मराठी सिनेमानं गेल्या काही वर्षांत कात टाकली अन् सिनेसृष्टीतील विविध अंग हायटेक होण्याच्या तयारीत असल्याचं दिसू लागलं. यातील संगीत हे महत्त्वाचं अंग सांगता येईल. डिजिटल टच लाभलेलं संगीत श्रोत्यांना सुश्राव्य कसं होईल यासाठीची धडपड संगीतकाराची असते. त्याशिवाय उत्तम संगीत सिनेमात असावं यासाठी संगीतकारासोबतच सिनेमाच्या दिग्दर्शकाचं आणि निर्मात्यांचाही कल असतो. सिनेमा रूपेरी पडद्यावर झळकण्यापूर्वी सिनेमाचं संगीतच त्याची ओळख निर्माण करत सिनेमाचा प्रवास हादेखील आता काही अंशी संगीतावर अवलंबून असल्याचं तंत्र सांगतात. मराठी सिनेमांच्या संगीतासाठी सध्या आघाडीच्या नावांमध्ये घेतलं जाणार एक नाव म्हणजे चिनार-महेश. चिनार खारकर आणि महेश ओगले या जोडगोळीने संगीतकार म्हणून मराठीतल्या अनेक सिनेमांच्या गाण्यांना संगीत दिलं.
चिनार खारकर आणि महेश ओगले या दोघांनी एकत्रच मराठी सिनेइंडस्ट्रीत संगीतकार म्हणून श्रीगणेशा केला तो २००४ साली. ‘ओटी कृष्णामाईची’ या मराठी सिनेमानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. ‘खेळ मांडला’, ‘शर्यत’, ‘मान – सन्मान’, ‘हिप हिप हुर्रे’, ‘मुन्ना भाई एसएससी’, ‘उचला रे उचला’, ‘भेटली तू पुन्हा’, ‘विठ्ठला शपथ’, ‘उर्फी’, ‘कॅरी ऑन देशपांडे’, ‘यंटम’ या आणि अशा अनेक सिनेमांना त्यांनी संगीत दिलं, तर अनेक व्यावसायिक जाहिरातींसाठीच्या जिंगल्सनाही त्यांनी संगीत दिलं आहे. सध्या गाजत असलेल्या रवी जाधव दिग्दर्शित ‘न्यूड’ सिनेमाचं संगीत संयोजक म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे, तर ‘शिकरी’ सिनेमातील ‘जवानी तेरी’ या गाण्यासाठीच संगीतही त्यांचंच आहे. ‘बालक पालक’, ‘टाइमपास’, ‘टाइमपास 2’ या रवी जाधव दिग्दर्शित सिनेमातली गाणी तुफान गाजली. या साऱयाच श्रेय संगीतकार म्हणून चिनार-महेश यांच्याकडेच आहे.
मुंबई सोबतच ठाण्यातही अनेक हायटेक स्टुडिओंची निर्मिती झाल्याने ध्वनिमुद्रणाचा प्रवास सुखकर झाला आहे. चिनार-महेश यांच्या स्टुडिओत त्यांचं एक वेगळं पोर्टेट आणि कँडिड शूट करायचं आम्ही निश्चित केलं. चिनार-महेश यांच्याशी संगीतावर सुरुवातीला मनसोक्त गप्पा झाल्या. यातून त्यांचा संगीतातला प्रवास अलगद उलगडत गेला. चिनार-महेश यांचं नेमकं कसं शूट करावं हे यातूनच सूचत गेलं आणि त्यांचे ठोकळय़ातले पोर्ट्रेटस् न टिपत ऍक्शन शूट करावं असं मी ठरवलं. एखाद्या संगीतकाराचा लाईव्ह परफॉर्मन्सचं वाटावा असा माहोल मला उभा करायचा होता आणि म्हणून त्यांच्या स्टुडिओत माझ्या सहाय्यक टीमनं मी सांगितल्याप्रमाणे लाईटस् सेटअप केल्या.
एरवी फोटोशूटला वापरल्या जाणाऱया लाईटस् या न्यूट्रल रंगाच्या कशा येतील जेणेकरून फोटोतील रंग नैसर्गिक कसे वाटतील याकडे माझं लक्ष असतं, मात्र चिनार-महेशच्या फोटोशूटसाठी रंगीत लाईटस्ची गरज होती. त्याशिवाय शूटसाठीचा माहोल तयारच झाला नसता. यासाठी स्टुडिओ लाईटस्ला रंगीत जेल आणि मोडीफायर्स लावून हा मूड क्रिएट केला गेला. चिनार-महेश कुठे बसतील याची जागा निश्चित करून त्यामागे काही स्टुडिओ लाईटस् हे रांगेत ठेवले गेले. या लाईटस्चे रंग मुद्दाम वेगवेगळे ठेवले गेले. हे सारे लाईटस् जास्त तीव्रतेचे होते, तर चिनार-महेशच्या चेहऱयावर मला एक ग्लो हवा होता तो मिळवण्यासाठी मला कॅमेऱयाच्या जवळ कमी तीव्रतेचा फ्लॅश वापरून हे शूट करावं लागलं होत.
शूटची सगळी तयारी झाली. महेशने त्याची आवडती गिटार काढली आणि त्याचे सूर छेडत गायलाच सुरुवात केली. महेशच्या जोडीने चिनारनेही त्याला साथ देत त्याच्या आवाजात सूर मिळवत गायला सुरुवात केली आणि बघता बघता त्यांची एक मैफलच सुरू झाली.
चिनार-महेश यांनी संगीतबद्ध केलेली गाणी एका पाठोपाठ एक ते गात होते आणि या त्यांच्या परफॉर्मन्समध्ये ते इतके एकरूप झालेले की, त्यांना मध्ये थांबवण्याचा धाडस न करता मी त्यांचे कँडिड फोटो विविध अँगलमधून टिपत होतो. ही मैफल साधारणपणे २०-२५ मिनिटे चालली. यानंतर लाइटस्मध्ये काही बदल करून मी आधी काही पोर्टेट टिपले, तर यानंतर पुन्हा स्टुडिओ लाईटस्च्या जागा बदलून आणि त्यातील लाईटस्ची प्रखरता बदलून पुन्हा काही कँडिड कॅमेराबद्ध केले.
सुमारे दोन ते अडीज तास हे शूट अखंड सुरू होतं. यानंतर मला मिळाली एक अविस्मरणीय फोटोंची सिरिज. प्रामाणिक हावभाव, बेधुंद गाण्यात रमलेले सच्चे कलाकार आणि सुरांसोबत रंगाची झालेली उधळण हे सारं काही एकेक करत मला कॅमेऱयात टिपण्याचा आस्वाद लुटता आला. चिनार आणि महेश यांच्या तिथल्या परफॉर्मन्समधला प्रामाणिकपणा हा पुढे त्यांच्या कामातही सातत्याने पाहायला मिळाला. त्यांच्या याच कामाची पावती म्हणून त्यांना विविध पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलं आहे. आता येऊ घातलेल्या सिनेमांतून त्यांचं वेगळं काम नेहमीप्रमाणेच मराठी रसिकांवर मोहिनी घालेल यात काही शंका नाही.
— धनेश पाटील
dhanuimages@gmail.com
Leave a Reply