बघा बघा तो रवि चालला, अतिशय वेगानें ।
पूर्व दिशेला चंद्रही येई, त्याच तन्मयतेने ।।
युगानु युगें लपंडाव हा, त्यांचा चालला असे ।
भावांमधली शर्यत बघूनी, गम्मत परी भासे ।।
मोठा भाऊ रवि त्याला, पकडण्या धांव घेई ।
लहान भाऊ चंद्र असूनी, निसटून मात्र जाई ।।
संताप येता लाल होऊनी, रवि जाई तापूनी ।
परि शांत असे चंद्र बघा, राग घेई गिळूनी ।।
लहान असूनी थकून जाई, कांही काळ जाता ।
नभीं न येतां घरींच झोपे, थकवा जाण्या करीता ।।
विश्रांतीचा काळ घालवूनी, हलके हलके येई ।
पुनरपि त्यांचा खेळ बघतां, आनंद मनास होई ।।
Leave a Reply