नवीन लेखन...

सुंदरतेची मूर्ती

सुंदरतेचा म्हणजे सुंदर दिसण्याचा ध्यास कोणाला नाही? पुरुष असो की स्त्री, लहान असो की मोठा, खेडयातला असो की शहरातला, पैसेवाला असो की गरीब… सुंदर दिसण्याची धडपड सर्वांचीच आणि सर्वकाळ! सर्वकाळ अशासाठी की आजची तरुणी स्वतःला सजवण्यात जशी मग्न तीच वृत्ती रामायण, महाभारतातील स्त्रियांमध्येही होती! प्रसाधनाची माध्यमं बदलली, सौंदर्याचे निकष बदलले पण स्वतःची आरशातली छबी तद्वत लोकांच्या नजरेतली पसंती, छान या सदरात मोडावी, हाच उद्देश ‘सुंदर मी होणार’ ह्यापाठी असतो. बरं हा ध्यास म्हटल्याप्रमाणे आज कालचा नाही तर पूर्वापार चालत आलेला आणि भविष्यातही अव्याहत चालू राहणारा असा आहे! त्यात परत बाळबोध, खानदानी, निसर्गदत्त, भडक, मादक, सात्विक, सर्वांग सुंदर वर्गवारी करावी तेवढी थोडी!

पण, एक गोष्ट मात्र खरी की सुंदर चेहरा, बांधेसूद शरीरयष्टीसाठी जेवढी धडपड आपण आज करतो तेवढी धडपड पूर्वी मुद्दामहून करावी लागत नव्हती. कारण तेव्हा स्त्री आणि पुरुष दोघांनाही अंगमेहनतीची चिक्कार कामे करावी लागत असत आणि परत निसर्गाला समांतर जगण्याची म्हणजेच निसर्गाशी साहचर्य राखून जगण्याची जीवनशैली आपल्या पूर्वजांनी आत्मसात केली असल्याने, एकूणच पुरुषांमध्ये भक्कमपणा आणि स्त्रियांमध्ये सुबक डौलदारपणा होता. आज पैसे मोजून आपण फिटनेस जिम, योगा क्लासेसला जातो आणि घाम गाळतो, ह्याची आवश्यकताच आपल्या आजी वा पणजीला भासली नाही. हां हे खरं की आत्ता आपल्याला जात ओढावं लागत नाही. शेताला शिपण करावे लागत नाही, घर शेणानी सारवावं लागत नाही, लांबच्या ओढा वा नदीवरून पाणी आणावं लागत नाही. तरीसुद्धा, खरंतर हा माझा अनाहूत सल्लाच आहे, पण शरीरसौष्ठव जपण्यासाठी एक व्यायाम प्रकार म्हणून का होईना घरातली जमतील ती कामे करायला काय हरकत आहे?

त्वचेला गोरेपणा देमाऱ्या क्रिमची टिव्हीवरील जाहिरात पाहून, सुंदरतेची व्याख्याच आपण किती विकृत करून टाकलेय याची खंत वाटते. कारण जाहिरातीतून काय अर्थ ध्वनित होतो तर त्वचा काळी-सावळी असेल तर त्या स्त्रीमध्ये गौणपणाची भावना निर्माण होते आणि मुलाखतीला जाताना ती आत्मविश्वास गमावून बसते. ते नुकसान होऊ नये, चेहरा नितळ, मुलायम राहण्यासाठी आमच्या क्रिमला पर्याय नाही असा दावा मी नाही तर कंपनी करत आहे. किंवा संतुर तरुण त्वचेचं रहस्य ही जाहिरातही खोटीच म्हणायला हवी कारण डाळीचं पीठ, चंदनलेप, गुलाबपाणी, हळद, साय आणि आनंदी मन हे खरं तर तरुण त्वचेचं रहस्य आहे नाही का?

पूर्वीपासून आपल्या डोक्यात सुंदर म्हणजे गोरी गोरीपान हे चित्रच मनात ठाण मांडून राहिल्याने चाफेकळी नाक, सिंहकटी, मीनाक्षी, नागासारखी सळसळती वेणी, मोहक हसरा चेहरा, शुभ्र दंतपंक्ती या घटकांना प्राधान्य खूप कमी दिले जाते. बौद्धिक चमक, शारीरिक क्षमता यांचा सौंदर्याच्या दृष्टिकोनातून स्वीकार हा विचार तर फार पुढचा झाला!

हल्ली चेहऱ्याची रंगरंगोटी, केशभूषा, वेशभूषा ह्यावर खूप लक्ष केंद्रित करावं लागतं. सिने नट्या, हवाई सुंदऱ्या, स्वागतिका ह्या क्षेत्रातील स्त्रिया तर स्वतःचं सौंदर्य टिकावं म्हणून खूप पैसे ओतून, एकसारख्या धडपडताना दिसतात. पूर्वी घरोघर गणपती वा दिवाळीला काय ती कापड खरेदी व्हायची… आजकाल मात्र एक नूर आदमी, सौ नूर कपडा आणि हजार नूर नखरा असा प्रकार पहायला मिळतो. म्हातारे स्त्री, पुरुष जेव्हा तरुणासारखं सुंदर दिसावं म्हणून वेड्यासारखे धडपडताना दिसतात, तेव्हा त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते!

१९९० च्या दरम्यान घडलेली एक सत्य घटना इथे सांगण्याचा मोह मला होत आहे. व्यक्ती वा ठिकाणांची नावं सांगण्याचा मोह मी आवरता घेतला आहे. धड शहर नाही खेड नाही. अशा त्या गावात, त्या गावचे मंत्री स्त्रियांच्या सौंदर्य स्पर्धेची घोषणा करतात. ग्लॅमर निर्माण करण्यासाठी बिकिनी वगैरे नाममात्र कपड्यातल्या, स्त्रिया मुंबईहून आयात केल्या जातात. स्त्रियांसाठी झटणाऱ्या एका सामाजिक संस्थेने याला जोरदार हरकत घेतली व कार्यक्रम होऊ न देण्याचा निर्धार केला. तेव्हा त्या मंत्र्यानी पोलीस स्त्रियांना आपल्या बाजूने वळवून संघटनेच्या कार्यकर्त्या स्त्रियांवर तिखट उधळायला सांगितले. तो कार्यक्रम झाला नाही ही चांगली गोष्ट घडली पण त्या दंग्यात, तिखटजाळ डोळ्यात गेल्याने, त्या संघटनेतील माझ्या एका मैत्रिणीची दृष्टी जाता जाता थोडक्यात बचावली!

खरं तर beauty lies concealing the beauty हेच सर्वार्थाने सत्य आहे. तरीही
पाश्चिमात्यांचं अनुकरण करण्याच्या नादात या सत्याचा आपल्याला विसर पडला आहे.

हे सगळं विवेचन झालं बाह्य सौंदर्याविष्काराबाबत… पण इथे एका महत्त्वाच्या गोष्टीचं संपूर्ण विस्मरण आपल्याला झालंय. ती गोष्ट म्हणजे मनाच्या सौंदर्याचा विचार आणि जपणूक. त्याच अनुषंगानी संत चोखामेळा म्हणतात, ‘काय भुललासी वरलीया रंगा।’ मनाचं औदार्य हेच मनाचं सौंदर्य होय. उत्कृष्ट संस्कार, आचारविचार, सत् संग आणि वाचन यामुळे मनाच सौंदर्य वाढीस लागतं.

मनाचं सौंदर्य म्हटल्यावर एक महत्त्वाची गोष्ट सुचवावीशी वाटते. म्हणजे असं की शरीर सुदृढ ठेवायला फिटनेस जीम असतात. त्याप्रमाणे मनाचं सौंदर्य जपण्यासाठी मनाच्या फिटनेस जिमचीही आवश्यकता आहेच ना? मनाचे श्लोक किंवा भगवद्गीतेच्या नित्य लेपनाने, मनाचं सौंदर्य बावनकशी सोन्याप्रमाणे झळाळून उठेल.

तेव्हा मनाचं सौंदर्य का जपायचं तर मनाची सुंदरता चेहऱ्यावर प्रतिबिंबित होते तेव्हा ज्याला सुंदरतेची ओढ आहे, त्याचं शरीर सुदृढ हवं आणि तेव्हाचं मनही सुदृढ, निरोगी आणि निकोप हवं!

टेकडीवरून जो शब्द उच्चारू तो परत कानावर आदळतो. त्याला प्रतिध्वनी म्हणतात. तद्वत, मनातल्या विचार तरंगांचाही प्रतिध्वनी नित्य अंतर्मनातल्या अंतर्मनावर उमटत असतो. आपलं मन एका दिवसात काही शुद्ध आणि सात्त्विक होणारं नाहीये पण मनाला काय बोध द्यायचा तर…

ज्याला मनाचं सौंदर्य जपायचं आहे त्याने काय पथ्य पाळायचं तर कुणाचा द्वेष न करणे आणि कुणाचे अंतःकरण न दुखावणे! अखंड काय स्मरणात ठेवायचं तर दिवस-रात्र आणि ऋतू हे आपल्या पापपुण्याचे तटस्थ साक्षीदार आहेत.

तसेच सकारात्मकतेला पर्याय नाही. अपयश, अपमान, उपेक्षा थोड्या फार प्रमाणात प्रत्येकाच्याच वाट्याला येतात. त्यामुळे नाउमेद न होता राखेतून झेप घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्याची जिद्द आपल्या मनात ठासून भरलेली हवी. देहाचं सौंदर्य मनाच्या सौंदर्यात सामावलेलं आहे आणि मन सतेज, सुंदर, टवटवीत राखायचं तर संतांचं अध्यात्म उपयोगी पडतं. संतांचे अभंग म्हणताच हटकून आठवण येते तुकाराम महाराजांची आणि मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष आणि बंधन, सुख समाधान इच्छित।। ह्या ओळी कानात रुणुझुणु लागतात! संतांच्या अभंग रचना म्हणजे अक्षय्य ज्ञानाचे नंदादीप आहेत. आणि तेव्हाच मनाची, बुद्धीची सौंदर्य प्रसाधन साधनेही आहेत.

मनाची सुंदरता म्हणजेच पर्यायाने चेहऱ्याची सुंदरता जपण्यासाठी विनोद करायला हवेत, विनोद ऐकायला हवेत. खळखळून, निर्मळपणे हसता यायला हवं. निरोगी आयुष्य आणि सुंदर चेहऱ्याचं रहस्य हसतमुख खिलाडू वृत्तीचं असल्याने मनाला समजावून सांगायचं की खाने को आधा करो, पानी को दुगना, कसरत को तीगुना और हसना चुगुना करो । हसणं आणि गाणं हे प्रत्येक माणसाचे दोन महत्त्वाचे अधिकार आहेत. सुख, दुः खाचा पाठशिवणीचा खेळ न संपणारा म्हणून अंधार वजा करून चांदण्या झेलत जायचं आणि तेव्हाच सुखाने नाचू नको, दुःखानी खचू नकोची मात्रा घेऊन, हरल्यापेक्षा जिंकलो याचं किती भान राखायचं.

अंतर्मनात परस्परविरोधी भावना भरतीच्या लाटांप्रमाणे उफाळून येतात आणि बऱ्याचदा निराशेने मन ‘झाकोळून जातं, ती वैफल्यता टिकू नये म्हणून निसर्गात रमायला हवं म्हणजेच निसर्गाला समांतर जगण्याची कला आत्मसात करायला हवी.

सौंदर्याच्या सुमनांवरचे
दव चुंबूनी घ्यावे,
चैतन्याच्या गोड
कोवळ्या उन्हात हिंडावे,
जेथे ओढे वनराजी,
वृत्ती तेथे रमे माझी

अशी नितांत सुंदर काव्ये नुसती गुणगुणण्यापेक्षा ती प्रत्यक्ष जीवनात साकारणं ह्यातच तनमनाच्या सौंदर्याचं रहस्य दडलेलं आहे. आशावाद जागवणारी सकारात्मक विचारसरणी मनात रुजायला हवी. तेव्हा मंगेश पाडगावकर म्हणतात तसं

तुम्हीच सांगा कसं जगायचं,
कण्हत कण्हत की गाणं म्हणत
पेला अर्धा भरला आहे
असंही म्हणता येतं.
पेला अर्धा सरला आहे,
असंही म्हणता येतं,
भरला आहे म्हणायचं की
सरला आहे म्हणायचं
तुम्हीच ठरवा कसं जगायचं…

मी सुंदर दिसावं की कुरूप हे कोणत्या गोष्टींनी निश्चित होणार? तर माझा जीवनाकडे पाहाण्याच्या दृष्टिकोनावर हे निश्चित करून निश्चिंत होऊया !

साने गुरुजींनी लिहिलंय, ‘दिसायला सुंदर नाही म्हणून सारेजण धडपडतात, त्यासाठी रडतात. पण माझं मन सुंदर नाही म्हणून धडपडणारे, त्या कारणासाठी रडणारे विरळाच.’ त्या विरळांमधले एक होण्याचा प्रयत्न त्या निमित्ताने करूया.

मी कोणाला नको आहे, मला कोणी नाही ही एकटेपणाची, एकाकीपणाची भावना आपल्याला भिवविते. तेव्हा गोंदवलेकर महाराज म्हणतात, तसं समूहाचे होऊन राहू या. भगवद्गीतेत तर भगवंतांनी ग्वाही दिली आहे की, जो लोकांना आवडतो आणि लोकही ज्याला आवडतात तो माझा प्रिय भक्त. तेव्हा देवाला प्रिय होईल असं वागण्याचा प्रामाणिक प्रयत्न या क्षणापासून करू या. घरीदारी, शेजारीपाजारी, नोकरीच्या ठिकाणी कुठे म्हणता कुठे तू तू मै मैं नको तर तू, मी आणि आपण सर्व मिळून ही भावना हृदयात तेवती ठेवू या.

जन्मभरच्या अपंगत्वामुळे थकून, मृत्यूची वाट पाहणाऱ्या पुनर्जन्मावर विश्वास असलेल्या(पुनर्जन्म हा सकारात्मकतेचा किती उत्कट दाखला आहे नाही?) कवी गोविंद यांची एक अजरामर काव्यनिर्मिती आहे. ‘सुंदर मी होणार’ हा जन्म सरला पण पुढील जन्म तरी निरोगी, सुंदर आयुष्य मिळणार हा आशावाद या कवितेत प्रतिबिंबित झाला आहे. तेव्हा सुंदरतेची व्याप्ती अशीही वाढती ठेवू या. झाल्या गेल्याचा विसर आणि पुढच्याचा विचार हे महाराजांनी सांगितलेलं जीवनसूत्र, प्रत्यक्ष कृतीत आणू या. शहरी माणसापेक्षा गावातला शिकलेल्या वा पैसेवाल्यापेक्षा कमी शिकलेला वा कमी पैसेवाला जास्ती आनंदी, ताणतणावरहित दिसतो, याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. आहे त्या परिस्थितीत स्त्रिया जास्त आनंदी रहातात की पुरुष, हे मला सतावणारं कोडं आज मी तुम्हाला घालते आहे.

लेखाचा शेवट लहानपणापासून ऐकत आलेल्या एका कथेने करते. कथेचं नाव सुखी माणसाचा सदरा. एक राजा, राज्याची धुरा सांभाळणारा, म्हणून अखंड चिंताक्रांत. चिंतारहित, आनंदी माणसाच्या शोधात एकदा नदीतीरी येतो. नदीकाठावर काय पाहतो.. आनंदाने निथळणारा एक माणूस मस्त आनंदात गाणं गुणगुणतोय, त्याला त्या आनंद समाधीतून जागं करत म्हणतो, हे आनंदी माणसा तुझा सदरा मला दे, माझा अंगरखा तुला घे. तेव्हाच राजाच्या लक्षात येतं की त्या माणसाच्या अंगात सदराच नाही आणि म्हणूनच तो आनंदात आहे.

तेव्हा मैत्रिणींनो, मनाची सुंदरता हाच चेहऱ्याच्या सौंदर्याचा रामबाण इलाज. इतकं बोलून आमचा राम राम घ्यावा…

– शिल्पा गोखले

व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी – महिला विशेषांकातून साभार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..