दहा वर्षांची रतन साळगावकर, नाकी डोळी देखणी होती. तिच्या आईला वाटायचं की, हिनं नृत्य आणि गाणं शिकावं. त्यासाठी मोठे उस्ताद व गवई यांना तिनं रतनची शिकवणी घेण्यासाठी घरी नेमलं. तर ते उस्ताद आले की, रतन एकतर घरातून पळून जायची किंवा लपून बसायची. त्यामुळे तिच्या आई व आजीची घोर निराशा होत असे.. जणूकाही मोठेपणी तिच्या आयुष्यात होणाऱ्या फरफटीचे संकेत, तिला आधीच कळलेले होते.
२४ जानेवारी १९२३ साली रतन साळगावकरचा मुंबईत जन्म झाला. चार भावंडात, तिचा तिसरा नंबर होता. वडिलांचं छत्र लहानपणीच हरपल़ेलं होतं. आई व आजीनं तिचा सांभाळ केला. काही कारणाने त्यांना सावंतवाडीला जावे लागले. तिथे चौथी पर्यंत शिक्षण झाल्यावर, पुन्हा सर्वजण मुंबईला आले. आजाराच्या साथीमध्ये तिची मोठी बहीण व भाऊ गेले. तिनं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दोन इयत्ता केल्या, पुढे आर्थिक परिस्थितीमुळे तिला शिक्षण सोडावं लागलं..
ती आपल्या आजीला ‘जीजी’ म्हणत असे. जेव्हा उस्ताद व गवईकडून ही शिकत नाही म्हटल्यावर, स्वतः आजीनेच तिला नृत्य व गायनात तयार केलं. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी तिला ललितकला प्राॅडक्शनचा, मामा वरेरकर लिखित, ‘विजयाचे लग्न’ हा पहिला चित्रपट मिळाला. त्यावेळी तिला महिना २५० रुपये पगार होता. या चित्रपटाच्या वेळी तिचे रतन साळगावकर हे मूळचे नाव बदलून मामा वरेरकरानी ‘हंसा वाडकर’ असे केले..
नंतर तिने ‘मीना’ व ‘प्रेमपत्र’ हे हिंदी चित्रपट केले. त्यात राजकुमार व चेतन आनंद होते. वयाच्या चौदाव्या वर्षी १९३७ साली तिचे लग्न झाले. गोल्डन इगल मुव्हिटोनचे तिने दोन स्टंटपट केले. त्यामध्ये भगवान पालव होते. बाॅम्बे टाॅकीजने तिच्यासोबत सहा वर्षांचा करार केला होता. काही चित्रपट केल्यावर हिमांशु राय गेले. हंसाने देविकाराणीला तो करार रद्द करण्याची विनंती केली असता, देविकाराणीने तीन वर्षे बाकी असताना तो कराराचा कागद फाडून टाकला व तिला मुक्त केले.
हंसा पुण्यात येऊन ‘प्रभात’मध्ये दाखल झाली. तिथे तिला पहिला चित्रपट मिळाला, ‘संत सखू’!! या चित्रपटाच्या यशानंतर तिला एकापाठोपाठ एक उत्तम चित्रपट मिळाले. ‘रामशास्त्री’ मध्ये तिने नर्तकीची भूमिका केली.
मुंबईत गेल्यावर नॅशनल स्टुडिओच्या ‘अपना पराया’ व ‘मेरा गाव’ या हिंदी चित्रपटात काम केले. याच दरम्यान १९४२ साली तिला मुलगी झाली.
१९४७ साली ‘लोकशाहीर राम जोशी’ हा राजकमल कलामंदिरचा चित्रपट तिने स्विकारला. शाहीराची भूमिका जयराम शिलेदार करीत होते. या चित्रपटापासूनच ‘सवाल जवाब’ हा प्रघात, सुरु झाला.
१९५० साली राजा परांजपे दिग्दर्शित ‘पुढचं पाऊल’ या चित्रपटात हंसाला संधी मिळाली. या चित्रपटात पु. ल. देशपांडे यांनी देखील काम केले होते. १९५५ साली राजा ठाकूर दिग्दर्शित ‘मी तुळस तुझ्या अंगणी’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटात हंसाला भूमिका मिळाली.
एखाद्या अभिनेत्रीला तिच्या कारकिर्दीत एकाच चित्रपटाने ओळखलं जातं, असा हंसा वाडकरचा चित्रपट होता.. ‘सांगत्ये ऐका’!! पुण्यामध्ये तब्बल १३१ आठवडे चाललेल्या या विक्रमी चित्रपटाची ‘ऐतिहासिक नोंद’ झालेली आहे. यातील कलाकार व तंत्रज्ञ मुरब्बी होते. अनंत माने यांचं दिग्दर्शन. वसंत पवार यांचं संगीत. गदिमांची गीतं, व्यंकटेश माडगूळकर यांची पटकथा व संवाद. जयश्री गडकर, चंद्रकांत, सूर्यकांत, सुलोचना, दादा साळवी असे दिग्गज कलाकार होते.
पती बरोबरच्या मतभेदांमुळे त्यांनी घर सोडले व त्यांची वाताहत झाली. १९६८ साली माधवराव शिंदे यांच्या ‘धर्मकन्या’ या चित्रपटानंतर त्यांनी काम करणं बंद केलं.. आयुष्यभराच्या ताणतणावामुळे त्यांची तब्येत बिघडू लागली. त्यासाठी काही काळ त्यांनी पांचगणी येथे वास्तव्य केलं. शेवटी जीवघेण्या कर्करोगाने त्यांना ग्रासलं.. शेवटी २३ ऑगस्ट १९७१ साली ‘फरफट’ झालेल्या हंसाच्या जीवनाला, ‘चिरशांती’ मिळाली.
पत्रकार अरुण साधू यांनी ‘माणूस’ मासिकासाठी हंसा वाडकर यांनी सांगितलेली जीवनकथा ‘सांगत्ये ऐका’ या नावाने क्रमशः प्रकाशित केली. त्याचंच नंतर ६७ पानांचं पुस्तक प्रकाशित झालं. या आत्मचरित्रपर पुस्तकाला राज्य सरकारचा ‘सर्वोकृष्ट आत्मचरित्र’ म्हणून पुरस्कार मिळाला!! खरं पाहता त्यांच्याकडे जीवनात भोगलेलं, सांगण्यासारखं सहा हजार पानांहून अधिक होतं, की जे वाचून या क्षेत्राकडे येणाऱ्या मुलींना त्याची दाहकता कळेल.. मात्र काही गोष्टी सांगितल्या तरी त्या छापता येत नाहीत.. म्हणून अवघ्या ६७ पानात ते भागवलं गेलं..
याच पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद, जसबीर जैन व शोभा शिंदे यांनी ‘यु आस्क, आय टेल’ या नावाने केला. हे पुस्तक जेव्हा श्याम बेनेगल यांच्या वाचनात आलं, त्यांनी १९७७ साली स्मिता पाटीलला घेऊन ‘भूमिका’ हा चित्रपट केला.. त्यातील वर्तमानकाळ रंगीत व भूतकाळ कृष्णधवल असा कलात्मकरित्या पडद्यावर सादर केला. साहजिकच चित्रपटाला व स्मिता पाटीलला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला..
हंसा वाडकरची जन्मशताब्दी सुरु होते आहे, तरीदेखील चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्रींचं खाजगी आयुष्य हे ‘सांगत्ये ऐका’ पेक्षाही महाभयंकर आहे.. हे त्यांनी जाहीर कबूल केले नाही तरी, नाकारुन चालणार नाही.
खरंच ‘स्त्रियश्चरित्रम्’!!!
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२४-१-२२.
Leave a Reply