आपल्या सुमधुर गळ्याने आणि तितक्याच सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची वाहव्वा मिळवून ठाण्याचे नाव संगीत रंगभूमीच्या प्रवाहात उजळवणारी अभिनेत्री म्हणजे मधुवंती दांडेकर. पुण्याला सहस्रबुद्धेंच्या घरी जन्मलेल्या मधुवंतीला गायनाचा वारसा मिळाला तो आई मनोरमाबाई सहस्रबुद्धे यांच्याकडून. आईच्या गळ्यातले गाणे लेकीच्या गळ्यात निसर्गदत्तपणे आले आणि मराठी नाट्यसंगीताच्या मैफिलीत एक कसदार सूर दाखल झाला. वयाच्या ९ व्या वर्षांपासून मधुवंतीचे शास्त्रीय संगीताचे शिक्षण पुण्याच्या भारत गायन समाजात सुरू झाले. ही सुरुवात होती एका गानहिऱ्याला पैलू पाडण्याची. वाढत्या वयाबरोबर गळ्यावरचे गाण्याचे संस्कार अधिक घट्ट होऊ लागले आणि मधुवंतीला वेध लागले संगीताच्या आभाळात भरारी घेण्याचे. आभाळ पंखांवर तोलायचं तर पंखात तेवढं बळही हवंच. त्यासाठी साधना सुरू झाली स्वरराज छोटा गंधर्व यांच्याकडे. छोटा गंधर्वांनी या शिष्येच्या गळ्यातील सूर नेमका हेरला आणि तिला उपशास्त्रीय, भक्तिसंगीत आणि नाट्यसंगीताचे धडे दिले. जाणकार गुरू मिळाल्यावर शिष्याचे व्यक्तिमत्त्व कसे खुलते याचे उदाहरण म्हणजे मधुवंतीताई. नंतर त्यांनी पं. ए. के. अभ्यंकर, पं. यशवंतबुवा जोशी यांच्याकडून मार्गदर्शन मिळवले. संगीत रंगभूमीवर आपल्या गानकौशल्याने आणि अभिनयाने रसिकांची मने जिंकणाऱ्या जयमाला शिलेदार यांचे मोलाचे मार्गदर्शनही त्यांना लाभले.
या सगळ्या तालमींनंतर जणू मधुवंतीताईंच्या सुरेल प्रवासाला नेमकी दिशा मिळावी म्हणूनच विधात्याने त्यांची लग्नगाठ जुळवली ती मोहन दांडेकरांशी. दांडेकर मूळचे आंजर्ल्याचे. त्यांच्याही घरी संगीत, नाट्यसंगीत याची आवड होतीच. त्यामुळे आपोआप मधुवंतीताईंचे गाणे लग्नानंतर अधिकच खुलले. लग्नानंतर वर्षभरातच म्हणजे १९६८ पासून त्या पती मोहन दांडेकर यांच्या प्रोत्साहनाने संगीत नाटकांमधून कामे करू लागल्या. त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले तेच मुळी नाटकाची पंढरी असलेल्या सांगलीमध्ये. शंकर घाणेकर, प्रसाद सावकार आणि गुरू छोटा गंधर्व या संचात त्यांनी ‘सौभद्र’ मध्ये रंगभूमीवर आपले पहिले पाऊल टाकले आणि एका सूरमयी प्रवासाला आरंभ झाला. ‘संगीत स्वयंवर’, ‘संशयकल्लोळ’, ‘एकच प्याला’, ‘रणदुंदभी’, ‘गर्वनिर्वाण’ अशा जुन्या गाजलेल्या नाटकांमधील नायिकांच्या भूमिका साकार करून मधुवंतीताईंनी नाट्यरसिकांवर आपल्या सुरेल स्वरांनी गारूड केलं.
त्यानंतर नाटककार विद्याधर गोखले यांच्या ‘रंगशारदा प्रतिष्ठान’तर्फे रंगमंचावर आलेल्या ‘मदनाची मंजिरी’, ‘सुवर्णतुला’, ‘भक्तराज धृवाचा तारा’, ‘मंदारमाला’, ‘झाला महार पंढरीनाथ’ इ. नाटकांतून बहारदारपणे भूमिका साकार केल्या. मराठी रंगभूमीप्रमाणेच अन्य भाषिक रंगभूमीवरही मधुवंतीताईंना भूमिका करण्याची संधी मिळाली. ‘त्राजवे तोळाया भगवान’ (सुवर्णतुलाचे रूपांतर) या गुजराती, तर ‘नेक परवीन’ या उर्दू नाटकात त्यांनी तितक्याच सहजपणे भूमिका केल्या आहेत. या सगळ्या रंगप्रवासात छोटा गंधर्व, राम मराठे, प्रसाद सावकार, रामदास कामत, चित्तरंजन कोल्हटकर, शरद तळवलकर, दाजी भाटवडेकर, मास्टर दामले, भालचंद्र पेंढारकर, दत्तारामबापू, अशोक सराफ या मराठी रंगभूमीवरच्या नामवंत अभिनेत्यांबरोबर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. तसेच त्यांचे पती मोहन दांडेकर यांच्याबरोबरही अनेक नाटकांमधून त्यांनी भूमिका केल्या.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेच्या विविध उपक्रमांमध्ये त्या मनपूर्वक सहभागी झाल्या. नाट्य परिषदेच्या ‘एकच प्याला’मध्ये त्यांनी सिंधू तर मोहन दांडेकरांनी भगीरथ साकारला होता. बालगंधर्व जन्मशताब्दी वर्षात त्यांनी आणि मोहनरावांनी नाट्य परिषदेच्या ‘मृच्छकटिक’ नाटकाचे संगीत दिग्दर्शन केले आणि त्या स्पर्धेत राज्य शासनाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले.
विद्याधर गोखले यांच्या ‘प्रेयसी ते परमेश्वर’, ‘खाडिलकरांचे गीत सौंदर्य’, ‘ओम नमोजी आद्या’, ‘खरा तो प्रेमा’, ‘केशव वंदना’ अशा कार्यक्रमांमधून त्या सहभागी झाल्या आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ‘रघुवीर सावकार सुवर्ण पदका’ ने त्यांचा गौरव करण्यात आला आहे. पं. राम मराठे पुरस्कार, बालगंधर्व गौरव पुरस्कार, भारत गायन समाजाचा मालती पांडे पुरस्कार, रंगशारदा ट्रस्टचा विद्याधर गोखले पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी या गाननिपुण अभिनेत्रीचा सन्मान झाला आहे. ठाण्याच्या नाट्यपरंपरेत आपल्या सोनस्वरांची मोहर उमटवणाऱ्या मधुवंती दांडेकर यांचा ठाणेकर नाट्यरसिकांना सार्थ अभिमान वाटतो.
–मधुवंती दांडेकर
Leave a Reply