ll श्री स्वामी समर्थ ll
“श्री स्वामी समर्थ” महाराजांचा प्रभावी मंत्र व मंत्र जप कसा करावा आणि जप करण्याचे लाभ –
अठराव्या शतकात (इ. स. १८५६-१८७८) अक्कलकोट मध्ये अलौकिक संत “श्री स्वामी समर्थ महाराज” हे प्रगट झाले होते. श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा अवतार दत्त परंपरेतील चौथा अवतार मानला जातो.
आपण जर नित्यनेमाने “श्री स्वामी समर्थ” मंत्राचा जप केला तर आपल्याला त्याचे असंख्य लाभ मिळू शकतात. मंत्र जप केल्याने आपल्या शरीरात नवीन ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे आपले मन प्रसन्न राहते, शांती मिळते व त्यामुळे आपली सर्व कामे विनासयास पार पाडतात. भक्तहो, ‘श्री स्वामी समर्थ’, हा शास्त्र शुद्ध-स्वयंभू आणि स्वत: श्री स्वामी समर्थाची अनुमती असलेला मंत्र आहे.
या लेखाच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ मंत्राची माहिती आपण पाहणार आहोत.
श्री स्वामी समर्थ मंत्र जप लाभ –
१) स्वामी स्वामी समर्थ ह्यांच्या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीचे स्वास्थ उत्तम राहते. आणि बऱ्याच रोगांपासून मुक्ती मिळते.
२) मंत्र जप केल्याने मानसिक शांततेसोबतच त्या व्यक्तीचे डोके थंड होऊन स्वभावात आपसूकच विनम्रता येते.
३) तापट, शीघ्रकोपी व्यक्तींनी तर नियमित श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करावा, अशा व्यक्तींच्या आचरणातील फरक आपसूकच लक्षात येईल.
४) श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप केल्यास व्यक्तीला जीवनात सर्वच कार्यक्षेत्रात यश मिळतेच.
५) मंत्र जप केल्याने मुलांच्या अभ्यासात लक्षणीय सुधारणा होते.
६) मंत्र जप केल्याने मनुष्याच्या जीवनात सुबत्ता येऊन जीवन सुखी समृद्ध होते.
७) मंत्र जप केल्याने व्यक्तीच्या शरीरात सकारात्मक ऊर्जा लहरी निर्माण होतात.
८) मंत्र जप केल्याने सर्व संकटाशी लढण्याचे बळ मिळते आणि मार्गही मिळतो.
९) मंत्र जप केल्यामुळे व्यक्तीचा कल आध्यात्मिक होतो.
जप कसा करावा –
जप करण्याची सुद्धा एक पद्धत असते. जपमाळेतील मण्यांना तर्जनीचा म्हणजेच अंगठ्या शेजारील पहिल्या बोटाचा व करंगळीचा स्पर्श होता कामा नये. जपमाळेमध्ये जो मेरुमणी असतो तो ओलांडायचा नसतो. एक माळ झाल्यानंतर दुसरी माळ करताना तेथूनच उलट फिरवायची असते. रोज जप करताना शक्यतो एकाच स्थानावर आणि एकाच आसनावर बसावे. तुमच्या जपमाळेचा स्पर्श जमिनीस होणार नाही याची तुम्ही काळजी घ्यावी. श्वास आत घेताना व बाहेर सोडताना मंत्र जपावा. हे सर्व अत्यंत एकाग्रतेने करावे. या प्रकारे सलग ११ जपमाळ केल्यानंतर तुम्हाला असा अनुभव येईल की, त्यानंतरही आतल्या आत मंत्र आपोआप काही काळ चालू राहतो. स्वामींचा जप करण्यासाठी तुम्ही रुद्राक्ष, रक्त चंदन अथवा तुळशी ची जपमाळ वापरू शकता. जप करते वेळेस एखाद्या आसनावर बसून मग जपास सुरुवात करावी. तुमच्या घरातील स्वामींच्या फोटो समोर बसून तुम्ही जप करू शकता. जर तुमच्या घरी स्वामींचा फोटो नसेल तर डोळे बंद करून स्वामींची प्रतिमा डोळयासमोर आणा आणी जपास प्रारंभ करा.
जपाचे प्रकार –
मोठ्या आवाजात बोलून जप करणे म्हणजे ‘कनिष्ठ जप’.
ओठ हलवून हळू आवाजात पूटपुटून जप करणे म्हणजे मध्यम जप यालाच ‘उपांशु जप’ असेही म्हटले जाते. जर तुमच्या शेजारी असलेल्या व्यक्तीला जप ऐकू जात असेल तर तो उपांशु जप नाही मानला जात. एखाद्या साधकाची साधना हि उपांशु जपातच सिद्ध होत असते.
आणि ओठ बंद करून दातांच्या आत जीभहि न हलवता प्रत्येक अक्षराचा स्पष्ट उच्चार मनानेच करून चिंतन करणे करणे म्हणजे ‘मानस जप’ होय. हा सर्वात उत्तम जप मानला जातो. पण असा जप करणे अवघड आहे, अनेक वर्षांच्या सरावानंतर हे शक्य होऊ शकते. या अशा जपाची फलश्रुती हि उपांशु जपापेक्षा निश्चितच जास्त असते.
“श्री स्वामी समर्थ” हा मंत्र खरोखरच अत्यंत प्रभावशाली आहे याची अनुभूती जप करणाऱ्या व्यक्तीस येतेच.
ll श्री स्वामी समर्थ ll
Shri Swami Samarth
Khup Chan
खूप छान माहिती दिलेली आहे
अशीच माहिती देत रहा.
श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏