स्वातंत्र्यदिनी मातृभूचे आक्रंदन
घामेजले शरीर, भडका दिशांत झाला
दूषित भूमी झाली, वारा विषारी झाला
तोडुनी वृक्षराई, डोंगर उजाड केला
निसर्ग कोपूनिया दुष्काळ माथी आला
स्वातंत्र्यतेज आमुचे, सारे दूषित झाले
आम्हीच हे स्वहस्ते, ऐसे अघोर केले
ऐशा कुकर्मी आज,जनताच त्रस्त सारी
स्वातंत्र्य हे कशाचे? ना संपली गुलामी
सारे विषारी अन्न,भाजीत विष मिळते
पाणी नदीतले ही, सारे अशुद्ध झाले
ही स्वैरता अघोरी, कैसा विकास झाला
स्वातंत्र्य भोगताना, हा सर्व घात झाला
संस्कारहीनतेसी, येथे मिळे प्रतिष्ठा
ढोंगीच तज्ञ बनती, तज्ञां मिळे उपेक्षा
सेंद्रिय नासवोनी, करतात रोज हत्या
ही लादली गुलामी,कैसी स्वतंत्र जनता
ही आजची अवस्था नाही उगाच झाली
सात्विक वारशाची आम्हीच हानी केली
स्वातंत्र्य गर्जताना, स्वार्थां जतन केले
आम्हीच मातृभूला, ऐसे उजाड केले
स्वैराचारी जमते जनता
एकच त्यांचा असतो गलका
मोफत सारे द्या द्या म्हणती
धोंडे मारत दंगे करती
कर्जे घेऊनी फेड न करती
स्वैराचारे व्यसने करती
राष्ट्रहिताचा विचार सोडूनी
संविधान हे सहजी मोडिती
जनसेवेची करूनी चेष्टा
उपभोगिती जे सदैव सत्ता
निवृत्तीचे वेतन घेती
पुन्हा पुन्हा जरी निवडून येती
या स्वैरतेस आज देण्यास तीव्रधक्का
येणार कोण बोला, येणार कोण बोला
तोंडात एक भाषा, पोटात देशद्रोह
राष्ट्रास तोडणारे , ऐसे अभद्र भाव
निसर्ग आणि भूमी,केली उजाड ऐशा
ढोंगीजनांस आता, देण्यास तीव्रधक्का
येणार कोण बोला, येणार कोण बोला
रचनाकार : देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने.
मोबाईल : ९८८१३७३५८५
सद्य परिस्थितीचे यथायोग्य वर्णन केले आहे