त्यांचा जन्म ७ मार्च १९१३ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील झापडे या गावी झाला.
ज्या काळात डॉक्टर आणि साहित्य यांचा फारसा संबंध येत नव्हता आणि साहित्यातही डॉक्टरेट मिळविणे ही तशी दुरापास्तच गोष्ट होती, त्या काळात डॉक्टर आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रांत यशस्वी ठरणारी ही लेखिका. व्यक्तीचे आणि समाजाचे जीवन कथांमध्ये जवळून हाताळता येते असा वैद्यकीय व्यवसाय त्यांनी स्वीकारलेला होता. मात्र, त्याचबरोबर मानवी वर्तनाचे अचूक ज्ञान, मानवी वर्तनाचे सूक्ष्म निरीक्षण आणि सहजसंवेदनशील मन यांमुळेच त्या वैद्यकीय व्यवसायाबरोबरच साहित्यातही यशस्वी ठरल्या.
त्यांचे वडील बाळकृष्णपंत रेगे हे रेव्हेन्यू खात्यात इन्स्पेक्टर होते. त्यांच्या घराण्याचे मूळ आडनाव रेगे, मात्र क्षेत्रमाडे हा त्यांना मिळालेला किताब होता. सुमतीबाईंनी आपल्या वडिलांप्रमाणेच ही पदवी स्वीकारली होती. सुमती क्षेत्रमाडे यांचे शालेय शिक्षण नाशिकला झाले. शालेय जीवनात त्या नेहमी प्रथम क्रमांकावरच असत. नाशिक सेंटरमधून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण होणार्या. त्या पहिल्याच विद्यार्थिनी होत्या.
शाळेत असताना त्यांनी अनेक वेळा मासिकांमधून, हस्तलिखितांमधून लिखाण केले होते. मॅट्रिकला त्या मराठी विषयात सर्वप्रथम आल्याने स्वाभाविकपणे त्यांनी कलाशाखेकडे प्रवेश घ्यावा, असेच सर्वाचे म्हणणे होते. मात्र, डॉक्टर होण्याचे त्यांचे स्वप्न असल्याने त्यांनी शास्त्रशाखेत प्रवेश घेतला. त्यांचे वैद्यकीय शिक्षण पुण्यात झाले. घरच्या गरिबीमुळे त्यांचे सर्व शिक्षण शिष्यवृत्तीवरच झाले. आई वारल्याने लहान भावंडांची जबाबदारी त्यांच्यावर लहान वयातच पडली. म्हणून एम.बी.बी.एस.पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी काही काळ बडोदा संस्थानात नोकरी केली. १९४८ साली त्या पुढील शिक्षणासाठी आयर्लंडला गेल्या.
१९५० साली परत येऊन त्यांनी कोल्हापूरला स्वतःचा दवाखाना थाटला. याच काळात त्यांची पहिली कथा ‘वादळ’ ही ‘स्त्री’ मासिकात प्रकाशित झाली होती. १९४७ साली झालेल्या किर्लोस्कर कथास्पर्धेत त्यांना दुसरा पुरस्कारही मिळालेला होता. बडोद्याला सयाजीराव महाराजांकडे त्या नोकरीला होत्या. ही त्यांची नोकरी फिरतीची होती. या काळात त्या बडोद्यातील दभोई, पादरा, कडी, अमरोली, नवसारी या ठिकाणी फिरल्या. त्यांच्या बडोदा वास्तव्यात त्यांचा मालतीबाई दांडेकरांशी परिचय होऊन लेखनप्रेम अधिक वाढीस लागले. गुजरातमध्ये असताना त्यांनी आपली पहिली ‘आधार’ ही कादंबरी लिहायला घेतली. त्यामुळेच या कादंबरीच्या स्थलकालनिर्मितीवर गुजरातच्या वातावरणाचा, चालीरीतींचा, परंपरांचा फार मोठा प्रभाव आढळतो. या त्यांच्या पहिल्याच कादंबरीला वि.स. खांडेकरांची प्रस्तावना लाभली आहे.
खांडेकरांना त्या गुरुस्थानी मानत असत. ‘आधार’ ही एका असहाय, पतिप्रेमवंचित स्त्रीच्या जीवनावर आधारलेली कादंबरी आहे. स्वतःच्या हिमतीवर उभे राहून संकटांशी लढणारी नायिका रेखाटताना त्यांनी परंपरेत पिचणार्याक स्त्रीचे चित्रण केले आहे. गौरांग महाप्रभूंच्या जीवनावर आधारलेली त्यांची ‘अनुहार’ ही कादंबरी प्रत्यक्षात मात्र गौरांगपत्नी विष्णुप्रियेला केंद्रस्थानी ठेवून साकारली. ‘वृंदा’ या त्यांच्या कादंबरीवर आधारित ‘सुखाची सावली’ हा चित्रपट त्या काळी गाजला होता. बंगाली साहित्यिक शरच्चंद्र चटर्जी यांच्या जीवनावर त्यांनी ‘जीवनस्वप्न’ ही कादंबरी लिहिली.
पौराणिक व्यक्तिरेखांना कवेत घेऊन ‘मेघमल्हार’, ‘मैथिली’, ‘योगेश्वर श्रीकृष्ण’, ‘सत्यप्रिय गांधारी’, ‘नल-दमयंती’ अशा अनेक कादंबर्या त्यांच्या लेखणीतून साकारल्या. त्यांची ‘महाश्वेता’ ही कोड झालेल्या तरुणीच्या जीवनावरील कादंबरीही खूप लोकप्रिय झाली. यावर आधारित मालिकाही बनली होती. या कादंबरीने भारावून जाऊन त्या काळी अनेकांनी कोड झालेल्या तरुणींशी विवाह केल्याची उदाहरणे आहेत.
काही कारणास्तव त्यांनी विवाह केला नव्हता. सुमतीबाईंनी विपुल साहित्यनिर्मिती केली. सुमारे ३१ कादंबऱ्या, २६ कथासंग्रह, २ नाटके आणि १ काव्यसंग्रह अशी त्यांची साहित्यसंपदा आहे.मराठी खेरीज कानडी, गुजराती, हिंदी, इंग्रजी, बंगाली या भाषांवरही सुमतीबाईंचे विलक्षण प्रभुत्व होते. गुजरातेत केलेल्या दीर्घ वास्तव्यामुळे त्यांचा गुजराती संस्कृतीशी जवळून परिचय होता. त्यांच्या अनेक कादंबऱ्याची गुजराती भाषांतरे झालेली आहेत. अशा या यशस्वी लेखिकेचे विश्व शेवटपर्यंत लिखाण आणि प्रसूतिगृह एवढेच मर्यादित राहिले. वाचकांनी त्यांच्या लिखाणाला दिलेल्या भरघोस प्रतिसादात त्या कायम समाधानी होत्या. सुमती क्षेत्रमाडे यांचे ८ ऑगस्ट १९९८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
Leave a Reply