शास्त्रीय संगीताचा पायाभूत अभ्यास, प्रचंड मेहनत हीच सुधार फडक्यांची प्राथमिक अशी ओळख करून घेता येईल. सुरवातीलाच पंडित वामनराव पाध्यांकडे शिस्तशीर शिक्षण तसेच त्याकाळातील कोल्हापूरमधील वास्तव्य असल्याने अनेक शास्त्रीय संगीतकारांच्या प्रभाव. १९४१ मध्ये HMV सारख्या मान्यवर कंपनीत कारकिर्दीला सुरवात झाली, पुढे १९४५ मध्ये “प्रभात” कंपनीत शिरकाव करून घेतला आणि कारकिर्दीला नवीन वळण मिळाले. सुधीर फडक्यांची खरी कारकीर्द गाजली ती मराठी चित्रपट संगीत आणि प्रसिद्ध पावलेले गीत रामायण. जवळपास १२० चित्रपट संगीत दिग्दर्शन केले असल्याने, समीक्षा करायला निश्चित एक विस्तृत पट मिळतो. या संगीतकाराचे “ललित गायन” यात देखील अतिशय उल्लेखनीय योगदान आहे आणि त्याची देखील वेगळेपणाने समीक्षा करणे गरजेचे ठरते.
गायक म्हणून विचार करता, स्वतः:च्या दिग्दर्शनाखाली गायलेली चित्रपटीय गीते तसेच खाजगी भावगीते(स्वतः:बांधलेली तसेच इतर संगीतकारांनी बांधलेली गाणी) लक्षात घ्यायला हवीत. गायक म्हणून विचार करताना काही मुद्दे लक्षात घेणे आवश्यक ठरते. सुधीर फडके हे जेंव्हा उदयोन्मुख गायक म्हणून प्रसिद्धीला यायचे होते, त्यावेळी संगीत पटलावर, विशेषतः: भावगीत संगीतावर जी.एन. जोशी, गजानन वाटवे इत्यादींनी आपली “बैठक” स्थिर केली होती. सुधीर फडक्यांची सुरवातीची गायकी न्याहाळली तर एक बाब प्रकर्षाने लक्षात येते, गायनावर असणारा बालगंधर्वांचा दाट परिणाम!! पुढे हा परिणाम विलयाला गेला, हे फारच चांगले झाले. एक बाब ठामपणे सांगता येते, अगदी पहिल्यापासून, ललित संगीत म्हणजे काय? याविषयीची धारणा अगदी पक्की होती. आपल्याला अभिप्रेत संगीताशय कसा मांडायचा याविषयी, सुधीर फडके अगदी नि:शंक होते. काय सांगायचे आणि कसे सांगायचे, यात कधीही चाचपडलेपणाची भावना कधीही आढळली नाही. आणि बहुदा याच जाणिवेतून त्यांची गायकी हा ललित संगीतातील “मानदंड” म्हणून प्रस्थापित झाला. याचाच दुसरा भाग म्हणजे ध्वनिमुद्रण असो किंवा समोरच्याला साथसांगतीशिवाय काहीतरी गुणगुणणे असो, गायनात तात्पुरतेपणा किंवा उरकून टाकणे, असे कधीही झाले नाही. गायनात एकप्रकारची शिस्त आली. आपल्या श्रोत्यांना आपण काय पोहोचवायचे आहे, याबाबत ठाम धारणा होती. गायनात एकामागोमाग एक व एका वेळेस एक स्वर घेणे म्हणजे संगीताविष्कारार्थ स्वरसंहती हे तत्व सांभाळणे होय. याची नेमकी प्रचिती गायनात कायम मिळत राहिली. आवाज फार बारीक अथवा जाड असा नव्हता पण लगाव काहीसा नाजूक होता (प्रसंगी या वैशिष्ट्याला छेद देणारी गायकी, विशेषतः: गीत रामायणातील गाणी सादर करताना) पट्टी जरी काहीशी उंच असली तरी तिथे मध्यममार्गच होता. आवाज सहजपणे हलका होत असे पण तरीही त्यात अस्थिरता नसायची.
मध्ययुगीन संगीतशास्त्र्यांनी आवाजाविषयी बारकाईने विचार केला होता. आवाज, त्याचा लगाव आणि त्यातून साधणारा परिणाम याविषयी बरीच जागरूक नोंद “संगीत रत्नाकर” ग्रंथात आढळते. त्यानुसार त्या ग्रंथात त्यांनी एक खास संज्ञा वापरली आहे – “शारीर”. शरीराबरोबर येणारा तो शारीर असे म्हटले आहे. अर्थात या बाबत आपल्याला अधिक खोलात जायचे नाही परंतु सुधीर फडक्यांची गायकी कक्षात घेताना हे “शारीर” वैशिष्ट्य नेमकेपणाने जाणवते. “गीत रामायण” गाताना प्रस्तुत वैशिष्ट्य ठामपणे त्यांनी निर्देशात केले आहे. वरवर पाहता, माणूस सुरेल असतो किंवा नसतो असेच म्हणावे लागेल. विशिष्ट आविष्कारात स्वरांची जी स्थाने संयुक्तिक असतात तिथे सहजपणे, पाहिजे तेंव्हा आणि श्रवणीयता राखून मुक्काम करणे म्हणजे सुरेल असणे. इथपर्यंत बहुतेकांचा प्रवास सारखाच असतो परंतु यापुढील प्रवास वेगळा असतो. थोडक्यात, द्रुत तान घेण्यासाठी किंवा एखादी उंच स्वरांवर हरकत सादर करण्याआधी, श्वास भरण्याकरता एक “ह” कार युक्त स्वर सादर फडके वापरात असत, त्यामुळे एकूणच सादरीकरणात गंभीरता वावरते आणि श्रोत्यांचे लक्ष खेचून घेण्यात यशस्विता येते.
प्रसंगी आवाजात काहीशी नाट्यमयता आणणे हा देखील एक विशेष म्हणता येईल. किंबहुना, त्यांच्या गायनाचे एक व्यवच्छेदक वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल परंतु नाट्यमयता किती असावी, या बाबत ठाम आडाखे होते. गायनातील नाट्यमयता त्यांनी कधीही शब्दांवर स्वर होऊ दिली नाही. किंबहुना, गायन आणि स्वररचना तयार करताना, सुधीर फडक्यांनी कवीचे शब्द हे नेहमीच प्रमाण मानले. शक्यतो “यतिभंग” होऊ द्यायचा नाही, अशीच बहुदा प्राज्ञा केली असावी, असा संशय घेण्याइतपत त्यांनी कवितेतील शब्दांना महत्व दिले.
दुसरा विशेष सांगायचं झाला तर शब्दोच्चार. याबाबत तर त्यांनी विशेषतः: मराठीत स्वतः:ची एक खास शैली निर्माण केली असे म्हटले तर वावगे ठरू नये. “ष”, “ऋ” इत्यादी अक्षरे गाड्यात उच्चारताना प्रयास पडतो तर स्वरांच्या साहाय्याने नेमका उच्चार करणे, किती अवघड असेल याची कल्पना यावी. केवळ हीच अक्षरे नव्हेत तर इतर अवघड वर्णनामांना, स्वरांतून घेताना, त्या अक्षरांचे व्याकरण सांभाळून त्यांनी आपली गायकी सिद्ध केली उदाहरणार्थ “दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा” या यमन रागाच्या सावलीतील गाण्यात, “दोष” मधील “ष” या अक्षराचा उच्चार फार अभ्यासपूर्ण आहे आणि तास तो स्वच्छपणे उच्चारल्याने, कवितेतील आशयात किती गहिरा रंग भरला जातो,हे मुद्दामून ऐकण्यासारखे आहे. गमतीचा भाग असा, स्पष्ट शब्दोच्चार करण्याच्या नादात आवाजात “खडबडीतपणा” येऊ शकतो परंतु फडक्यांची खासियत अशी, स्पष्टोच्चारात गाताना, स्वरांत तितकेच मार्दव आणण्याची किमया करून दाखवत. हा प्रकार विलक्षण म्हणावा लागेल.
संगीतकार म्हणून फडक्यांची कारकीर्द अधिक समृद्ध आहे. प्रभात सिनेमांच्या काळात सुरवात झाल्यानंतर त्यांनी हळूहळू स्वतः:चे स्थान निर्माण केले आणि पुढे प्रचंड लोकप्रिय केले, यात कसलाच वाद नाही. एक संगीतकार म्हणून बघताना,एकूणच त्यांच्या “यमन” रागाचा फार प्रभाव होता असे म्हणता येईल. “पराधीन आहे जगती”, “धुंदी कळ्यांना”, “तोच चंद्रमा नभात” कारे दुरावा” “आकाशी झेप घेरे” ही आणि अशी आणखी गाणी वानगी दाखल सांगता येतील. अर्थात इथे यमन राग केवळ उदाहरण म्हणून घेतला आहे परंतु इतर अनेक रागात त्यांनी स्वररचना सादर करून, कलासंगीतावरील प्रभुत्व सिद्ध केले आहे. सुधीर फडक्यांनी मराठी चित्रपट संगीतावर एकेकाळी अधिराज्य केले होते असे म्हटले तर अतिशयोक्ती चुकूनही होऊ नये. जवळपास १२० चित्रपटांसाठी त्यांनी संगीत रचना केल्या आहेत, असे इतिहास सांगतो. परंतु कधीकधी असे वाटते, त्यांच्यातील गायक, हा संगीतकारावर अधिकार गाजवत असावा. स्वररचना करतानाच त्यातील शब्दांचे औचित्य सांभाळणे आणि तसे करताना सादरीकरणाच्या वेळेस, गायन अधिक समृद्ध व्हावे, अशीच धारणा दिसते. त्यांची जोडी,ग.दि. माडगूळकरांसोबत अधिक जमली, हे तर सर्वश्रुतच आहे. माडगूळकर कविता लिहिताना, बरेचवेळा संस्कृत शब्दांचा आधार घेत असत. सुधीर फडक्यांचे शब्दोच्चार स्पष्ट असण्यामागे माडगूळकरांची संस्कृतप्रचुर काव्यरचना असणे, हा केवळ योगायोग नक्कीच नसणार. कवितेची चाल सहज, गुणगुणता येईल अशीच असायची परंतु त्यात विस्ताराच्या अनेक शक्यता दिसतात. फडक्यांचे वैशिष्ट्य हेच म्हणता येईल अशा विस्तारशक्यता असून देखील, त्यांनी शब्दांना नेहमीच प्राधान्य दिले. उदाहरण द्यायचे झाल्यास, “ज्योतीकलश छलके” हे सुप्रसिद्ध गाणे. एकाबाजूने भूप तर दुसऱ्या अंगाने देसकार रागाच्या सावलीत बांधलेली स्वररचना, वेगळ्या ढंगाने गाऊन देखील कवितेचे पावित्र्य कुठेही ढळलेले नाही. YouTube वर आपल्याला लताबाईंच्या आवाजात आणि सुधीर फडक्यांच्या आवाजात, अशा दोन्ही रचना ऐकायला मिळतील.
चाल बांधताना, शक्यतो खालचे किंवा मध्य सप्तकातील स्वर आणि संबंधित स्वर-मर्यादा यांतच चालीचा वावर ठेवायचा. “चालली शकुंतला” , “डोळ्यात वाच माझ्या” इत्यादी गाण्यांमधून हाच विचार प्रबळ दिसतो. पहिली रचना दु:खाचे नाटकी प्रक्षेपण न करता व्याकुळ करणाऱ्या व्यथेचे मन:स्पर्शी दर्शन घडवते तर दुसऱ्या गाण्यात एकमेकांच्या सहवासासाठी आतुर झालेल्या जीवांचे मनोमिलन दिसते. दोन्ही गीतांत प्रामुख्याने फडक्यांचा आवाज आहे पण तरीही सादरीकरण करताना, वर दर्शविलेल्या वैशिष्ट्यांचे दर्शन आपल्या घडते.. अर्थात, पुढे मात्र त्यांनी आपले धोरण बदलले आणि उच्चस्वरी वाद्यवृंद वापरण्याचे धोरण ठेवले – उदाहरणार्थ “जाशील कोठे मुली तू” वगैरे. वस्तूत: तशी फारशी गरज नव्हती.
एकंदरीत सुधीर फडक्यांची रचनाप्रकृती दु:ख, अंतर्मुखता आणि खंत करण्याकडे झुकली होती, असे सहजपणे म्हणता येईल – उदाहरणार्थ “चल सोडून हा गाव” किंवा “हा माझा मार्ग एकला” या दोन्ही गाण्यात एकटेपणाची व्याकुळ अवस्था अतिशय सुरेख प्रकारे मांडली आहे त्या दृष्टीने फडक्यांच्या रचना “गीतधर्मी” आहेत, असे म्हणायला प्रत्यवाय नसावा. रागाच्या स्वरक्षेत्रात रुंजी घालण्याच्या ब्रीदास ते जगतात पण शिवाय भारतीय वाद्यांचा स्वरधर्म ओळखून त्यांचा वापर करायचा. कवितेच्या चरणाचा पायाभूत अभ्यास करून, त्याच्या भोवतीच वाद्यमेळाची रचना करायची.या आग्रहामुळे काव्याचा अर्थच नव्हे तर आशय देखील ऐकणाऱ्याच्या मनात सावकाश दाटपणे उतरत जातो.
सुधीर फडक्यांच्या रचनेचे आणखी एक अंग दाखवायचे झाल्यास, त्यांची दृष्टी “चित्रपटीय” होती. गाणी ही चित्रपटातील आहेत आणि चित्रपटाची कथा पुढे नेण्यास मदत करणारी आहेत, याची वास्तविक जाणीव आढळायची. याचाच वेगळा अर्थ, कवितेतील कवित्व जपायचे पण ते जपताना चित्रपटातील प्रसंगाचे देखील नेमके भान ठेवायचे. अशी अंतर्मुख दृष्टी ठेवणारे, विरळाच आढळणारे कलाकार होते.
– अनिल गोविलकर
Leave a Reply