आधुनिक काळातील संत आणि कवी सदगुरु स्वामी स्वरूपानंद यांचा जन्म १५ डिसेंबर १९०३ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पावस या गावी झाला.
त्यांचे जन्मनाव रामचंद्र विष्णू गोडबोले. त्यांचे प्राथमिक शिक्षण पावस येथे, तर माध्यमिक शिक्षण रत्नागिरी येथे झाले. ते पुढील शिक्षणाकरता मुंबईला ‘आर्यन एज्युकेशन सोसायटी’च्या आंग्रेवाडीतील विद्यालयात गेले. त्यांचे वाङ्मयविशारद पदवीचे शिक्षण पुण्याच्या ‘टिळक महाविद्यालया’त झाले. शिक्षण काळातच वयाच्या विसाव्या वर्षी त्यांना सद्गुरु गणेश नाथ महाराज यांचा अनुग्रह झाला. त्यांनी ब्रिटीश सत्तेच्या विरोधात असहकार आंदोलनात भाग घेतला. त्यात त्यांना पुण्यातील येरवडा कारागृहात तुरुंगवास सोसावा लागला. येथे त्यांनी अखंड सोsहं साधना केली. त्यामुळे त्यांच्या देहाचे आणि मनाचे अमुलाग्र परिवर्तन झाले.
कारागृहातच त्यांना एस. एम. जोशी, अच्युतराव पटवर्धन, शंकरराव पटवर्धन यासारखे त्यांना स्वामी म्हणून संबोधू लागले. स्वामी स्वरूपानंदांनी त्यांच्या महासमाधीपर्यंत म्हणजे जवळजवळ १९३४ ते १९७४ असे चाळीस वर्षे वास्तव्य आंबेवाले देसाई यांच्या घरात ‘अनंत निवास’मध्ये एका खोलीत केले. तेथेच त्यांना निर्गुण-निराकार श्रीमहाविष्णूच्या सगुण रूपाचा साक्षात्कार १९४२ साली झाला. त्यांनी अनंत निवासमधील वास्तव्य काळातच ‘श्रीमत् अभंग ज्ञानेश्वरी’, ‘श्रीभावार्थगीता’, ‘श्रीअभंग अमृतानुभव’, ‘संजीवनी गाथा’ (अभंग संग्रह), ‘चांगदेव पासष्टी’ यांसारखे प्रासादिक अनुवादित ग्रंथ लिहिले.
स्वामी स्वरूपानंद यांनी आयुष्यभर ज्ञानेश्वरीतील आध्यात्मिक विचार सुबोधपणे साधकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. ” मृत्यू पावलो आम्ही ” या शब्दात स्वतःच्या मृत्यूचा अनुभव तारखेनिशी नोंदवला. भगवान विष्णूचे त्यांना साक्षात दर्शन झाले होते. १५ ऑगस्ट १९७४ रोजी स्वामी स्वरूपानंद पावस येथे समाधिस्त झाले. रत्नागिरी जवळ पावस येथे त्यांचे आज भव्य मंदिर आहे. मंदिर अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे. स्वामींचे चैतन्यारुपात अखंड वास्तव्य आहे असे मानले जाते. मंदिरात भक्तनिवास आणि प्रसादाची सोय आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply