सुगम संगीत गायक गिरीश पंचवाडकर यांचा जन्म १ जुलै १९६० रोजी झाला.
गिरीश पंचवाडकर यांच्या घराण्यातच संगीत आहे. त्यांचे आजोबा पंढरपुरातील प्रसिद्ध कीर्तनकार होते. लहानपणापासून गिरीश यांना गाण्याची आवड होती. त्यांचे गायनाचे सुरुवातीचे शिक्षण त्यांचे वडील आणि गुरु भालचंद्र हरिभाऊ पंचवाडकर यांच्याकडे झाले. जुन्या पिढीतील ज्येष्ठ संगीततज्ञ आणि नॉर्थकोट हायस्कूल व हरिभाई देवकरण प्रशालेचे एक तळमळीचे संगीत शिक्षक म्हणून पंचवाडकर सरांचा लौकिक होता. गिरीश यांचे अक्षर अतिशय सुंदर आहे आणि तितकेच सुंदर गायन यांसाठी ते प्रसिद्ध आहेत.गिरीश हे बँकेची नोकरी सांभाळून १९९२ पासून गायनाचे कार्यक्रम करीत आले आहेत. ‘पहाटगाणी’, ‘अक्षयगाणी’ ‘एक धागा सुखाचा’ ‘गीत रामायण’ ‘तो राजहंस एक’ आणि ‘शब्दस्वरांचे इंद्रधनुष्य’ हे त्यांचे कार्यक्रम विशेष गाजले आहेत. सोलापूर मध्ये “दिवाळी पहाट” ची सुरुवात त्यांनी केली.
आकाशवाणी सोलापूर येथे त्यांचे गायनाचे अनेक कार्यक्रम झाले. त्यांच्या “क्षितिज” या संस्थेतर्फे ते सुगम संगीताचे कार्यक्रम करतात. २००९ मध्ये “राष्ट्रपती भवन, दिल्ली” येथे मराठी गायन मैफल करायची संधी त्यांना मिळाली.
गिरीश पंचवाडकर यांना महाराष्ट्र शासनाचा – गुणवान कामगार पुरस्कार, महाराष्ट्र गुणीजन रत्न कलागौरव, महापौर गौरव असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
त्यांचे चिरंजीव अक्षय पंचवाडकर हे उत्तम तबला वादक असून डॉ.आदिती ही कन्या उत्तम गायिका आहेत. मा.प्रतिभाताई पाटील भारताच्या राष्ट्रपती असताना राष्ट्रपती भवनामध्ये गिरीश व अक्षय पंचवाडकर या पितापुत्रांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली होती. गायिका शीतल पंडित आणि अक्षय पंचवाडकर या दोघांनी मिळून “नादसप्तक अकादमीची” स्थापना केली आहे. त्या माध्यमातून भावगीत, भक्तिगीत, चित्रपटगीत, लावणी, अभंग, गज़ल, लोकगीत, सुगम संगीत असे संगीताचे विविध प्रकार शिकवले जातात.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply