सूर्यमण्डलस्तोत्रं अथवा सूर्यमण्डलाष्टकम् – मराठी अर्थासह
सूर्यमंडल स्तोत्र भविष्य पुराणांतर्गत एक भाग आहे. यालाच सूर्यमंडल अष्टकम् असेही नाव आहे (परंतु श्लोकसंख्या ८ पेक्षा अधिक आहे). सूर्याच्या स्तुतीला वाहिलेल्या या स्तोत्राची रचना इन्द्रवज्रा वृत्त तसेच अनुष्टुभ छंदात केली आहे.
येथे मुख्य स्तोत्रात सर्व श्लोकात ‘यन्मण्डलम्’ व ‘पुनातु माम्…’ हे शब्दप्रयोग समाईक आहेत. त्यांचे विविध अभ्यासकांनी वेगवेगळे अर्थ घेतलेले दिसतात. ‘यन्मण्डलम्’ चे अर्थ सौर कक्षा, सौर बिंब, सूर्याचे भ्रमण असे, तर ‘पुनातु’ चे पवित्र करो, रक्षण करो, प्रकाशित करो असे घेतलेले दिसतात.
नमः सवित्रे जगदेकचक्षुषे जगत्प्रसूती स्थितिनाशहेतवे ।
त्रयीमयाय त्रिगुणात्मधारिणे विरञ्चि-नारायण-शङ्करात्मने ।
मराठी- जगाची उत्पती, स्थिती आणि नाश यांच्या हेतूने जो जगाचा एकमेव डोळा आहे, सत्व रज तम असे तिन्ही गुण ज्याच्याठायी आहेत, तिन्ही वेद ज्यात समाविष्ट आहेत, ब्रहमा विष्णू आणि महेश यांनी ज्याची निर्मिती केली आहे, अशा सूर्याला नमस्कार असो.
नमू खगा, नेत्र जगा बघावया (खग – सूर्य)
तिन्ही अवस्था, त्रिगुणात्मका तया ।
तिघांस सामावुन घेत जो असे
त्रिदेव निर्माण जया करीतसे ॥
नमोऽस्तु सूर्याय सहस्ररश्मये सहस्रशाखान्वितसम्भवात्मने ।
सहस्रयोगोद्भवभावभागिने सहस्रसङ्ख्यायुगधारिणे नमः ॥
मराठी- ज्याचे हजारो किरण आहेत, ज्याचा संबंध हजारो युगांशी आहे (जो हजारो युगे आस्तित्त्वात आहे), जो योगाच्या हजारो शाखांचा स्रोत आहे, जो हजारो युगांचा आधारभूत आहे अशा सूर्याला नमस्कार असो.
युगे हजारो सहवास भानुचा हजार ज्याची किरणे प्रणाम त्या ।
सुरु जिथे योग सहस्र मार्गिका नमू युगाधार जगा हजार त्या ॥
यन्मण्डलं दीप्तिकरं विशालं रत्नप्रभं तीव्रमनादिरूपम् ।
दारिद्र्यदुःखक्षयकारणं च पुनातु मां तत्सवितुर्वरेण्यम् ॥ १॥
मराठी- जे बिंब अत्यंत तेजस्वी, विस्तीर्ण, एखाद्या रत्नासारखे प्रखर आहे, ज्याला कोणताही आरंभकाळ नाही, जे दारिद्र्य, दैन्य यांचा लोप होण्यास कारणीभूत आहे, ते सूर्याचे सर्वोत्कृष्ट (तेज) मला उजळून टाको.
जे बिंब तेजाळ विशाळ खासे
प्राचीन रत्नासम चंड भासे ।
दारिद्र्य दैन्यातुन मुक्ति देतो
आदित्य तेजे उजळो मला तो ॥ ०१
यन्मण्डलं देवगणैः सुपूजितं विप्रैः स्तुतं भावनमुक्तिकोविदम् ।
तं देवदेवं प्रणमामि सूर्यं पुनातु मां तत्सवितुर्वरेण्यम् ॥ २॥
मराठी- ज्या बिंबाची देवांकडून सुयोग्य पूजा केली जाते, ब्राह्मणांकडून स्तुती केली जाते, जे मोक्षप्राप्तीला हातभार लावण्यात प्रवीण आहे, त्या देवांच्या देवाला मी नमस्कार करतो. ते सूर्याचे सर्वोत्कृष्ट (तेज) मला उजळून टाको.
बिंबास सारे सुर पूजिताती
मोक्षप्रदाचे गुण विप्र गाती ।
त्या वंदना देवदेवास देतो
आदित्य तेजे उजळो मला तो ॥ ०२
यन्मण्डलं ज्ञानघनं त्वगम्यं त्रैलोक्यपूज्यं त्रिगुणात्मरूपम् ।
समस्त-तेजोमय-दिव्यरूपं पुनातु मां तत्सवितुर्वरेण्यम् ॥ ३॥
मराठी- जे बिंब (धर्मग्रंथातील) सर्व समजण्यास अवघड ज्ञान व्यापून टाकते, जे तिन्ही लोकात पूजनीय आहे, ज्यात तिन्ही गुण सामावले आहेत, जे पूर्णतः स्वर्गीय तेजस्वरूप आहे, ते सूर्याचे सर्वोत्कृष्ट (तेज) मला उजळून टाको.
जे बिंब व्यापी घनदाट ज्ञाना
अप्राप्य तेजे सकलां सुरांना ।
तिहीं गुणांनी जगि पूज्य होतो
आदित्य तेजे उजळो मला तो ॥ ०३
यन्मण्डलं गूढमतिप्रबोधं धर्मस्य वृद्धिं कुरुते जनानाम् ।
यत्सर्वपापक्षयकारणं च पुनातु मां तत्सवितुर्वरेण्यम् ॥ ४॥
मराठी- जे बिंब सामान्य जनांना गुप्त ज्ञान प्रदान करते, त्यांच्यामध्ये धार्मिक भावना वाढीस लावते, जे सर्व पातकांचा नाश करण्यात कारणीभूत ठरते, ते सूर्याचे सर्वोत्कृष्ट (तेज) मला उजळून टाको.
जे बिंब गूढात्मक ज्ञान देई
धर्मप्रसारा मदतीस येई ।
ज्या कारणे पातक नाश होतो
आदित्य तेजे उजळो मला तो ॥ ०४
यन्मण्डलं व्याधिविनाशदक्षं यत् ऋग्-यजुः-सामसु सम्प्रगीतम् ।
प्रकाशितं येन च भूर्भुवः स्वः पुनातु मां तत्सवितुर्वरेण्यम् ॥ ५॥
मराठी- जे बिंब विविध रोगांना नष्ट करण्यात तत्पर आहे, ज्याची स्तुतिगीते ऋग्वेद,यजुर्वेद आणि सामवेदात गायलेली आहेत, ज्याने भूः, भुवः आणि स्वः लोकांना उजळून टाकले आहे, ते सूर्याचे सर्वोत्कृष्ट (तेज) मला उजळून टाको.
जे र्बिंब तात्काळ व्यथांस नाशी
वेदत्रयी गात स्तुती पदांसी ।
जो तीन लोकांस उजेड देतो
आदित्य तेजे उजळो मला तो ॥ ०५
टीप- पृथ्वीच्या संदर्भात एकूण चौदा लोक कल्पिलेले असून त्यातील भुवः, स्वः, महः, जनः तपः सत्य हे लोक भू (पृथ्वी) लोकाच्या वर आणि अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसात्तल आणि पाताल हे भू लोकाच्या खाली कल्पिलेले आहेत. या श्लोकात फक्त भूः, भुवः आणि स्वः या तीनच लोकांचा उल्लेख आहे.
यन्मण्डलं वेदविदो वदन्ति गायन्ति यच्चारण-सिद्धसङ्घाः ।
यद्योगिनो योगजुषां च सङ्घाः पुनातु मां तत्सवितुर्वरेण्यम् ॥ ६॥
मराठी- ज्या बिंबाची वेद विद्येच्या जाणकारांकडून नेहेमी चर्चा केली जाते, सिद्ध आणि स्वर्गीय गायकांचे गट ज्याची गीते गातात, ज्याचे ध्यान योगी आणि योगविद्येचे साधक करतात, ते सूर्याचे सर्वोत्कृष्ट (तेज) मला उजळून टाको.
जे बिंब वेदज्ञ हि चर्चिताती
सिद्धांसवे गायक गीत गाती ।
योगी तसा साधक आठवीतो
आदित्य तेजे उजळो मला तो ॥ ०६
यन्मण्डलं सर्वजनैश्च पूजितं ज्योतिश्च कुर्यादिह मर्त्यलोके ।
यत्कालकालाद्यमनादिरूपं पुनातु मां तत्सवितुर्वरेण्यम् ॥ ७॥
मराठी- ज्या बिंबाची सर्व लोक पूजा करतात, जे या अशाश्वत पृथ्वीसाठी आकाशस्थ प्रकाश आहे, ज्याला सुरुवात नाही आणि जे काळाच्या मोजणीपासून आस्तित्त्वात आहे, ते सूर्याचे सर्वोत्कृष्ट (तेज) मला उजळून टाको.
जे बिंब सारेजण पूजिताती
जे नश्वर क्षितिस दिव्य ज्योती ।
आरंभ ना, काळ जिथे सुरू तो
आदित्य तेजे उजळो मला तो ॥ ०७
यन्मण्डलं विष्णुचातुर्मुखाख्यं यदक्षरं पापहरं जनानाम् ।
यत्कालकल्पक्षयकारणं च पुनातु मां तत्सवितुर्वरेण्यम् ॥ ८॥
मराठी- जे बिंब विष्णू आणि ब्रह्मा (उत्पत्ती आणि स्थिती) यांची प्रतिमाच आहे, जे अविनाशी आहे, (परंतु) इतरांच्या पापांचा नाश करते, जे कल्पांताचे कारण आहे, ते सूर्याचे सर्वोत्कृष्ट (तेज) मला उजळून टाको.
बिंबास साधर्म्य हरी-विरंची
पापे हरी शाश्वत तो जनांची ।
कल्पान्त, ज्याकारण नाश होतो
आदित्य तेजे उजळो मला तो ॥ ०८
यन्मण्डलं विश्वसृजं प्रसिद्धमुत्पत्ति-रक्षा-प्रलय-प्रगल्भम् ।
यस्मिञ्जगत्संहरतेऽखिलं च पुनातु मां तत्सवितुर्वरेण्यम् ॥ ९॥
मराठी- ज्या बिंबाने जगाची उत्पत्ती केली हे प्रसिद्ध आहे, जे उत्पत्ती, स्थिती आणि लय हे तिन्ही घडवून आणण्यास सक्षम आहे, ज्यामध्ये सर्व जगताचा विनाश होतो, ते सूर्याचे सर्वोत्कृष्ट (तेज) मला उजळून टाको.
जे बिंब निर्मी जगता प्रसिद्ध
स्थिती नि उत्पत्ति लयास सिद्ध ।
सारा जिथे विश्वविनाश होतो
आदित्य तेजे उजळो मला तो ॥ ९॥
टीप- सृज् या धातूचा ‘गरगर फिरणे-फिरविणे’ असाही एक अर्थ आहे. तो घेतल्यास, पहिल्या चरणाचा ‘ जे बिंब सर्व जगाला स्वतःभोवती गरगर फिरवते हे प्रसिद्ध आहे ’ असाही अर्थ होऊ शकेल.
यन्मण्डलं सर्वगतस्य विष्णोरात्मा परं धाम विशुद्धतत्त्वम् ।
सूक्ष्मान्तरैर्योगपथानुगम्यं पुनातु मां तत्सवितुर्वरेण्यम् ॥ १०॥
मराठी- जे बिंब सर्वव्यापी श्रीहरीचा आत्मा, श्रेष्ठ आणि पवित्र तत्त्व आहे, जे योगाच्या मार्मिक अभ्यासातून प्राप्त करता येते, ते सूर्याचे सर्वोत्कृष्ट (तेज) मला उजळून टाको.
जे बिंब आत्मा हरिचा पवित्र
सर्वत्र ज्याची गति सत्य सत्र ।
जो साधने योगिक प्राप्त होतो
आदित्य तेजे उजळो मला तो ॥ १०
यन्मण्डलं वेदविदो वदन्ति गायन्ति यच्चारण-सिद्धसङ्घाः ।
यन्मण्डलं वेदविदः स्मरन्ति पुनातु मां तत्सवितुर्वरेण्यम् ॥ ११॥
मराठी- ज्या बिंबाची वेद विद्येच्या जाणकारांकडून नेहेमी चर्चा केली जाते, सिद्ध आणि स्वर्गीय गायकांचे गट ज्याची गीते गातात, ज्याचे ध्यान वेदविद्येचे जाणकार करतात, ते सूर्याचे सर्वोत्कृष्ट (तेज) मला उजळून टाको.
जे बिंब वेदज्ञ हि चर्चिताती
सिद्धांसवे गायक गीत गाती ।
ज्ञानी-मनी आठव नित्य येतो
आदित्य तेजे उजळो मला तो ॥ ११
यन्मण्डलं वेदविदोपगीतं यद्योगिनां योगपथानुगम्यम् ।
तत्सर्ववेद्यं प्रणमामि सूर्यं पुनातु मां तत्सवितुर्वरेण्यम् ॥ १२॥
मराठी- ज्या बिंबाची वेदशास्त्रसंपन्न विद्वान स्तुती करतात, योगाच्या मार्गावर चालून योगीजनांना ज्याला अनुसरणे शक्य होते, अशा सुविख्यात ज्ञानाचा विषय असणार्याच सूर्याला मी प्रणाम करतो. ते सूर्याचे सर्वोत्कृष्ट (तेज) मला उजळून टाको.
ज्या वेदमूर्ती स्तुतिगीत गाती
योगी पथे ज्यास समीप जाती ।
विख्यात सूर्या मी नम्र होतो
आदित्य तेजे उजळो मला तो ॥ १२॥
सूर्यमण्डलसुस्तोत्रं यः पठेत् सततं नरः ।
सर्वपापविशुद्धात्मा सूर्यलोके महीयते ॥ १३॥
मराठी- जो माणूस सूर्यबिंबाचे हे सुंदरसे स्तोत्र नेहेमी म्हणतो त्याची सर्व पातके धुतली जाऊन, सौरलोकात त्याला गौरवास्पद स्थान मिळते.
स्तोत्र हे रविबिंबाचे गात मानव सर्वदा ।
पातके धुवुनी जाई सूर्यलोकी महत्पदा ॥ १३
इति श्री भविष्यपुराणे सूर्यमण्डलस्तोत्रं सम्पूर्णम् ॥
धनंजय बोरकर
(९८३३०७७०९१)
मी गणपत कोयनप्पा सोनवणे वय वर्षे 75 चालू मी रेणुका मातेचा उपसक असून माझ्या पूर्वजाकडून रेणुका मातेच्या कुलाचारांचा अवामान झाल्यानंतर झाल्याने सातव्या पिढीतील एका शाखेचा निर्वंश झाला. अधो गती कारणे. चौथ्या पिढीतील पूर्वजांनी रेणुका मातेचा फोडला त्या दोषाने माझे सर्व पूर्वज, अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांची पूर्तता करू शकले नाही. पण रेणुका मातेने माझे उत्तरदायित्व घेऊन माझ्यापासून घराण्याचा पुनरुधार केला. मला तिने एक प्रार्थना शिकविली होती.” हे सर्व नारायणा तुझ्या प्रकाशाने या पृथ्वीला सुख शांती समृद्धी वैभव आयुष्य आरोग्य वैभव कीर्ती आणि अध्यात्म प्रदान करतो त्याप्रमाणे माझ्या प्रपंचाला प्रधान कर. हे सूर्यनारायण हे सत्यनारायणा हे शेषनाराय ही प्रार्थना 50 वर्षा पर्यंत सूर्योदयाला माझ्याकडून करून घेतली. पाच वर्षांपूर्वी कोणीतरी मला हे सूर्य मंडळ स्तोत्र पाठविले ते नित्य सूर्योदयात ऐकतो आहे पण मला संस्कृतचे ज्ञान नसल्याने जरी अर्थ कळत नव्हता. तरी आशय देवीने दिलेल्या मंत्राचा असावा असे वाटत होते. त्या शंकेने प्रेरित होऊन आज मी सर्च केले असता. माझ्या शंकेचे निरसन झाले
रेणुका माता माझ्याकडून घराण्याच्या इतिहासाचे कारण करून ब्रम्हांड रचनेचे रहस्य प्रकट करून लिहून घेत आहे. तिच्या म्हणण्यानुसार माझे उत्तरदायित्व वयाच्या सातव्या वर्षापासून घेतले. आणि गत साठ वर्षात म्हणजे 26 जून 2017 मध्ये घराण्याचा पचनरउद्धार करून माइंड अटॅकचे निमित्त करून पूर्ण केले. की तुझी पुण्यतिथी समजून केवळ तुझ्या जन्मात चारी युगाचा इतिहास घडवला. हे युगांत असल्याने मला माझे रहस्य प्रकट करायचे आहे. म्हणून केवळ लिखाण कर असा आदेश दिला. (त्याची प्रष्ठी मारुती चिलमपल्ली कर्वे करवली.) गेली सात वर्षे प्रसव वेदना सहन करत लिहित आहे.लिखाणाची सुरुवात सोनवणे घराण्याचा इतिहास अशी केली, पण पुढे अर्थात आधी मी युगातील रेणुका महात्मा असे केले आहे. आपले मराठीतील भाषांतर मनाला अत्यंत भावले. कदाचित यामागे रेणुका मातेचा काही हेतू असावा. म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्याचे निमित्त करून हा प्रपंच धन्यवाद