लहानपणी पहिलं गाणं कानावर पडलं ते ‘नाच रे मोरा, आंब्याच्या वनात’! या आवाजाचा ताबा कानाने तेव्हापासून घेतलाय, तो आजपर्यंत सोडलेला नाहीये.
सदाशिव पेठेत असताना घरात रेडिओ नव्हता. समोरच्या जबरेश्वर हाॅटेलमध्ये बुधवारी ‘बिनाका गीतमाला’ हा कार्यक्रम मोठ्या आवाजात लावला जात असे. तेव्हा अमीन सयानीच्या टिपीकल बोलीतून दहापासून पहिल्या ‘पायदान’पर्यंत एकेक गाणी ऐकलेला आशाताईंचा आवाज अजूनही कानात गुंजतो आहे.
१९७० साली ‘किशोर’ मासिक सुरू झालं. त्याची वार्षिक वर्गणी भरल्यानंतर येणारा प्रत्येक अंक मी अधाशीपणे वाचून काढायचो. त्यातील एका अंकात लतादीदींनी लिहिलेला ‘मांजर हवे, मांजर नको’ हा लेख वाचनात आला.
लता, आशा, उषा, मीना या चौघीही पोरसवदा वयात रस्त्याने जात असताना त्यांना एक मांजरीचे पिल्लू दिसते. चौघींनाही ते घेण्याचा मोह होतो. त्या विचार करतात की, आपण आपले काम झाल्यावर घरी जाताना त्याला घेऊन जाऊ. थोड्या वेळाने परत तिथून जाताना ते मांजरीचे पिल्लू जवळच्या डबक्यातील चिखलाने भरल्यामुळे त्यांना ते उचलावेसे वाटत नाही. या लेखासाठी प्रभाशंकर कवडी यांनी चित्रं काढली होती. त्यात या चौघी बहिणी व मांजराचे पिल्लू दाखवले होते
घरात ट्रान्झिस्टर आला. सकाळच्या भक्तीगीतांमधून आशाताईंचा आवाज ऐकत होतो. कधी त्यांच्या नाट्यगीतांतून कान सुखावत होते.
सत्तर सालानंतर मी हिंदी चित्रपट पाहू लागलो. आशा पारेखचा ‘तिसरी मंझील’ पाहिला आणि आशाताईंच्या सुमधुर गीतांनी वेड लावले. आशा पारेखची बरीचशी गाणी आशाताईंच्याच आवाजातील आहेत. ‘हरे राम हरे कृष्ण’ चित्रपटातील ‘दम मारो दम’ या गाण्याने तरूणाईला वेड लावले. आर. डी. बर्मन आणि आशाताई यांची सर्वच गाणी अप्रतिम आहेत.
भावगीत गाणाऱ्या आशाताई हा खरं तर प्रबंधाचाच विषय आहे. त्यांनी गायलेली भावगीतं आणि बाबूजींचं संगीत हा ऐकणाऱ्याला ‘अमृतयोग’ आहे.
मराठी चित्रपटांसाठी आशाताईंनी गायलेली गाणी हा मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णठेवा आहे. अंगाई गीतांपासून प्रणयरम्य, भक्तीगीतं, लावणी, लोकगीत सर्व प्रकारात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
१९३३ साली आशाताईंचा जन्म झाला. चार बहिणींमध्ये, लता नंतर आशा चौघींनीही गायनाच्या क्षेत्रात कारकिर्द केली. त्यातील मीनाचा सहभाग कमी आहे. दहा वर्षांची असल्यापासून आशाताई गाऊ लागल्या, चित्रपटांसाठी १९५० साल उजाडलं. ‘माझा बाळ’ या चित्रपटाने पार्श्र्वगायिका म्हणून सुरुवात झाली. १९५७ पासून हिंदी चित्रपटांसाठी त्या गाऊ लागल्या. १९६० पासून ओ. पी. नय्यर यांच्या संगीत कारकिर्दीत त्यांनी मानाचं स्थान मिळवलं. १९७१ पासून राहुल देव बर्मन यांच्यासोबत गायलेल्या गाण्यांतून इतिहास रचला. एकूण १४ भाषेत आजपर्यंत १२००० हून अधिक गाणी गायली आहेत.
या कारकिर्दीची भारत सरकारने दखल घेऊन २००१ साली सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार आशाताईंना प्रदान केला. देशविदेशात शेकडो कार्यक्रम केले. आज त्या नव्वदीच्या घरात आहेत, तरीदेखील त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असा आहे.
दादा कोंडके यांना चित्रपट निर्माते करण्यामागे आशाताईंनी शिफारस महत्त्वाची ठरली. त्यांनी भालजींना सांगितले व दादांनी ‘सोंगाड्या’ची निर्मिती केली. त्यानंतर दादांनी मागे वळून पाहिले नाही. यशाने त्यांना पायघड्या घातल्या
एवढं करुनही आशाताईंचे पाय जमिनीवरच आहेत. सर्वसामान्य माणसांप्रमाणे त्यांच्याही जीवनात चढ-उतार, सुख-दुःखं आली म्हणून त्यांनी हार मानली नाही.
त्याचीच परिणती म्हणून महाराष्ट्र सरकारने त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याचे कारण जाहीर केले. या पुरस्काराच्या घोषणेने त्यांच्या तमाम चाहत्यांना सर्वाधिक आनंद झालेला आहे
म्हणूनच मनापासून म्हणावसं वाटतं. ‘सुरा’ मी वंदिले.
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२६-३-२१.
Leave a Reply