आत्तापर्यंतच्या धाडसाचे आणि मेहनतीचे चांगलेच फळ मला मिळाले होते. टेलिव्हिजनवर पूर्वी मी युवदर्शनमध्ये गायलो होतो.
आता मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम मिळाला. या कार्यक्रमात श्रीकांत ठाकरे यांची दोन नवी गाणी मी सादर केली. कार्यक्रम मिळत होते. आत्मविश्वास वाढत होता. आता एक संपूर्ण कॅसेट गाण्यासाठी प्रयत्न करायचे मी ठरवले. अनेक कॅसेट कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना भेटलो. पण माझी संपूर्ण कॅसेट काढण्यासाठी त्या सर्वांनी चक्क नकार दिला. कारण व्यावसायिक होते. चटकन मिळालेल्या थोड्या यशामुळे मी स्वतःला लोकप्रिय मानत होतो. पण कॅसेटची भरपूर विक्री होऊन कंपनीला फायदा होण्याइतका लोकप्रिय त्यांच्या मते मी नव्हतो आणि त्यांचे बरोबरच होते. मी अगदीच नवीन कलाकार होतो.
“पण म्हणूनच तर तुम्ही मला संपूर्ण कॅसेट गायची संधी द्यायला हवी. नाहीतर आम्ही नवीन गायक लोकप्रिय होणार कसे?” माझ्या प्रश्नाला त्यांच्याकडून काहीही उत्तर मिळाले नाही. मी अत्यंत नाराज होऊन घरी परतलो. भाऊंना घडलेला प्रकार सांगितला. आम्ही नवीन गायक लोकप्रिय नाही म्हणून आमची स्वतंत्र कॅसेट नाही. मी उद्वेगाने म्हणालो, मी भावनिक झालो होतो. पण भाऊंची शिकवण्याची पद्धत वेगळीच होती. ते म्हणाले,
“तू म्हणतोस ते बरोबर आहे. पण हे समजून घे की तुझ्यासारख्या नवीन गायकाला लोकप्रिय करण्याचे काम कॅसेट कंपनीचे नाही. लोकप्रिय गायकांची कॅसेट करून नफा मिळवणे हे त्यांचे काम आहे.” आता मी विचार करू लागलो.
“हे बघ, कॅसेट काढण्याचा खर्चही भरपूर असतो. तुझ्यासारख्या नव्या गायकासाठी त्यांनी तो का करावा?” पण मग माझी कॅसेट कशी निघणार? मी अजूनही कॅसेटची टेप अडकते तसा तिथेच अडकलो होतो.
“तू स्वतः खर्च करून स्वतःची कॅसेट कंपनी काढून, स्वतःच का नाही कॅसेट काढत?” एका नवीन विचारांचा बॉम्ब भाऊंनी माझ्यावर फेकला.
माझे विचारचक्र सुरू झाले. कॅसेट कंपनी काढण्यासाठी काय काय आवश्यक आहे याची माहिती जमवायला मी सुरवात केली. सर्वप्रथम वकिलांना भेटून कॉपीराईट अॅक्टबद्दल समजून घेतले. कंपनीच्या लोगोचे डिझाईन नक्की केले आणि लवकरच ‘स्वर-मंच कॅसेट्स’ ही स्वर – मंचशी संलग्न कंपनी अस्तित्वात आली. एखादी गोष्ट मनात ठरवली की ती पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्थ बसत नाही. त्यासाठी कितीही श्रम घेण्याची माझी तयारी असते. हा माझा स्वभाव भाऊंनी ओळखला होता. त्यामुळे या प्रकारची नवी आव्हाने ते माझ्यासमोर उभी करत. त्यासाठी मदतही करत, पण मागे राहून. आव्हानाशी मलाच झगडावे लागे आणि त्यातूनच मी शिकत गेलो.
– अनिरुद्ध जोशी
Leave a Reply