” लोकसत्ता ” मध्ये सुभाष अवचटांचा लेख वाचला बाईंबद्दल ! विदर्भात – खामगांव, अकोल्याला ” बाई ” हा शब्द “आई ” साठी वापरला गेलेला लहानपणी प्रथम ऐकला. तोपर्यंत इ. पहिली ते चौथी ( फॉर दॅट मॅटर अगदी बालवाडीतही) बाई म्हणजे माझ्या लेखी शिक्षिका !
असंच “बाई ” हे संबोधन विजया मेहेतांना आदरपूर्वक लावलं जातं.
अवचटांच्या लेखात खूप हृद्य संबंध वर्णन आहे बाईंविषयी आणि अधून-मधून तोंडी लावायला पुलं (आहेतच). त्यातलं एक वाक्य खोलवर रुतलं – ” कविता ही फार खासगी गोष्ट आहे-एकट्याची, एकट्यापुरती ! ” ( वाक्य आतवर भिडलं कारण ते जणू माझ्या भावना बोलत होतं -गेली काही वर्षे मी कविता लिहीत नाही आणि त्या वाचून दाखविणे / कवी संमेलनात सादर करणे तर फार पूर्वीच सोडलंय. मी कविता “जगत ” असतो हल्ली ! )
जीए आणि सुनीताबाई हे कॉम्बो वाचलं होतं. आज अवचट /सुनीताबाई यांचे रेशमी नाते भेटले.
लेख संपवताना मनात विचार आला ” सुनीताबाईंवर चित्रपट काढला गेला तर ! ” ( मांजरेकर क्षमस्व ! तुम्ही दोनदा आमचे हात पोळले आहेत. या वाट्याला प्लिज जाऊ नका.) मागील आठवड्यात ” मला काही प्रॉब्लेम नाही “मधील स्पृहा मनात आली बाईंच्या भूमिकेसाठी, नंतर पल्लवी जोशी आली- दोघींची चण लहानखुरी फक्त तेजतर्रार वाटू शकतात त्या ! आणि मग प्रश्न संपला – ” मुक्ता बर्वे ” कूड बी मोअर दॅन पर्फेक्ट . आणि भाईंसाठी – अतुल कुलकर्णी ! दोघेही conviction वाले कलावंत ! प्रथमदर्शनी फ्रेममध्ये बसत नाही, पण अतुलचा अभ्यासपूर्ण ” गांधी” ज्यांनी पाहिला आहे त्यांना माझं पटेल. असो. हे कणभर विषयांतर !
सुनीता बाईंशी मी दोनदाच फोनवर बोललो आहे- वालचंद ला असताना आम्ही ” तुझे आहे — ” बसविले होते. मी त्यांत “आचार्य ” ची भूमिका केली होती. मनाच्या एका तारेत पुलंना पत्र लिहिलं – ” तुमच्या या मानसपुत्राला आशीर्वाद द्या.” उत्तर आलं नाही. फोन लावला, पलीकडून सुनीताबाईंचा आवाज – ठाम नकार आणि फोन कट !
आणखी प्रयत्न करणार होतो पण तेवढ्यात लक्षात आले – कॉलेजने परवानगी काढली आहे का, मानधन दिलंय का काहीच माहीत नाही. सुनीताबाई याबाबतीत खूप कडक आहेत. उगाच काहीतरी कायदेशीर प्रकार होतील जर त्यांना या नाट्यप्रयोगाबद्दल कळलं तर !
काही वर्षांनी पुण्यात आल्यावर दुसऱ्यांदा पुलंना भेटावंसं वाटलं म्हणून फोन केला. ( नाशिकला शिरवाडकरांकडे तसं मुक्तद्वार होतं पण इथे परवानगी मस्ट ! )
पलीकडून धारदार (आज अवचटांनी वारंवार “ताठ ” असा सुनीताबाईंचा उल्लेख केलाय) आवाज- ” काय काम आहे?”
” पुलंना भेटायचं आहे.”
“सध्या भाईची तब्येत ठीक नसते. तो कोणालाही भेटत नाही.” फोन निर्ममपणे कट !
पुढे दोघंही गेले यथाकाल ! भेटीचा योग नव्हता. साहित्यातूनच भेट झाली, कधी त्यांचे कार्यक्रम बघता,ऐकता आले नाही. तेवढेच समृद्धपण कमी आयुष्यात !
२०१९ मध्ये पुण्यातील एका कवितेच्या कार्यक्रमाला गेलो असताना अचानक ” शुभांगी दामले ” दिसल्या ज्योत्स्नाबाई भोळे कलामंदिराच्या आवारात ! आम्ही सर्व पडद्यावरील या सुनीताबाईंना भेटलो. मोठ्या तालेवार लोकांच्या भूमिका केलेल्या कलावंतांनाही नकळत त्या थोरपणाचा सुगंध लागत असेल. नर्मविनोदी, आजीसारख्या आवाजात या सुनीताबाई आमच्याशी बोलल्या.
त्यानंतर आज अवचटांनी पुन्हा सुनीताबाई भेटवल्या.- लखलखणाऱ्या सौदामिनीसारख्या !
ती
ती नाकारते जगाचा वेडाचार
आणि सतत बसते स्वतःच्याच वेदनांच्या आसऱ्याला
प्रत्येक त्रासदायक भुताला
ती ओळखत असते नावानिशी
आणि जपत असते-
पदराआडचा “भाई “नावाचा परीस
मराठी सारस्वताला न दिलेले वचन पाळताना
कासावीस होत ,धापा टाकत !
माफी मागत नाही
तिच्या बेडरपणा बद्दल,
युद्धांबद्दल,
बंडखोरीबद्दल !
ती कशी जिंकली हे फक्त
तिचे व्रण सांगतात -अभिमानाने !
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply