नवीन लेखन...

पाकिस्तानचे ‘सर्जिकल ऑपरेशन’ सुरूच ठेवायला हवे

Surgical Strike on Pakistan

‘सर्जिकल स्ट्राईक’चे गांभीर्य कळायला उरी येथील लष्कराच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे गांभीर्य कळायला हवे. 18 सैनिकांचा जीव घेणारा हल्ला झाल्याने संपूर्ण भारतात संतापाची लाट पसरली.तेव्हा लष्कराच्या मानसन्मानाला ठेच लागली. त्यामुळे लष्कराचे मनोधैर्य ढासळण्याची शक्यता असते. अशा वेळी हल्ल्याचा निषेध केवळ शब्दांनी करून भागत नाही, तर दहशतवाद्यांना अद्दल घडेल अशा प्रकारे कृतीतून उत्तर द्यावे लागते. तेच लष्कराने केले.

भारतीय सैन्य ब्रह्मदेशातच नव्हे, तर पाकिस्तानातसुध्दा कारवाई करू शकते

29 सप्टेंबर, दुपारी 1च्या दरम्यान बातम्यांमध्ये सर्व भारतीयांच्या मनावरील साचलेले दाट मळभ दूर करणारी बातमी आली. आदल्या दिवशीच्या रात्री भारतीय विशेष पथकाने पाकिस्तानमध्ये 2-3 कि.मी. आत घुसून दहशतवाद्यांच्या तळावर हल्ले केले. सुमारे 25-28 कि.मी. अंतरावर पसरलेल्या 6-7 अशा छावण्या अचानक हल्ले करून उद्ध्वस्त केल्या. भारताचे सैनिकी कारवाई विभागाचे प्रमुख सैन्याधिकारी DGMO जन. रणाबीर सिंग यांनी ही माहिती दिली. सर्वच्या सर्व भारतीय कमांडो ती कारवाई आटोपून अल्पावधीत भारतात सुखरूप परत आले. या बातमीने भारतात एकच जल्लोश झाला. भारतीयांच्या मनावरील सावट दूर झाले.

भारतीय सैन्य ब्रह्मदेशातच नव्हे, तर पाकिस्तानातसुध्दा कारवाई करू शकते हे उघड झाले. एकाही सैनिकाची आहुती न देता हे घडवून आणले गेले, ही महत्त्वाची बाब होती. यामुळे अमेरिका, इस्रायल यासारख्या लष्करी कारवाया यशस्वी करणाऱ्या देशांच्या रांगेत भारत जाऊन बसला, ही अभिमानाची बाब होती.

आँखो देखा हालचा अट्टहास धरू नये

भारताने पाकिस्तानी दहशतवाद्यांविरुद्ध प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलीकडे केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक्स वरून सध्या चाललेले राजकारण दुर्दैवी आहे. या कारवाईबाबत शंका निर्माण करून केंद्र सरकारला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. भारतीय लष्कराने सरकारकडून मुक्तहस्त मिळताच आपले काम व्यवस्थित तडीला नेले. त्याची घोषणाही प्रचलित पद्धतीनुसार डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्सद्वारे देशासमोर केली आणि पुन्हा मौनाचा पडदा स्वीकारून आपली नित्यनेमाची कामे पूर्ववत सुरू केली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सरकारच्या या धोरणात्मक आक्रमकतेचे सर्व थरांतून स्वागत झाले. विरोधकांचीही या कारवाईला विरोधासाठी विरोध दर्शविण्याची प्राज्ञा झाली नाही, कारण संपूर्ण देशभावना या कारवाईमागे उभी होती. मात्र, ती तीव्रता ओसरताच काही नेत्यांनी या कारवाईचे निमित्त साधून आपले राजकारण पुढे दामटण्याचा प्रयत्न केला. ही कारवाई झालीच नाही असा दावा एखाद्याने करणे याचा सरळसरळ अर्थ आपल्या देशाच्या राजकीय नेतृत्वाबरोबरच भारतीय लष्करावर अविश्‍वास दर्शविणे ठरते, कारण या कारवाईची घोषणा लष्कराने अधिकृतपणे केलेली आहे.

या संपूर्ण कारवाईचे छायाचित्रण केलेले आहे .त्यातून या लष्करी कारवाईसंदर्भातील कोणतीही गुपिते उघड होऊ नयेत ही खबरदारी घेणेही अत्यावश्यक आहे. नाही तर पाकिस्तानला भारताने हाताळलेल्या तंत्राची माहिती उपलब्ध होऊ शकते. माजी लष्करप्रमुख शंकर राय चौधरी आदींनी हीच भीती व्यक्त केली आहे. अशा वेळी जी मंडळी पुरावे द्या, पुरावे द्या असे ओरडत आहेत, त्यांना हा काय तीन तासांचा सिनेमा वाटला? राष्ट्रहितासंदर्भात प्रत्यक्ष कारवाईवेळी संवेदनशील बाबींबाबत गोपनीयता पाळावी लागते. हा सरळ साधा संकेतही या महाभागांना ठाऊक नाही. आँखो देखा हालचा अट्टहास धरू नये! राष्ट्रहित आणि पक्षीय स्वार्थ यामधील फरक लक्षात घेता, या वाचाळ नेत्यांनी तोंड सांभाळूनच बोलावे. वृत्तवाहिन्यांवर प्रसिद्धी मिळते म्हणून उचलली जीभ लावली टाळय़ाला असे प्रकार होउ नव्हे.

‘सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय?

उरीतील हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने सीमारेषा पार करून पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला चढवला. सर्जिकल स्ट्राईक हा परवलीचा शब्द बनला. ‘सर्जिकल स्ट्राईक’ म्हणजे अतिशय हुशारीने नियोजन करून आणि नेमकेपणाने अंमलात आणलेली लष्करी कारवाई. या कारवाईमध्ये जे टार्गेट असते त्यांच्यावरच थेट हल्ला केला जातो. आजूबाजूच्या कोणालाही या हल्ल्याने नुकसान पोहोचणार नाही याची काळजी घेतली जाते.

भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण तळांना लक्ष्य करत त्यावर हल्ले चढवले. दहशतवाद्यांचे सात तळ उद्ध्वस्त करण्यात आले. त्यात पाकिस्तानच्या ९ सैनिकांसह ४० दहशतवादी ठार झाले. पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का आहे. ‘भारतीय लष्करानुसार यापूर्वीही ‘सर्जिकल स्ट्राईक’चा वापर करण्यात आला होता, परंतु त्याची उघड वाच्यता करण्यात आली नव्हती. यावेळी पहिल्यांदाच भारतीय लष्कराने केलेली कारवाई प्रसार माध्यमांसमोर उघड करण्यात आली.

पीओकेमध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राइकमुळे सर्वात जास्त नुकसान लश्करे-तैयबाला झाला आहे. भारतीय सैन्याच्या या कार्यवाहीमध्ये लश्करे तैयबाचे जवळपास 20 दहशतवादी ठार झाल्याचा खुलासा रेडियो इंटरसेप्ट्सच्या असेसमेंट रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. लश्करे तैयबा ही एक पाकिस्तानचा पाठींबा असलेली प्रतिबंधीत दहशतवादी संघटना आहे.हे असेसमेंट रिपोर्ट्स भारतीय लष्करा जवळ आहेत.यामध्ये पाकिस्तान आर्मी आणि इतर अनेक दहशतवादी संघटनादरम्यान रेडिओवर झालेला संवाद रेकॉर्ड आहे.

विद्युतगतीने सहा ते सात ठिकाणी अकस्मात नेमकी कारवाई

पाकिस्तानच्या हद्दीतील नेमक्या कोणत्या तळांवर हल्ला करायचा हे आदल्या दिवशी निश्‍चित झाल्यानंतर लष्कराच्या विशेष तुकडीने रंगीत तालीम केली. प्रत्येकाची जबाबदारी आधीपासून निश्‍चित होती. उरी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राईकचे प्लानिंग केले होते. हे ऑपरेशन 28 आणि 29 सप्टेंबर दरम्यान झाले. लष्करी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने नियंत्रण रेषेलगत उतरल्यानंतर तुकडीतील कमांडो अंधारात उपयुक्त ठरतील अशी उपकरणे आणि अत्याधुनिक आयुधे घेऊन नियंत्रण रेषा ओलांडत नकाशाच्या आधारे मार्गस्थ झाली. त्यानंतर एकापाठोपाठ लक्ष्य भेदण्यास सुरुवात झाली. अवघ्या काही तासांमध्ये विद्युतगतीने सहा ते सात ठिकाणी अकस्मात नेमकी कारवाई करून शत्रूच्या गोटात भंबेरी उडवत विशेष तुकडीतील ‘कमांडो’ २ ते २॥ कि.मी. अंतर पायी कापत पुन्हा भारतीय हद्दीत परतले.

भारतीय लष्कराने यापूर्वी सर्जिकल स्ट्राइकचा वापर भुतान,म्यानमार मधे,केला होता.पाकिस्तानविरोधात अशी कारवाइ चार वेळा पिओके झालेली आहे.पण ही कारवाइ भारतीय लष्कराने आपल्याच जबाबदारीवर केली.पाकिस्तानविरोधात एवढी मोठी कारवाइ प्रथमच झाली आहे. भारतीय लष्कराच्या शस्त्र दलात अनेक विभागांचा समावेश आहे. पायदळ प्रत्यक्ष शत्रूशी लढा देत असले तरी उर्वरित विभाग त्यांना सहाय्यकारी भूमिकेत असतात. मर्यादित वा सर्वंकष युद्धात ही सर्व दले एकत्र काम करतात, विशेष तुकडीचे काम त्यापेक्षा वेगळे असते.त्यांचा वापर शत्रुवर सर्जिकल स्ट्राइक/कमांडो रेड करता केला जातो.या मधे ६बिहार,१० डोग्रा(उरी हल्ल्यात १७ जवान याच बटालियनचे शहिद झाले होते) व पायदळाच्या अनेक घातक दस्त्यांनी भाग घेतला होता. ६बिहार,१० डोग्राला या हल्यामुळे त्यांच्यावर झालेल्या हल्याचा बदला घेता आला.यावेळच्या कारवाईचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच ‘कार्टोसॅट’ मालिकेतील ‘२ सी’ या ‘इस्रो’ने सोडलेल्या उपग्रहाची मदत घेण्यात आली. ‘कार्टोसॅट’ हा उपग्रहच लष्करासाठी आहे.पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी सर्जिकल स्ट्राईकचा आता धसका घेतला असून ३०० दहशतवादी फ़रार झाले.

जनमत या सर्व पाकीस्तान प्रेमींच्या विरोधात

सर्वांना वाटले होते की, गेली अनेक वर्षे जे घडले ते आताही घडणार. निषेधाचे खलिते, पाकिस्तानला इशारे, फारतर अमेरिकेकडून दोन्ही देशांना संयम पाळण्याचे फुकटचे सल्ले आणि नेहमीप्रमाणे त्यानंतर शांत शांत.

28, 29 सप्टेंबर मध्यरात्र ते पहाट या काळात चार तासांत सर्जिकल ऍटॅक मधे दहशतवाद्यांचे सात लॉन्चिंग पॅडस् उद्ध्वस्त केले. ही बातमी अगदी अभिमानाने भारतीय लष्कराच्या महासंचालकांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली.

काहीच दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी ‘सर्जिकल स्ट्राईक’बद्दल लष्कराचे आणि अन्य संबंधितांचे अभिनंदन केले, त्या वेळी ‘देर आए, दुरुस्त आए’ अशी आमची त्यांच्याबद्दलची भावना होती. एका जबाबदार विरोधी पक्षनेत्यासारखी त्यांची प्रतिक्रिया होती. पक्षीय भेदाभेद दूर ठेवून सर्वांनी एक झाले पाहिजे अशीच उरी येथील घटना होती. त्याला दिलेल्या चोख आणि धाडसी प्रत्युत्तराबद्दल सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही लष्कराचे तसेच विद्यमान सरकारचे अभिनंदन केले. त्यानंतर संजय निरुपम, अरविंद केजरीवाल, दिग्विजय सिंग – ज्यांना सर्व जण बेताल बोलण्यामुळेच ओळखतात, त्या नेत्यांनी ‘सर्जिकल स्ट्राईक’बद्दल कुशंका व्यक्त केली.

काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी हल्ला झालाच नाही, असल्यास त्याचे पुरावे सादर करण्याचे आवाहन केले. केजरीवाल यांनी हल्ल्याचे पुरावे सादर करण्याचे आवाहन केले. तोच प्रकार पाकिस्तानी कलाकारांची बाजू घेणाऱ्या बॉलीवूडच्या कलाकारांच्या बाबतीत घडला. सलमान खान, सुधींद्र कुळकर्णी, ओम पुरी यांनी केलेल्या विधानांचा बहुसंख्येने निषेध झाला. आज जनमत या सर्व पाकीस्तान प्रेमींच्या विरोधात गेले आहे.

देशावर दहशतवादी आक्रमण झाल्यानंतर थेट कारवाई करून दहशतवाद्यांना आणि शत्रूला धडकी भरवणारी कृती केली. सगळ्या जगाचा पाठिंबा मिळवत केली. संपूर्ण भारत देशाला या गोष्टीचा आनंद आणि अभिमान वाटला, पण या अभिमानास्पद कामगिरीनंतर ज्यांची पोटे दुखतात त्यांनी आपली डोकी तपासून घेतली पाहिजेत. भारतीय जनतेने या लोकांचे सल्ले, यांचे विचार, यांचा युक्तिवाद याकडे जरा सावधपणेच पाहिले पाहिजे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक गावांमधील लोकांशी बोलून असे हल्ले झाल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. लष्कराने कारवाईची चित्रफीत पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवल्याचे वृत्त आहे व या कारवाईची जाहीर वाच्यता करायची की नाही हा निर्णय सरकारवर सोपवला आहे.

पाकिस्तानने पुरावे सादर करा असा तगादा आणला तरी अन्य देशांच्या दबावाला बळी पडण्याचे कारण नाही. उलट पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांवर केलेल्या हल्ल्याची चित्रफीत जगापुढे आल्यास भारतीय लष्कराच्या कारवाईचे स्वरूप दहशतवादी गटांना समजू शकते.

भारत पाकिस्तान धोरणावरती भारतातिल शांततावादी तज्ज्ञांची पकड होती. त्यांच्या सल्ल्यानुसार आपण पाकिस्तान आपल्याशी कसाही वागला तरीही आपण मात्र त्यांच्याशी चांगलेच वागलो पाहिजे. तरच ह्रुदय परिवर्तन होउन पाकिस्तान आपला मित्र बनेल.आपल्याला आता देशांतर्गत देशद्रोही ताकदींशीही लढावे लागणार आहे.

नवाज शरीफ आणि लष्करप्रमुख राहील शरीफ यांच्यातील संघर्ष

नियंत्रण रेषेपलीकडे भारताने केलेल्या कारवाईला दुजोरा देणारी नवनवी माहिती उघड होत असतानाच पाकिस्तानच्या ‘डॉन’ या नामांकित वृत्तपत्राने सर्वोच्च पातळीवरील एका गोपनीय बैठकीत लोकनियुक्त सरकार आणि लष्कर/आयएसआयचे सर्वेसर्वा यांच्यात दहशतवादाविरुद्धच्या कारवाईसंदर्भात तणातणी होऊन ‘आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाकी पडायचे नसेल तर आता दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करावीच लागेल’ असे नवाज शरीफ यांनी त्यांना सुनावल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. याचाच भाग म्हणून आयएसआयचे महासंचालक रिझवान अख्तर आणि नवाज शरीफांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नासर जांजुआ हे चारही प्रांतांचा दौरा करून दहशतवादाविरुद्ध पावले उचलण्यास फर्मावणार आहेत. ही अत्यंत महत्त्वाची घडामोड मानावी लागेल. जागतिक स्तरावर एकाकी पडत चालल्याने पाकिस्तानी राजकीय नेतृत्व हादरले आहे. पाकिस्तानात लोकनियुक्त सरकार आणि लष्कर किंवा आयएसआय यांच्यातील संबंध किती ‘मधुर’ आहेत ते जगाला ठाऊक आहेच. त्यामुळे विद्यमान परिस्थितीत पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयवरील आपला प्रभाव कायम ठेवण्याची ही धडपड शरीफ यांनी चालवली आहे. यामुळे नवाज शरीफ आणि लष्करप्रमुख राहील शरीफ यांच्यातील संघर्षाला यातून तोंड फुटेल.

दहशतवादाविरुद्ध पावले उचलल्याशिवाय किंवा निदान तसा देखावा केल्याविना आता तरणोपाय नाही हे पाकिस्तानला कळून चुकले आहे. त्यामुळे कारवाईचा देखावा तरी पाकिस्तानला उभा करावाच लागेल. दहशतवाद्यांवरील कारवाईस चालना द्या असे त्यांनी लष्कराला वरील बैठकीत सांगितले असले, तरी त्यामागील उद्देश दहशतवादाला आळा घालण्यापेक्षा लष्कराला आणि आयएसआयला आपल्या मर्यादेत ठेवणे हा अधिक दिसतो.

वाटतोय तसा पाकिस्तान एकाकी नाही

सर्जिकल ऑपरेशन’नंतर पाकिस्तान बेहोश झाले, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर म्हणाले. अशा हल्ल्यांमुळे पाकिस्तान हादरले आहे काय? आपल्याला वाटतोय तसा पाकिस्तान एकाकी नाही.शब्द हवेत विरण्याआधीच सर्जिकल ऑपरेशन’नंतर लष्करी तळावर अतिरेक्यांनी ४ हल्ले केले आहेत. हे सर्व पाहिले तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. दहशतवाद हेच त्यांचे बळ आहे. हे बळ खतम होत नाही तोपर्यंत पाकिस्तान कायमचे कोमात जाणार नाही.

१९७१ च्या युद्धात भुत्तो यांनी गर्जना केली होती, भारत आमचे धर्मयुद्ध आहे!’ आठशे वर्षे आम्ही भारतावर राज्य केले. याच भुत्तोला पुढे भारतिय लष्कराने पराभूत केले व पाकिस्तानच्या लष्करशहांनी भुत्तोला फासावर लटकवून मारले.

आत्ताच्या सर्जिकल स्ट्राईक मुळे पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी हल्ले आणि काश्मिरप्रश्नाचे आंतरराष्ट्रीयकरण करण्याचे प्रयत्न थांबतील का? तर याचे उत्तर नाही असेच येणार आहे. पाकिस्तानी सैन्याला “कुराणिक कॉन्सेप्ट ऑफ वॉर” या पध्दतीचा अभ्यास करावा लागतो. पाकिस्तानी सैन्याने आपल्या शत्रुंशी कसे लढावे हे त्यातून शिकवले जाते त्या पुस्तकातील दोन महत्त्वाची तत्वे आपण पाहू.

पहिले तत्व-दहशतवादाचा वापर एक राष्ट्रीय धोरण म्हणून केला जातो. दहशतवादामुळे भारत पाकिस्तानशी केव्हातरी वाटाघाटी करायला तयार होईल, असा पाकिस्तानचा समज आहे.दुसरे तत्व-पाकिस्तान हजारो वर्ष भारताशी लढाई करायला तयार आहे, त्यामुळे चर्चेने शांतता निर्माण होईल ही अपेक्षाच चुकीची आहे. ही लढाई अनेक वर्ष सुरु राहणार आहे.

भारताने आपल्या सर्व ताकदीचा वापर करुन पाकिस्तानला ते कधीही जिंकू शकत नाही हे दाखवून द्यायला हवे. भारताविरुद्ध लढण्याचा पाकिस्तानवर आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक परिणाम होणार आहे. त्यामुळे होणारे नुकसान पाकिस्तानसारख्या विकसनशील देशाला नक्कीच परवडणारे नाही.जो पर्यंत पाकिस्तान हे समजत नाही तोपर्यंत भारत पाकिस्तान यांच्या दरम्यानचे संबंध सुधारू शकणार नाही. भारत पाकिस्तान संबंध सुधारण्यासाठी आपल्याला पुढील अनेक वर्ष लढावे लागणार आहे.

चीनचा पाठिंबा

आज चीन पाकिस्तानच्या बाजूने ठामपणे उभी आहे व भारतावर सोडलेला प्रत्येक बॉम्ब आणि बंदुकीच्या गोळीवर चीनचाच शिक्का आहे. चीनला कश्मीरचे जे महत्त्व वाटत आहे, त्याला कारण कश्मीरच्या जवळून चीनच्या सिकियांग प्रांताला तिबेटशी जोडणारा अक्साई चीनचा रस्ता जातो. ज्याच्या ताब्यात कश्मीर तो सिकियांग व तिबेट यांच्यामधील दळणवळण तोडू शकेल. सिकियांग भागाला चीनचे मर्मस्थान समजावयास हरकत नाही. इस्लामाबादच्या ‘सार्क’ परिषदेवर भुतान, नेपाळ, मालदिव, बांगलादेश, श्रीलंकासारख्या राष्ट्रांनी बहिष्कार टाकला हा आनंद ठीक आहे. चीन पाकिस्तानला मदत करत आहे. त्यामुळे ‘सर्जिकल ऑपरेशन’नंतर पाकिस्तान बेहोशीत गेले, या भ्रमातून बाहेर पडण्यातच राष्ट्रीय हित आहे.

चीनच्या आर्थिक नाड्या आवळा

पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर राग व्यक्त करणार्‍या पोस्ट सोशल मीडियावर सातत्याने पडत आहेत. पण हे शब्दांचे बाण सोडून काही उपयोग नाही.पाकिस्तानला मदत करणारा शत्रू म्हणून चीन समोर येत आहे. अशा परिस्थितीत चिनी अर्थव्यवस्था बळकट करण्याचे काम जे भारतातून होत आहे ते आपण थांबवले पाहिजे. आपणच त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे .केवळ शाब्दिक बाण सोडून आणि सोशल मीडियावर व्यक्त होऊन आपले काम संपणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.चीनपासून तर सगळ्या पाकसमर्थक देशांना आपण नागरिक धडा शिकवू शकतो.

चिनी मार्केट जे आमच्या खाद्य संस्कृतीपासून झोपेपर्यंत प्रत्येक गरजेत घुसखोरी करते .ती थांबवली पाहिजे. ती थांबवण्यासाठी आम्हाला सरकारच्या मदतीची गरज नाही. चिनी मालावर सरकारने बंदी घातली नाही तरी आपण ते नाकारून तिकडे जाणारा पैसा वाचवू या. चिनी बनावटीचे स्मार्ट फोन नको. दिवाळीत होणारा चिनी फटाक्यांचा फाटफाट नको. चिनी माळांचा आणि दिव्यांचा लखलखाट नको. चायनीज खाणे बंद करून वेगवेगळ्या प्रांतांतल्या भारतीय पदार्थांवर ताव मारू. चिनी उत्पादने नकोत. असंख्य दर्जेदार अशा भारतीय कंपन्या आहेत. त्यांना आपण हात देऊ. मोठं करायचंच झालं तर आपल्या भारतीय उद्योजकांना मोठे करू. नागरिकांनी स्वयंखुषीने, स्वयंघोषित घातलेल्या आर्थिक निबर्ंधानेच या परकीय आर्थिक दहशतवादावर विजय मिळवता येईल. चीनच्या अशा प्रकारे आर्थिक नाड्या आवळल्या तर त्यांना पाकिस्तानला मदत करण्याचे भरल्या पोटीचे निरुद्योग सुचणार नाहीत. ते सरकारच्या नाही आपल्या हातात आहे. तेव्हा अगोदर चीनच्या आर्थिक नाड्या आवळू. चिनी उत्पादनांवर बंदी घालण्याचे धाडस केल्यावर सरकारला दखल घ्यावीच लागेल. शत्रूच्या अगोदर त्याला मदत करणार्‍या देशांचा बंदोबस्त महत्त्वाचा आहे.

केवळ एका ‘सर्जिकल ऑपरेशनने पाकिस्तानचा बदला घेतला असे होते काय? त्यामागची सगळी ताकद नमवणे महत्त्वाचे आहे.पूर्ण तयारीनिशी युद्धात उतरायला हवे. युद्धाचा हेतू शुद्ध हवा व आपण एकाकी लढतोय हे मनात रुजवायला हवे. आमची तशी तयार्रीं असेल तर उशीर कशाला? पाकिस्तानचे ‘सर्जिकल ऑपरेशन’ अनेक वर्षे सुरूच ठेवायला हवे.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..