नवीन लेखन...

सुंदरी की वाघ? (संक्षिप्त आणि रूपांतरीत कथा ११)

खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.
तेव्हां एका छोट्या राज्याचा राजा थोडा जंगली आणि क्रूर होता.
जवळच्या सुधारलेल्या राज्यांच्या गोष्टी ऐकून तो त्या सुधारणा अंमलात आणू पहात असे परंतु त्याच्या मुळच्या क्रूर स्वभावामुळे त्यांना विचित्र रूप येई.
तो क्षणांत त्याच्या मनांतील कल्पना खऱ्या करत असे.
एकदा त्याच्या मनांत जे आले की ते अंतिम असे.
जेव्हां त्याच्या आजूबाजूची मंडळी ठरलेल्या व्यवस्थेप्रमाणे काम करीत तेव्हा तो त्यांच्याशी प्रसन्नतेने वागे.
पण जेव्हा कांही त्यांत व्यत्यय येई तेव्हां तो अधिकच प्रसन्न होई कारण व्यत्यय आणणाऱ्याला सरळ करणे हा त्याचा अत्यंत आवडता खेळ होता.

सुधारलेल्या देशांकडून उचललेली त्याची एक कल्पना म्हणजे म्हणजे खेळाचे मोठे गोल मैदान (स्टेडीयम, कलोजियम) ज्यांत सभोवार जनता बसू शकत होती आणि तिथे घडणाऱ्या गोष्टी पाहून जास्त सुसंस्कृत आणि सभ्य होणार होती.
पण इथेही त्याचे क्रौर्य दाखवण्याचा उत्साहच इतर हेतुंवर मात करत होता.

त्याने ते रिंगण मल्लयुध्दे, घोडेस्वारांची युध्दे दाखवून किंवा शौर्याचे वर्णन करणारी गाणी गाऊन लोकांची मनं रिझवण्यासाठी बांधले नव्हते.
ते बांधण्यामागे प्रजेला व्यापक दृष्टीकोन मिळावा आणि लोकांची मानसिक ताकद वाढावी हा होता.
हे मोठे प्रेक्षागृह, त्यांत बसण्यासाठी भोवताली गोल रचलेली बाके, त्याच्या गूढ खोल्या आणि न दिसणारे रस्ते हे सर्व काव्यमय न्यायाचे प्रतिनिधी होते.
इथे गुन्ह्याला शिक्षा होई आणि सद्गुणांना उत्तेजन मिळे ते नि:पक्षपाती आणि अटळ अशा दैवावर सोडलेल्या आज्ञांच्या द्वारे.
जेव्हा राजाला एखाद्याचा अपराध शिक्षा देण्याइतपत गंभीर वाटे, तेव्हां राजाच्या रिंगणातर्फे अपराध्याला अमुक एक दिवशी योग्य शिक्षा दिली जाईल असे तो जनतेला जाहीर करत असे.

रिंगण हे नांव राजाच्या त्या रचनेला शोभून दिसे कारण जरी त्याची कल्पना दुसरीकडून उचलली असली तरी तिचा उद्देश राजाचा प्रत्येक विचार आणि कृती त्याच्या जंगली क्रौर्याची आवड पुरवणे हाच असल्यामुळे दुसरी कोणतीही व्यवस्था त्याच्या क्रूर मेंदूला सुचली नसती.

जेव्हा प्रेक्षागृहातील सर्व बाके प्रेक्षकांनी भरून जात आणि राजा त्याच्या दरबाऱ्यांसह स्वतःसाठी रिंगणाच्या एका बाजूला तयार केलेल्या उच्चासनावर स्थानापन्न होत असे, तेव्हां त्याने खूण करताच त्याच्या आसनाच्या बाजूच्या खालच्या भागांतून एक दरवाजा उघडला जात असे.
त्यांतून आरोपी बाहेर रिंगणात येई.
बरोबर त्याच्या विरूध्द बाजूस बंद जागेमधे दोन अगदी सारखे दिसणारे दरवाजे बाजूबाजूला होते.
आरोपीने कर्तव्य आणि हक्क म्हणूनही आणि खटल्यातील भाग म्हणून सरळ त्या दरवाजाकडे चालत जायचे असे व त्या दोनापैकी एक दरवाजा त्याने उघडायचा असे.
त्याच्या मर्जीने दोनापैकी कोणताही एक दरवाजा तो उघडू शकत असे.
त्याला कोणतेही मार्गदर्शन नसे किंवा त्याच्यावर कोणताही दबावही नसे.
तो फक्त त्याच्या नि:पक्षपाती आणि अटळ दैवावर अवलंबून असे.
त्यापैकी एक दरवाजा आरोपीने उघडल्यास त्यातून एक भुकेने व्याकुळ झालेला अत्यंत हिंस्र आणि भयंकर असा वाघ बाहेर येत असे आणि आरोपीच्या अपराधाची शिक्षा म्हणून वाघ आरोपीचे लचके तोडून मारत असे.

ज्या क्षणी आरोपीचे अपराधीत्व असे सिध्द होत असे त्या क्षणी घंटा नाद सुरू केला जाई.
रिंगणाच्या बाहेरच शोक करण्यासाठी उभी केलेली भाडोत्री माणसे मोठ्ठ्या स्वरांत विव्हळणे चालू करत.
प्रेक्षागृहातील बाकांवरील मोठ्या संख्येने जमलेली जनता माना खाली घालून आणि जड अंतःकरणाने हळूहळू आपल्या घराकडे परत जात असत.
त्यांच्या मनांत दुःख असे की ह्या एवढ्या तरूण अथवा प्रौढ माणसाला किंवा ह्या एवढ्या आदरणीय माणसाला असे भयंकर मरण नशीबी असावं !
पण जर आरोपीने दुसरा दरवाजा उघडला तर त्याच्यामागे राजाच्या प्रजेतील तरूणींपैकी एकादी सुंदर मुलगी उभी असे आणि आरोपीचे निरपराधित्व सिध्द झालं असं मानून व त्याबद्दल बक्षिस म्हणून त्याचे तात्काळ तिच्याशी लग्न लावून देण्यांत येत असे.
मग त्याचे आधी एक लग्न झाले आहे व मुले आहेत किंवा त्याचे दुसऱ्याच कुणावर प्रेम आहे, अशा सबबी राजा ऐकून घेत नसे.
त्याला आपल्या शिक्षा आणि बक्षिस देण्याच्या योजनेमधे कसलाही अडथळा चालत नसे.

ज्याप्रमाणे पहिला दरवाजा उघडला तर ताबडतोब कारवाई होई तशीच दुसरा दरवाजा उघडून सुंदरीं बाहेर आली तर राजा, एक गुरूजी, त्यांच्याबरोबर वाजंत्री, नाचणाऱ्या मुली, वगैरे सगळा लवाजमा, जयघोष करीत त्या निरपराध ठरलेल्या आरोपी आणि ती सुंदरी ह्यांच्या जोडीकडे जात असे आणि तात्काळ त्यांचा विवाह धुमधडाक्यात लावून देण्यांत येत असे.
मग वाजंत्री, नाच, गाणं, ह्याबरोबरच लोकही आनंदाने ‘हुर्रे’ करत असत आणि तो निरपराध पायघड्यांवरून आपल्या नवपरिणीत पत्नीला घरी घेऊन जाई.

राजाची ही अशी न्यायाची जंगली पध्दत होती. तिचा नि:पक्षपातीपणा स्पष्ट आहे.
आरोपीला माहित नसे की कोणत्या दाराआड सुंदरी आहे आणि कोणत्या दाराआड वाघ आहे.
त्याला हवा तो दरवाजा तो उघडू शकत असे पण पुढच्या क्षणाला काय होणार, तो वाघाकडून खाल्ला जाणार की त्याचा विवाह होणार, हे त्याला माहित नसे.

कांही वेळा वाघ उजव्या दरवाजाआडून बाहेर येई तर कधी डाव्या.
समितीचा निर्णय नुसता
नि:पक्षपातीच नसे तर तो खऱ्या अर्थाने निर्णायकही असे.

आरोपी अपराधी सिध्द झाला तर ताबडतोब शिक्षा अंमलात येई आणि निरपराध सिध्द झाला तर त्याला तत्क्षणी बक्षिसही मिळत असे मग त्याला ते हवे असो अथवा नसो.
राजाच्या रिंगणन्यायांतून आरोपीची सुटका नसे.
ही व्यवस्था तशी लोकप्रिय होती.

जेव्हा लोक जमत तेव्हां त्यांना आज आपल्याला विवाहसोहळा पहायला मिळणार आहे की वाघाकडून माणूस खाल्ला जातांना पहायला लागणार आहे, हे ठाऊक नसे.

ह्या न्यायव्यवस्थेतील ही अनिश्चितताच त्या प्रसंगाचं आकर्षण वाढवत असे.

अशा प्रकारे लोकांच मनोरंजन करून खुश केले जाई.

बुध्दीवादी लोक पक्षपातीपणाचा आरोपही करू शकत नसत कारण आरोपीचं दैव एका अर्थी आरोपीच्याच हातात असे.
त्या कांहीशा जंगली राजाला एक अतिशय सुंदर कन्या होती.
तीही कल्पक आणि आपलंच खरं करणारी, थोडीशी राजासारखीच होती.
ती त्याची अतिशय लाडकी होती.
तो तिच्यावर खूप माया करत असे.

त्याच्या दरबारी एक युवक होता.
अगदी तसाच जसा प्रेमकथामधे राजकन्या एखाद्या कमी दर्जाच्या कुळात जन्मलेल्या युवकाच्या प्रेमात पडतात त्यातल्या नायकासारखा.
राजाची मुलगी आपल्या प्रियकरावर खूष होती कारण तो दिसायला चांगला होताच आणि शौर्यांतही राज्यामधे कोणापेक्षाही कमी नव्हता.
तिचे त्याच्यावर खूप प्रेम होते आणि स्वभावांतील जंगलीपणामुळे ते प्रखर टोकाचे होते.
राजाला एक दिवस कळेपर्यंत, अनेक महिने हे प्रेमप्रकरण मजेत चालू होते.
ह्या प्रकरणात आपलं कर्तव्य काय ह्याबद्दल राजाच्या मनांत कोणतीच शंका नव्हती.
त्याने ताबडतोब त्या युवकाला तुरूंगात टाकले आणि त्याला न्यायाच्या रिंगणात आणण्याचा दिवस निश्चित केला.

अर्थातच हा सर्वांसाठी महत्त्वाचा प्रसंग होता, राजासाठी आणि प्रजेसाठीही.
सर्वच हा न्याय कसा होतोय हे पहाण्यासाठी उत्सुक होते.
असा प्रसंग पूर्वी घडला नव्हता.
ह्यापूर्वी कधी प्रजेतील एखाद्याने राजाच्या मुलीवर प्रेम करण्याचं धाडस केलं नव्हतं.
नंतर अशा गोष्टी सामान्य झाल्या पण त्या काळी त्या चकीत करणाऱ्या होत्या.
राज्यातले वाघांचे पिंजरे शोधून सगळ्यांत भयानक वाघ रिंगण-न्यायासाठी निवडण्यांत आला.
त्याचप्रमाणे जर युवकाच्या दैवाने विवाहाचा कौल दिला तर त्याचा विवाह करण्यासाठी त्याला शोभेल अशी एक अतिशय सुंदर युवतीही निवडण्यांत आली.
त्या युवकाने राजकन्येवर प्रेम केलं (म्हणजेच अपराध केला) हे सर्वांनाच ठाऊक होतं.
राजकन्येने किंवा त्याने ते अमान्यही केलं नव्हतं.
परंतु राजाला आपल्या न्यायव्यवस्थेबद्दल एवढा विश्वास होता आणि त्यांत त्याला इतकं समाधान आणि आनंद वाटत असे की अशा गोष्टींचा विचार करणे त्याला आवश्यक वाटले नाही.
ह्या खटल्याचा निकाल कांही लागो राजाला त्याची पर्वा नव्हती.
राजकन्येवर प्रेम करण्याचा अपराध त्या युवकाने केला की नाही हे त्या रिंगणात ठरणार होते आणि राजाला ते पहाण्यांत एक सात्त्विक समाधान मिळणार होते.

ठरवलेला दिवस आला.
दूरदूरवरून लोक आले व त्यांनी गर्दी केली.
रिंगणातली बाके गच्च भरली.
अनेक लोक बाहेर उभे राहिले.
राजा आणि दरबारी आपापल्या आसनावर, त्या दैव ठरवणाऱ्या अगदी सारख्या दोन दरवाजांसमोर, बसले.
सर्व तयारी झाली होती.
राजाने खूण केली.
राजा बसला होता.
त्या भागांतील खालचा दरवाजा उघडला व राजकन्येचा प्रियकर डौलाने चालत रिंगणांत आला.
उंच, देखणा. गोरा.
त्याच्या रूबाबदार व्यक्तीमत्वाचे हलक्याशा आवाजांत स्वागत झाले.
अर्ध्याहून अधिकांना आपल्यात असा एक देखणा युवक आहे हे माहितच नव्हतं.
राजकन्येने त्याच्यावर प्रेम केलं याचं त्यांना आश्चर्य वाटलं नाही.
तो तिथे असणं किती भयंकर होतं.

समोरच्या दरवाजांकडे जातांना तो युवक पध्दतीप्रमाणे राजाला मुजरा करायला वळला.
पण त्याचे राजाकडे अजिबात लक्ष नव्हतं.
त्याचे डोळे बापाबरोबर बसलेल्या राजकन्येवर खिळले होते.
जर त्या राजकन्येंत थोडासा जंगलीपणाचा अंश नसता तर ती तिथे आलीच नसती.
पण तिला रस असणारी घटना घडत असतांना तिचा तीव्र स्वभाव तिला स्वस्थ बसू देणार नव्हता.
जेव्हा राजाने त्या युवकाचा निवाडा रिंगणात करण्याचा हुकुम सोडला होता, तेव्हांपासून तिने दुसरा कसलाही विचार केला नव्हता.
रात्रंदिवस ह्या प्रसंगाचा आणि सर्व संबंधित बाबींचाही तिने विचार केला होता.
तिच्याकडची सत्ता, तिच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव, ह्यांचा उपयोग करून तिने दरवाजांचे गुपित माहित करून घेतले होते.
आजच्या प्रसंगात समोर असलेल्या दोन दरवाजापैकी कोणत्या दरवाजामागे वाघ होता आणि कोणत्या दरवाजामागे आज ती तरूणी होती हे तिने पक्के माहित करून घेतले होते.
दरवाजा उघडणाऱ्याला ह्या दरवाजांमधून कोणताही आवाज येण्याची शक्यता कातड्यांचे पडदे लावून नाहीशी केली होती.
परंतु तिच्याकडचे सोने आणि एका जिद्दी स्त्रीची इच्छाशक्ती यांच्या जोरावर तिने ते रहस्य हस्तगत केले होते.
तिला सुंदरी कोणत्या दरवाजाआडून लाजत, मुरकत, बाहेर येणार आहे, एवढेच माहित नव्हते तर ती सुंदरी कोण आहे, हेही तिला ठाऊक होते.
ती एक अतिशय नितळ सोनेरी कांतीची सर्व राज्यांत रूपवती असलेली दरबारांतली युवती, तो युवक निरपराध ठरल्यास, बक्षिस म्हणून निवडण्यात आली होती.
राजकन्या अर्थातच तिचा द्वेष करत होती.
तिने पूर्वी अनेक वेळा ती युवती तिच्या प्रियकराकडे प्रेमळ कटाक्ष टाकतांना पाहिले होते किंवा निदान तिला तसे वाटले होते.
तिला कधी कधी असंही वाटलं होतं की त्या तरूणीच्या नयनबाणांना राजकन्येच्या प्रियकराने नजरेने उत्तरही दिलं होतं.
अनेकदा त्या दोघांना बोलतानाही तिने पाहिले होते.
अगदी क्षण दोन क्षण असेल पण तेवढ्यात बरंच कांही बोललं जाऊ शकतं.
कदाचित ते महत्त्वाचं नसेलही पण ते राजकन्येला कसे कळणार ?

युवती सौंदर्यवान होती आणि तिने राजकन्येच्या प्रियकरावर नजर टाकण्याची हिम्मत दाखवली होती, एवढ्या कारणाने राजकन्येचं वंशसातत्याने मिळालेलं जंगली रक्त खवळलं होतं आणि ती त्या दरवाजाआडून लाजत आणि थरथरत असलेल्या युवतीचा पुरेपूर द्वेष करत होती.

जेव्हा ती तिथे बसलेली असतांना तिच्या प्रियकराने वळून तिच्याकडे पाहिले आणि त्याची नजर तिच्या नजरेला भिडली, त्या क्षणी परस्परांवरच्या प्रेमामुळे मने जुळलेल्या त्याने क्षणात ओळखले की पांढरी फटक आणि चिंतीत दिसणाऱ्या राजकन्येला कोणत्या दाराआड वाघ आहे आणि कोणत्या दाराआड युवती आहे हे ठाऊक आहे.

त्याने ही अपेक्षा केलीच होती.
त्याला तिचा स्वभाव माहित होता आणि ती हे जाणून घेतल्याशिवाय रहाणार नाही, हे तो समजून होता.
तरूणाची आशा तिला ही माहिती मिळण्यावरच अवलंबून होती आणि तिच्याशी नजर मिळताच त्याला कळले की त्याच्या अपेक्षेप्रमाणे ते रहस्य तिला ठाऊक आहे.
मग त्याच्या नजरेतच प्रश्न उमटला, “कोणत्या ?”
हे सर्व निमिषार्धात घडत होतं.
दोघांकडे अधिक वेळ नव्हता.
प्रश्नाचे उत्तरही त्याच निमिषार्धात द्यायचं होतं.
त्याने ओरडून विचारलेल जसं तिला स्वच्छ ऐकू आलं असतं तसाच त्याच्या डोळ्यातला “कोणत्या” हा प्रश्न तिला स्पष्ट ऐकू आला.
तिचा उजवा हात तिच्या आसनाच्या बाजूच्या मऊ गादीवर होता.
तिने तो हात उचलला आणि थोडा उजवीकडे हलवला.
तिच्या प्रियकराशिवाय कुणाच्याही हे लक्षांत आलं नाही.
बाकी सगळे त्याच्याकडे पहात होते.
तो युवक वळला आणि जलद चालत मोकळी जागा ओलांडून आला.
प्रत्येकजण श्वास रोखून त्याच्याकडे टक लावून पहात होता.
दरवाजांपाशी पोहोचताच जराही विचलित न होतां त्याने उजवा दरवाजा उघडला.
आता मुद्दा असा आहे की त्याने उघडलेल्या दरवाजातून वाघ बाहेर आला की सुंदरी बाहेर आली ?
जो जो आपण ह्या प्रश्नाचा अधिक विचार करू तो तो प्रश्नाचे उत्तर कठीण होत जाते.
त्यांत माणसाच्या खोल स्वभावाचा अभ्यास आहे, हृदयांमधील भावना मनावर कसं राज्य करतात आणि माणसाला कांहीही करायला उद्युक्त करतात तेही लक्षांत घ्यायचं आहे.
हे चाणाक्ष वाचका, विचार कर, प्रश्नाचे उत्तर तुझ्यापेक्षा त्या गरम रक्ताच्या जंगली युवतीच्या मनावर आहे, जे त्याच्यावर प्रेम करत होतं आणि आता मत्सराने आणि निराशेने ग्रासलेलं आहे.
तिच्या हातून तो गेला होता पण मग तो दुसऱ्या कोणाला कां मिळावा !

कितीदा तिच्या मनांत प्रियकराने वाघाचा दरवाजा उघडल्यामुळे भुकेलेल्या वाघाने तिच्या प्रियकरावर झडप घातल्याची दृश्ये तिच्या नजरेसमोर तरळून गेली होती आणि घाबरून तिने आपला चेहरा झांकून घेतला होता.
पण त्याहून अनेकदा तिने त्याला दुसरे दार उघडतांना कल्पिले होते.
तिच्या भयानक स्वप्नात तिचा प्रियकर दार उघडताच सुंदरीकडे आनंदाने आणि खुशीने पहातांना तिने किंतीदा दांत ओठ खाल्ले होते !
तो युवक त्या युवतीला भेटायला घाईने जात असलेला मनाशी पाहून कितीदा तिचं हृदय विदीर्ण झालं होतं !
त्याने तिला हाताला धरून बाहेर आणल्याचं, ती युवती आणि तो विजयी मुद्रेने पहात असल्याची आणि प्रेक्षक आनंदाने ओरडत असल्याच्या कल्पना करून तिला किती दुःख झाले होते !

त्याने युवतीचा दरवाजा उघडल्यामुळे सुरू झालेली लगबग, त्या वाजणाऱ्या घंटा, वाजंत्री, लग्न लावायला निघालेले गुरूजी आणि आनंदाचे उधाण आलेल्या प्रेक्षकांच्या घोषणा, इ. च्या गदारोळांत तिच्या दुःखाचा हुंदका कुणाच्याही कानावर पडणार नव्हता.

त्यापेक्षा त्याचा क्षणांत मृत्यू होणं ठीक नव्हतं कां ?
मरणानंतर दोघांच्या भेटीच्या संभावनेची कांही तरी जंगली कल्पना होतीच ना !
पण पुन्हा तो भयानक वाघ, त्याची डरकाळी, भयाचे चीत्कार, ते रक्त, तिला आठवे.
तिने तिचा निर्णय क्षणात दिला होता.
पण तो निर्णय तिने अनेक क्लेशदायक रात्री जागून घेतला होता.
तिला माहित होतं की प्रियकर तिला हा प्रश्न विचारणार आणि तिने उत्तर तयार ठेवले होते.
क्षणाचाही विलंब न लावता तिने आपला उजवा हात किंचित उचलून उजवीकडे हलवला होता.
तिचा निर्णय तिने कसा घेतला हे कळणे इतके सोपे नाही.
मी स्वतःला त्याचे उत्तर देण्याइतका समर्थ समजत नाही.
तेव्हां मी ते तुमच्यावर सोपवतो.
तेव्हां तुम्हीच ठरवा की त्या युवकाने उघडलेल्या दरवाजांतून युवती बाहेर आली की वाघ ?

— अरविंद खानोलकर.

मूळ कथा – लेडी ऑर टायगर

मूळ लेखक – फ्रँक स्टॉकटन (१८३४-१९०२)


तळटीप : फ्रँक स्टॉकटन हा खास करून मुलांचे वाडमय लिहिण्यासाठी खूप प्रसिध्द होता.
त्याची ही गोष्ट इंग्रजी वाडमयात अतिशय लोकप्रिय आहे.
कारण ती एक सुंदर रूपक कथा आहे.
त्यात दैव आणि स्वेच्छा (Determinism versus Free Will) यांचा सनातन झगडा दाखवला आहे.
राजा त्याला आरोपी करून त्याची व राजकन्येची स्वेच्छा हिरावून घेतो.
परंतु राजकन्या गुपित जाणून घेऊन पुन्हा आपल्या इच्छेनुसार निर्णय घेऊ शकते. तसाच जंगलीपणा आणि सुधारणावाद यांतील द्वंद्वही दाखवले आहे.
राजाला आपण नि:पक्षपाती आहोत असं तर दाखवायचे आहे पण त्याचे जंगलीपण त्या व्यवस्थेतही प्रबळ ठरते. आजही सुधारणेसाठी केलेला कायदा व त्याची अंमलबजावणी यांत आपल्याला तफावत दिसते.
विश्वास आणि विश्वासघात या समाजांत नित्य दिसणाऱ्या गोष्टीही कथेत आल्या आहेत.
माणसाच्या मनांतील परस्परविरोधी भावनांमधून दुसऱ्याच्या भल्याची भावना निवडणे किती कठीण आहे ? राजकन्येचं त्याच्यावर प्रेम आहे पण ती त्या युवतीचा द्वेष करते आहे.
पुन्हा प्रियकर तिला मिळण्याची शक्यता नाहीच.
तिला रहस्य माहित आहे.
ती विश्वासपात्र ठरेल की विश्वासघात करेल ?
तो तरूण तिने दाखवलेला दरवाजा उघडतो.
तो तिच्या वरील विश्वासाने ?
शेवटी उदात्त प्रेम आणि शारिरीक पातळीवरचं प्रेम ह्यांचा झगडा आहे.
उदात्त प्रेम स्वत:पेक्षा दुसऱ्याचा विचार अधिक करतं.
लेखकाने सुंदरी की वाघ ह्याचे उत्तर तुमच्यावर सोंपवलयं.
इथे जरा थांबून तुमचं उत्तर कारणासहीत लिहून ठेवा मग पुढे वाचा.
ह्या प्रश्नाचं उत्तर सोपं नाही, हे लेखकाने सांगितले आहे.
राजकन्येच्या मनातला झगडा आपल्याला ठाऊक आहे.
त्यामुळे तिच्यापुढे दोन पर्याय होते. त्याला वाचविण्याचा किंवा न वाचविण्याचा.
शेवटपर्यंत लेखकाने तिचा निर्णय काय असेल ह्याबद्दल सूचक कांही लिहिलेले नाही.
त्यामुळे तिने कोणताही निर्णय घेतलेला असू शकतो.
शिवाय तिला प्रियकर आपल्याला विचारणार ह्याची खात्री आहे पण आपण दाखवू तोच दरवाजा तो उघडेल अशी खात्री आहे कां ? तिचा त्याच्यावर विश्वास नसेल तर ती उफराटे मार्गदर्शन करून त्याला चकवेल.
त्या तरूणाने तिने खूण केलेला दरवाजा सहजपणे उघडला.
परंतु त्यामागे त्याचाही विचार असणारच.
राजकन्येशिवाय कुणीच नको, इतके त्याचे खरे प्रेम असेल तर तो वाघाचा दरवाजा उघडण्याचा निर्णयही घेऊ शकतो.
तिच्यावर विश्वास ठेवून ती इच्छित असलेला दरवाजा उघडू शकतो. तिने दाखवलेलाच दरवाजा तो उघडतो, ह्याचं कारण असंही असू शकतं की त्याला तिचा जंगली पण चतुर स्वभाव इतका चांगला माहित असतो की तिने खूण केली तिथेच ती सुंदर मुलगी असणार असे आपण मानू म्हणून आपल्याला चकवण्यासाठी, आपण विरूध्द दरवाजा उघडू असे गृहीत धरून ती खूण करणार असा विचार त्याने केला असेल.
थोडक्यात काय तर त्या दरवाजातून सुंदरी येईल की वाघ येईल हे अनिश्चितच रहाणार.
हा एक परिपूर्ण पेचप्रसंग (perfect dilemma) आहे. त्याला उत्तर नाही. अच्छा ! तुम्ही उत्तर लिहून ठेवलंय म्हणतां. जर तसं असेल तर ते उत्तर ह्या प्रश्नाचे नाही पण तुमच्या स्वभावाचं दर्शक असेल.
तुम्ही उदात्त असाल तर त्याला दुसरीशी विवाह करून सुखी झालेलं पहाणं तुम्हाला आवडेल.
तुम्ही द्वेष्टे असाल तर वाघ येईल, तुम्ही संशयी असाल तर उलट सुलट विचार करून कोणताही निर्णय तुम्ही घ्याल.
जाता जाता शेवटी एक निष्कर्ष नोंदवल्याशिवाय रहावत नाही. आजच्या जगांतली न्यायव्यवस्था तितकीच अनिश्चित वाटत नाही कां ? सेशन कोर्टाने निरपराध ठरवलेला आरोपी हायकोर्टात दोषी ठरतो तर सुप्रीम कोर्टात तो पुन्हा निरपराध ठरतो. त्या राजाचा न्याय वेळकाढू तरी नव्हता. आताच्या न्यायव्यवस्थेत काळच खटल्यांचा ‘निकाल’ लावतो. तो राजाही सुंदरी निवडण्यासाठी समिती नेमत असे. आजही आपण चौकशी समित्या बसवतो आहोत. राजकारणी माणसांवर तर डझनांनी खरेखोटे दावे दाखल असतात. असो. पण आज कायद्याचे राज्य आहे, असे आपण मानतो. शेवटी आपण रिंगणाबाहेरून अनिश्चिततेचा खेळ पहाणारे प्रेक्षक.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..