MENU
नवीन लेखन...

टिप्पणी : ग़ज़लगो सुरेश भट, दुश्यंत आणि ग़ालिब

लोकसत्ता, मुंबई आवृत्तीच्या रविवार २४.१२.१७ च्या ‘लोकरंग’ पुरवणीत डॉ. राम पंडित यांची, ‘सुरेश भट आणि …’ या प्रदीप निफाडकरांच्या पुस्तकावर समीक्षा प्रसिद्ध झालेली आहे.

त्यातील दोनएक मुद्द्यांबद्दल हें पत्र. मी ज्या मुद्द्यांबद्दल लिहीत आहे, त्यांवरील राम पंडितांच्या भाष्याशी मी सहमत आहे.

एक गोष्ट उघड आहे, ती ही की सुरेश भट, ग़ालिब व दुश्यंत या तीन श्रेष्ठ ग़ज़लगोंची  तुलना करण्याची कांहीं आवश्यकता आहे काय ? साहित्य-समीक्षेच्या पुस्तकात एक वेळ आपण तुलनात्मक अभ्यास समजूं शकतो. मात्र, प्रस्तुत पुस्तक तशा प्रकारचें नाहीं.

सुरेश भट आणि दुश्यंत कुमार हे दोघेही श्रेष्ठ ग़ज़लगो आहेत, हें निर्विवाद. मात्र, ज्या ग़ालिबच्या शायरीची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य झालेली आहे, त्याच्या तुलनेत भट आणि दुश्यंत यांना कुणी ज्ञानवंत कदाचित् तुल्यबल ठरवूंही शकेल, पण त्यांना श्रेष्ठतर मात्र मुळीच ठरवूं शकणार नाहीं. परत, भटांना ग़ालिबपेक्षा श्रेष्ठ ठरवण्याचें कारण तर अगदी साहित्यबाह्य आहे. ग़ालिबच्या दृष्टीनें, पेन्शन मिळणें हा खरेंतर त्याचा हक्कच होता. त्यासाठी त्याला नाइलाज़ानें कंपनी सरकारचा उंबरठा झिजवायला लागला. आणि, तसें पाहिलें तर, आजच्या काळात ‘मटेरियल बेनिफिट’साठी सरकारची हांजी-हांजी करणारे साहित्यिक आपण पहात नाहीं काय? पण त्यांच्या साहित्यकृतींचा विचार करतांना असे साहित्यबाह्य मुद्दे ध्यानात घ्यायचे नसतात.

आतां दुश्यंत यांच्याबद्दल. जसें मराठी ग़ज़लच्या संदर्भात आपण ‘भटांपूर्वीची ग़ज़ल’ आणि ‘नंतरची ग़ज़ल’ असे भाग करतो व त्यानुसार विश्लेषण करतो, तसेंच हिंदी ग़ज़लच्या क्षेत्रात, ‘दुश्यंत से पहले’ आणि ‘दुश्यंत के बाद’ असे विभाग मानून विश्लेषण केलें जातें. म्हणजेच, या दोघांनीही आपापल्या भाषेतील ग़ज़लच्या क्षेत्रात एक नवीन युग निर्माण केलें. त्यामुळे, त्यांचे महत्व एक वेळ समतुल्य मानतां येईल, पण एकाला दुसर्‍यापेक्षा श्रेष्ठ मानतां येणार नाहीं.

परत, इथेंही भटांचे श्रेष्ठत्व काव्याच्या गुणवत्तेवरून नाहीं, तर अन्य कारणानें दाखविलें आहे. प्रत्येक कवी हा गुरु असतोच असें नाहीं. पण त्याच्या काव्याचा अभ्यास करतांना काव्याची गुणवत्ताच पहायची असते, किती शिष्य घडवले, हें नव्हे. आणखी एक गोष्ट ध्यानात घेणें महत्वाचें आहे. भट जरी व्याधिग्रस्त असत, तरी त्यांना दीर्घायुष्य लाभलें होतें. दुश्यंत यांचे वयाच्या केवळ ४२व्या वर्षीं निधन झालें !!  त्यामुळे, किती शिष्य घडवले या निकषावरील दोघांची तुलनाही अनुचित आहे.

व्यक्तिश: मला सुरेश भट व दुश्यंत कुमार या दोघांबद्दलही आदर आहे ( आणि अर्थातच, ग़ालिबबद्दल आहेच आहे). फक्त अनुचित मुद्द्यावरून  तुलना केली जाऊं नये, असें मला वाटतें. राम पंडित यांनी या बाबीचा योग्य तो समाचार त्यांच्या समीक्षेत घेतलेलाच आहे.

( पूर्वप्रसिद्धी : लोकसत्ता, मुंबई आवृत्ती, लोकरंग पुरवणी, दि. ३१.१२.२०१७)

– सुभाष स. नाईक

Subhash S. Naik

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 294 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..