नवीन लेखन...

सुटका

१९९७ मधे, लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाणे मुंबई येथे पोलिस निरीक्षक म्हणून मी नेमणुकीस असतानाची गोष्ट.

रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास मी ड्यूटी ऑफिसरशी चार्जरुम मधे बोलत असताना सहा सात तरुण मुलांचा घोळका हसत खेळत पोलिस ठाण्यात शिरला.

तीन गुजराथी, दोन बंगाली, एक केरळी अशी मुले आणि त्यांच्याबरोबर कपाळावर मोठ्ठं हळद कुंकू लावलेली डोक्यात बरेच गजरे माळलेली एक मुलगी. तिच्या हालचालींवरुन तिला साडी नेसून वावरायची अजिबात सवय नसल्याचे लगेच कळत होते. मुलगी तशी बावरलेली परंतु या घोळक्याच्या मूड मधे सामील होण्यासाठी उसनं अवसान चेहेऱ्यावर राखून होती हेही दिसत होतं. मुलगी सोडून सगळ्यांच्या तोंडात पानांचे विडे. नुकतेच कुठेतरी जेऊन आलेले दिसत होते.

“क्या है?”मी विचारलं.

“अम शादी किया”तो केरळी मुलगा बोलला.

घाईघाईने गुजराथी मुलाने त्या मुलीला प्रॉम्पटिंग केले.”तू भी बोल ना”.

तिने पुढे न येता, केरळी मुलाकडे बोट दाखवून,आधी ठरल्याप्रमाणे सांगितले,

“ये मेरा मरद हैं”.

लक्षात आले. पळून जाऊन केलेले लग्न.

“कभी हुई शादी?”.. मी

“आज शामको”.. गुजराथी मुलाने उत्तर दिले.

“कहां?”….. मी

“ओ…. उदर एक टेम्पळ ऐ. उदर”…. खास केरळी शैलीत नवरदेवाने उत्तर दिले.

“शामसे अबतक कहां थे?”..मी.

“अम पार्टी किया”.. नवरदेवाने सांगितले.

अच्छा.. म्हणून तोंडात पानं होती तर!

मुलगी गप्प गप्प होती. त्या तरुण मुलांच्या चेहेऱ्यांवर इतकी बेफिकिरी आणि अपरिपक्वता होती की हे सगळे भातुकलीमधील लग्न लाऊन आलेत की काय असा प्रश्न पडावा!

मी त्यांना माझ्या केबिनमधे बोलाऊन बसवले आणि ड्यूटी ऑफिसर ला माझ्या समवेत बसवून पुढील चौकशी सुरु केली.

मुलीला नाव पत्ता विचारलं. तिने नांव सांगितले. तिला कोणीतरी आधी सांगून ठेवले असावे.ती आई वडिलांचा पत्ता सांगायला टाळाटाळ करत होती. मात्र तिने महत्प्रयासाने चेहेऱ्यावर धरून ठेवलेल्या उसन्या अवसानाचा मुखवटा मधे मधे गळून पडतोय हे माझ्या लक्षात आले होते. मुलगी अत्यंत निरागस, सुस्वरूप आणि शांत स्वभावाची दिसत होती.

नावावरून कळलं होतं की ती गुजराती नागर समाजातील आहे. ती या केरळीवाल्याच्या प्रेमात पडली होती. त्याच्याबरोबर पळून चालली होती. आदल्याच दिवशी तिचा अठरावा वाढदिवस साजरा झाला होता. तिला काहीही विचारलं की ती त्या घोळक्याकडे पहात असे. त्यातील दोन गुजराथी तरुण तिला प्रॉम्पटींग करत असत. प्रथम त्यांना समज देऊन केबिनच्या बाहेर काढले.

हे दोघे गुजराथी बंधु, ठण्याजवळील एका मोठ्या रिसॉर्टची मालकी असलेल्या श्रीमंत घरातील.त्यांचे लहानपण गिरगावातील गझधर स्ट्रीट येथे गेलेले. त्यामुळे त्या भागातील पूर्वीपासूनच्या मित्रमंडळीबरोबर दररोज संध्याकाळ घालवण्याचा त्यांचा शिरस्ता.

मुलीचा जबाब घ्यायला लागेल आणि तो घेण्यापूर्वी खूप वेळ चौकशी करावी लागते. अशावेळी बाजूला कोणीही असता कामा नये असा नियम असल्याचे सांगून मी नवरदेवाला बाहेर थांबायला सांगितले. महिला पोलिस मुलीच्या बाजुला बसवून लग्नाबद्दल तिचे अभिनंदन केल्याचे दाखवत काही मिनिटे इकडच्या तिकडच्या गप्पा मारत तिचे दडपण दूर करून तिला बोलते केले.

मुलगी बोरिवलीच्या गुजराथी घरतील. दोन भावंडांपैकी ही मोठी. धाकटा १५ वर्षाचा भाऊ नववीत. वडिलांचा हिऱ्यांच्या दलालीचा व्यवसाय. हीने बारावीची परीक्षा दिली आणि कॉम्प्युटर चे कोर्सेस केले. नरिमन पॉइंट येथे वडिलांच्या एका नातेवाईकांच्या एक्स्पोर्ट कंपनी चे छोटे ऑफिस होते. तिथे ही क्लर्क म्हणून नोकरीला लागली. बोरिवलीहून रोज येण्या जाण्याचा त्रास नको म्हणून गिरगाव मधील गझधर स्ट्रीट येथे राहणाऱ्या मावशीकडे आई वडिलांनी तिला रहायला ठेवले. मावशीला अपत्य नव्हते. मुलीच्या घरी मांसाहार सोडा, तिने कधी अंडही जवळून पाहिले नव्हते. तिच्या घरी कांदा लसूण सुद्धा चालत नसे.

“अठरा वर्ष नक्की पूर्ण झालीत का तुला?”असे विचारले तेव्हा, मुलीने”हो”म्हणून घरून आणलेला शाळा सोडल्याचा दाखला नवरदेवाकडे आहे असे सांगितले. त्याला बोलावून तो प्रथम ताब्यात घेतला आणि तपासला.

तिचे वय आदल्याच दिवशी अठरा वर्ष पूर्ण झाले होते.

सासरचे गाव कोणते आहे असं विचारल्यावर”केरला”एवढंच उत्तर देणाऱ्या त्या मुलीला सासरी कोणकोण आहे किंवा त्यांच्या उदर निर्वाहाचं साधन काय याची काहीही कल्पना नव्हती. सगळाच पोरखेळ.

आदल्या दिवशी तिचा वाढदिवस असल्याने ती बोरिवलीला आईकडे घरी गेली होती. तेथून ती थेट ऑफिस मधे जाते असं सांगून गिरगावात ठरलेल्या ठिकाणी आली. तिने आणि नवरदेवानेही त्या दिवशी रजा घेतली होती. त्याच्या मित्रांनी साडी खरेदी करून आणली. तिने देवळात नेसली आणि देवळातील पुजाऱ्याने मंत्र म्हणून त्यांचे लग्न झाल्याचे सांगितले. मंगळसूत्र कुठे केलं विचारलं तेव्हा असं कळलं की लग्नाच्या वेळी साडी, गजरे, हार मित्रांनी आणले पण मंगळसूत्र आणायला मंडळी विसरली होती. देवळातून निघाल्यावर एका दुकानात जाऊन मित्रांपैकी एका गुजराथी मित्राने अगदी कमी वजनाचे सोन्याचा मुलामा लावलेले मंगळसूत्र घेऊन दिले. ते मुलीने दुकानातच स्वतःच्या गळ्यात घातले. सगळाच पोरखेळ.

मावशी आणि तिचे यजमान त्या दिवशी घाटकोपरला नातेवाईकांकडे काही समारंभाला गेले होते. त्यांना रात्री यायला उशीर होणार होता.

मुलीला दुसऱ्या खोलीत बसवून मी नवरदेवाची विचारपूस सुरू केली.

नवरदेवाचा मामा नरिमन पॉइंट येथे एका खाजगी कंपनीत अनेक वर्ष स्टेनोग्राफर म्हणून नोकरीस होता. गिरगावातील गझधर स्ट्रीट येथे त्याची एक सिंगल रूम होती. मुंबईतील त्याचा सर्व काळ या खोलीतच व्यतित करून आता निवृत्त होऊन तो कुटुंबासमवेत कायमचा राहण्यासाठी केरळला निघून गेला होता. निघता निघता कॉलेजची दोन तिन वर्ष पूर्ण केलेल्या आपल्या भाच्याला त्याने त्याच्या कंपनीत चिकटवले होते.

भाचा, म्हणजेच माझ्या समोर ऊभा असलेला नवरदेव तीन महिन्यांपूर्वीच मुंबईत आला होता. गिरगाव मधील घर, खानावळ म्हणून लावलेले हॉटेल आणि ऑफिसचा रस्ता या पलीकडे त्याला मुंबईची काही म्हणजे काही माहिती नव्हती. केरळमधे त्याच्या घरी आईवडील, दोन मोठे भाऊ, त्यांच्या बायका,त्यांची लहान लहान मुले,एक लहान बहीण असं एकत्र कुटुंब. मामाने राहायला गझधर स्ट्रीट येथील त्याची सिंगल रूम देऊन सोय केली होती. मात्र लग्नानंतर मामा त्या खोलीत संसार मांडून देईल की नाही याची शाश्वती नव्हती. गिरगांव ते नरिमन पॉइंट आणि परत, हा रोजचा प्रवास तो बस ने करत असे.

या मुलीची आणि त्याची ऑफिसला जाण्याची वेळ साधारण एकच. बस रूट क्रमांक सुध्दा एकच.

केरळहून आल्यावर साधारण एक महिन्यानंतर त्याची या मुलीशी बसस्टॉप वर ओळख झाली. ते रोज एकमेकांशी बोलू लागले. ती त्याला इंग्रजी शब्दांना हिंदी प्रतिशब्द सांगू लागली. आधी रोजच्या भेटी बसस्टॉप वरील आणि बसमधल्याच होत्या. त्यानंतर मात्र ऑफिस सुटल्यावर नरिमन पॉईंट येथील समुद्र किनाऱ्यावर थोडा वेळ फिरून त्यानंतर घरची बस पकडणे अशी प्रगति झाली.

हा मुंबईत एकटाच होता. ऑफिस मधून आल्यावर तो थेट मुंबादेवी जवळील धनजी स्ट्रीट येथे एका मंगलोरी हॉटेलमधे जेवायला जात असे. त्या हॉटेलातच खानावळ अशाकरता लावली होती की त्याला रोज मासे खायची सवय. त्याशिवाय त्याचे चालत नसे. जेऊन आला की घराच्या खाली उभ्या असलेल्या नव्याने ओळख झालेल्या, त्या परिसरातील सोनारकाम करणाऱ्या बंगाली कारागीर तरुणांसमवेत गप्पा मारत वेळ घालवत असे. ते गुजराथी तरुणही याच कोंडाळ्यातील. मित्रांना याच्या प्रेमप्रकरणाची माहिती मिळाली आणि सर्वांनी त्याचे लग्न तडीस नेण्याचं मनावर घेतले.

लग्नानंतर बायकोला तो गावी सोडून येणार होता आणि काही दिवसांनी गावाकडेच नोकरी शोधणार होता. सगळा बेभरवशी कारभार.या त्याच्या प्रेमविवाहा बद्दल गावाकडे कुणालाच काही कल्पना नव्हती.

लग्न”उरकून”ते सहा सात जणांचे समस्त वऱ्हाड मेट्रो सिनेमा समोर एका हॉटेलात गेले. लग्नाची पार्टी म्हणून तिथे जेवले आणि तिच्या घरच्यांनी काही तक्रार केलीच तर मुलीचे लग्न झाले आहे हे कळवण्यासाठी पोलिस स्टेशनला आले होते.

मुलीची कौटुंबिक पार्श्वभूमी, तिचे चित्रासारखे रूप, आतापर्यंत मांसाहाराशी तिचा दुरान्वयानेही न आलेला सबंध हे सगळे लक्षात घेता, तिन्ही त्रिकाळ मासे खाणाऱ्या अशा या नवऱ्याच्या घरी, त्याच्या अनुपस्थितीत, इतक्या दूरच्या केरळ राज्यातील एका खेड्यात, भाषेचाही प्रश्न असताना, एकत्र कुटुंबात कशी राहणार या विचाराने मीच विचारात पडलो.

काहीही करून या पोरीचे डोके ठिकाणावर आणले पाहिजे इतकाच विचार मनात येत होता.

मी मनात काही योजले. ड्युटी ऑफिसरला बाजूला घेऊन काही सूचना देऊन जीपसह रवाना केले.
त्या रात्री आमच्याच डिव्हीजनच्या एसीपी सरांचा नाईट राऊंड होता. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क पटकन् करता आला. त्यांना आणि माझ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाना, या केरळी युवक आणि गुजराथी मुलगी यांची कथा सांगितली आणि माझा प्लॅन सांगितला. दोघांनीही मला”Go ahead”सिग्नल दिला. एसीपी सरांना मी विनंती केली की आमच्या पोलिस स्टेशनची visit त्यांनी सर्वात शेवटी करावी. त्याना मी कारण सांगितले होते.
माझा ड्यूटी ऑफिसर सांगितलेले काम चोख बजावून २०/२५ मिनिटात परत आला. त्याला सांगितल्या प्रमाणे त्याने,मुलगी राहात होती त्या भागाच्या संबंधित पोलिस स्टेशनच्या नाइट ड्यूटी ऑफिसरला संपर्क करून मुलीच्या पत्यावर तात्काळ पोलिस पाठवून,तिच्या आई वडिलांनी अमुक एक नंबरवर फोन करावा असा निरोप देण्यास सांगितले. १५/२० मिनिटात तिच्या वडिलांचा फोन आलाच. माझ्या ड्यूटी ऑफिसरने त्यांना माझा निरोप दिला. मुलीच्या आत्ताच्या स्थितीची जुजबी माहिती दिली. आणि बाहेरगावी जाण्याच्या तयारीने पेट्रोल टाकी भरून, त्यांनी ड्रायव्हर सह एका कारमधे मुलीच्या आईला, कोणी सोबत असल्यास त्याच्याबरोबर आमच्या पोलिस स्टेशनमधे लवकरात लवकर पाठवावे असे सांगितले.येताना पोलिस स्टेशनच्या मागील बाजूस स्मॉल कॉजेस कोर्टासाठी असलेल्या गेट मधूनच गाडी आणून, पुन्हा गेटकडे तोंड करून ठेवावी असेही बजावले. तिची आई जवळच राहणाऱ्या मुलीच्या मामासह त्याच्याच कारमधून लगेच निघत आहे असे त्यांनी कळवले.

इकडे नवरदेवाची मंडळी पोलिस स्टेशन बाहेर उभे राहून हास्यविनोद करण्यात गर्क होती.

मुलीची आई येत आहे हे त्यांना बिलकुल कळून द्यायचे नव्हते. बरं, तिची आई यायला अजून दीड तास जाणार होता. म्हणून मग आरोपी अटक झाल्यावर भरायचे असतात तसले फॉर्म घेऊन त्या मुलीची आणि नवरदेवाची माहिती त्यामधे भरण्याचे नाटक केले. त्यात पाऊण तास घालवला.

इकडे मित्रमंडळ मधूनच आत येऊन काम कुठपर्यंत झालंय हे पहायला डोकावून जात होतं.

जसा तास उलटून गेला, तसं मी मित्रमंडळाला बोलाऊन खोटंच सांगितलं की नाईट राऊंड वर असलेले मोठे साहेब कामाच्या बाबतीत फार काटेकोर आहेत. त्यांनी तुम्हाला पाहिलं तर ते तुमचा प्रत्येकाचा जबाब घ्यायला हुकूम देतील आणि त्यात सकाळ उजाडेल. ते आता व्हीजीटला येण्याची वेळ झाली आहे. तेंव्हा तुम्ही पोलिस स्टेशन पासून जरा दूर थांबलेलं बरं. ते येऊन गेले की मग कळवतो.

मंडळी मग रस्त्याच्या पलीकडे असलेल्या G T हॉस्पिटलच्या आवारात गेली.

मुलीचे जबाब होईपर्यंत तुझंही काही काम नाही असं सांगितल्यावर नवरदेव सुध्दा जाऊन मित्रांच्यात सामील झाले.

मुलीचा जबाब सुरू करण्यासाठी म्हणून तिला बोलावून समोर बसवले. ठरल्याप्रमाणे रात्रपाळीचा”रिलीफ ऑफिसर”मला सांगत आला

“सर मी जे जे हॉस्पिटल मधे जाऊन येतो. जाळून घेतलेली ती कालची बाई मरण पावली. मेसेज आलाय”

“अरे अरे. वाईट झालं. तिच्या त्या मुलीला कळणारसुध्दा नाही आपली आई मरण पावली ते”… मीही मुद्दाम मोठ्याने बोललो.

समोरची मुलगी आणखी बावरली.

मी दोन मिनिटं मुद्दाम बाहेर गेलो. तेंव्हा अपेक्षेप्रमाणे तिने तिच्याबरोबर बसवलेल्या महिला पोलिसाला विचारलच.”क्या हो गया? कौन मर गया?”आधी
ठरल्याप्रमाणे महिला पोलिसनेही तिला सांगितलं

“कुछ नही. कोई औरतने उसकी लडकी पडोसीके साथ भाग गयी इसलीये खुदखुशी की l”
ही मुलगी आणखी कावरी बावरी झाली.

“तूझे खाना बनाना आता है?”मी विचारलं.

डोकं हलवून तिने”नाही”सांगितलं.

“अब व्हेज, नॉन व्हेज सब सिखेगी. जलदीही एक्स्पर्ट कूक बनेगी. क्योंकी मछली साफ करना, मुर्गी काटना ससुरालमे अब हररोज करना पडेगा.”

“कल birthday के लिये क्या खास बनाया था घरमे?”मी विचारलं.

“गाजर हलवा”.. खाली पहात ती म्हणाली.

“तुम्हारा फेवरीट?”.. मी विचारलं.

डोकं हलवून “हो” हे उत्तर.

“किसने बनाया था?” मी.

“मम्मी ने”…. इथे तिच्या डोळ्यात पाणी तरळलं.

माझा प्लॅन यशस्वी होण्याबद्दलच्या आशा पल्लवित झाल्या.

तेवढ्यात मागच्या गेटमधून एक गाडी आल्याचा आवाज आला. ड्युटी ऑफीसर चपळाईने तिकडे गेला. मुलीच्या मामाला गाडीतच बसायला सांगितले. माझ्या केबिनमधे आल्यावर मुलीला काहीही बोलायचे नाही असे सांगून तो आईला आत घेऊन येत असताना आईची कुजबुज मुलीच्या कानावर असावी. तिने पटकन गळ्यातले मंगळसूत्र काढून पर्समधे टाकले. अर्धी लढाई आम्ही जिंकलो होतो.

चाळिशीतील त्या आईने आत आल्या आल्या आपल्या मुलीकडे न पाहता मला प्रश्न केला”क्या हुआ हैं साब?”

मी म्हटलं”आपके घरमे इस लडकिको आप बहुत तकलीफ देते हो, उसके पसंदका खानाभी नही मिलता हैं l………..”

हे मी बोलत असताना मुलगी मान हलवत”नाही नाही, असं काही नाही”असं सुचवत होती

आई एवढंच बोलली,.”उसको सिर्फ ऐसी एक चीज बोलने दो, जो उसने मांगी और हमने दी नही l”.

आई एकटक मुलीकडे पहात होती. जे घडलं होतं त्यावर तिचा विश्वासच बसत नसल्याचं तिच्या डोळ्यात दिसत होतं. मुलीला आईकडे पाहण्याचा धीर होत नव्हता. तिच्या डोळ्यातून आसवं गळत होती.

आई थिजलेल्या डोळ्यांनी मुलीकडे पहात गुजराथीत इतकच बोलली,.”तू खूष आहेस ना बेटा? नेहेमी सुखात रहा”

आणि मुलगी एकदम झेप घेऊन आईच्या गळ्यात पडली. स्फुंदून स्फुंदून रडू लागली. अश्रूंवर आत्तापर्यंत ठेवलेला ताबा आईलाही अनावर झाला. लहान बाळासारखं मुलीला जवळ घेऊन आई तिला थोपटू लागली.

मी महिला पोलीसला खूण केली आणि आम्ही दोघेही केबिनबाहेर गेलो. मायलेकीना मनसोक्त रडू दिलं. ड्युटी ऑफिसरला ताबडतोब तिचा जबाब घ्यायला सांगितले. तिनेही आपल्याला त्या केरळी मुलाबरोबर जायचे नसून स्वखुषीने आईवडिलांकडे जायचे आहे असा सहिनिशी जबाब दिला. तिला परत परत विचारले. ती ठाम होती.

जबाब झाला. सहि शिक्के झाले. आई आणि मुलगी मागच्या दाराने कारमधे जाऊन बसले. त्यांच्याबरोबर मी युनिफॉर्म मधील एक कॉन्स्टेबल दिला. आधीच सांगितल्या प्रमाणे तिच्या वडिलांनी तिच्या मामाला सूचना दिल्या होत्याच.

गाडी मागच्यामागे धोबीतलाव, जी पी ओ, लायन गेट, गोदीच्या आतील रस्त्याने शिवडी, माटुंगा, सायन मार्गे ठाणे आणि पुढे नाशिक मार्गे गुजरात कडे मुलीच्या दुसऱ्या मामाच्या गावी रवाना झाली. मला कोणताही धोका पत्करायचा नव्हता. गाडीमध्ये युनिफॉर्म मधील कॉन्स्टेबल असल्यामुळे गोदीमधे प्रवेश सुकर झाला. गोदीतून गाडी पास झाल्यावर तो उतरून परत आला.

एसीपी सरांना सगळा वृत्तांत कळवला. ते पोलिस ठाण्याची व्हिजिट आटोपून गेले.

त्यांची जीप निघून गेल्यावर समोरच्या रस्त्यावरून नजर ठेऊन असलेले नवरदेव आणि त्याची मित्रमंडळी पोलिस ठाण्यात आली.

मुलगी तिच्या घरी स्वखुषीने गेल्याचे आणि तिला त्या केरळी मुलाबरोबर संबंध ठेवायचे नाहीत असे सांगितल्यावर ते अवाक झाले.त्यांनी

“लेकीन वो गया किधर?”

“किसके साथ गया?”

“अरे हमने हॉटेल रुम भी बुक किया था”. असा गलका करायला सुरुवात केली.

नवरदेव माझ्या समोर येऊन

“लेकीन ऐसा कैसा?”या एकाच प्रश्नाचा एकसारखा जप करत होता.

“ऐसा कैसा मतलब? वो अपने खुषीसे गयी. उसने खुदका वैसा सिग्नेचरके साथ स्टेटमेंट दिया हैं l”… मी त्याला सांगितले.

शेवटी मित्रमंडळ समजून चुकले.

“जाने दो, चलो….. जायेंगे”असं एकमेकांना सांगत ते निघाले.

त्यातील एक दोघाना निघताना या एकूण प्रकाराने, त्या केरळी मित्राची फजिती झाल्याचे इतके हसू येत होते की त्यातील एकजण चक्क पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वाराशी खोखो हसत खाली बसला. सगळाच पोरखेळ.

बस स्टॉप वरील ओळखीतून एकमेकांचा आगापीछा माहीत नसलेले ते दोन अविचारी तरुण जीव, एक महिन्याच्या ओळखीत “एक दुजेके लिये” झाले होते. त्यांना विभक्त केल्याचे पाप मी माथी घेतलं होतं.

तरीही त्या गोतावळ्यातील अपरिपक्वता, त्यांचा सतत उतू जात असलेला उथळ पोरकटपणा, त्याचप्रमाणे या पोरसवद्या नवरदेवाची लग्नाबाबतच्या जबाबदारीची शून्य जाण पाहून त्या मुलीची अनिश्चित भविष्यातून आम्ही केलेली सुटका, योग्य होती की अयोग्य या विचार द्वंद्वातून माझी मात्र सुटका झाली.

— अजित देशमुख.

(निवृत्त) अप्पर पोलिस उपायुक्त.

9892944007.

ajitdeshmukh70@yahoo.in

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..