इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष सुहार्तो यांचा जन्म ८ जून १९२१ रोजी जावा बेटावर झाला.
इंडोनेशियाची सत्ता १९६६ ते १९९८ अशी ३२ वर्षे मुठीत ठेवणारे हुकूमशहा सुहार्तो यांचा २०व्या शतकातल्या सर्वाधिक भ्रष्ट व क्रूर नेत्यांच्या पंक्तीत यांचा क्रम वरचा आहे. पण देशाला त्यांनी आथिर्क प्रगतीच्या वाटेवर नेले.आपला देश डचांच्या अधिपत्याखाली असताना ‘रॉयल नेदरलँडस आर्मीत त्यांनी सार्जंट म्हणून नोकरी केली, मग १९४२ मध्ये जपान प्रणित उठावात सहभाग घेतलाआणि देश स्वतंत्र झाल्यावर पुन्हा सैन्यात अधिकारीपदावर नोकरी केली, इथवरचा सुहार्तो यांचा प्रवास साधाच होता. पण १९६५ मध्ये कम्युनिस्ट राजवटीविरुद्ध त्यांनी केलेल्या उठावाने जग ढवळले. इंडोनेशियाच्या जनतेने १९९७ मध्ये मोठा उठाव करून, वर्षभर संघर्ष वाढता ठेवून सुहार्तो यांना पायउतार होण्यास भाग पाडले. पण १९६५ ते ६८ या काळात कम्युनिस्टांचे सरकार सुहार्तोंनी लष्कराच्या बळावर उलथवले, तेव्हा तब्बल आठ लाख कम्युनिस्ट कार्यकर्ते वा समर्थकांना त्यांनी ठार मारले. त्यानंतरही पूर्व तिमूर, पापुआ व असेह भाग आपल्याच टाचेखाली ठेवण्यासाठी सुहार्तो यांनी लष्कराकरवी किमान तीन लाख जणांचे शिरकाण केले.
राजकीय कत्तली करताना आथिर्क बाजू मात्र त्यांनी उत्तमपणे सावरली. ‘आथिर्क प्रगतीचा मलिदा सुहार्तो आणि त्यांच्या बगलबच्च्यांनीच खाल्ला. सहकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराला त्यांनी अभयच दिले’, असे अभ्यासक सांगतात. पदच्युत व्हावे लागल्यानंतर सुहार्तो यांनी कातडीबचाऊपणाची हद्द गाठत कधी प्रकृती अस्वास्थाचे कारण देऊन, तर कधी पुरावेच मिळू न देता स्वत:वरील एकाही आरोपाच्या खटल्याला सामोरे जाणे टाळले.
सुहार्तो यांचे निधन २७ जानेवारी २००८ रोजी झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply