ठेचकळे आंधळा मी काळोख्या पथात
आधाराचा हात देई पंढरीचा नाथ ।।
चुकीचाच धरला रस्ता, असा चालतो मी –
विषयवासनांच्या पंकीं अजुन लोळतो मी
मद-मत्सर-मोह यांचा संग नसे जात ।।
जरी मी न जाऊं शकलो कधी पंढरीला
मंदिरीं न पाहूं शकलो विटेवर हरीला
भाग्यवंत परि मी, विठ्ठल भेटला मनात ।।
पाडुरंगनाम येतां एकदाच माझ्या तोंडीं
स्वर्गानंदाच्या स्पर्शें पावन झाली कुडी
झरा अमृताचा अक्षय प्रगटला मुखात ।।
जगत्-भान हरपे माझें, अंतरीं निवालो
पाप सर्व जळलें माझें, पुण्यवंत झालो
जन्मचक्र-भीती विठ्ठल तोडतो क्षणात ।।
— सुभाष स. नाईक
पंढरीचा राणा
Leave a Reply