MENU
नवीन लेखन...

‘सुरीली’ सफर

गुणगौरव’मध्ये जाहिरातींची कामं सुरु करण्याआधी आम्ही घरातूनच कामं करीत होतो. ऑर्केस्ट्राचं पहिलं काम केलं ते पपीशकुमार ललगुणकर यांच्या तिकीटाच्या डिझाईनचं. हत्ती गणपतीजवळ एक छोटा ‘लकी प्रिंटींग प्रेस’ होता. शहा व लाळे असे दोघेजण त्याचे पार्टनर होते. त्यांच्याकडे डिझाईनचं काही काम आलं की, ते आमच्याकडून करुन घ्यायचे. तेव्हा पपीशकुमार यांच्या ‘सुहाना सफर’च्या शो च्या तिकीटाचं डिझाईन आम्ही करुन दिलं. त्याआधी महेश कुमार आणि पार्टी, मेलडी मेकर्स यांच्यासारख्या ऑर्केस्ट्राच्या जाहिराती मी फक्त वर्तमानपत्रातून पहात होतो. प्रत्यक्ष आॅर्केस्ट्रा पहाण्याची संधी तोपर्यंत काही मिळालेली नव्हती.

पपीशकुमार यांची ओळख झाल्यानंतर ते डिझाईनसाठी आमच्याकडे येऊ लागले. मुकेशचा ‘सही रे सही’ आवाज ही त्यांची खासियत होती. त्यांनी मुकेशची गायलेली गाणी ऐकून स्वतः चित्रपट निर्माते-दिग्दर्शक राजकपूर यांनी पपीशकुमार यांना ‘व्हाॅईस आॅफ मुकेश’ ही पदवी दिली होती. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नोकरी सांभाळून त्यांनी आपला हा गायनाचा छंद जोपासला होता. मुकेश यांची तब्बल दोन हजार गाणी पपीशकुमार यांना तोंडपाठ आहेत.

वर्तमानपत्रातील ऑर्केस्ट्राच्या जाहिराती पाहून सुबोध चांदवडकर आमच्याकडे आले. रमेशचा कॉलेज मित्र, काशिनाथ फाटे व सुबोध हे गरवारे शाळेतील वर्गमित्र. सुबोधचा ‘सरगम ऑर्केस्ट्रा’ नावाचा शो होता. त्यां‌ची व्हिजिटींग कार्ड, लेटरहेड, पाकीटं अशी आम्ही स्टेशनरीची सर्व कामं केली. ते राहायला प्रभात रोडला होते. पोस्टर डिझाईनसाठी त्यांच्या घरी जाऊन एकदा फोटोसेशन केले. सुबोधची पत्नी, मेधा चांदवडकर या उत्तम गायिका आहेत. त्यांचेही भरपूर फोटो काढले. या फोटोंच्या वापर करून एक मोठे रंगीत पोस्टर डिझाईन तयार केले. त्या कामाच्या निमित्ताने ‘सरगम’ ऑर्केस्ट्रा’ अनेकदा पाहिला.

हळूहळू ऑर्केस्ट्राची डिझाईन करुन घेण्यासाठी पुण्यातील अनेक गायक कलाकार, निर्माते आमच्याकडे येऊ लागले. त्यामध्ये माणिक बजाज, कीर्तिकुमार काळे, हिम्मतकुमार पंड्या, डॉ. मालुसरे, विलास आडकर, मोहनकुमार भंडारी, वसंतराव दांडगे, प्रकाश शेळके, असे अनेकजण होते.

कीर्तिकुमार काळे हा एक महंमद रफीच्या आवाजात गाणारा उत्साही गायक होता. तो त्याच्या ख्रिश्चन पत्नीसह ऑफिसवर यायचा. पत्नी नोकरीला होती आणि हा आपला गायनाचा छंद आणि घर सांभाळत असे. काही वर्षांनंतर तो पुन्हा दिसला नाही.

माणिक बजाज हे स्वतः उत्तम गायक तर आहेतच शिवाय त्यांचा ‘म्युझिकल पॅराडाईज’ हा ऑर्केस्ट्राही आहे. त्यांनी अनेकदा परदेश दौरे केलेले आहेत. त्यांची डिझाईन्स केली. सोमवार पेठेतील त्यांच्या ऑफिसमध्येही अनेकदा गेलो होतो.

हिम्मतकुमारने सर्व गायकांची हुबेहूब गाणी गाऊन स्वतःच अस्तित्त्व अबाधित ठेवलं आहे. आजही तो आघाडीचा गायक कलाकार आहे. त्याच्या अनेक शोजची डिझाईन, ब्रोशर, पोस्टर केलेली आहेत.

विलास आडकर यांचं संगीत क्षेत्रात फार मोठं योगदान आहे. त्यांनी मराठी, हिंदी गाण्यांचे भरपूर शोज केले. ऑडिओ कॅसेट्स केल्या. संगीत संयोजनात त्यांचा हातखंडा होता. ते अॅकॉर्डियन उत्तम वाजवायचे. त्यांच्या अनेक शोजची डिझाईन केली, फोटो काढले. अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे विलास आम्हा दोघांनाही मोठ्या बंधूसारखे, आधारस्तंभ होते. अल्पशा आजाराने गेले, मात्र अजूनही विलासच्या सहवासातील क्षण आठवले की मन उदास होतं.

वसंतराव दांडगे हे खरं तर बांधकाम व्यावसायिक. त्यांना संगीताची मनस्वी आवड. त्यांनी काही कलाकारांना एकत्र आणून ऑर्केस्ट्रा सुरु केला. काही दिवसांनी त्यांनी हुमा खान या हिंदी चित्रपट सृष्टीतील हॉट डान्सरला आणून शो केला. शो होता नेहरु मेमोरियल हॉलमध्ये.‌ शोचे फोटो काढण्याचे काम माझ्याकडे होते. हुमा खान आल्यानंतर तिला पहाण्यासाठी शेकडों प्रेक्षक उतावीळ झाले. मेकअपरुमजवळ बघ्यांची ही गर्दी जमली. कसाबसा शो पार पडला, नंतर मात्र वसंतरावांनी हुमाचा ‘ह’ सुद्धा तोंडातून कधीही काढला नाही.

किशोरकुमारची गाणी गाणारा नितीन खमितकर हा विलास आडकर यांच्यामुळे संपर्कात आला. त्याने स्वतःचा ‘हिन्दुस्थानी’ नावाचा ऑर्केस्ट्रा सुरु केला. त्यामध्ये आताची मराठी चित्रपटातील सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (ज्युनिअर) डान्सर म्हणून उमेदवारी करीत होती. त्याने ‘हिट्स ऑफ किशोरकुमार’ नावाने भरपूर शोज केले.

फार्मास्युटिकल कंपनीमध्ये नोकरी करुन आपला गायनाचा छंद जोपासणारा राजेंद्र एकदा आमच्या ऑफिसवर आला. तो कुमार सानुचा परमभक्त आहे. त्याने अहमदाबाद मधील नोकरी सांभाळून पुण्यात येऊन शो केले. काही वर्षांनंतर पुण्यातच स्थायिक होऊन भरपूर शो केले. माझ्या रमणबागेतीलच तो माजी विद्यार्थी असल्यामुळे माझा खास मित्रही आहे.

पोलीस खात्यातील नोकरी केवळ उपजीविकेचे साधन म्हणून करताना स्वतःचा ‘मिलन’ ऑर्केस्ट्राच्या निर्मितीतून आनंद मिळविणारा नागेश थोरात आम्हाला इथेच भेटला. तो उत्कृष्ट ड्रमर आहे.

सुपेकर नावाच्या राजेश खन्ना सारखा दिसणाऱ्या एका गायकाने ऑर्केस्ट्रा सुरु केला. हा गायक खरं तर एका दैनिकाचा क्राईम रिपोर्टर होता. त्याने प्रयोग लावला की, पोलीसांच्या गळ्यात तो तिकीटं मारायचा. स्वतः मुकेशची दर्दभरी गाणी गात असे. ब्रह्मचारी होता, बिचाऱ्याला कोणत्याही मुलीनं पसंतच केलं नव्हतं. तो पैशाची शेवटच्या क्षणापर्यंत जमवाजमव करुन शो लावायचा. मागचीच देणी राहिल्यामुळे सर्वांच्या हातापाया पडूनच त्याने शो सुरु केलेला असायचा. मध्यांतराच्या आधी एक दोन गाणी गाऊन, मध्यांतर होऊन गेल्यावर उर्वरित कार्यक्रम सुरु करुन हा बेपत्ता होत असे. मग काही महिने तो अज्ञातवासात राही. आम्ही त्याचे अनेक शो पाहिले, शो झाल्यानंतर त्याने आम्हाला रिक्षाने घरी सोडलेले आहे. कधी शो संपल्यावर स्टेशनला जाऊन खाणेही केलेले आहे. तो एक अवलिया होता, त्याला सगळेजण ‘गुरखा’ म्हणायचे.

आम्ही पुण्यातील सर्व ऑर्केस्ट्रांची कामे केली, फक्त मेलडी मेकर्सचं काम केलेलं नव्हतं. ती संधी दहा वर्षापूर्वी मिळाली. स्वतः अशोक सराफ डिझाईन करुन घेण्यासाठी आले. त्यांची तिकीटाची, शोज ची भरपूर डिझाईन्स केली. त्यांच्यासोबत गप्पा मारल्या. त्यांनी अनेक किस्से सांगितले. एक वर्तुळ पूर्ण झालं.

पपीशकुमारांनी मुकेशजींचा दरवर्षी २७ ऑगस्टचा, स्मृतिदिनाचा शो कधीही चुकवला नाही. गेल्या वर्षी कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे त्यात खंड पडला. सुमारे चाळीस वर्षांहून अधिक काळ मुकेशची गाणी सादर करणारे पपीशकुमार आता निवृत्तीचे जीवन आनंदाने जगत आहेत. त्यांचे चिरंजीव मुकेश ललगुणकर, वडिलांचा वारसा पुढे चालवत आहेत. अतिशय शांत स्वभाव, अध्यात्माची आवड असणारे पपीशजी मनोरंजनाच्या क्षेत्रातील अजातशत्रू आहेत.

स्वरांच्या वाटेवर अशी सुरेल, सुस्वभावी माणसं भेटत राहिल्यामुळे आमचं कलाजीवनही सदाबहार राहिलं..

© सुरेश नावडकर.

मोबाईल ९७३००३४२८४

३-६-२१.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..