रविवार या एकाच दिवशी मनासारखे झोपायला मिळते म्हणून जाग आलेली असतानाही मी आणि माझा दहा वर्षाचा मुलगा अंथरुणावर लोळत पडलो होतो. बायको उठली आहे हे किचनमधल्या भांडयाच्या आवाजावरून कळत होते. कुठलेही भांडे गॅसवर ठेवण्याआधी ते टिकाऊ आहे की नाही हे आपटून बघते की काय कळत नव्हते.
“अरे दहा वाजले, उठा आता दोघेही.”
“काय यार मम्मी पण, संडे असून आजही झोपून देत नाही.” माझा मुलगा एका कुशीवरून दुसर्या कुशीवर होत बोलला.
“खूप झालं आता. दोघेही उठा.” म्हणत खेचून पांघरुणे गुंडाळायलाच काढल्यावर नाईलाजाने उठावे लागले. हिचं किचनमध्ये काहीतरी चालूच होतं. ब्रश आणि अंघोळ उरकून खिडकीतून खाली पहात बसलो. आमच्या बिल्डिंगच्या मागेच दुसर्या एका इमारतीचे बांधकाम चालू होते. रविवारी तर डोके उठवणारा कर्कश आवाज असतो. पण त्यादिवशी बहुतेक सुट्टी असावी. एका माणसाशिवाय कोणीही दिसत नव्हते.
त्याच्या अंगात खादीचा बनियन आणि कमरेखाली धोतर होते. दोन्ही वस्त्रे कमालीची मळलेली होती. कुठूनतरी स्लॅबसाठी लागणार्या फळया आणून तो मोकळया जागेत ठेवत होता. खूप सकाळीच कामाला लागलेला असावा कारण बराच मोठा ढीग झाला होता.
इमारतीखाली बनवले जाणारे काँक्रिट वर नेण्यासाठी एका सरळ रेषेत केलेली बांबूच्या स्कॅफ फोल्डींगची व्यवस्था बघत बसलो हातो. त्या माणसाचे फळया टाकायचे काम बहुतेक झाले असावे कारण इमारतीच्या आवारात असणार्या बोअरींगची मोटर चालू करून त्याने पाईपच्या साहाय्याने इमारतीवर पाणी मारायला सुरवात केली.
इतक्यात बायकोने बटर लावलेली गरमागरम सँडविच समोर आणून ठेवली. सँडविच हा बंड्याचा वीक पॉईंट आहे. वाऊ करून तो त्यावर तुटून पडला. मी मात्र “हा ब्रेकफास्ट?” म्हणून उगाचच तिच्यावर वैतागलो. दोन दिवस ऑफिसच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये ब्रेकफास्टसाठी सँडवीचच होती. त्यामुळे मी त्यांना कंटाळलो होतो. नेमके ते सोडून काहीतरी वेगळे मला पाहिजे होते. पण त्या बिचारीला काय ठाऊक! एखाद्या रविवारी तरी किचनमध्ये नेहमीसारखा पसारा नको म्हणून तिने पटकन नाष्ता बनवला होता.
माझ्या अचानक चिडण्यावर काहीच न बोलता ती तिथेच खाली मान घालून उभी राहिली. तिच्या डोळ्यांत टचकन पाणी आल्यावर मी वरमलो. बायकोचा हा अवतार मी कधी पाहिला नव्हता. असे काही झाले की ती नेहमी भांडायच्या मूडमध्ये असते. अचानक हिला काय झाले ते मला समजेना. मी प्रचंड गोंधळलो.
आपल्या ऑफिसला किमान रविवारी तरी सुट्टी असते पण बायकोला कधी सुट्टी असते का हा विचार मी कधी केलाच नव्हता. अजून वादावादी नको म्हणून गुपचूप सँडविच खायला लागलो. माझं लक्ष खिडकीतून मघाशी त्या पाणी मारणार्या माणसावर गेलं.
त्याने चालू पाण्याचा पाईप बांधकामावर तसाच बाजूला ठेऊन एका ग्लासमध्ये पाणी घेतले. तिथेच बाजूला ठेवलेल्या त्याच्या सामानातून त्याने कसलेतरी पॅकेट काढले. पॅकेट कसले, बिस्किटचा पुडा होता तो! नुकत्याच टाकलेल्या फळ्यांच्या ढीगाला टेकून तो आरामात बसला आणि पुडा फोडून त्यातली बिस्कीटे एकेक करून पाण्यात बुडवून खाऊ लागला.
बंड्या सँडविच उडवण्यात दंग होता. मी आणि बायकोने एकाचवेळी त्या माणसाला पाहिलं. ती काही बोलली नाही पण दोन क्षणांपुरता का होईना तिने एक अर्थपूर्ण कटाक्ष माझ्यावर टाकला आणि किचनमध्ये निघून गेली. अचानक काय झाले कळले नाही पण माझ्या तोंडातल्या सँडविचची चव झटकन बदलली आणि त्याबरोबरच्या गरमागरम कॉफीने तर मूडच बदलून टाकला.
सुखाचे संदर्भ चुकले की आयुष्यातले समाधान हरवून जाते हे त्यादिवशी मला नव्याने उमजले.
©विजय माने, ठाणे
https://vijaymane.blog
Leave a Reply