राजेश खन्ना म्हणजे जतिन अरोरा यांचा जन्म २९ डिसेम्बर १९४२ साली अमृतसरमध्ये झाला. त्यांचे पालनपोषण लीलावती चुन्नीलाल खन्ना यांनी केले कारण त्यांनी त्याला दत्तक घेतले होते, अर्थात ते त्याचे नातेवाईकही होते. फाळणीनंतर त्यांचे आईवडील अमृतसरला राहावयास आले. राजेश खन्ना यांचे शिक्षण मुंबईमधील गिरगावात असणाऱ्या सेण्ट सॅबेस्टियन स्कूल मध्ये झाले. त्याचबरोबर रवि कपूर म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेते जितेंद्र हेदेखील शिकत होते. लहानपणापासून राजेश खन्ना म्हणजे जतिन खन्ना यांना नाटकाची आवड होती , आणि त्यात काम करण्याची देखील आवड होती. शाळेत असताना त्यांनी काही नाटकात कामेदेखील केली होती. इतकेच नव्हे तर त्यांनी कॉलजमद्ये असताना अनके नाट्यस्पर्धांतून भाग घेऊन बक्षिसेही मिळवली होती . नाटक ह्या बद्दल त्यांना नितांत आदर होता. स्टार पदाला असताना ते एकदा काही कामानिमीत्त डोंबिवली येथे आले होते त्यावेळी डोंबिवलीचे सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचे काम चालू होते , कुणाच्यातरी सांगण्यावरून तेथे ते बघावयास गेले तेव्हा आत पाऊल ठेवण्याआधी त्या वास्तूला त्यांनी वाकून नमस्कार केला होता असे अनेकजण सांगतात. हे सांगण्याचा इतकाच उद्देश आहे कारण त्यांच्याबद्दल खूप वावड्या उडत होत्या त्याला त्यांच्या ह्या कृतीने निश्तित छेद गेला असणार.
त्यांचा पहिला चित्रपट १९६६ मध्ये आला त्याचे नाव होते ‘ आखरी खत ‘ लागोपाठ १९६९ ते १९७१ पर्यंत १५ चित्रपट सुपरहिट होणे ही आत्तापर्यंत हिंदी चित्रपटसृष्टीत अशक्य गोष्ट होती ती त्यांनी शक्य केली. राजेश खन्ना संपूर्ण चित्रपट एकटा ‘ खेचायचे ‘ त्यांना स्वतः बरोबर कोणी को-स्टार म्हणजे सहाय्यक कलाकार लागत नसे. म्ह्णून ते सुपरस्टार होते. अभिताभ बच्चन यांना बरोबर शशी कपूर , विनोद खन्ना किंवा कधी प्राण हे कलाकार बरोबर लागत . अर्थात अभिताभ हे काही लहान कलाकार नाहीत हे त्यांनी आत्तापर्यंत सिद्ध केलेले आहे. परंतु एकटा कलाकार एखादा चित्रपट खेचणे तसे कठीणच परंतु ते राजेश खन्ना यांनी करून दाखवले. अनेक तरुण तरुणी अक्षरशः त्यांच्यासाठी वेडे होत. त्यांची गाडी जिथे असेल तिथे त्यांची गर्दी असे तो गाडीत नसला तरीही , त्याच्या गाडीला हात काय लावणे , गाडीचे चुंबन काय घेणे. मला वाटते इतके जबरदस्त स्टारडम हिंदी चित्रपटसृष्टीत कुणाला मिळाला नसेल.
त्याला लोक आदराने ‘ काका ‘ म्हणत . त्यांचे मान तिरपे करून बोलणे , चालण्याची , नाचण्याची विशिष्ट पद्धत प्रसंगी नाटकीही वाटे परंतु त्यांच्या प्रेक्षकांनी त्यांना त्यासकट स्वीकारले होते हे महत्वाचे. त्यांच्या चित्रपटातील गाणी हिट होत असत कारण किशोरकुमार हा खरा त्यांचा आवाजच होता अर्थात इतर अनेकांनी देखील त्यांना आवाज दिला आहे आणि त्यांना यशही मिळाले आहे . परंतु बोलबाला मात्र किशोरकुमारच्याच आवाजाचा होता असे म्हणावे लागेल. त्यांचे लग्न , त्याच्याबद्दलच्या वावड्या याना त्यावेळी ऊत आला होता. त्यांचे आणि मुमताज बरोबर आठ चित्रपट आले आणि ते सर्वच हिट झाले. त्यांनी अमर प्रेम चित्रपटात केलेली बंगाली माणसाची भूमिका इतकी जबरदस्त होती की त्यांना पुढे बंगाली चित्रपटात काम करावेच लागणार असे वाटले परंतु त्यांना बंगाली चित्रपटात काम करता आले नाही ते त्यांच्या व्यस्ततेमुळे . ‘ पुष्पा . आय हेट टिअर्स …..” हा त्याचा डायलॉग इतका फेमस झाला की तो त्यांच्याच तोडून एकण्यात मजा होती. त्यांनी चित्रपटातील घातलेले कपडे , केसांची पद्धत म्हणजे हेअर स्टाईल , कुडता , त्याच्या विशिष्ट चपला ह्याचा प्रभाव लाखो लोकांवर , तरुण-तरुणीवर इतका पडायचा की त्याचे ‘ फॅशन ‘ मध्ये रूपांतर व्हायचे.
राजेश खन्नाचे त्या १५ चित्रपटनानंतर १९७६ ते १९७८ मध्ये पाच चित्रपट हिट झाले आणि नऊ चित्रपट पडले, किंवा बॉक्स ऑफिसवर चालले नाहीत. त्या पाच चित्रपटातील मेहबुबा हा चित्रपट तर खूपच चालला, हिट झाला . सत्यम शिवम सुंदरम मध्ये शशी कपूरने जो रोल केला आहे तो खरा राजेश खन्ना यांना मिळणार होता परंतु आयत्यावेळी राजकपूरने शशी कपूरला तो रोल दिला असे म्हटले जाते. राजेश खन्ना राजकारणात आला परंतु त्याला ते जास्त मानवले नाही . राजेश खन्नाने ज्या ७४ चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या ते चित्रपट ५० आठवडे सातत्याने चालले. त्यांनी एका तेलगू चित्रपटात पाहुणा कलाकार म्ह्णून भूमिकाही केली होती त्या चित्रपटाचे नाव होते ‘ बंगारू बाबू ‘ . त्यांचा विवाह डिंपल कपाडिया या अभिनेत्रीशी झाला होता. पुढे अनेक प्रकारे वाद झाले परंतु शेवटी परत ते एकत्र आले.
पुढे पुढे मात्र राजेश खन्ना हे ‘ राजेश खन्ना ‘ नावाच्या स्वतःच्या वर्तुळातून कधीच बाहेर पडू शकले नाहीत आणि तिथेच त्याच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली , त्याचवेळी अभिताभ बच्चन या मोठ्या कलाकाराचा उदय होत होता, आणि ही वेळ होती ‘ आनंद ‘ ह्या चित्रपटाच्या वेळची . दुर्दैवाने त्यांच्या भोवतालचा नको तो गोतावळा वाढला होता, त्यापैकी अनेकांनी त्याच्या अहंकाराला खतपाणी घातले. तरीपण तो शेवटपर्यंत त्याच रुबाबात राहिला याचे विशेष . परंतुत्यावेळी अभिताभ मात्र वेळोवेळी आपली पावले अत्यंत सावधपणे टाकत होता. मला राजेश खन्नाला २००३ साली त्याला जवळून बघण्याचा , त्याचे भाषण आइकण्याचा योग्य आला पण तेव्हा जाणवले त्याची मस्ती काही कमी झालेली नव्हती. त्याच सुपरस्टारच्या वलयात तो त्याही वेळीही होता. त्याने स्वतःभोवती स्वतःच्याच नावाचा कोष केला होता तो कोणीही भेदू शकले नाही शेवटी तो भेद मृत्यूलाच करावा लागला.
राजेश खन्ना यांनी आराधना , सफर , अमर प्रेम , राजा राणी, दाग ,अजनबी , मेहबुबा , रोटी , बरसात , अलग अलग , बावर्ची , आपण देश , हाती मेरे साथी , अंदाज , दुश्मन , सच्चा झूठा अशा सुमारे १८० चित्रपटात कामे केली , त्यात १२८ चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या , २२ चित्रपटात दुहेरी भूमिका केल्या आणि १७ छोट्या चित्रपटात कामे केली. राजेश खन्ना याना तीन वेळा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले ते अविष्कार, आनंद आणि सच्चा झूठा या चित्रपटासाठी तर चार वेळा बंगाल जर्नलिस्ट अवॉर्ड मिळाले. त्यांना ऑल इंडिया क्रिटिक अवॉर्ड सात वेळा मिळाले. राजेश खन्ना यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळाले तेव्हा त्याने जे भाषण केले ते भाषण कोणीही विसरणार नाही. त्यांनी त्यावेळी साहीरचा एक शेर म्हटला होता तो शेर असा होता , ” इज्जते , शोहरते , उल्फते , चाहते सब कुछ इस दुनिया मे रहता नही . आज मै हू जहाँ कल कोई और था , ये भी एक दौर है ..वो भी एक दौर था ” ह्या शेर मधून त्यांची मनस्थिती दिसून आली आणि त्यावेळी त्यांच्या बाजूला अभिताभ बच्चन उभा होता. तो खऱ्या अर्थाने एकमेव सुपरस्टार होता. त्यांची लोकप्रियता भारतभर पसरलेली आहे आणि ती आजही आहे. त्याची गाणी आजही हिट आहेत. आजही ती गाणी ऐकली जातात , यू टयूब वर प्रचंड प्रमाणावर बघीतली जातात.
ठाण्यातील राजेश खन्ना यांचे सर्वात मोठे फॅन विलास घाटे यांच्याकडे राजेश खन्ना यांचे इतके मोठे कलेक्शन आहे तसे कुणाकडेच आणि त्याबद्दल त्यांना लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड ने सन्मानित केले आहे तर माझी हिस्सार मधील मैत्रीण आहे तिने तर राजेश खन्ना यांना आपला सहजीवन जोडीदार मानले असून ती हार्डली ३० ते ३५ वर्षाची आहे . असे अफाट प्रेम कदाचित कोणत्याही सुपरस्टारला लाभले नसेल.
या ‘ सुपरस्टारचे ‘ १८ जुलै २०१२ रोजी मुबंईत आजाराने निधन झाले. त्या दिवशी विले पार्ले येथील सर्व ‘ ट्राफिक जाम ‘ झाले अगदी अभिताभ बच्चन पासून अनेक सेलिब्रेटींना आपापल्या गाड्या सोडून पायी जावे लागले, त्याचप्रमाणे दुसऱ्या राज्यातून अनेक फॅन्सनी देखील मुबईला धाव घेतली होती आपल्या एकुलत्या एक ‘ सुपरस्टार ‘ ला शेवटचे पाहण्यासाठी.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply