“गेटवे” पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीच्या प्रकाशन समारंभातील प्रमुख पाहुणे कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या भाषणातील निवडक मुद्दे.
प्रकाश बाळ जोशी व्यवसायाने पत्रकार आहेत. त्यांनी कधी काळी लिहिलेल्या स्वतःच्या लेखांच्या संग्रहाचे पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकामध्ये एकूण ४४ लेख आहेत ते १९९३-९४ च्या काळात मुंबई आज दिनांक मधून प्रसिद्ध झाले आहेत. म्हणजे नऊ वर्षांनी ते प्रकाशात आले आहेत, साधारण गर्भवास नऊ महिने असतो पण इथे तब्बल नऊ वर्ष लागली. कपिल पाटील यांनी सुंदर बाळंतपण करून चांगल्या पुस्तकाला जन्म दिला आहे. त्या पुस्तकाच्या जन्माचा आनंदमी साजरा करीत आहे.
मुंबई शहरासंबंधी हे लेख लिहिलेले आहेत. आपल्याला माहित आहे की माणूस हा भाषेच्या माध्यमातून विचार व्यक्त करायला लागला आणि आपले विचार व्यक्त करण्यासाठी त्याने जो आराखडा, एक फॉर्म तयार केला आहे तो निबंध. निबंधातून विचार व्यक्त करतांकरतां माणसाने आणखी काही भाषेची शास्त्रे वापरायला सुरुवात केली. उदाहरणार्थ विरोधकांवर टीका करण्यासाठी उपरोध नांवाचे अस्त्र वापरायला लागला. विनोद वापरायला लागला. लोकमान्य टिळकांचे लेख वाचता वाचता हळूहळू शिवरामपंत महदेव परांजपे यांचे लेख किंवा चिपळूणकरांचे लेख वाचायला लागला. त्यातून पुढे लघुनिबंध प्रकार जन्माला आला, आणि लघु निबंधातून पुढे ललित निबंध आला. यथावकाश दुर्गाबाई भागवतांनी दुपानी निबंध लिहायला सुरुवात केली. दोन पानांचा परिपूर्ण निबंध अवतरला. प्रकाश बाळ जोशी यांचा लेखनप्रकार असाच दुपानी निबंध आहे.
प्रकाश बाळ जोशी पत्रकार असले तरी त्यांच्यातील कलावंत जागा आहे. त्यांच्यातला कलावंत या भावना आणि विचार व्यक्त करतोय, पत्रकार नाही, आणि म्हणूनच या सर्व लेखांमध्ये फक्त विचार नाहीत, विचार आणि भावनाही आहेत. सुंदर सुंदर संवेदनाही आहेत आणि जीवनाकडे बघण्याची एक दृष्टी ही आहे. अशा या सगळ्या सुंदर अभिव्यक्तीचा या दुपानी ललित निबंधांमध्ये विस्मित करणारा संगम आहे.
प्रस्तावनेत त्यांनी लिहिलंय – मी मुंबईत आलो तेंव्हा फक्त पेन आणि पेन्सील घेऊन आलो. पण मी म्हणतो त्यांनी पेन आणि पेन्सील या व्यतिरिक्त माणसाकडे, जीवनाकडे प्रसंगाकडे, घटनांकडे बघण्याची दृष्टीही आणली आहे. पेन आणि पेन्सील आणली असती तर या पूर्वी कधीच त्यांचं एखादं पुस्तक प्रसिद्ध झालं असतं. पण गेटवे सारखे पुस्तक आले नसते. म्हणून या पुस्तकातून मला जाणवते की त्यांची जीवनाकडे माणसांकडे बघण्याची जी दृष्टी आहे तीच त्यांची भाषा आहे. त्यांची दृष्टी ही सहज सुंदर आहे म्हणून बोलल्यासारखी वाटते. ती आपल्याकडे म्हणजे स्वतःकडे लक्ष वेधून घेत नाही, खेचून घेत नाही. दृष्टी ही त्यांची भाषा असल्यामुळे त्यांच्या भाषेतून तुम्ही जीवनाकडे बघायला लागता. हा एक भाग म्हणजे त्यांचं यश आहे. दृष्टी आणि भाषा सहजपणे एकरूप झाल्या आहेत. पुष्कळ ठिकाणी भाषा ही वाचकाचे लक्ष स्वतःकडे वेधून घेते. खेचून घेते आणि या प्रकाराला भाषा प्रभुत्व म्हणतात. खरं म्हणजे ते कलात्मक दृष्ट्या परावलंबित्व आहे. भाषेने आपल्याकडे लक्ष खेचून घेणे हा लेखनाचा पराभव आहे. यांच्या लिखाणात मात्र असं काही झालेलं नाही. कारण भाषाही त्यांची दृष्टि आहे.
आपल्या मनोगतात त्यांनी म्हटलं आहे की पत्रकार म्हणून आपल्याला फिरण्याची संधी मिळाली. पण संपूर्ण पुस्तक वाचल्यावर मला जाणवले की या लेखातून त्यांच्यातील पत्रकार नव्हे तर यांच्यातील कवी, कलावंत या पुस्तकातून व्यक्त झाला आहे.
एक साधी गोष्ट. उदाहरणार्थ या पुस्तकातील ‘भुयारी’ नावाचा एक लेख आहे. ललित निबंध. मुंबई मध्ये जवळ जवळ ३०-४० भुयारी गटारे आहेत. त्या गटारांच्या मध्ये काही काम निघते त्यावेळी त्यामध्ये हा माणूस उतरून अत्यंत कष्टाचे काम कारीत असतो. त्यांनी लिहिलंय,काम करतांना एखादा आत मेला तर त्याला बाहेर कोण काढणार? तिथे तो तसाच राहतो. त्याचे प्रेतही बाहेर काढले जात नाही. हॉटेलच्या बाहेर तो चहा पीत बसलाय. कारण त्याच्या अंगाला वास येतो म्हणून त्याला कुणी आत घेत नाही. अंगाला येणारी दुर्गंधी टाळण्यासाठी भडक आणि उग्र अत्तर त्याने चोपडलेले असते. स्वतःचे माणूसपण जपण्यासाठी त्याने उग्र अत्तर लावलेले असते. घाण वासामुळे त्याला सगळे टाळतात. हे सारं वाचता वाचता त्याच्या अंगाला लावलेल्या उग्र अत्तराचा वास माझ्या नाकात भिनायला लागला. कारण उग्र अत्तराचा वास आणि माणूसपणा यांची सांगड पहिल्यांदाच या लेखातून मला आकलन झाली आणि मी थक्क झालो. भारावलो,यालाच दृष्टी म्हणतात, संवेदनशीलता म्हणतात. पत्रकार आणि बातमीचा संदर्भच येथे येत नाही. अहो हे काम करणारा माणूस मी कैक वेळा पहिला आहे, पण कवी असूनसुद्धा, मला कधी त्याच्याशी संवाद साधावासा वाटला नाही, की त्याच्या विषयी कणव वाटली नाही. हे काम अतिशय संवेदनशील माणूसच करु शकतो.
हा माणूस व्यवसायाने पत्रकार असला तरी अतिशय संवेदनशील कवी आहे. आणखी एक गोष्ट सांगतो. एखाद्या प्रसंगाचा, दुःखाचा हा संवेदनशील माणूस कसा शोध घेतो ते बघा. रेल्वे स्टेशन. एक पाच सहा वर्षाची मुलगी, भीक मागणारी… तिच्या बरोबर एक लहान मुलगा, तिचा भाऊ, दोन वर्षाचा. तिच्या बरोबरीने भीक मागणारा. ती त्याला बदडत बदडत फटके मारत असते. नंतर रात्री स्टेशनवर लेखकाला ही मुलगी पुन्हा दिसते. जवळच पेंगळून पडलेला भाऊ. प्रकाश बाळ जोशी पाहतात, ती मुलगी नाणी मोजत बसलेली असते. भावाशी क्रूरपणे वागणारी ती मुलगी. जोशी तिला पाहून कळवळतात. तिच्या जवळ जाऊन हळुवारपणे विचारतात, ‘तुला भूक लागली असेल तर वडा पाव घेऊन देऊ का?’ तर ती म्हणते, ‘नको नको, मला पैसे द्या. नाणी द्या. थक्क झालेले जोशी विचारतात तुला वडा पाव कां नको. तुला भूक लागली नाही कां? ती म्हणते, नको मला वडा पाव, फक्त नाणी द्या, कारण नाणी नेली नाहीत तर माझा बाप मला खूप मारेल. थुडवेल. मला नगद पैसे द्या, खायला नको. प्रकाश बाळ जोशींना उमगले की ती आपल्या लहानग्या भावाशी इतक्या क्रूरपणे कां वागली. प्रकाश बाळ जोशी यांनी केवळ दोन पानात त्या मुलीची मानसिकता, तिचे दुखः यांचे चित्र उभे केले आहे. म्हणूनच म्हणतोय की त्यांची दृष्टी हीच त्यांची भाषा आहे. मी सुद्धा अनेकदा भीक मागणारी मुले गाडीत पहिली आहेत. मी एक कवी आहे, कलावंत आहे पण मला मात्र कधी असं त्यांच्या अंतरंगात शिरावं असं वाटलं नाही. पण जोशी मात्र या मुलीच्या अंतरंगामध्ये डोकाऊन तिच्या दुःखाचा शोध घेतात. दाहक वास्तवाचा शोध घेतात.
त्यांच्या लिखाणात माणसं येतात. चलःचित्रपटाप्रमाणे हलतात, आणि कुठलीही भाषणबाजी न करता त्यांच्यातील चिंतनशील तत्वज्ञ प्रकट होतो. तो कसा असतो तर माठात गार होण्यासाठी पाणी भरतात आणि ते त्याच्या भोवतीच पाझरत राहते, ज्या हळुवारपणे हे पाणी पाझरते, ते माणसालाही कळत नाही. तसा त्यांच्यामधला चिंतनशील तत्वज्ञ आहे, पाझरणाऱ्या पाण्याप्रमाणे अलगद आणि हळुवारपणे व्यक्त होतो.
‘चेहरे’ म्हणून त्यांचा दुसरा एक अतिशय सुंदर लेख आहे. माझ्याबाबत घडलेली एक गम्मत सांगतो. मी वसंत बापट आणि विंदा करंदीकर असे आम्ही तिघे एकत्रित काव्यवाचन करीत असू. त्या दरम्याने शेकडो लोकांनी आम्हाला पाहिलेले असते. एक दिवस असाच गाडी पकडण्यासाठी मी घाईघाईत निघालो होतो आणि एक गृहस्थ हसत हसत समोर आला. त्याने मला कधी तरी पाहिले असावे हे मात्र नक्की. म्हणजे माझा चेहरा त्याच्या ओळखीचा असावा. तो माझ्या समोर थांबला म्हणून मला थांबावे लागले. मग तो म्हणाला, नमस्कार! आपण वसंत बापट ना? नाही! मी विंदा करंदीकर! मी उत्तरलो. हं! असं काय? बरं! बरं! असं म्हणत त्याने माझा निरोप घेतला. असा ओळखीचा चेहरा असतो, असे अनेक चेहरे आढळतात. आणि त्यांची गंमत असते.
हा सगळा अज्ञाताचा खेळ चाललेला असतो तो अजबच आहे. माणसं माणसांना भेटतात, चेहरे ओळखतात, एकमेकांशी हसतात पण आत मात्र रिकामी असतात, एकटी असतात. म्हणून जोशींना प्रश्न पडतो मुंबई हे काय प्रकरण आहे? ही काय गर्दी आहे? आणि स्वतःच म्हणतात, मुंबई म्हणजे महाप्रचंड असा एक ‘सापळा’ आहे. ते पुढे आपली आठवण लिहितात. आमच्या लहानपणी उंदरांना पकडण्यासाठी सापळे असत. त्यात खोबऱ्याचा तुकडा असायचा त्याच्या वासाने उंदीर आत शिरायचा आणि त्या सापळ्यात अडकायचा. पण आता उंदीर शहाणे झाले आहेत ते सापळ्यात अडकणे बंद झाले आहे. पण माणूस काही अजून शहाणा झाला नाही. हजारो माणसे त्या सापळ्यात रोज अडकत असतात.
मी परत एकदा प्रकाश बाळ जोशी यांचे अभिनंदन करतो. मराठी ललित निबंधांची एक परंपरा आहे, अगदी दुर्गाबाई भागवत यांच्या पर्यंत, त्या परंपरेत या ललित निबंध संग्रहाला – ‘गेटवे’ ला- एक महत्वाचे स्थान आहे असे मी मानतो.
-कविवर्य मंगेश पाडगांवकर
Leave a Reply