आपल्या आयुष्यात मैत्र जीवाचे मिळणं हा खरोखरच नशिबाचा भाग असतो. मी मात्र त्या बाबतीत भाग्यवान आहे. मला माझ्या पौगंडावस्थेत, उमेदीच्या वयात फार चांगले मैतर मिळाले. माझ्या आयुष्याचा एक कोपरा या मित्रांनी व्यापलेला आहे.
पण या सगळ्यांमध्ये माझ्या जवळ आलेला माझा एक जिवलग होता रवींद्र एकनाथ गोसावी. तसं पाहिलं तर तो काही माझा लंगोटीयार नव्हता किंवा शाळा कॉलेजमधला मित्रही नव्हता. आमची ओळख झाली ती आमच्या कामाच्या म्हणजेच नोकरीच्या ठिकाणी. एका विदेशी बँकेत मी 1979 साली नोकरीला लागलो ते बँकेच्या घाटकोपर शाखेत, आणि 1981 मध्ये रवी बदली होऊन आमच्या या शाखेत आला. अगदी त्या दिवसांपासून ते बँकेतून 1999 मध्ये एकदमच स्वेच्छानिवृत्ती घेईपर्यंत आम्ही दोघे मनाने एकत्र होतो.
मला आठवतंय आमची नुकतीच ओळख झाली होती. आपल्या नोकरीसाठी रवी त्याच्या काका काकूंसोबत ठाण्यालाच राहात होता. त्याचे आईवडील जालन्याला होते. काकांच्या घरातलं वातावरण तसं मोकळं असलं तरी ते खूप orthodox होते. काकूंही परंपरा मानणाऱ्या आणि कर्तबगार. काकूंच्या व्यक्तिमत्वात गोडवा, अगत्य याचबरोबर त्यांच्या मनाचा थांग न लागणारा गुढ भाव होता. काका काकूना दुर्दैवाने आपत्य नव्हतं. रवी अगदी आपल्याच घरी असल्यासारखा तिथे रहायचा. परिस्थितीची जाण ठेवण्याचा शहाणपणा त्याच्यात घरच्या परिस्थितीतूनच आला होता, त्यामुळे कुरकुर कटकट न करता, परिस्थितीला हसत सामोरं जाण्याची मानसिकता त्याच्यात आली होती. रविचं बालपण तसं सर्वसामान्य वातावरण असलेल्या घरातच गेलं. आई वडील त्याच्यापेक्षा दोन थोरल्या बहिणी आणि त्याच्या नंतरची एक धाकटी बहीण असं षटकोनी कुटुंब होतं त्यांचं. रवीच्या सरळ साध्या स्वभावाप्रमाणेच त्याचा पेहरावही होता. कपड्यांची, छानछोकिची त्याला मुळात आवडच नव्हती. पण खवैय्या मात्र एक नंबरचा. पण त्यातही घरगुती पदार्थ त्याला मनापासून प्रिय होते. मेंदू अत्यंत तल्लख होता परंतू आर्थिक परिस्थितीने शिक्षणात फार मोठं करिअर करणं शक्य झालेलं नव्हतं. B.Sc. केल्यावर वडिलांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी मिळालेली पहिली नोकरी स्वीकारून मार्गाला लागला. कारण ते त्याचं प्राप्त परिस्थितीत पाहिलं उद्दिष्ट होतं. रवी आमच्या शाखेत बदली होऊन आला तो मात्र माझ्याशी मैत्रीचं नातं जोडायलाच. तसं पाहिलं तर आमचे स्वभाव खूप भिन्न होते. तो हुशार, तीव्र आकलनशक्ती असलेला, तर मी सर्वसामान्य बुद्धिमत्ता असलेला. तो शक्यतो मनात काही न ठेवणारा, जे असेल ते बोलून टाकणारा. तर मी एखादी गोष्ट मनात ठेवून देणारा. दोघातली सामायिक गोष्ट म्हणजे खवैयेगिरी. तो ब्राम्हण, घरात माशांचा म सुद्धा माहित नसतानाही हा प्राणी मासे खाताना काटे खायचेच बाकी ठेवणारा, तर मी सारस्वताच्याघरात जन्म घेऊनही समिष आहारापासून फारकत घेणारा. आता काकांच्या घरात अंड्यालाही मज्जाव होता हा भाग वेगळा. आता या सगळ्यात त्याच्यामध्ये असलेली त्रुटी म्हणजे आळशीपणा किंवा ठेविले अनंते तैसेचि रहावे ही वृत्ती. त्याने थोडासा प्रयत्न केला असता, बँकेची परीक्षा दिली असती तर नक्कीच तो उच्चपदावर गेला असता. पण…. असो,
आमची दोस्ती होण्याशी, ती वाढीला लागण्याशी आणि टिकून रहाण्याशी या वरच्या गोष्टींचा काहीही संबंध नव्हता. आम्हा दोघांनाही मनातल्या गोष्टी शेअर करण्यासाठी, समजून घेणारा मैतर हवा होता हे एक आणि दोघांचीही वेवलेंग्थ जुळली हे दुसरं आणि महत्वाचं. यामध्ये मी वर म्हटल्याप्रमाणे आमच्या काही आवडी निवडी सारख्या होत्या. त्यातली पहिली चविष्ट खाण्याची आवड, दोघेही मध्यमवर्गीय घरातले आणि दोघेही विवाह बंधनात अडकलेलो नव्हतो.
चित्रपट, नाटकाची किंवा संगीताची फारशी आवड रवीला नव्हती. म्हणजे मुद्दाम तिकिटं वगैरे काढून जाण्याचा उत्साह अजिबात नव्हता. परंतू त्याचबरोबर या सगळ्याबद्दल तो अनभिज्ञ होता असं अजिबात नाही. सांगायचा मुद्दा काय, तर आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव त्याला सतत आणि नेहमीच असायची. उगीच एखाद्याबद्दल कळवळा दाखवणं त्याला जमत नसे. पण एखादयाला खरच काही गरज आहे याची त्याला खात्री पटली की वेळ न दवडता तो मदतीला जात असे. दिखाऊपणा, भपका या गोष्टींचा त्याला मनस्वी तिटकारा होता. गणेश चतुर्थीला त्याच्या काकांकडे गणपती बसत असे. त्याला आपण मस्त डेकोरेशन करण्याबद्दल विचारलं तर तो फार उत्साह दाखवत नसे. परंतू बाप्पाची पूजाअर्चा, घरी येणाऱ्या पाहुण्यांचं आदरांतिथ्य हे सगळं तो मनापासून करायचा. आयुष्यात कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचं किंवा कोणत्या गोष्टींना अगदी किती गांभीर्याने घ्यायचं आणि कोणत्या गोष्टींना सोडून द्यायचं याचं गणित त्याच्या मनात पक्क होतं. तसं पाहिलं तर एक संवेदनशील आणि भावुक मन त्याच्यामध्ये दडलेलं होतं पण शक्यतो त्याला तो बाहेर येऊ देत नसे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींना कधीही दुखवायचं नाही, त्यांचा अपमान होईल असं वागायचं नाही, त्यांची चुकलेली गोष्ट मुद्दाम दाखवून द्यायची नाही किंवा मोठ्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट लहानांनी अमलात आणण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करायचा हे संस्कार रविवर झालेले होते. पण काही वेळा हे संस्कार त्याला मनापासून बोचायचे. असं काही घडलं की न राहवून ती गोष्ट अगदी पोटतिडकीने आणि गळ्याच्या शिरा ताणून यामध्ये त्याचंच म्हणणं कसं बरोबर होतं ते मला तो सांगायचा. पण ते ही तेव्हढयापुरतच असायचं. आमच्या घरी एखादे दिवशी कुणी नसेल, म्हणजे बाहेर गेले असतील की मला ही पार्वणीच वाटायची. ‘चल बाहेरून काहीतरी आणून किंवा हॉटेलमध्ये जाऊन मस्त खाऊया,’ असं मी उत्साहाने रवीला सांगायचो. पण तो मात्र माझा उत्साह मावळून टाकायचा. म्हणायचा, “कशाला हॉटेलमध्ये? आमच्याकडेही कोणी नाही. काकू पोळ्या करून गेलीय, आमटी, भाजी सुद्धा आहे. तू इकडेच ये, आपण मस्त जेऊया. पोळ्या कमी पडल्या तर आपल्यातली अर्धी मला वाढायचा. इतकं छान वाटायचं जेवताना, हॉटेलमध्ये जायला न मिळाल्याची आठवणही येत नसे. पोट अन्नाने आणि मन प्रेमाने तृप्त होऊन जायचं. घरचं अन्न असताना बाहेर जाऊन खर्च कशाला करायचा असा साधा सरळ दृष्टिकोन असायचा त्याचा. याचा अर्थ त्याला हॉटेलच्या जेवणाची allergy होती असा अजिबात नाही. हॉटेलमध्ये गेलो की ते सुद्धा व्यवस्थित चापायचा. अन्न वाया घालावणं त्याला बिलकुल आवडत नव्हतं.
1984 साली अचानक रवीचं लग्न ठरलं. अचानक म्हणजे रवीला हे स्थळ आलं ते रवी आणि त्याच्या घरच्या सगळ्यांचच तसंच काका काकूंचं श्रद्धास्थान श्रीं. कलावती आई (बेळगांव ) यांच्या मुलाकडून म्हणजे पूज्य दादांकडून. संगीता रेगे जी लग्नानंतर संगीता रवींद्र गोसावी झाली. रवी संगीताच्या लग्नाची तारीख ठरली 3मे 1984. लग्न बेळगांवला हरिमंदिरात(जिथेआईंचा पूर्वी वास होता) होणार होतं. मी रवीला माझी ट्रेनची सीट आधीच बुक करायला सांगितलं होतं. गोसावी मंडळींसह आम्ही वऱ्हाडी लग्नाच्या आदल्या दिवशी रात्रीच्या ट्रेनने बेळगावला जायला निघालो. रेगे मंडळीही श्रीं कलावती आईंची परमभक्त. रवी संगीताचा विवाह पूज्य दादा आणि वहिनींच्या (दादांच्या पत्नी ) शुभाशीर्वादाने साधेपणानेच संपन्न झाला. खूप पवित्र-प्रसन्न आणि आनंदी वातावरणात उभयतांनी एकमेकांना वरमाला घातल्या आणि रवी संगीताचा ‘संसार हा सुखाचा’ सुरु झाला.
1988 मध्ये मी ही चतुर्भुज झालो. माझ्या लग्नानंतर आम्ही रवीकडे अनेकदा एकत्र येऊन खवय्येगिरी आणि धमाल करत होतो. 1989 मध्ये जागेच्या विवंचनेने मी ठाणे सोडलं आणि संपत्नीक मुंबईच्या पश्चिम उपनगरातील दहिसर इथे राहायला आलो. यानंतर मी बँकेच्या मुख्य कार्यालयात आणि रवी घाटकोपर शाखेत असं झाल्यामुळे तसंच संसारीक जबाबदाऱ्या आणि इतर अनेक गोष्टींमुळे आमच्या भेटीगाठी खूपच कमी झाल्या. मधल्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. लहान मोठ्या अडचणींना तोंड देत आमचे संसार फुलत होते. यातच बँकेने तिसऱ्यांदा स्वेछानिवृत्ती योजना आणली आणि ती प्रत्येकाने स्वीकारावी यासाठी दबावही येऊ लागला. पुढे काय होईल या विवंचनेत जवळजवळ अर्ध्याच्या वर कर्मचाऱ्यांनी त्याला स्वीकृती दिली. रवीनेही स्वेछानिवृत्ती घेतली आणि थोड्याच दिवसांत तो एका ठिकाणी नोकरीलाही लागला. अर्थात हे मला मात्र काहीही माहित नव्हतं. त्याच काळात मी सुद्धा कांदिवलीला एका खाजगी कंपनीत नोकरी करत होतो. असाच एक दिवस संध्याकाळी ऑफिसमधून घरी जाण्यासाठी मी बसची वाट पहात स्टॉपवर उभा होतो.
“प्रसाद ” अशी हाक ऐकू आली. मी इकडे तिकडे पहात असतानाच समोर थांबलेल्या आणि गच्च भरलेल्या बसमधून लोकांना बाजुला सारत रवी बसमधून उतरत होता. त्याने मला स्टॉपवर उभं असलेलं पाहिलं होतं. इतक्या वर्षांच्या साठून राहिलेल्या गप्पा संपणं शक्यच नव्हतं. किंचित मन शांत झालं इतकंच. परंतू विधात्याच्या मनात मात्र वेगळंच आणि विश्वास बसणार नाही असं काही होतं. म्हणूनच की काय त्याने आमची शेवटची भेट घडवून आणली होती.
दि.2 ऑगस्ट 2011 हा रवीच्या आयुष्याचा अखेरचा दिवस लिहिला गेला होता. दिवसभर ऑफिसमध्ये काम करून
संध्याकाळी घरी यायला निघालेला रवी बसमध्येच बसल्या ठिकाणी हृदयक्रिया बंद पडून या जगातून निघून गेला. हा प्रचंड मानसिक धक्का संगीताला अक्षरशः आपादमस्तक हादरवून टाकणारा होता. या जगात आलेल्या प्रत्येक जीवाला कधीना कधी या जगातून जायचंच आहे हे त्रिकालबाधित सत्य असलं तरी प्रत्यक्ष, अकल्पित, अकाली बसणारा आणि आपल्या जीवनाचा चोळामोळा करून टाकणारा नियतीचा वार अक्षरशः होत्याचं नव्हतं करून टाकतो. मी फोनवर ही मन सुन्न करून टाकणारी बातमी ऐकली आणि संपूर्ण शरीर बधिर होऊन गेलं. डोळ्यांसमोर रवीची ओळख झाल्यापासून अगदी नुकतच शेवटचं भेटलो तिथपर्यंतचा प्रवास सरकू लागला. रवीच्या घरी आम्ही पोहोचलो. समोर त्याचा निष्प्राण देह शांतपणे शेवटच्या प्रवासाला निघाला होता. कुणाचं आणि कसं सांत्वन करणार होतो मी?
माझ्यावर सख्ख्या भावासारखं प्रेम करणारा, मला मनापासून सल्ला देणारा, वेळेला माझी कानउघडणी करणारा, माझ्या मित्र या संकल्पनेत अगदी चपखल बसणारा, आपल्यासमोर पाटावर बसवून मला जेवू घालणारा आणि जेवताना आपल्या वाट्याची पोळी मला वाढून माझं पोट आधी भरणारा रवी आठवतो. त्या जेवणाची चव पंचपक्वान्नालाही येणार नव्हती कारण रवीच्या निरपेक्ष आणि शुद्ध मैत्रीचीआणि मनाची चव त्या अन्नाला होती.
प्रासादिक म्हणे,
— प्रसाद कुळकर्णी.
Leave a Reply