जन्म.२९ ऑक्टोबर १९६६
साठच्या दशकात सुनील मेहता यांचे वडील अनिल मेहता यांनी मेहता पब्लिशिंग हाऊसची स्थापन केली. १९७६ साली वडील अनिल मेहता यांनी पुण्यात स्थापन केलेल्या ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ या प्रकाशन संस्थेची सगळी सूत्रे १९८६ साली सुनील मेहता यांच्याकडे आली.
पारंपारिक प्रकाशन व्यवसायाचे डिजिटायजेशन करण्याचे श्रेय हे सुनील मेहतांना जाते. हिंदी, बंगाली, कन्नड, गुजराती आणि इंग्रजी अशा विविध भाषांमधील पुस्तकांचे मराठी अनुवाद त्यांनी प्रकाशित केले. कोरियन आणि जपानी भाषेतील पुस्तकांचे मराठी आणि इंग्रजी अनुवादही प्रकाशन करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.
सर्व प्रकारच्या श्रेणीली दर्जेदार डिजिटल पुस्तके प्रकाशित करणारे असे मेहता पब्लिशिंग हे एकमात्र पब्लिशिंग हाऊस आहे. एकट्या महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात त्यांनी इंग्रजी पुस्तकांचा व्यवसाय वाढवला. मराठी वाचकांना परदेशी भाषांमधील पुस्तके वाचण्यास मिळावी म्हणून त्यांनी परदेशी भाषांमधील अनेक पुस्तकांचे अनुवाद प्रकाशित केले होते.
रणजित देसाई, वि.स. खांडेकर, व्यंकटेश माडगूळकर, आनंद यादव, व.पु. काळे, शिवाजी सावंत, शांता शेळके, शंकर पाटील अशा दिग्गजांची पुस्तकेही त्यांनी प्रकाशित केली. रविंद्रनाथ टागोर, एपीजे अब्दुल कलाम, नारायण मूर्ती, सुधा मूर्ती, अरूण शौरी, गुलजार, किरण बेदी, अरूंधती रॉय, सचिन तेंडुलकर, शोभा डे यांचीही पुस्तके त्यांनी प्रकाशित केली.
मराठीतील दर्जेदार पुस्तकांच्या प्रकाशनासोबतच विविध भाषांमधील पुस्तकांचे अनुवाद मराठीत आणणाऱ्या सुनील मेहता यांनी संस्थेचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले होते. अनेक आंतरराष्ट्रीय, नामांकित जेफ्री आर्चर, मायकल क्रायटन, फ्रेडरिक फोरसाइथ, रॉबिन कुक, ऍलिस्टर मॅक्लीन, जॉन ग्रिशॅम, इयान फ्लेमिंग, डॅन ब्राऊन, डेबोरा एलिस, ली चाइल्ड झुम्पा लाहिरी यांचे साहित्य मराठीत आणण्यातत्यांचे मोठे योगदान आहे. तर तस्लिमा नासरीन, सुधा मूर्ती, अरुण शौरी, खुशवंत सिंग, चेतन भगत, एस. एल. भैरप्पा, शिवराम कारंथ, गुलजार, दीप्ती नवल, अरुंधती रॉय, ओशो, किरण बेदी अशा लेखकांचे साहित्य त्यांनी मराठीत नावारूपाला आणले. टीबीसी या अभिनव संकल्पनेतून त्यांनी हे अनुवाद मराठी वाचकांपर्यंत पोहचविले. नाशिक येथे पार पडलेल्या साहित्य संमेलनात त्यांनी ‘मेहता साहित्योत्सव’चा अभिनव प्रयोग राबविला, ज्यात साहित्यिक कार्यक्रमांसाठी स्वतंत्र स्टॉल घेऊन वाचक आणि लेखकांचा संवाद घडवण्यात आला. त्यांनी अनेक प्रकाशनाचे कार्यक्रम आयोजित केले. २०१२ मध्ये नॉर्वे येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत एकमेव मराठी प्रकाशक म्हणून मेहता यांनी प्रतिनिधित्व केले होते. त्यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले.
सुनील मेहता यांनी मराठीत सर्वप्रथम इ-बुक्सचा प्रयोग यशस्वीरित्या राबवला. मेहता पब्लिशिंग हाऊसची दीडहजारहून अधिक पुस्तके इ-बुक स्वरूपात उपलब्ध करण्यात आली आहेत.
सुनील मेहता यांना भावपुर्ण श्रद्धांजली.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply