दिवाळीच्या पाडव्याचा दिस आज आला बाई
घालते सडा अंगणात धन्याची मी वाट पाही ।
लावीते पणती मी दारी केली बघा रोषणाई
फुलला दारीचा मोगरा फुलली हो जाई जुई ।
किती दिस झाले बघा धन्याची माझ्या भेट नाही
करण्या रक्षण देशाचे धनी माझा सैनिक होई ।
ऊन वारा पाऊस तर कधी बर्फ वृष्टी होई
नाही विश्रांती कधी त्यास मन कासावीस होई ।
वाट पाहता धन्याची डोळे माझे ओले होई
लावता सुगंधी तेल शीण त्याचा जाईल बाई ।
लाऊनी ऊटणे सुवासीक त्यासी न्हाऊ घालीन मी
घालता अंघोळ माझ्या राया जीव वेडावून जाई ।
दोन डोळ्यांची निरांजने करती ग औक्षण बाई
करी रक्षण कुंकवाचे हेच मागणे ग अंबाबाई ।
व्हावे कल्याण सर्वांचे नाही मागणे माझे काही
घरधनी व्हावा सुखी हीच ओवाळणी मला देई ।
सुरेश काळे
मो.9860307752
सातारा.
८ नोव्हेंबर २०१८