सुंदर असे तो दिखावा
सुबक होई तो देखावा
रंग खरा का दाखवावा
मनुष्य म्हणतो!!
अर्थ–
कालच्या वर्तमानपत्रात ” मुखवट्या पलीकडचे चेहरे ” असे शीर्षक असलेला लेख वाचला.
गाडीवरून येता जाता रस्त्यांवर लावलेल्या बॅनर्स वर दृष्टी पडते, त्यामुळे एक बॅनर वाचला, ” अमुक अमुक भाईंचा वाढ दिवसा निमित्त अमुक अमुक ग्रुप तर्फे अभिष्टचिंतन ” मग बॅनर मधे खाली आणि वर 2 उजळलेले चेहरे, त्यांच्या एकंदर दिसण्यावरून कुणी सज्जन व्यक्ती असावेत असा अंदाज. बॅनर वर शुद्ध मराठीत एक वाढ दिवसा बद्दलची चारोळी, अर्थात इंटरनेट वरून चोरलेली. पण प्रत्यक्षात ते शब्द वाचताना मात्र त्या उजळ चेहऱ्याच्या तोंडाची होणारी चाळण मात्र बघण्यात जास्त मजा येत असेल अगदी खात्री पूर्वक.
जे सुंदर असते त्याला दिखावा म्हणतात, जे सुबक असते त्याला देखावा म्हणतात पण जे कदाचित या दोन्ही पैकी काही नसू शकते जे पाहण्याची ताकद माणसांत आता कमी होत चालली आहे त्याला खरेपणा म्हणतात. पुढे पुढे करणारा खूप पुढे जातो कदाचित पण त्यासाठी त्याला दिखावा किती करावा लागतो याला मोजमाप नाही. बॅनर वर चेहरा अँप मधे गोरा करून लावू शकतो पण वृत्तीचं आणि विचारांचं काय?
सुबत्ता ही वस्तूंमुळे नाही तर मनाच्या मोठेपणा मुळे येत असते असे समर्थ म्हणतातच. जगताना दिखावा करावा की देखावा यापेक्षा खरेपणा दाखवावा म्हणजे बाकी कसली गरज पडणार नाही.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply