माझ्या दिव्यांच्या संग्रहामध्ये कित्येक दिवे मी माझ्या कल्पनेने बनविलेले आहेत. अगदी अलीकडे नेहेमींप्रमाणे स्वामी समर्थांचे दर्शन घेतांना एक कल्पना सुचली. लहानपणी आम्ही भावंडे, वीज नसलेल्या आमच्या आजोळच्या घरी जात असू. तेथे आरतीसाठी संपूर्ण देवघरात देवांपुढे लावलेली एक मोठी समई, आजीच्या भोवती आमचे भावंडांचे कोंडाळे, भिंतीवर पडणाऱ्या आमच्याच सावल्या… हे सर्व मनात घर करून राहिलेले ! याची तीव्रतेने आठवण झाली.
स्वामी समर्थांचा मांडीवर टेकलेला उजवा हात आणि आधारासाठी जमिनीवर ( व्याघ्रासनावर ) ठेवलेला डावा हात ही सर्वपरिचित प्रतिमा एका पितळी पत्र्यावर केवळ बाह्यरेषा कापून तयार करून घेतली.एका अतिशय सुंदर कोरीव काम असलेल्या दिव्याला मागच्या बाजूला बोल्ट्स बसवून घेतले. त्यामध्ये ही स्वामी प्रतिमा बसविली.
खोलीमध्ये दुसरा कुठलाही दिवा न लावता, केवळ हा दिवा लावला आणि भिंतीपासून विशिष्ट अंतरावर ठेवला की स्वामींची सावली भिंतीवर दिसू लागते. मनातील भक्ती , दिव्याचा मंगल प्रकाश आणि भिंतीवर प्रकटणारे स्वामी पाहताना … तूर्यावस्थेत जायला फार वेळ लागत नाही.
।। श्री स्वामी समर्थ ।।
— मकरंद करंदीकर.
( हा लेख शेअर केल्यास कृपया तो माझ्या नावासह शेअर करावा )
Leave a Reply