सजलेले घर हे सुंदर
सजलेल्या चारभिंती
सुन्न सारे, मनही सुन्न
एकांती बोलती भिंती ।।१।।
नाही, काही उणे इथे
दरवळ सारा सुखांती
तरी, जीव घुसमटतो
शांतता पोखरते भिंती ।।२।।
जीव सुखे जरी नांदतो
मन, शोधिते विश्रांती
व्याकुळ हा जीव सारा
याचितो नित्य मन:शांती ।।३।।
जगण्याची एक स्पर्धा
अविश्रांत चाले जगती
सौख्याचीच सारी नशा
उद्विग्न आज चारभिंती ।।४।।
स्पंदने आज सरावलेली
साशंक, जगी भावप्रीती
खुंटलेली ओढ नात्यांची
एकांती मुसमुसती भिंती ।।५।।
— वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ७१.
५ – ३ – २०२२.
Leave a Reply