्स इस्राईल वर डागली, पण इस्राईल ने अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून त्यातील बरीचशी रॉकेट्स हवेतच नष्ट केली आणि आपल्या नागरिकांचे प्राण वाचवले. तरीही तुम्ही खापर इस्रायल च्या माथी फोडताय ! हमास पेक्षा इस्राईल प्रगत व बळकट आहे हा इस्राईल चा दोष आहे का? इस्राईलशी अमेरिकेने मैत्री केली,अमेरिका इस्राईल ला मदत देत असते. मग ती अतिरेकी हमास ला पाठिंबा देईल की शेजारच्या ISIS ची फॅक्टरी असणाऱ्या सिरियाला देईल ? आयातुलला खोमेनी तर इस्राएल ला देश मानतच नाहीत, ते म्हणतात, इस्राएल म्हणजे दहशतवाद्यांचा अड्डा आहे.

आपण आपली विचारशक्ती वापरून, निरक्षीरविवेकबुद्धीने काय बरोबर काय चूक ठरवायला नको का ? ते न करता, या प्रश्नात हिंदू -मुस्लिम वाद आणून, रा.स्व.संघाला खेचून कुणाची पोळी भाजली जाणार आहे ?

या प्रश्नावर म.गांधी, श्री.मोरारजी देसाई, श्री.अटलजी, श्री. दीनदयाळ जी,  त्या त्या वेळी जे बोलले असतील, त्याचे कंगोरे काल सापेक्ष असतात. Nothing is permanant in this world.The change is constant. या उक्तीप्रमाणे आजची काळाची गरज आहे, भारत व इस्राएल मैत्री दृढ होणे. याची जाणीव ठेवून आपले पंतप्रधान श्री मोदीजी आणि इस्राएलचे पंतप्रधान श्री नेत्यानाहू प्रयत्नशील आहेत. या मैत्रीवर टीका करण्यासाठी हाती कांही लागत नाही म्हणून हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करण्याच्या तुमच्या प्रयत्नांचा मी निषेध करतो.

त्यातल्या त्यात तुमच्या लेखाबाबत एक समाधानाची बाब म्हणजे तुम्ही चार कलमी तोडगा सुचवलाय.

त्यावर थोडा विचार करू या.
पहिला मुद्दा : शस्त्रसंधी आणि दोन्ही कडून हिंसाचार बंदी. हे बऱ्याच अंशी झालेलं आहे.

तुम्ही लिहलंय,
पॅलेस्टाईन मध्ये मानवतावादी दृष्टिकोनातून मदतकार्य. पूर्ण मान्य, पण हे मदत कार्य, इस्राएलसाठी सुद्धा नको का ? तोडगा काढताना तरी तो समतोल असावा, एकतर्फी नसावा.याची तुम्हाला जाणीव हवी.

पुढे तुम्ही म्हणता, अमेरिकेला भूमिका बदलून उर्वरित जगाची साथ देण्याची विनंती करणं. यात तुम्ही सगळ्या जगाला गृहीत धरून सगळं जग हमास आणि पॅलेस्टाईन यांच्या बाजूने उभे आहे असा आभास निर्माण करायचा प्रयत्न करताय. अहो, अजून ब्रिटन, फ्रांस, जर्मनी अशा ४५ (UN) देशांनी पॅलेस्टाईन ला मान्यता सुद्धा दिलेली नाही. आणि दहशतवाद, कोणत्याही देशाचा, संघटनेचा, कोणत्याही कारणासाठी असो तो स्वीकारार्ह नाही.

पॅलेस्टाईन व इस्राएल मधील संबंध द्विराष्ट्र सिद्धांतावर सुधारावेत हि तुमची इच्छा आहे. इच्छा चांगली आहे, पण त्यासाठी बेस काय असावा हे तेच ठरवतील, आपण त्यात तोडगा सुचवायचा असेल तर तो आपल्या परराष्ट्र मंत्रालयाकडून अधिकृतपणे गेला पाहिजे.

आणि हा सलोखा शक्य आहे हे सांगताना तुम्ही काव्याचा दाखला देताय. काव्यात दोन्ही बाजूनी प्रेमाची भाषा बोलणे सोपे असते पण वास्तव खूप वेगळे व भीषण असते. तरी ही तुम्ही दोन्ही कडून प्रेमाची भाषा असावी, असे म्हणताना इस्राएलच्या सद्सद्विवेक बुद्धिमध्ये आमूलाग्र क्रांती होण्याची गरज सांगितली. ३००० रॉकेट्स डागणाऱ्या, कोणतीही पूर्वसूचना न देता शेकडो भ्याड दहशतवादी हल्ले करणाऱ्या हमास ते PLO  सारख्या अतिरेकी संघटना पाळणाऱ्या पॅलेस्टाईनना सद्सद्विवेक बुद्दीबद्दल कांही डोस दिला नाहीत. म्हणजे त्यांच्याकडे सद्सद्विवेक बुद्धी नाही याची तुम्हाला खात्री असावी.

तुम्ही निष्कारण या लेखात हिंदू -मुस्लिमविरोधी विचार मांडले, भारत देशातील सौहार्दाचा विचार न करता, हिंदू वर आरोप केले आणि सध्या करोनाग्रस्तांच्या सेवेत निस्वार्थी पणे व्यस्त असणाऱ्या रा.स्व.संघाला या विषयात विनाकारण ओढलेत म्हणून मी माझा सात्विक आणि तात्विक संताप व्यक्त करण्यासाठी हा मेल पाठवतोय.

तसे तुम्ही व मी एकाच पंचक्रोशीत वाढलेले आहोत, म्हणून मी संयमाने भाषा वापरली आहे. लेख निष्पक्ष असता, तर मेल पाठवताना आनंद झाला असता.

तुम्ही आखातातील प्रश्नांचा इतिहास आणि गेल्या पन्नास वर्षात घडलेल्या घटना यांचा व्यवस्थित अभ्यास करून,निष्पक्ष तोडगा काढला आणि परराष्ट्रमंत्रालयाला सादर केलात, तर तो माझ्यासाठी सुद्धा आनंदाचा क्षण असेल.

कळावे

— अरविंद टोळ्ये
कोल्हापूर
९८२२०४७०८०.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..