सुमित्रा भावे या माहेरच्या सुमित्रा उमराणी. सुमित्रा भावे या मुळच्या पुण्याच्या. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९४३ रोजी पुणे येथे झाला. आगरकर हायस्कुलमधुन त्यांनी माध्यमिक शिक्षण तर फर्ग्युसन महाविद्यालयातुन त्यांनी कला शाखेची पदवी घेतल्यानंतर मुंबईच्या टाटा समाजविज्ञान संस्थेतुन समाजकार्याचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. कविता लेखन, रांगोळी, चित्रकला असे छंद जोपासत त्यांनी विद्यार्थी दशेत गुरु रोहिणी भाटे यांच्याकडे नृत्याचे शिक्षण घेतले. राष्ट्रसेवा दलाच्या कला विभागात नृत्यामध्ये यांचा सहभाग होता. तरुण वयात त्यांनी दिल्ली आकाशवाणीवरुन मराठी वृत्त निवेदन ही केले. १९६५ साला पर्यत त्या टाटा इन्स्टिट्यूट मध्ये काम करत होत्या. टाटा इन्स्टिट्यूट सोडल्यावर त्या १९८५ पर्यत सोशल वर्क फिल्डमध्ये काम करत होत्या. त्यात दहा वर्षे पुण्याच्या कर्वे समाज सेवा संस्थेमध्ये समाजकार्याचे अध्यापन, अनेक सामाजिक संशोधने आणि शोधनिबंध, उरुळीकांचन येथे सर्वोदय अध्ययन केंद्र हा शिक्षण प्रयोग, मुंबईच्या कास्प- प्लान या झोपडपट्टी वस्त्यामधील मुले व कुटूंबे यांच्या विकास योजना प्रकल्पाच्या प्रमुख पदाचा कार्यभार या अनुभवानानंतर त्यांनी पुण्याच्या स्त्री-वाणी या संस्थेच्या संचालक पदावरही काम केले.
या दरम्यान दलित, अशिक्षित स्त्रीं यांच्या स्वप्रतिमेच्या अभ्यासाचे निकष त्यांच्या पर्यंत पोहचविण्याच्या ईर्षेतुन त्या १९८५ सालापासून चित्रपट माध्यमाकडे वळल्या. सुमित्रा भावे या काही मूळच्या चित्रपट किवा कला क्षेत्रातील नाहीत. त्यांचा पिंड समाजसेवकाचा. समाजसेवा करताना आलेले अनुभव, प्रसंग, त्यांच्या सर्जनशील मनाने सूक्ष्मपणे टिपले. त्याच्या अभिव्यक्तीसाठी चित्रपटासारखे प्रभावशाली माध्यम त्यांनी वापरले. त्यावेळी वाणिज्य शाखेत शिक्षणारा आणि नाट्य उपक्रमामध्ये रमलेला विद्यार्थी सुनिल सुकथनकर त्यांना सहकारी म्हणुन लाभला. त्यांचा बाई हा पहिला लघुपट राष्ट्रपती पदक विजेता ठरला. सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर या दोन व्यक्तीमत्वांचे कार्यक्षेत्र भिन्न होते, परंतु ध्येय एकच होते, ते म्हणजे सामाजिक जागृती. योगायोगाने ते एकत्र आले. समांतर चित्रपट आजपर्यंत सरंजामशाही, शोषण, अत्याचार, विवाहबाह्य संबंध या पलिकडे गेला नव्हता. या दिग्दर्शक द्वयीने ‘ दोघी, वास्तूपुरूष’ यासारखे गंभीर विषय हाताळून या चित्रपटाला त्यापलीकडे पोहोचविले.
सुमित्रा भावे आणि सुनिल सुकथनकर या जोडीने चौदा चित्रपट, ५० हुन अधिक लघुपट, ३ दुरदर्शन मालिकांची निर्मिती व दिग्दर्शन केले. जिंदगी जिंदाबाद, १० वी फ, वास्तुपुरुष, देवराई, बाधा, नितळ, एक कप च्या, हा भारत माझा, संहिता, अस्तु,दोघी, कासव असे त्यांचे अनेक चित्रपट प्रसिद्ध आहेत. या चित्रपट व लघुपटांना तीन आंतरराष्ट्रीय, १० राष्ट्रीय, ४० हुन अधिक राज्य पुस्कार, तसेच झी, स्क्रीन, म.टा. सन्मान आदी पुरस्कार मिळाले आहेत. देश विदेशातील अनेक महोत्सवात या चित्रपटांचे प्रदर्शनही झाले आहे. या दिग्दर्शक द्वयीला दोघी, वास्तुपुरुष, अस्तु, देवराई, बाई, पाणी, कासव या चित्रपटांसाठी तब्बल ७ वेळा राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे. या चित्रपटांचे स्वतंत्र कथा- पटकथा- संवाद लेखन, सुमित्रा भावे यांनीच केले असुन संहिता लेखनासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सुनिल सुकथनकर यांनी यातील अनेक चित्रपटांसाठी तसेच इतरही काही चित्रपटांसाठी गीतलेखन केले आहे. कर्नाटकातील शाश्वकती या राष्ट्रीय संस्थेतर्फे दरवर्षी एका भाषेतील अभिजात साहित्य निर्मितीसाठी दिला जाणारा कामधेनु पुरस्कार सुमित्रा भावेंना मराठी भाषेसाठी त्यांच्या संहिता लेखनातील साहित्यिक मुल्यांसाठी २०१३ मध्ये देण्यात आला.
सुमित्रा भावे आणि सुनिल सुकथनकर यांनी यांच्या चित्रपटातुन मानवी मन, नाते संबंध आणि समाज मन यांच्या गुंतागुंतीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी एम.के.सी.एल. या संस्थेसाठी ‘ माझी शाळा’ ही शिक्षणातील ज्ञानरचनावादाची कथात्मक मांडणी करणारी दुरदर्शन मालिका निर्माण केली होती. मुंबई दुरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ही मालिका ४० भागांमध्ये दाखविण्यात आली. त्यांना केरळ मधील अरविंदन स्मृती पुरस्कार, सह्याद्री चित्ररत्न पुरस्कार, साहिर लुधियानवी – बलराज सहानी प्रतिष्ठान तर्फे दिला गेलेला के.ए.अब्बास स्मृती पुरस्कार मिळाले आहेत.
सुमित्रा भावे नेहमी म्हणतात माझा सिनेमा गल्ला भरण्यासाठी कधीच नव्हता आणि भविष्यातही नसेल. त्याचे दुःखही मला वाटत नाही. या सिनेमांसाठी प्रेक्षकांची हाऊसफुल्ल गर्दी व्हावी, असेही कधी वाटले नाही. मी एक सिनेमाची अभ्यासक आहे आणि मानवी भाव-भावना आणि आजच्या पिढीचे प्रश्न समजून घेत ते मांडण्याचे प्रभावी माध्यम म्हणून सिनेमे बनवते. त्यामागे केवळ सकस समाजनिर्मितीचाच प्रामाणिक उद्देश असतो.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply