पुणे जंक्शनहून पुणे-कोल्हापूर पॅसेंजर गाडी नुकतीच सुटली होती.
सेकंड क्लासमधे पाच प्रवासी अजून डुलक्या देत होते.
नुकतेच त्यांचे भोजन झाले होते, त्यामुळे ते आता झोंप काढण्याच्या प्रयत्नात होते.
सर्व कसं शांत होतं.
अचानक दरवाजा उघडला गेला आणि एक ताडासारखा सरळ, उंच आणि नीटनेटका पोशाख केलेला, अंगात जाकीट घातल्यामुळे पत्रकार वाटणारा माणूस आंत शिरला.
धाप लागल्यामुळे डब्यात मधेच तो थोडा वेळ नुसता उभाच होता.
त्याचे डोळे बसायला जागा शोधत होते.
मग तो उद्गारला, “परत चुकीचाच डबा मिळालेला दिसतोय. कमाल आहे !
एखादा वैतागेल अशाने.”
त्याला पाहून प्रवाश्यांमधला एकजण आनंदाने ओरडला, “श्याम आठवले, तू इकडे कसा ? श्यामच ना तू ?”
नव्या प्रवाशाने प्रथम भकास नजरेने त्या आवाजाच्या दिशेने पाहिलं मग तोही आनंदाने ओरडला, “राम हेगडे, अरे किती वर्षांनी भेटतो आहेस !
कुठे होतास ? मला माहित नव्हतं तूही ह्या गाडीतच आहेस.”
रामने विचारलं. “कसं चाललंय तुझं, श्याम ?”
“अरे यार, मी ठीक आहे रे !
फक्त माझा डबा चुकलाय आणि कांही केल्या तो मला सांपडत नाही.
काय मूर्ख आहे मी ! मला कोणीतरी बडवला पाहिजे !”
गाडीबरोबर एक हेलकावा घेऊन श्याम पुढे म्हणाला, “विचित्र गोष्टी होत असतात.
मी गाडीतून उतरून जरा पुढे जाऊन एक छोटा पेग घेत होतो आणि दुसरी घंटा वाजली.
एकाने कसं बरं वाटणार ?
मग आणखी एक पेग मी घाईघाईत घेत असतांनाच तिसरी बेल झाली.”
“मी कसाबसा तो संपवून गाडीकडे धांव घेतली आणि वेड्यासारखा समोर येईल त्या डब्यात उडी मारून चढलो.
मूर्खपणाच झाला तो !”
राम म्हणाला, “पण तू तर मजेत दिसतोयस ? इथे भरपूर जागा आहे. ये बस इथे !”
“नाही रे बाबा ! मला माझा डबा शोधला पाहिजे. अच्छा !” श्यामने स्पष्टीकरण केले.
राम म्हणाला, “ऐक माझं ! असा डबा शोधतांना जरा चूक झाली तर दोन डब्यांच्या मधे पडशील !
आता इथे बस. स्टेशन आलं की शोध तुझा डब्बा.”
श्यामने एक मोठ्ठा सुस्कारा सोडला आणि कांटेरी पाटावर बसल्यासारखा चुळबुळ करत तो रामच्या समोरच्या मोकळ्या जागेवर बसला.
राम हेगडेने विचारले, “तू कुठे निघाला आहेस ?”
श्याम आठवले म्हणाला, “मी अवकाशाच्या प्रवासाला निघालोय. माझ्या डोक्यात गोंधळ आहे की मी कुठे चाललोय तें मीच सांगू शकत नाही.
जिथे नशीब नेईल तिथे जायचं.
तू कधी सुखी मूर्ख पाहिला आहेस ? नाही ?
मग सर्वात सुखी माणूस पहा.
माझा चेहरा पाहून काय वाटतं तुला ?
राम हेगडे त्याच्याकडे पहात म्हणाला, “विशेष कांही नाही दिसत वेगळं ! आहेस नेहमीसारखाच.”
श्याम आठवले म्हणाला, “मी खरंच सांगतो तुला.
मी आरशात पाहिलेलं नाही पण आतां मी अगदी येडपट दिसत असेन ना !
मी वेडाच होतोय बहुदा.
तुला माहित आहे, राम, अरे मी लग्न केलंय. काय समजलास !”
राम हेगडे आश्चर्याने ओरडला, “म्हणजे तू शेवटी लग्न केलसं !”
श्याम म्हणाला, “केलं म्हणजे काय ? आजच केलं.
लग्न केलं, देवळातून बाहेर आलो आणि थेट गाडी पकडली.”
रामने श्यामचे अभिनंदन वगैरे केले.
मग तो म्हणाला, “तू तर छुपा रूस्तुम निघालास !
म्हणून तू असा सजलायस आणि ताजातवाना वाटतोयस !”
श्याम म्हणाला, “ हो रे मित्रा ! स्वप्न पुरं करायला, मी अगदी अत्तराचा फवारा सुध्दा अंगावर आणि कपड्यांवर मारलाय.
ह्या क्षणी मी माझ्यावरच खूष आहे.
स्वर्गसुख, स्वर्गसुख म्हणतात, ते हेच असावं !
माझ्या आयुष्यात मी कधी एवढा आनंदी नव्हतो.”
श्यामने डोळे मिटून मान हलवली.
“मी अत्यानंदात आहे. विचार कर, दोन मिनिटांत मी माझ्या डब्ब्यात पोहोचेन.
तिथे खिडकीशी मला आपलं सर्वस्व देऊ केलेली, सुंदर गोल चेहरा अन् सुंदर नाक डोळे असलेली माझी देवता, माझी प्रिया, माझी बायको बसलेली असेल.
एखादी परीच आहे असं वाटणारी सुंदरी, माझी लाडकी.. !
पण हे सर्व तुला सांगून काय उपयोग. तू व्यवहारी, अरसिक, अविवाहीत.
प्रेम वगैरे झूठ वाटणारा तू ! तुला नाही समजणार.
तू जर कधी विवाह केलास तर माझी आठवण येईल तुला.
मी आता एक दोन मिनिटांत तिच्या बाजूला बसलो असेन आणि तिची हनुवटी हातात धरून तिचं सौंदर्यपान करेन.”
पुन्हा श्याम आठवलेने डोळे मिटले अन् मान हलवली.
तो परत बोलू लागला, “मी माझी मान तिच्या खांद्यावर ठेवून झोपेन.
ह्या अशा आनंदाच्या क्षणी सगळं जग कवेंत घ्यावसं वाटतं.
राम, मित्रा, ये, तुला कडकडून भेटू दे.”
राम म्हणाला, “ये, तुझा आनंद साजरा करू.”
दोघे कडकडून मिठी मारतात.
आजूबाजूला बसलेले प्रवासी मोठ्या आवाजांत चाललेला हा संवाद ऐकत असतात.
दोघे कडकडून भेटतांच सर्व एकत्र हंसतात.
श्याम पुढे बोलू लागतो, “मग चित्र पूर्ण करण्यासाठी पॅंट्रीमधे जाऊन कांही खानपान करणार. मजा करणार.”
आता श्यामचे बोलणं ऐकायला पांच श्रोते होते.
त्याच्या बोलण्याला, त्याच्या हावभावांना ते सर्वच दाद देत होते.
त्यांची झोप आता उडाली होती.
तो बडबडतच होता.
तो हंसला की सर्व हंसत होते.
तो म्हणाला, “सद्गृहस्थहो, कधी दारू प्यावीशी वाटली तर प्या.
ती पिणं चांगली की वाईट ह्याचं तत्त्वज्ञान बनवण्याची गरज नाही.
ते तत्त्वज्ञान आणि ते मानसशास्त्र अगदी गुंडाळून ठेवा.”
तेवढ्यात एक तिकीट चेकर तिथून जात होता, त्याला उद्देशून तो म्हणाला, “साहेब, तुम्ही जेव्हां डब्बा नंबर २०९ मधे जाल तेव्हां तिथे एक हिरव्या रंगाची पांचवारी साडी नेसलेली स्त्री दिसेल, तिला सांगा की मी इथे आहे.”
चेकर म्हणाला, “जरूर सांगेन पण डब्बा नंबर २०९ ह्या गाडीला जोडलेल्या डब्ब्यांत नाही. २१९ नंबरचा डब्बा मात्र आहे.”
श्याम म्हणाला, “ ठीक आहे. मग २१९ असेल. तिला सांगा की तिचा नवरा इथे आहे आणि ठीक आहे.”
मग तो डोक्याला हात लावत म्हणाला, “काय मजा आहे. नवरा, बायको, एक छोटा विधी झाला आणि कांही मिनिटांत आम्ही पती-पत्नी झालो. माझं ठीक आहे हो !
पण तिचा विचार करा. काल ती मुलगी होती, लहान होती आणि आज लागलीच पत्नी झाली. कमाल आहे !”
एक प्रवासी मधेच म्हणाला, “आज काल कोणी सुखी असणं फार कठीण झालं आहे.
पांढरा हत्ती पहायला मिळणं जसं कठीण आहे, तसंच ते कठीण आहे.”
“बरोबर आहे पण ह्यात दोष कुणाचा आहे ?” श्यामने बसल्या जागीच पाय लांब करत विचारलं.
तो पुढे म्हणाला, “तुम्ही जर सुखी नसाल तर तो तुमचा दोष आहे.
तुम्हाला नाही वाटत असं ?
माणूस स्वतःच सुख स्वतःच निर्माण करतो.
तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर तुम्ही सुखी होऊ शकता.
नाही तर तुम्हीच सुखाकडे पाठ फिरवतां.”
“पण पुढे काय होणार, ते तुम्हाला कसं कळतं ?” कोणीतरी विचारलं.
श्याम म्हणाला, “ अगदी सोप्पं आहे.
निसर्गाने माणसाच्या आयुष्यात वेगवेगळे भाग ठेवलेत.
त्या त्या वेळी माणसाने आपल्या त्या स्थितीवर प्रेम करावे.
मात्र तसं न करतां तुम्ही जर दुसऱ्याच अपेक्षा ठेवल्यात तर तुम्हाला दुःखच मिळणार.
तरूण झालात की विवाह करावा, ही निसर्गाचीच आज्ञा आहे.
त्या वयांत विवाहाविना आनंद नाही.
योग्य वेळ येताच विवाह करावा.
चालढकल करू नये पण तुम्ही लग्न करत नाही.
दुसऱ्याच कशाची तरी वाट पहाता.
तसं केल्याने दुःखी होता.
विवाह करावा, मद्य प्यावसं वाटलं तर मद्य प्यावं.
आनंद साजरा करावा.
‘महाजनो येन गता: स पन्थ:’ हे मला अगदी योग्य वाटतं.
सर्व जण जातात, तोच म्हणजे मध्यम मार्ग म्हणजेच राजमार्ग.
म्हणूनच मी सुखी आहे.”
“तुम्ही म्हणतां की माणूस स्वतःचा आनंद निर्माण करतो पण मला सांगा की दांत दुखत असला किंवा एखादीला वाईट सासू छळत असली तर त्या व्यक्तींना आनंद कसा होणार ? सांगा !
सर्व कांही दैवावर अवलंबून असतं.
योगायोग असतो.
समजा, आता आपल्या गाडीला अपघात झाला तर तुम्ही ताबडतोब सूर बदलाल.” एक प्रवासी म्हणाला.
“एकदम चुकीचे उदाहरण.
गाडीला अपघात वर्षा-दोन वर्षात एखादा होतो. मला अपघात होईल अशी भिती मुळीच वाटत नाही.
मला अपघात या विषयावर मुळीच बोलायचं नाही.
आपली गाडीची गती मंद झाली.
बहुदा एखादं स्टेशन जवळ आलं असावं !“
रामने विचारलं, “तू आता पुढे कुठे जाणार आहेस ? कोल्हापूरला की बेळगावला ?”
श्याम म्हणाला, “कोल्हापूरलाही नाही आणि बेळगांवलाही नाही.
मी सांगलीहून आलो आणि धुळ्याला चाललोय.
कोल्हापूर, बेळगांव उलट्या दिशेला आहेत. मी उत्तरेला चाललोय.”
राम म्हणाला, “अरे पण ही गाडी मिरजेहून कोल्हापूर किंवा बेळगांवकडे जाणारी आहे.”
“अरे मी चाललोय नाशिकमार्गे धुळ्याला.
परत उलट कशाला जाऊ ?” श्यामने ठामपणे सांगितले.
“मी तर बेळगांवला चाललोय. आता सातारा येत असेल.” राम म्हणाला.
“म्हणजे ही दिल्लीकडे जाणारी गाडी नाही ?”
“श्याम, तू पुण्याला बहुदा चुकीच्या गाडीत चढलास.
तू परत सांगलीकडे जाऊ शकशील पण धुळ्याला नाही.” राम म्हणाला.
बाकीच्या प्रवाशांनीही त्याला दुजोरा दिला.
“अरे बापरे ! मी ही किती मूर्ख आहे.
मग तो चक्क रडू लागला.
अरे माझी नवखी पत्नी त्या पॅसेंजर गाडींतून गेली आहे.
बिचारी एकटीच काळजी करत बसली असेल.
आता काय करू ?”
तो तोंडावर हात घेऊन रडत म्हणाला, “मी एक दुःखी, दुर्दैवी माणूस आहे. आता काय करू ?”
“अरेरे ! कठीण आहे खरं !
पण तुम्ही साताऱ्याहून तिला तार पाठवा आणि थोड्या वेळाने मागून येणाऱ्या कलकत्ता एक्सप्रेसने धुळ्याला जा.
तुम्ही कदाचित थोडे आधीच पोहोचाल आणि तिला धुळे स्टेशनवरच गांठू शकाल.”
“कलकत्ता एक्सप्रेस ! आणि मी त्या कलकत्ता एक्स्प्रेसचे तिकीट कसे काढू ? माझ्याकडे पैसेच नाहीत.
माझे पैसे पत्नीकडेच आहेत.”
सर्व प्रवासी हंसतात.
आपापसात कांही बोलतात आणि हंसत हंसतच थोड्या वेळापूर्वी स्वतःला सुखी म्हणवणाऱ्या त्या दुःखी माणसाच्या तिकीटासाठी पैसे जमवू लागतात.
– अरविंद खानोलकर.
मूळ कथा – हॅपी मॅन
मूळ लेखक – ॲंटन चेकॉव्ह
तळटीप – ही गोष्ट वाचून सुप्रसिध्द मराठी लेखक चिं. वि. जोशी ह्यांच्या वायफळाचा मळा मधल्या एका गोष्टीची आठवण झाली.
चिं. वि.जोशींची गोष्ट सरस आहे.
तिचा उल्लेख मी माझ्या आठवणींची मिसळमधे केला आहे.
तोच भाग पुन्हा सादर करतो.
“चिं. वि. जोशींच्या “वायफळाचा मळा” या पुस्तकांत एक लेख आहे.
“स्मरणशक्तीचे प्रोफेसर”.
लेखकाला गाडीत एक प्रोफेसर भेटतात. प्रोफेसर साहेब लेखकाला स्मरणशक्ती कशी वाढवावी, लहान सहान गोष्टी कशा लक्षात ठेवाव्यात ह्याबद्दल उदाहरणासहीत लेक्चर देतात.
त्यांचे एक उदाहरण पहा.
ते म्हणतात, “मला अहमदनगर जायचे आहे.
अहमदनगर हे नांव लक्षांत ठेवण्यासाठी मी एक कारिका रचली आहे.
ती अशी “दिवस गर्व विष नसे ज्या पुरी” (अह + मद + न गर).
पद्यमय कारिका पटकन् लक्षात रहाते आणि गांवाचे नांव लक्षात ठेवणे सोपे जाते.”
लेखक त्यांना विचारतो, “आपण अहमदनगरला कोणत्या कामासाठी निघाला आहेत ?”
तर प्रोफेसर म्हणाले, “अहो, अहमदनगरला माझ्या बहिणीला स्थळासाठी दाखवण्याचा कार्यक्रम आहे.”
लेखकांने विचारले,”पण बहिण कुठे दिसली नाही तुमच्या बरोबर.”
प्रोफेसर त्या प्रश्नाने गडबडले आणि म्हणाले, “अरेच्चा, म्हणजे ती मनमाड स्टेशनवर गाडी बदलताना तिथेच राहिली वाटते !”
— अरविंद खानोलकर.
मूळ लेखक- ॲंटोन चेकॉव्ह.
Leave a Reply