सुधीर फडके म्हणजेच रामचंद्र विनायक फडके त्यांचा जन्म २५ जुलै १९१९ रोजी कोल्हापूर येथे झाला. सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेली गाणी , त्यांनी गायलेली गाणी ही आजही प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यांनी जवळजवळ ५० वर्षाहून अधिक वर्षे मराठी चित्रपट सृष्टीवर अधिराज्य केले. सुधीर फडके यांनी शेकडो गाणी गायली , शेकडो गाण्यांना चाली लावल्या. भावगीत हा प्रकार त्यांनी जी. एन . जोशी यांच्यानंतर खऱ्या अर्थाने मराठी मनात रुजवला अर्थात त्यामध्ये गजानन वाटवे यांचेही नाव घ्यावे लागेल. सुधीर फडके यांनी शास्त्रीय गायनाचे प्राथमिक शिक्षण कै. वामनराव पाध्ये यांच्याकडे घेतले. त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरवात एच .एम. व्ही . या संगीत क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेतून केली. १९४६ साली ते पुण्याच्या प्रभात चित्र संस्थेत संगीत दिग्दर्शक म्ह्णून काम करू लागले. त्याच्या पत्नी ललिता फडके याही उत्तम गायिका होत्या.
कवी ग.दि . माडगूळकर आणि सुधीर फडके यांनी ‘ गीत रामायण ‘ मराठी मनात अजरामर केले. १९६० च्या दशकात ऑल इंडिया रेडिओ साठी त्यांनी ‘ गीत रामायण ‘ केले. गीत रामायण मधील पहिले गाणे १ एप्रिल १९५५ रोजी आकाशवाणीवर प्रसारित झाले. ऐकून ५६ गाणी आकाशवाणीवर प्रसारित झाले. त्यामुळे सुधीर फडके म्हणजे ‘ बाबूजी ‘ आणि कवी ग.दि . माडगूळकर याचे नाव घराघरात पोहचले. गीत रामायणाची आत्तापर्यंत हिदी , गुजराथी , कन्नड , बंगाली , असामी , तेलगू , मल्याळी , संस्कृत , कोकणी अशा विविध भाषांमध्ये भाषांतरे झाली.
सुधीर फडके यांनी जवळ जवळ १११ चित्रपटाना संगीत दिले . त्यात २१ चित्रपट हिदी भाषेतील आहेत. त्यानी १९४६ साली गोकुळ ह्या त्याच्या पहिल्या चित्रपटाला संगीत दिले. त्याच्या ‘ भाभी की चुडीया ‘ या हिदी चित्रपटातील गाणी विशेष गाजली. मराठी चित्रपटसृष्टीत राजा परांजपे , ग. दि . माडगुळकर आणि सुधीर फडके यांनी अजरामर गीते दिली . आजही त्याची जगाच्या पाठीवर या चित्रपटातील गाणी आणि बाबुजीचे संगीत कोणीही विसरू शकत नाही. त्यानी संगीत दिलेल्या चित्रपटांची नावे जरी पहिली तर बाबुजींनी चित्रपटसृष्टीला भरभरून दिले आहे हे लक्षात येईल . गोकुळ , आगे बढो ,सीता स्वयंवर ,अपराधी , जय भीम , माया बाजार , राम प्रतीज्ञा , संत जनाबाई , श्री कृष्ण दर्शन , मालती माधव , मुरलीवाला , पहली तारीख , रत्न घर , शेवग्याच्या शेंगा , देवघर , सजनी , गज गौरी , गोकुल का चोर , भाभी की चूडियां , प्यार की जीत ,एकटी , आधार , दरार , शेर शिवाजी , रुक्मिणी स्वयंवर , आम्ही जातो आमुच्या गावा , पुढचे पाऊल , जगाच्या पाठीवर सुवासिनी , प्रपंच , मुंबईचा जावई हे सुधीर फडके यांचे गाजलेले चित्रपट आहेत. चित्रपटाव्यतिरिक्त त्यांनी शेकडो गीतांना , भावगीतांना चाली लावल्या आणि गायली देखील.
सुधीर फडके हे ‘ राष्ट्रीय स्वयंसेवक संघा ‘त जवळजवळ ६० वर्षे होते. तसेच अमेरिकेमध्ये ‘ इंडिया हेरिटेज फाउंडेशन ‘च्या स्थापनेमागे त्यांचीच प्रेरणा होती. आपल्या कारकीर्दीच्या अखेरीस त्यांनी ‘ वीर सावरकर ‘ या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावरील हिंदी चित्रपटाच्या निर्मितीत लक्ष घातले होते आणि तो चित्रपट करणे ही त्यांची महत्वाकांक्षा होती. शेवटी त्यांनी आपली जिद्द पुरी केली. तो चित्रपट केलाच. सुधीर फडके यांनी पार्श्वगायन केलेला व संगीत दिलेला हा शेवटचा चित्रपट. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी सुधीर फडके यांनी अफाट श्रम केले. हा चित्रपट बनवणे हे त्याचे स्वप्न होते. त्याचप्रमाणे त्यांनी गोवा मुक्ती संग्रामात भागही घेतला होता.
सुधीर फडके यांचे सुपुत्र श्रीधर फडके हेही उत्तम गायक आणि संगीतकार आहेत.
सुधीर फडके यांना खूप पुरस्कार मिळाले. राष्ट्रपती पदक (१९६३) – हा माझा मार्ग एकला या चित्रपटासाठी , सह्याद्री स्वररत्न पुरस्कार (२००२) , दिनानाथ मंगेशकर पुरस्कार (१९९८) , लता मंगेशकर पुरस्कार (२००१) .
अशा ह्या समर्थ संगीतकाराचे , गायकाचे मुंबईत २९ जुलै २००२ रोजी निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply