नवीन लेखन...

सूर गवसण्याचा आनंद

आपल्या घरात हार्मोनियम असावी अशी माझी खूप इच्छा होती. एक दिवस मी पेटी विकत घेतली आणि ती वाजवायला बसलो. याआधी मी कधीही पेटी वाजविली नव्हती. शुद्ध सूर कोणते, कोमल सूर कोणते, तीव्र सप्तक म्हणजे काय मला कशाचीही काहीही कल्पना नव्हती. मी उगाचच चाळा म्हणून पेटी वाजवत बसलो. बोटं फिरवता फिरवता पेटीतून सूर उमटू लागले. ते सूर कानावर पडताच एखादं गाणं आपल्याला वाजवता येईल का याचा मी विचार करु लागलो. एक गाणं मला सुचलं. मी ते पेटीवर वाजवता येतंय का याची चाचपणी करु लागलो. पेटीतून बाहेर पडणारे काही सूर त्या गाण्याच्या चालीशी मिळते जुळते होते, मात्र चालीशी न जुळणारेही अनेक सूर पेटीतून उमटत होते. पेटीतून हरतऱ्हेचे सूर उमटतात. त्यातील काही मोजकेच सूर चालीशी संबंधीत असतात. अन्य सूर एरव्ही मधुर भासत असले तरी चालीत बांधलेले नसल्यास कानांना कर्कश भासतात हा पहिला धडा मी शिकलो. आपण पेटी वाजवणं शिकायचंच हा निश्चय मी मनाशी केला. सध्यातरी कोणाकडे पेटी वाजवणं शिकण्याऐवजी स्वतःच्या स्वतः रोज धडे गिरवायचे असं मी मनाशी ठरवून टाकलं. मी नित्यनियमाने पेटी वाजवू लागलो.

त्यानंतर अमुक एक गाणं आपल्याला वाजवता येतं का हे मी रोज चाचपू लागलो. ही चाचपणी सुरु असताना आपल्याला हवा असलेला नेमका सूर गवसला की मनाला अभूतपूर्व आनंद मिळतो हे माझ्या ध्यानात आलं. सुरांच्या गर्दीतून नेमका तो सूर शोधणं म्हणजेच पेटी वाजविण्याचं कौशल्य हे साधं गणित मला उमगलं. मात्र हे कौशल्य अंगी भिनविण्यासाठी सतत रियाझ करणं आवश्यक आहे हे ही माझ्या ध्यानात आलं. ती मेहनत घ्यायला मी तयार होतो. या मेहनीतून एक अवर्णनीय आनंद मला सापडत होता. त्या आनंदासाठी रोज पेटी वाजविण्याचं व्रत मी स्वीकारलं. काही दिवसांनी पेटी वाजवणं आपल्याला बऱ्यापैकी जमतंय हे माझ्या ध्यानात आलं. आता पेटीतून उमटणाऱ्या चालीशी संबंधीत बसणाऱ्या कर्कश सुरांची संख्या रोडावत होती. थोडा नेट धरला की नेमके सूर उमटतात हे मी हेरलं. त्या सुरांचा मागोवा घेत खेळत राहण्यात मी तल्लीन होऊ लागलो.

पेटी वाजविण्यात तल्लीन झाल्यानंतर मनातले दुसरे विचार लुप्त होतात हेही माझ्या लवकर ध्यानात आलं. दैनंदिन कामकाजात आपल्या मनात सतत विचारांची आवर्तनं घोंघावत असतात. अनेकदा रात्री झोपेतही विचार करीत राहणं सुरुच असतं. कित्येकदा झोप मोडण्याची खोडी करण्यासही हे विचार धजावतात. पेटी वाजवताना मात्र हे विचार विनायास दूर पळतात हे माझ्या ध्यानात आलं. पेटी वाजवताना आपलं केवळ सुरांशी नातं जुळलेलं असतं. अन्य सर्व गोष्टी त्यावेळी नगण्य ठरतात. दैनंदिन कामाचा ताण हलका करण्यासाठी पेटी वाजवणं हा एक रामबाण उपाय आहे हे मला उमगलं आणि मी अक्षरशः प्रफुल्लीत झालो. आता बाहेरच्या जगात काय घडलं, माझ्याशी कोण कसा वागला आणि कोण काय बोलला, या क्षुद्र गोष्टींशी माझं कसलंही देणंघेणं उरलं नाही. मला माझ्या आनंदाचा मूळ स्त्रोत सपडला. त्या आनंदात हरवून जाणं मला सहजसाध्य झालं. उर्वरीत जगातील घडामोडींशी माझा कसलाही संबंध उरला नाही.

मी जसा पेटी वाजविण्याचा छंद जोपासला तसा प्रत्येकाने एखादा तरी छंद अवश्य जोपासावा. हा छंद जोपासण्याचा आनंद मनातले सर्व ताण सहजरित्या दर लोटतो. मात्र हा छंद जोपासताना एक पथ्य अवश्य पाळावं. ते म्हणजे, या छंदातून पुन्हा आणखी काही मिळविण्याचा अट्टाहास कधी धरु नये. छंद हा केवळ छंदासाठी जोपासायचा असतो. आपण पेटी वाजविण्याच्या छंदाचंच उदाहरण घेऊ. पेटीचा रियाझ करताना मी एक दिवस जगातला सर्वोत्कृष्ट पेटीवादक होईन, माझं पेटीवादन ऐकून लोक थक्क होऊन जातील, माझ्या हार्मोनियमच्या वादनाच्या सी.डी. निघतील, माझे देशविदेशात कार्यक्रम होतील, मला उत्तम पैसा मिळेल, प्रसिद्धी मिळेल असले मनोरथ कधीही कुणी हाकू नयेत. कारण अपेक्षा ठेवली की अपेक्षाभंगही जोडीनेच येतो आणि फार मोठी अपेक्षा ठेवली की नैराश्य ! थोडक्यात पेटी वादनातून आपल्याला काही मिळवायचं आहे किंवा काही मिळणार आहे हा विचार बाजूला सारुनच पेटी वादनाकडे म्हणजेच आपल्या छंदाकडे वळायचं असतं.

दुसरं पथ्य पाळायचं ते कुणाचंही अनुकरण न करण्याचं. अमका पेटी वाजवतो म्हणून मीही पेटी वाजवीन, तो क्रिकेट खेळतो म्हणून मी क्रिकेट खेळेन, तो स्विमिंगला जातो म्हणून मीही स्विमिंगला जाईन असं अनुकरण कधीही करु नये. आपला जीव कशात रमतो हे प्रत्येकाने स्वतःच शोधून काढायचं असतं. व्यक्ती तितक्या प्रकृती तसेच व्यक्ती तितके छंद हे ध्यानात ठेवावं. संगीत, अभिनय, खेळ अशा अनेक प्रकारच्या छंदातून आपला नेमका छंद कोणता हे आपणच हुडकून काढावं. कारण दुसऱ्याचा छंद हा कदाचित आपली डोकेदुखी ठरण्याचाही संभव असतो. म्हणून आपली नाळ कशाशी जोडली गेली आहे ते आपणच शोधावं . हा नेमका छंद सापडणं म्हणजेच अचूक सूर गवसणं असंही म्हणता येईल.

छंद जोपासण्यासाठी दररोज ठराविक वेळ देणंही आवश्यक ठरतं. आपण सर्व आरंभशूर असतो. काहीही करायचं म्हंटलं की सुरुवातीचे काही दिवस आपण अट्टाहासाने त्याच्या मागे लागतो. मात्र काही दिवस लोटल्यानंतर मध्येच काहीतरी महत्त्वाचं काम निघतं आणि छंद बाजूला पडतो. काही दिवस लोटले की आपण अमुक छंद जोपासणार होतो याचाही आपल्याला विसर पडतो. मध्येच कधीतरी त्या छंदाची आपल्याला आठवण होते आणि मग मनाला चुटपूट लागून राहते . आपलं चुकलंच ही जाणीव पदरी दुःखाचंच दान देऊन जाते. यावर उपाय म्हणजे दररोज नियमाने छंदासाठी वेळ काढणं. वेळेचं नियोजन हा मोठा विषय आहे. दिवसातल्या चोवीस तासांतून ठराविक गोष्टींसाठी ठराविक वेळ काढता आला की बरंच काही साध्य होतं. आपण जसा नोकरीधंद्यासाठी वेळ काढतो, कुटुंबियांसाठी वेळ काढतो, जगात काय चाललंय ते घेण्यासाठी वेळ काढतो तसाच वेळ छंद जोपासण्यासाठी काढावा. असा वेळ काढता जाणून आला की आपलं छंदाशी अतूट नातं जुळून येतं.

छंदाशी नातं जुळून घेणं म्हणजे एकप्रकारे स्वतःशीच नातं जुळून येणं. आयुष्याच्या कोलाहलात आपल्याला अनेक गोष्टींसाठी वेळ असतो. वेळ नसतो तो केवळ स्वत:साठी, वेळ नसतो तो केवळ आपला आतला आवाज जाणून घेण्यासाठी. तो वेळ काढता आला की आपल्याला स्वतःच्या सामर्थ्यांची, अंगभूत कौशल्यांची जाणीव होऊ लागते. आपला आत्मविश्वास द्विगुणीत होतो आणि आयुष्याला सामोरं जाण्यासाठी आपण सिद्ध होतो. दिवसातला केवळ अर्धा पाऊण तास आपल्याला उरलेल्या तासांशी सामना करण्याचं सामर्थ्य देऊन जातो. मी जर पेटी वाजवू शकतो तर मी परिपूर्ण आहे, माझ्यात कसल्याही उणिवा नाहीत हा आश्वासक विचार आपल्याला व्यक्तिमत्त्व विकासाची गुरुकिल्लीच हाती देऊन जातो. ही गुरुकिल्ली हाती गवसली की अलिबाबाची गुहाच आपल्यासमोर उलगडली जाते.

भोवतालचं तेच ते कंटाळवाणं जग आपल्याला नवं भासू लागतं. सूतावरुन स्वर्ग गाठता येतो ही म्हण कदाचित मूळात सूरांवरुन स्वर्ग गाठता येतो अशी असावी. तो नेमका सूर गवसणं म्हणजेच स्वर्गलोकीचं सुख भुतलावर उपभोगणं, जीवनाला वेगळा अर्थ मिळवून देणं आणि अक्षय सुखाचा खजिना लुटणं!

-सुनील रेगे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..