व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेला श्रीराम पचिंद्रे यांचा लेख
स्वदेशी हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वाचा मंत्र होता. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने युवा विनायक दामोदर सावरकरांनी पुण्यात परदेशी कपड्यांची होळी करून स्वदेशीचा झेंडा उचलला होता. १९१५ मध्ये महात्मा गांधी यांचे दक्षिण आफ्रिकेतून भारतात आगमन झाले. १९२० मध्ये टिळकांचा मृत्यू झाला, त्या दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर हे कारावासात होते. याच दरम्यान महात्मा गांधी यांचा स्वातंत्र्य चळवळीत उदय झाला होता. लोकमान्यांच्या अंत्ययात्रेला गांधीजी उपस्थित होते. तोपर्यंत त्यांची लोकप्रियता वाढत चाललेली होती. त्यांच्या सत्य, अहिंसा ह्या मूलमंत्रांबरोबर स्वदेशी हाही एक मूलमंत्र होता. स्वदेशी हा भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत एक महत्त्वाचा कार्यक्रम होता. स्वदेशी चळवळीला राजकीय स्वातंत्र्यापेक्षा देशाचे आर्थिक स्वातंत्र्य अभिप्रेत होते. चरखा हे ह्या आर्थिक स्वातंत्र्याचे एक साधन होते.
चरखा हे हातांनी चालवण्याचे साधन आहे. महात्मा गांधींचा विज्ञानाला विरोध नव्हता, पण यांत्रिकतेच्या अतिरेकाला होता. रामकृष्ण परमहंस यांच्या आध्यात्मिक अर्धांगिनी शारदामाता यांचे १९२० मध्येच देहावसान झाले. पण तत्पूर्वीच त्यांनी चरख्याचे महत्त्व जाणले होते. भारतातील खेडोपाड्यातल्या स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य मिळण्यासाठी चरख्याची चळवळ आवश्यक आहे, असे शारदामाता यांनी म्हटले आहे. चरखा हे स्वदेशीचे एक प्रतीक होते. देशातल्या सर्व नागरिकांनी चरखा चालवल्याने इंग्रज देश सोडून जातील आणि भारताला स्वातंत्र्य मिळेल, असे समजण्याएवढे गांधीजी भाबडे नक्कीच नव्हते. चरखा चालवून सूत कातणे आणि हातमागावर विणलेल्या कापडातून स्वतःचे कपडे शिवून ते वापरणे, यातून भारतातील खेडी कापडापुरती स्वयंपूर्ण होतील. अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मूलभूत गरजांपैकी अन्न शेतकरी खेड्यातल्या खेड्यात पिकवत होतेच, डोक्यावर छत असण्यापुरता निवारा गरिबातला गरीब माणूस गावात बांधू शकत होता आणि राहता राहिला वस्त्राचा प्रश्न- तो चरखा आणि हातमागाने सोडवला की ज्यामुळे खेड्यांना शहरांवर अवलंबून राहावे लागणार नाही, पर्यायाने इंग्लंडसारख्या जेत्या राष्ट्राच्या आर्थिक गुलामगिरीतून भारतातील खेडी मुक्त होतील. ८० टक्के भारत खेड्यात राहात असल्याने एवढी मोठी लोकसंख्या आर्थिकदृष्ट्य स्वतंत्र झाल्यास सारा देश लवकरच स्वतंत्र होईल, असे महात्माजींना वाटत होते. त्यासाठी त्यांनी स्वतःपासून ही चळवळ सुरू केली.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एका वर्षात महात्मा गांधींची हत्या झाली. त्यानंतर चरखा आणि खादी हा विषय मागे पडला. देशात उद्योग मूळ धरू लागले. वास्तविक भारतात जमशेटजी टाटांनी मागेच उद्योगांची मुहूर्तमेढ रोवली. १९५० नंतर भारतात उद्योगांना वेग येण्यास आरंभ झाला. देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू हे विज्ञान आणि त्याचबरोबर मोठ्या उद्योगांचे पुरस्कर्ते होते. १९५६ च्या औद्योगिक धोरणामुळे भविष्यातील भारतातील औद्योगिक क्रांतीची सुरुवातच झाली, असे म्हटले तर ते अवास्तव ठरणार नाही. असे असले तरी स्वदेशीचा खरा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. स्वदेशातील साधनसामग्रीचा उपयोग करून स्वदेशी वस्तू तयार करणे, त्यांची निर्यात विदेशात करणे तिकडून परकीय चलनाद्वारे उत्पन्नात वाढ करणे आणि राष्ट्रीय उत्पन्न वाढवणे हा स्वदेशीचा खरा अर्थ आहे. इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात स्वदेशीला चालना देण्याचा प्रयत्न झाला. जेव्हा रशियाने भारताला क्रायोजेनिक इंजिन देण्यास नकार दिला, तेव्हा भारताने स्वतः ते तयार केले. असे अनेक क्षेत्रात घडलेले दिसून येते. सुपर कॉम्प्युटर द्यायचे अमेरिकेने नाकारले, तेव्हा भारतात त्याची निर्मिती झाली. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) हे स्वदेशीचे एक चांगले उदाहरण सांगता येईल. भारताने स्वबळावर अंतराळ संशोधन करण्यासाठी ही संस्था स्थापन केली. आता देशाचे हे स्वप्न साकारू लागले आहे. १९६९ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या इस्रोने आज स्वतः च्या बळावर अंतराळ संशोधनात भरारी घेतलेली आहे. अगदी अलीकडच्या मंगळ अभियानाने जगाच्या भुवया उंचावल्या गेल्या असल्या, तरी त्याआधीपासूनच ह्या संस्थेची वाटचाल दमदारपणे सुरू होती. भारतात अंतराळ संशोधनाचा आरंभ १९२० मध्ये झाला. डॉ. एस. के. मित्रा हे कोलकत्यातील शास्त्रज्ञ, भारतीय अंतराळ संशोधनाचे अग्रदूत मानावे लागतील. नंतर डॉ. सी. व्ही. रमण, मेघनाद साहा यांनी हे संशोधन पुढे नेले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर विक्रम साराभाई आणि होमी भाभा यांनी अंतराळ संशोधन संस्थेला आधुनिक रूप दिले. १९६९ मध्ये इस्रोला नवे आधुनिक रूप मिळाल्यामुळे ते संस्थेच्या स्थापनेचे वर्ष धरले जाते.
पी. व्ही. नरसिंहराव हे भारताचे पंतप्रधान असताना डॉ. मनमोहन सिंह हे अर्थमंत्री होते. त्यांच्या काळात आणि त्यांच्याच पुढाकाराने भारतात जागतिकीकरण आणि उदारीकरण आले. यामुळे विज्ञान-तंत्रज्ञान, शिक्षण, उद्योग, व्यापार अशा अनेक क्षेत्रात जगाची दारे भारतासाठी खुली झाली. भारतीय उद्योग आणि विदेशी उद्योग यांच्यात देवाणघेवाण सुरू झाली. हा काळ होता विसाव्या शतकातल्या शेवटच्या दशकातला. ह्या जागतिकीकरणामुळे खऱ्या अर्थाने स्वदेशीला प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळाले. एकविसाव्या शतकातील वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानातील प्रगतीचा तो खऱ्या अर्थाने आरंभ होता. त्या आधीच्या काळात पंतप्रधान राजीव गांधी यांनी दूरदृष्टीने संगणकयुगाला भारतात आमंत्रण दिले होते. पुढील काळातील विज्ञान-तंत्रज्ञान, माहिती -तंत्रज्ञान पर्वात देशातील नवयुवकांना त्याचा फार मोठा लाभ झाला आणि स्वदेशीला वेगळे परिमाण लाभले.
देशाची प्रगती ही आर्थिक परिप्रेक्ष्यात मोजली जाते. आज एकविसाव्या शतकामधील वीस वर्षे पूर्ण झालेली असताना देशाची आर्थिक स्थिती काही चांगली आहे, असे म्हणता येत नाही. जागतिक महामंदी, देशातील नोटबंदी, जीएसटी आणि आज ज्याने हाहाकार माजवला आहे, तो कोरोना विषाणू- असे काही घटक आज देशाच्या आर्थिक मोडकळीला जबाबदार आहेत. यातून आपण निश्चितच सावरणार आहोत. ह्या गोष्टीला जरा वेळ लागेल, हे खरे. पण आपले सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर होण्याचे आवाहन भारतीयांना केलेले आहे, त्यांनी जर आत्मनिर्भर होण्याचा काही ठोस मार्ग दाखवला, तर आपण त्या दिशेने वाटचाल करू शकू. त्यासाठी पंतप्रधानच नव्हे, तर त्यांचे सहकारी असोत, प्रचारक असोत, अर्थतज्ज्ञ असोत कोणीतरी तरुणांना मार्गदर्शन करायला हवे. तसे झाले तर देश निश्चितपणे आत्मनिर्भर होईल यात काही शंका नाही. तसे झाले तर ती स्वदेशीची कास धरल्यासारखेच होणार आहे.
– श्रीराम पचिंद्रे
(कार्यकारी संपादक, दै. ‘पुढारी’, कोल्हापूर, ‘शाहू’ ह्या राजर्षी शाहू महाराज यांच्यावरील एकमेव कादंबरीचे लेखक, सहा आवृत्त्या प्रकाशित, इंग्रजी अनुवादाच्या तीन आवृत्या प्रकाशित, कादंबरीतील पाठ बालभारतीच्या पाचवी मराठी पुस्तकात समाविष्ट, एकूण १६ पुस्तके प्रकाशित. तीस पुरस्कार प्राप्त. हजारहून अधिक लेख, पाच हजार व्याख्याने.)
(व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंका मधून)
Leave a Reply